(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Fuel Price : क्रूड ऑइलच्या दरात घट, तरीही भारतात इंधन दर का घटेना? जाणून घ्या कशी होईल दर कपात
Petrol Diesel Price in India : मागील काही दिवसांपासून आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात घट होत आहे. मात्र, देशात इंधन दरात कपात झाली नाही.
Petrol Diesel Price in India : देशातील बहुतेक राज्यांमध्ये पेट्रोलचे दर 100 रुपयांहून अधिक आहे. मागील काही दिवसांमध्ये डिझेलच्या दरातही वाढ झाली आहे. इंधन दरवाढी मागे कच्च्या तेलाच्या दरात वाढ होत असल्याने दरवाढ होत असल्याचा तर्क दिला जात होता. मात्र, मागील काही दिवसांपासून आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर कमी होऊ लागले आहेत. मात्र, भारतातील इंधन दरात कपात झाली नाही.
भारतात इंधन दर काय?
देशात मागील 25 दिवसांपासून पेट्रोल-डिझेलच्या दरात कोणतेही बदल झाले नाहीत. कच्चे तेल निर्यात करणाऱ्या देशांमधून सातत्याने ब्रेंट क्रूड स्वस्त होत असल्याचे वृत्त समोर येत आहे. त्यामुळे देशात इंधन दरात कपात कधी होणार हा प्रश्न उपस्थित केला जात आहे. IOCL च्या संकेतस्थळानुसार, दिल्लीत एक लीटर पेट्रोलची किंमत 103.97 रुपये आणि डिझेलचा दर प्रति लीटर 86.67 रुपये इतका आहे.
कधी आणि कसे कमी होणार दर
जागतिक स्तरावर कच्च्या तेलाचे दर आणखी काही दिवस घसरण्याची शक्यता आहे. ही घसरण कायम राहिल्यास भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत घट होण्याची शक्यता आहे. अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, देशांतर्गत किरकोळ किमती १५ दिवसांच्या 'रोलिंग' सरासरीच्या आधारे ठरवल्या जातात. अशा स्थितीत जागतिक स्तरावर दर सातत्याने घसरल्यानंतरच देशात इंधनाचे दर कमी होतील.
क्रूड तेलाची किंमत काय आहे
जागतिक बेंचमार्क ब्रेंट कच्च्या तेलाच्या किमती नोव्हेंबरमध्ये (25 नोव्हेंबरपर्यंत) प्रति बॅरल सुमारे 80-82 डॉलर इतकी होती. मागील शुक्रवारी कच्च्या तेलाच्या किंमतीत प्रति बॅरल 4 डॉलरने आणखी घट झाली. लंडनच्या ICE मध्ये त्याची किंमत सहा डॉलरने आणखी कमी झाली. कच्च्या तेलाच्या दरातील ही घट कोरोनाचा नवीन व्हेरियंट ओमिक्रॉनमुळे निर्माण झालेल्या भीतीचा परिणाम असल्याचे म्हटले जाते.
भारतात इंधन कंपन्यांनी दर कमी का केले नाहीत?
देशातील सरकारी पेट्रोलियम कंपन्या इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (IOC), भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (BPCL) आणि हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन (HPCL) दररोज पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत बदल करतात. परंतु, दरातील बदल हा गेल्या पंधरवड्यातील सरासरी बेंचमार्क आंतरराष्ट्रीय दरावर आधारित आहे. त्यामुळे रविवारी पेट्रोल आणि डिझेलचे दर गेल्या पंधरा दिवसांच्या सरासरीनुसार ठरले आहेत.
सूत्र काय म्हणतात?
एका सूत्राने सांगितले की, 'आंतरराष्ट्रीय स्तरावर जेव्हा आणखी काही दिवस किंमती कमी होत राहतील, तेव्हाच पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी होतील'. अलीकडेच, अमेरिका, जपान आणि दक्षिण कोरियासह भारतासारख्या तेलाचा वापर करणार्या प्रमुख देशांनी आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या किमती कमी करण्याच्या संयुक्त प्रयत्नांचा एक भाग म्हणून त्यांच्या स्ट्रेटेजिक रिजर्व कोट्यातून कच्चे तेल वापरात आणण्याची घोषणा केली होती. मात्र, त्याचाही फारसा परिणाम झाला नाही. आंतरराष्ट्रीय बाजारातील तेलाच्या किंमतीत घट झाली नाही.