बापरे बाप! 6 महिन्यांत 550 टक्के रिटर्न्स, विजय केडिया यांच्याकडे तब्बल 1100000 शेअर्स; 'या' कंपनीने अनेकांना केलं मालमाल
शेअर बाजारात अशा अनेक कंपन्या आहेत, ज्या अवघ्या काही महिन्यांत मल्टिबॅगर ठरल्या आहेत. या कंपनीने तर आपल्या गुंतवणूकदारांना सहा महिन्यांत मालामाल केलं आहे.
मुंबई : टीएसी इन्फोसेक या छोट्या कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना चांगले रिटर्न्स दिलेले आहेत. गेल्या सहा महिन्यांत या कंपनीचा शेअर हे 550 टक्क्यांनी वाढलेला आहे. म्हणजेच ही कंपनी मल्टिबॅगर ठरलेली आहे. शुक्रवारी (11 ऑक्टोबर) या कंपनीच्या शेअरचे मूल्य 685 रुपये आहे. या कंपनीचा आयपीओ 27 मार्च 2024 रोजी गुंतवणुकीसाठी खुला झाला होता. आयपीओ आला तेव्हा या कंपनीच्या शेअरचे मूल्य 106 रुपये होते. या कंपनीत दिग्गज गुंतवणूकदार विजय केडिया यांनी मोठी गुंतवणूक केलेली आहे. त्यांच्याकडे या कंपनीचे 11 लाखांपेक्षा अधिक शेअर्स आहेत.
कंपनी सूचिबद्ध झाली तेव्हा गुंतवणूकदारांना 187 टक्के फायदा
टीएसी इन्फोसेक (TAC Infosec) या कंपनीचा आयपीओ आला तेव्हा या कंपनीच्या प्रत्येक शेअरचे मूल्य 106 रुपये होते. ही कंपनी 5 एप्रिल 2024 रोजी शेअर बाजारावर सूचिबद्ध झाली. ही कंपनी शेअर बाजारावर सूचिबद्ध झाली तेव्हा या कंपनीच्या शेअरचे मूल्य थेट 290 रुपयांवर पोहोचले. पुढे त्याच दिवशी हा शेअर 304.50 रुपयांवर पोहोचला. या पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांना थेट 187 टक्क्यांपेक्षा अधिक रिटर्न्स मिळाले. या कंपनीचा आयपीओ 422.03 पट सबस्क्राईब झाला होता. हा आयपीओ किरकोळ गुंतवणूकदार श्रेणीत 433.80 पटीने सबस्क्राईब झाला होता. गैर संस्थात्मक गुंतवणूकदारांच्या विभागात हा आयपीओ 768.89 पटीने सबस्क्राईब झाला होता.
विजय केडिया यांच्याकडे 11 लाख शेअर्स
दिग्गज गुंतवणूकदार विजय केडिया यांनीदेखील या कंपनीत कोट्यवधी रुपये टाकलेले आहेत. त्यांच्याकडे टीएसी इन्फोसेक (TAC Infosec) या कंपनीचे जवळपास 11 लाख 47 हजार 500 शेअर्स आहेत. या कंपनीत त्यांची मालकी 10.95 टक्के आहे. ही सर्व माहिती एनएससीच्या संकेतस्थळावरून घेण्यात आलेली आहे. वरील सर्व माहिती ही 3 एप्रिल 2024 पर्यंतची आहे. विजय केडिया यांच्यासह त्यांचा मुलगा अंकित केडिया यांच्याजवळ या कंपनीचे 3 लाख 82 हजार 500 शेअर्स आहेत. त्यांची या कंपनीत 3.65 टक्के हिस्सेदारी आहे.
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)
हेही वाचा :
पुन्हा पडणार पैशांचा पाऊस, 16 ऑक्टोबर रोजी येणारा 'हा' आयपीओ देणार तब्बल 55 टक्क्यांनी रिटर्न्स?