Bank Strike: ग्राहकांनो लक्ष द्या; या दोन दिवशी बँक कर्मचाऱ्यांनी पुकारला संप, त्याआधी करा झटपट काम
Bank Strike: बँक कर्मचारी संघटनांनी आपल्या विविध मांगण्यासाठी दोन दिवसांचा संप पुकारला आहे. त्याबाबत आज माहिती देण्यात आली.
Bank Strike: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण एक फेब्रुवारी रोजी देशाचा अर्थसंकल्प (Union Budget 2023) सादर करणार आहेत. मात्र, त्याच्या दोन दिवस आधीच सरकारी बँक कर्मचारी केंद्र सरकारची चिंता वाढवण्याच्या तयारीत आहेत. बँक कर्मचाऱ्यांची संघटना युनायटेड फोरम ऑफ बँक युनियनच्या (UFBU) बैठकीत संपावर (Strike) जाण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बँक कर्मचाऱ्यांनी (Bank Strike) 30 आणि 31 जानेवारी रोजी संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे.
युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स ही विविध बँक कर्मचार्यांच्या संघटना एकत्र करून स्थापन केलेली संघटना आहे. बँक संघटनांनी आपल्या मागण्यांबाबत सरकारवर दबाव आणण्यासाठी संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशनचे सरचिटणीस सीएच वेंकटचलम यांनी सांगितले की, युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सची बैठक झाली आहे. आमच्या मागण्यांबाबत पत्र लिहूनही इंडियन बँक असोसिएशनकडून कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही. त्यानंतर बँक संघटनांनी दोन दिवस संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे.
बँक कर्मचाऱ्यांचा संप कशासाठी?
बँक कर्मचारी युनियनने बँकिंग कामकाज पाच दिवसांचे करण्याची मागणी केली आहे. त्याशिवाय, राष्ट्रीय पेन्शन योजना संपुष्टात आणावी, पगार वाढीबाबतच्या वाटाघाटी सुरू कराव्यात, बँकांमधील सर्व कॅडरमध्ये भरती प्रक्रिया लागू करावी आदी मागण्या करण्यात आल्या आहेत. या मागण्यांना घेऊन बँक कर्मचारी संघटनांनी दोन दिवसांच्या संपाची हाक दिली आहे.
बँकिंग व्यवहाराला फटका बसण्याची शक्यता
बँक कर्मचारी दोन दिवसाच्या संपावर जाणार असल्याने सामान्य ग्राहकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. बँक कर्मचारी संघटनांनी सोमवारी आणि मंगळवारी संप पुकारला आहे. रविवारी साप्ताहिक सुट्टी असल्याने बँकिंग व्यवहार तीन दिवस बंद असणार आहेत. त्यामुळे एटीएममध्ये रोख रक्कमेचा तुटवडा आणि चेक वटवण्यासाठी वेळ लागण्याची शक्यता आहे. त्याशिवाय, जानेवारी महिन्याचे शेवटच्या दिवशी संप पुकारण्यात आला आहे. या दिवसांमध्ये पगार, पेन्शन जमा केले जातात. संपामुळे याला उशीर होण्याची शक्यता आहे.
नोव्हेंबर महिन्यात संप घेतला होता मागे
नोव्हेंबर महिन्यातही विविध मागण्यांसाठी बँक कर्मचाऱ्यांनी संप पुकारला होता. मात्र, इंडियन बॅंक असोसिएशनने कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत चर्चा करण्याची तयारी दर्शवली होती. त्यानंतर कर्मचारी संघटनेने संप मागे घेतला होता.