BLOG | 'पुन्हा' कोरोनावर बोलू काही!
राज्यात कोरोनाबाधितांची आकडेवारी झपाट्याने वाढत असताना मात्र याबाबत आजही गांभीर्याने नागरिकांमध्ये चर्चा होताना दिसत नाही. फक्त माध्यमांनी बातम्या द्यायच्या, आरोग्याशी संबंधित यंत्रणेने कोरोनाच्या अनुषंगाने असणारी दैनंदिन माहिती द्यायची हेच सध्या घडत आहे. मात्र यामधून नागरिकांनी बोध घेऊन त्यावर कृती करणे अपेक्षित असताना तसे फारसे काहीच घडत नाही. काही नागरिक या परिस्थितीला अपवाद आहेत. मात्र आजही नागरिक अनाठायी गर्दी करतच आहे, जी गर्दी टाळणे शक्य आहे. बाजारात गर्दी होतंच आहे. सभा, संमेलन. बैठका हे काही दिवसांकरिता टाळणं हे प्रतिबंधात्मक उपाय आहे, तसे करणे गरज आहे. अजून किती रुग्ण आजरी पडल्यावर आपण स्वतःला शिस्त लावून घेणार आहे. प्रशासन जागृत करण्याचे काम करीत आहे. नागरीक निर्बधांची वाट बघत आहे का? असा सवालही येथे उपस्थित होतो. लॉकडाऊन नकोय अशी सगळ्यांचीच भावना असली तरी जो काही या आजाराचा संसर्ग पसरत आहे. त्यावर नियंत्रण आणण्यासाठी काही तरी उपाययोजना कराव्याच लागतील त्यात अत्यावश्यक सेवा वगळून काही काळापुरती संचारबंदी, वाहतुकीवर नियंत्रण असे उपाय योजिले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. लोकांनी या आजाराला न घाबरता सतर्क राहून या आजरांपासून होणारे संभाव्य धोके आणि आजर होऊ नये याकरिता असणाऱ्या उपाय योजनांवर बोलत राहण्याची गरज आहे, काही होत नाही आता सगळं चांगलं चाललंय ह्या वृत्तीतून बाहेर येऊन कोरोनावर बोलण्याची वेळ आता पुन्हा एकदा सगळ्यांवर आली आहे.
कोरोनाची साथ राज्यात येऊन आता वर्ष झाले, नागरिकांना या काळात काय करावे आणि काय करू नये याची चांगलीच माहिती झाली आहे. कोरोनाच्या या साथीकडे शास्त्रीय दृष्टिकोनातून बघितले पाहिजे तरच त्यातील दाहकता लक्षात येईल. गेल्या वर्षभरात राज्यात 52 हजार 556 नागरिकांना या आजाराने आपला जीव गमवावा लागला. तर आतापर्यंत 22 लाख 38 हजार 398 नागरिक या आजाराने बाधित झाले आहे. अद्यापही राज्यात 95 हजार 322 रुग्ण विविध ठिकाणी उपचार घेत आहेत. राज्यात रुग्ण बरे होण्याचं दर चांगला आहे मृत्यूची संख्या मोठ्या प्रमाणात कमी झाली ह्या जमेच्या बाजू असल्या तरी एका बाधित व्यक्तीचे साधारण 14 दिवस या काळात वाया जातात हा मोठा तोटा याकडे कुणीच बघत नाही किंवा बोलत नाही, अनेक मानवी तासांची हानी या आजारामुळे होते. अनेक उद्योग व्यवसाय या साथीच्या काळात बंद पडले आहेत. लोकांचा रोजगार गेला आहे. राज्यात केवळ वरिष्ठ नागरिकच नाही तर धडधाकट तरुणांना ह्या आजाराने ग्रासले आहे. या आजाराचा नायनाट करण्यासाठी मोठ्या प्रमाणात शास्त्रीय पद्धतीने याची जनजागृती करून खरी माहिती देण्याचे काम करण्याची गरज आहे. आपल्याकडे नकारात्मक माहिती पसरवण्यावर जास्त भर असतो. कोरोना हा असा आजार आहे तो कुणालाही आणि कधीही होऊ शकतो, तो गरीब श्रीमंत असा भेदभाव करीत नाही. त्यामुळे अतिआत्मविश्वास न बाळगता प्रशासनाने आखून दिलेले नियम पाळले पाहिजे.
गेले काही दिवस कोरोनाच्या विषाणूने पुन्हां एकदा राज्यातील विविध भागात धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली आहे. हजारोंच्या संख्येने नवीन रुग्ण या आजाराने बाधित होत आहे. अनेकांना वाटत आहे की, कोरोनाबाधितांचे आकडे वाढवून सांगितले जात आहेत. नागरिकांना घाबरवण्यासाठी हे प्रकार होत आहे. तर या भ्रमात राहू नका आणि अशी माहिती देणाऱ्यापासून वेळीच सावध राहणे गरजेचे आहे. राज्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढली आहे. हे वास्तव मानण्यापेक्षा सोयीची माहिती ऐकण्यावर भर देणे आता थांबविले पाहिजे. सध्या मुंबईत नुकतंच एक प्रकरण उजेडात आले आहे. तिथे पॉझिटीव्ह रिपोर्ट निगेटिव्ह करून घेण्यासाठी काही पैसे घेतले जात आहे. हा सगळा प्रकार भयानक आहे, या अशा प्रकारातून किती मोठा संसर्ग पसरू शकतो याची कल्पना न केलेलीच बरी, त्यामुळे नागरिकांनी वेळीच सावधान होण्याची गरज आहे. सुरक्षिततेचे नियम पाळून वावर ठेवणे शक्य आहे त्यास प्राधान्य दिले पाहिजे. प्रशासन प्रत्येक व्यक्तीच्या मागे नियम पाळत आहे का? हे पाहण्यासाठी थांबणार नाही. प्रशासन जे काही या आजराला प्रतिबंध करण्यासाठी प्रयत्न करणे शक्य आहे ते करत असतात. नागरिकांनीच आता लोकांमध्ये जनजगृती केली पाहिजे. विशेष म्हणजे कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये. आपल्याकडे आलेली माहिती फक्त फॉरवर्ड करण्यापेक्षा त्याची सत्यता तपासणीवर भर दिला पाहिजे. आरोग्याच्या आणीबाणीत काही समाज कंटक याचा गैरफायदा घेण्याची शक्यता आहे. त्याच्या कुठल्याच गोष्टीला नागरिकांनी बळी पडू नये.
याप्रकरणी मुंबई शहराच्या कोरोना मृत्यू विश्लेषण समितीचे अध्यक्ष डॉ. अविनाश सुपे यांनी सांगितले की, "एवढं निश्चित लोकांमध्ये जेवढी पूर्वी या आजाराला घेऊन भीती असायची ती आता कमी झाली आहे. लोक बिनधास्त झाले आहे. नागरिकांनी घाबरले नाही पाहिजे हे बरोबर आहे पण सतर्क तर नक्कीच राहण्याची गरज आहे. कारण डॉक्टरांच्या उपचाराला यश येत आहे मोठ्या प्रमाणात नागरिक बरे होत आहे. मृत्यूदर कमी झाला आहे. हा विषय केवळ संसर्ग होतो आणि बरा होतो या इथपर्यंतच मर्यादित नाही. तर यामध्ये नागरिकांचे 14 दिवस वाया जातात त्याकाळात अनेक नागरिक काम करू शकत नाहीत. त्यात या आजारातून बरे झाल्यावर काहींना आणखी त्रास सहन करावा लागतो. हे मोठे नुकसान आहे शिवाय आर्थिक तोटाही सहन करावा लागतो. काही वेळा तरुणांना लक्षणरहित हा आजार झाल्यावर त्यांना फारसे काही होत नसले तरी त्यांच्यापासून घरातील आजूबाजूच्या परिसरातील वरिष्ठ नागरिकांना याचा संसर्ग होऊ शकतो. मृत्यूदर कमी असला तरी हा मृत्यूदर शून्य कसा आणता येईल यासाठी प्रयत्न केले गेले पाहिजे."
फेब्रुवारी 22 ला, 'होय, मी जबाबदार!' या शीर्षकाखाली सविस्तर लिखाण करण्यात आले होते. त्यामध्ये, कोरोनाबाधितांची अचानक संख्या कशी वाढली? असा प्रश्न सध्या अनेकांना पडला आहे. मात्र प्रत्येकजण त्यांच्या सोयीनुसार याचा अर्थ काढत बिनधास्तपणे आपली मतं व्यक्त करताना दिसत आहे. प्रत्येक जण आपली थिअरी सांगत आहे, कुणी टिंगल टवाळी करत आहेत तर कुणी आताच कसा वाढला कोरोना यावरून प्रश्न निर्माण करीत आहेत. कोरोना हा संसर्गजन्य आजार आहे. अनेक वैद्यकीय तज्ञांच्या मते या आजारांवर नियंत्रण मिळवू शकतो मात्र तो कायमस्वरूपी नष्ट करण्यासाठी मोठा कालावधी जावा लागतो. राज्यात कोरोनाचा आजार काल होता, आजही आणि उद्याही राहणार आहे, हे आता नागरिकांनी समजून घ्यावे लागणार आहे. स्वाईन फ्लूचे रुग्ण दहा वर्षानंतर आजही सापडत आहे, त्यांची फक्त संख्या कमी झाली आहे. एखाद्या आजाराची तीव्रता कमी होऊ शकते मात्र तो आजार संपला असा गैरसमज कुणी करून घेऊ नये. या कोरोनाच्या विषाणूमध्ये अनेक जनुकीय बदल (म्युटेशन) होत आहेत. हा आजार होऊ नये म्हणून 'लस' आली आहे. तो प्रतिबंधात्मक उपाय आहे. बहुतांश सर्वसामान्य लोकांना लस मिळण्यासाठी अजून काही काळ जाणार आहे. त्यामुळे या आजाराचा संसर्ग होऊ द्यायचा नसेल तर मास्क लावणे, सोशल डिस्टंसिंगचे पालन करणे आणि हात स्वच्छ धूत राहणे. नागरिकांनी आपली जबाबदारी वेळेवरच ओळखली पाहिजे.
तर राज्य कोरोना विशेष कृती दलाचे सदस्य डॉ. शशांक जोशी यांच्या मते, नागरिक फारच रिलॅक्स झाले आहेत सुरक्षिततेचे नियम फारसे पाळताना दिसत नाहीत. या आजराची भीतीही कमी झाली आहे, मात्र नागरिकांनी नियम पाळले पाहिजे. प्रशासनाला आता आणखी कठोर व्हावे लागणार आहे. लसीकरण मोठ्या संख्येने 24 तास केले पाहिजे. ज्या वरिष्ठ नागरिकांना केंद्रावर येणे शक्य नाही त्यांना घरी जाऊन लस दिली पाहिजे तशी काही तजवीज सरकाने करायला हवी. नागरिकांनी विसरता काम नये कोरोनाची साथ अजूनही राज्यात आहे आणि दिवसेंसदिवस रुग्ण वाढत आहे तर सावधगिरी बाळगली पाहिजे.
या आजाराच्या वाढत्या संसर्गाच्या फैलावामुळे याला प्रतिबंध करण्यासाठी राज्यात निश्चितच काही ठिकाणी कठोर निर्बंध आणावे लागतील त्यासाठी नागरिकांनी तयार राहिले पाहिजे. उगाच गडबड गोंधळ न करता प्रशासन जे नियम आखून देत आहे त्याचे कडक पालन केले पाहिजे. सध्याच्या परिस्थितीत शक्यतो नियम पाळून या वाढत जाणाऱ्या रुग्णसंख्येला आजच आळा घातला पाहिजे, आणि हे शक्य आहे. उद्याच्या आरोग्यदायी जीवनासाठी आज नियम पाळण्याचे एक पाऊल पुढे टाकलेच पाहिजे.
संतोष आंधळे यांचे अन्य ब्लॉग :
- BLOG | मुंबईचा 'कोरोना'!
- BLOG | संसर्ग रोखणे : आव्हान
- BLOG | डायलिसिसच्या रुग्णांना वाट दिसू देगं देवा .....
- BLOG | दाताचा ठणका आणि कोरोना
- BLOG | कोई भी लेलो .... लाल, काला, पिला मास्क
- BLOG | होम कॉरंटाईन वर निष्ठा वाढवेल आपली प्रतिष्ठा
- BLOG | मला कोरोना झाल्यासारखं वाटतंय...
- सोशल डिस्टन्ससिंग म्हणजे काय असतं रे भाऊ?
- BLOG | कोरोनाशी भिडण्याची हीच ती वेळ!
- BLOG | आम्ही बिनधास्त काम करू
- दुःखावर अंकुश ठेवणारा कोरोना
- BLOG | देवभूमीचा कोरोनाशी यशस्वी लढा
- BLOG | 'चाचपणी' संसर्गाच्या फैलावाची
- BLOG | सह्याद्रीच्या मदतीला देवभूमी?
- BLOG | 'नवरक्षक' पीपीई किट ठरणार वरदान
- BLOG | पांगळी मुंबई कुणाला आवडेल?