BLOG | योध्यांवर हल्ले!
देशभरात आतापर्यंत 100 पेक्षा जास्त डॉक्टरांचा कर्तव्य बजावत असताना या संसर्गजन्य आजाराने मृत्यू झाला आहे, तर 1300 पेक्षा जास्त डॉक्टरांना या आजाराचा संसर्ग झाला आहे. सध्याच्या या वैश्विक महामारीच्या काळात या आजाराचा स्वतःला काही संसर्ग न होता रुग्णांवर उपचार करायचे. त्यात या अशा हल्ल्यांमुळे डॉक्टरांचं मानसिक खच्चीकरण होत असल्याची शक्यता नाकारता येत नाही.
एका बाजूला या महाभंयकर संकटात कोरोनाच्या युद्धात लढाई करून रुग्णांचे जीव वाचवून त्यांना बरे करतो म्हणून डॉक्टरांना योद्ध्याची उपमा द्यायची आणि त्यांची चुक नसतानाही त्यांच्यावर हल्ला चढवायचा यामुळे डॉक्टर क्षेत्रात कमालीचा संताप व्यक्त केला जात आहे. कोरोना काळातील या आरोग्य क्षेत्रातील कर्मचाऱ्यांवर हल्ले थांबत असताना महाराष्ट्रात आठवड्यभरात त्यांच्याच क्लिनिकमध्ये जाऊन दोन डॉक्टरांवर हल्ले झाल्याच्या घटना घडल्या आहेत. लातूरनंतर आता नाशिकच्या डॉक्टरांवर सोमवारी हल्ला करण्यात आला आहे. देशभरात आतापर्यंत 100 पेक्षा जास्त डॉक्टरांचा कर्तव्य बजावत असताना या संसर्गजन्य आजाराने मृत्यू झाला आहे, तर 1300 पेक्षा जास्त डॉक्टरांना या आजाराचा संसर्ग झाला आहे. सध्याच्या या वैश्विक महामारीच्या काळात या आजाराचा स्वतःला काही संसर्ग न होता रुग्णांवर उपचार करायचे. त्यात या अशा हल्ल्यांमुळे डॉक्टरांचं मानसिक खच्चीकरण होत असल्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे प्रशासनाने डॉक्टरांना काम करण्यासाठी सुरक्षित वातावरण निर्माण होईल अशा पद्धतीची व्यवस्था करावी लागेल. सामान्य नागरीकांनी सुद्धा आपण काय करतोय याचं तारतम्य बाळगलं पाहिजे. डॉक्टरांकडून तुम्हाला अन्याय झाला असे वाटत असेल तर त्या विरोधात तक्रार दाखल करण्याचा मार्ग असतोच त्याचा अवलंब करावा.
सोमवारी नाशिक येथील अंबड लिंक रोडवरील एका खाजगी रुग्णालयात कोरोना सदृश्य रुग्णाचा मृत्यू झाल्याने संतप्त झालेल्या नातेवाईकांनी रुग्णालयातील डॉक्टरला मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. याचे सीसीटीव्ही फुटेज सगळीकडे व्हायरल होत असल्याने उलटसुलट चर्चा रंगल्या असून यासंदर्भात अंबड पोलिसांत रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासंदर्भात मिळालेली माहिती अशी की, या रुग्णालयात गेल्या तीन-चार दिवसांपासून एक महिला रुग्ण उपचारासाठी दाखल करण्यात आली होती. त्यानंतर सोमवारी ती दगावली सदर रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह होती की, निगेटिव्ह यासंदर्भात माहिती मिळाली नाही. यावरून रुग्णाच्या नातेवाईकांनी डॉक्टरांशी विचारणा केली असता वाद झाला. त्यावरून संतापलेल्या नातेवाईकांनी संबंधित डॉ. दिनेश पाटील यांना मारहाण करून रुग्णालयाची तोडफोड केल्याचे समजते. याप्रकरणी पोलिसांनी संबंधित नातेवाईकांना अटक केली आहे.
इंडियन मेडिकल असोसिएशनचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष, डॉ रवी वानखेडकर, सांगतात की, " नाशिकमधील डॉक्टर हल्ल्याची घटना अत्यंत क्लेशदायक आणि मनाला वेदना देणारी आहे. सध्या कोणता काळ सुरु आहे. संपूर्ण देश एका मोठ्या संकटाबरोबर लढत आहे. आरोग्य यंत्रणेतील सर्व कर्मचारी प्राणाची बाजी लावून दिवस लावून दिवस रात्र मेहता करून रुग्णांना उपचार देत आहे. यामध्ये डॉक्टरांना रुग्ण बरे करण्यात बऱ्यापैकी यश मिळत आहे. सध्या आहे त्या परिस्थितीत प्रचलित औषधांच्या आधारे डॉक्टर रुग्ण वाचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करीत असलयाचे संपूर्ण देशवासीयांनी पहिले आहे. या कोरोना काळात 12 लाख 30 हजार 509 रुग्ण डॉक्टरांचे उपचार घेऊन बरे होऊन घरी गेले आहेत. हे वास्तव तर कुणालाही लपवता तर येणार नाही. त्यामध्ये काही गंभीर रुग्ण दगावल्याच्या घटना आहेतच त्या कुणी नाकारून चालणार नाही. लोक म्हणत असतील, मात्र आम्ही डॉक्टर म्हणजे देव नाही, जे काही आम्ही वैद्यकीय शास्त्रीय ज्ञान घेतले आहे त्याचा पुरेपूर वापर करून आम्ही रुग्णांना बरे करत असतो आणि प्रत्येक डॉक्टरांचा हाच प्रयत्न असतो. प्रत्येक डॉक्टरला त्याच्याकडे आलेला रुग्ण दगावला आहे याचे वाईटच वाटत असते. मात्र अशा पद्धतीने डॉक्टरांना मारहाण म्हणजे अत्यंत्य निंदनीय बाब आहे असे मला वाटते."
ते पुढे असे म्हणतात की, "डॉक्टरांवर यापूर्वीही हल्ले झाले आहे, किती काळ सहन करायचं त्यांनी तो सुद्धा शेवटी एक माणूसच आहे. नाशिकच्या या हल्ल्यात पोलीस प्रशासनाने या संबंधित प्रकरणातील आरोपींवर कडक कारवाई केली आहे त्याबद्दल नाशिक पोलिसांचे आम्ही आभारी आहोत. मात्र गेल्याच आठवड्यात लातूर जिल्ह्यात डॉक्टरांवर जो हल्ला झाला त्याप्रकरणातील आरोपीवर जो साथरोग कायदा अंतर्गत आम्हाला कारवाई अपेक्षित होती ती मात्र झालेली नाही. आज डॉक्टर भयभीत वातावरणात काम करत आहे, त्याना सुरक्षित वाटेल असे वातावरण निर्माण करणे ही शासनसोबत प्रशासनाची जबाबदारी आहे."
20 जुलै रोजी, व्यर्थ न हो बलिदान या शीर्षकाखाली या कोरोना काळात अत्यावश्यक सेवेतील त्यात आरोग्य कर्मचारी आणि डॉक्टरांचा समावेश आहे. या मध्ये 100 पेक्षा जास्त डॉक्टर या संसर्गजन्य आजाराच्या प्रादुर्भावामुळे मृत्यूमुखी पडले आहेत. हे सर्व मृत्यू हे डॉक्टर आपले कर्तव्य बजावत असताना झाले असल्याचे इंडियन मेडिकल असोसिएशन तर्फे सांगण्यात आले आहे. त्या वृत्तात, देशभरात 100 पेक्षा जास्त डॉक्टरांचा या संसर्गजन्य आजाराने मृत्यू झाला आहे, तर 1300 पेक्षा जास्त डॉक्टरांना या आजाराचा संसर्ग झाला आहे. रविवारी राज्यातील सर्वच डॉक्टरांच्या मोबाईलवर डोंबिवली येथील डॉ पंकजकुमार चौधरी यांचा कोरोनाचा संसर्ग होऊन मृत्यू, ही बातमी धडकली आणि पुन्हा या बातमीविषयी डॉक्टरांमध्ये चर्चा सुरु झाली. खरं तर प्रत्येक व्यक्तीचा मृत्यू हा तितकाच महत्वाचा. प्रत्येक मृत्यूमागे एक कुटुंब असते, त्याची एक आपली सामाजिक व्यवस्था असते. कोरोना सोबत सुरु असलेल्या या युद्धात अनेक योध्यांना युद्ध लढत असताना वीरमरण प्राप्त झाले आहे. मग ते डॉक्टर, नर्स, वॉर्डबॉय, आशा वर्कर, आरोग्य सहाय्यक, पोलीस विभाग, राज्य परिवहन महामंडळाचे आणि बी.ई.एस.टी चे चालक, वाहक आणि अन्य कर्मचारी, या ठिकणी काम करणारे आणि तसेच अत्यावश्यक सेवे मध्ये काम करणाऱ्यांना, अनेकांना आपले कर्तव्य पार पडताना या आजाराचा प्रादुर्भाव झाला आहे.
यापैकी अनेक जण उपचार घेऊन बरे होऊन पुन्हा कामावर रुजूही झाले आहेत. त्याच ठिकाणी त्याच व्यवस्थेत ज्या ठिकाणी त्यांना कोरोनाचा प्रादुर्भाव झाला होता. केवळ इतर नागरिकांना त्यांच्या सर्व सेवा सुविधा व्यवस्थित मिळत राहाव्यात म्हणून. त्यांना घरी बसण्याचा 'पर्याय' नसतो कारण त्यांचे कामावर जाणे अनिवार्य आणि अत्यंत गरजेचे असते. हे सगळं सुरु आहे सर्व सामान्य नागरिक सुरक्षित आणि निरोगी राहावेत म्हणून. मात्र या सगळ्यात प्रक्रियेत आपण सामान्य नागरिक म्हणून आपण आपली जबाबदारी पाळतोय का? तसेच या व्यतिरिक्त देशभरातील होमियोपॅथी, आयुर्वेद आणि युनानी विषयातील डॉक्टर यांची आकडेवारी समाविष्ट नाही. या विषयातील डॉक्टरांचाही कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्याची शक्यता नाकारता येत नाही, शिवाय काही जण रुग्णांना उपचार देताना मृत्यू पावले असतील. मात्र या सगळ्याची एकत्र आकडेवारी कुठेही उपलब्ध नाही.
सहा दिवसापूर्वी लातूरमध्ये डॉक्टरांवर अशाच प्रकारे नातेवाइकांद्वारे हल्ला करण्यात आला होता. त्यावेळी येथील अल्फा सुपरस्पेशालिटी रुग्णालयात करोनाग्रस्तांवर उपचार करण्यात येत असून, या रुग्णालयात एका रुग्णाच्या नातेवाइकानं डॉक्टरांवर चाकूनं हल्ला केला. सुदैवानं या हल्ल्यातून डॉक्टर बचावले. त्यांच्यावर उपचार केले असून, त्यांची प्रकृती स्थिर आहे. डॉ. दिनेश वर्मा असं डॉक्टरांचं नाव आहे. या प्राणघातक हल्ल्यातून ते बचावले आहेत. ही घटना घडल्यापूर्वी चार दिवसांपासून रुग्ण या रुग्णालयात दाखल होता. ते वयोवृद्ध होते. त्यात त्यांना मधुमेहाचा त्रास होता. रुग्णाची प्रकृती गंभीर होती हे नातेवाइकांना माहीत होते. मात्र, रुग्ण दगावल्यानंतरही त्याच्या एका नातेवाइकानं डॉ. वर्मा यांच्यावर चाकूने हल्ला केला. या घटनेमुळं तीव्र संताप व्यक्त होत असून, लातूरमधील संघटनेनं या घटनेचा निषेध केला आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपीला अटक करण्यात आली आहे.
राज्याच्या मृत्यू विश्लेषण समितीचे अध्यक्ष डॉ अविनाश सुपे सांगतात की, " या सध्याच्या परिस्थितीत डॉक्टर नाही म्हटलं तरी धोका पत्करून रुग्णांना उपचार देत आहेत. अशा वेळी रुग्णांच्या नातेवाईकांनी थोडाफार विचार करायला पाहिजे. जर काही त्रुटी असतील तर त्यावर बसून चर्चा करायला हवी कींवा सनदशीर मार्गाचा वापर करून त्यांची रीतसर तक्रार करायला हवी. अशा मारहाणीमुळे प्रश्न न सुटता ते होतील त्यामुळे डॉक्टरांच निश्चितपणाने खच्चीकरण होऊ शकते . या काळात एकमेकाना सहकार्य करणे गरजेचे आहेत नाही तर आपणस अन्य अडचणी उभ्या राहू शकतात. "
कुणालाही आपलं जवळचा नातेवाईक गेल्यानंतर त्रास होतोच, मात्र याचा अर्थ तो उपचार करणाऱ्या डॉक्टरांमुळे गेला आहे असे मत तयार करणे चुकीचे आहे. जर तुम्हाला खात्रीशीररित्या माहिती असेल त्या डॉक्टरांची चूक आहे तर त्याच्याविरोधात रीतसर तक्रार करावी. आज पर्यंत अशी उदाहरणे आहेत ज्यामध्ये काही डॉक्टरांनी चूक केली असेल तर त्यांची नोंदणी रद्द होऊ शकते,तसेच अन्य स्वरूपाच्या शिक्षा झालेल्या आहेत. पोलिसात आणि महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेकडे तक्रार करण्याचा नागरिकांना अधिकार आहे. मात्र मारहाण करून कायदा हातात घेतल्यामुळे यामध्ये समाजाचे नुकसान होत आहे. डॉक्टरांनी सुद्धा रुग्णाच्या नातेवाईकांना रुग्ण दाखल होण्यापूर्वी सर्व परिस्थिती समजून सांगावी कुठेही संवादाचा अभाव राहणार याची काळजी घ्यावी, आहे त्या गोष्टी स्पष्ट सांगाव्यात त्यामुळे भविष्यात अशा होणाऱ्या घटना टळू शकतील.
संतोष आंधळे यांचे अन्य ब्लॉग- BLOG | कोरोनाचे आकडे बोलतात तेव्हा...
- BLOG | फिजिओथेरपीचं योगदान महत्वाचं!
- BLOG | 'डेक्सामेथासोन'!
- BLOG | डायलिसिसच्या रुग्णांना वाट दिसू देगं देवा .....
- BLOG | दाताचा ठणका आणि कोरोना
- BLOG | कोई भी लेलो .... लाल, काला, पिला मास्क
- BLOG | होम कॉरंटाईन वर निष्ठा वाढवेल आपली प्रतिष्ठा
- BLOG | मला कोरोना झाल्यासारखं वाटतंय...
- सोशल डिस्टन्ससिंग म्हणजे काय असतं रे भाऊ?
- BLOG | कोरोनाशी भिडण्याची हीच ती वेळ!
- BLOG | आम्ही बिनधास्त काम करू
- दुःखावर अंकुश ठेवणारा कोरोना
- BLOG | देवभूमीचा कोरोनाशी यशस्वी लढा
- BLOG | 'चाचपणी' संसर्गाच्या फैलावाची
- BLOG | कोरोना, टोळधाड अन् चक्रीवादळ कसं जगायचं!
- BLOG | खासगी रुग्णालयाचं 'हे' वागणं बरं नव्हं
- BLOG | रुग्णसंख्या आवरणार कशी?
- BLOG | रोगाशी लढायचंय, आकडेवारीशी नाही !
- BLOG | 'ती' पण माणसूच आहे
- BLOG | लक्षणविरहित रुग्णाचं काय?
- BLOG | कोरोनाबाधितांची ओळख परेड?
- BLOG | कोरोनामय 'डायबेटिस'
- BLOG | संपता संपेना... कोरोनाकाळ
- BLOG | कोरोनाची वक्रदृष्टी पुरुषांवर अधिक!
- BLOG | व्यर्थ न हो बलिदान...!
- BLOG | कोरोना विरोधी लोकचळवळ!
- BLOG | पुणे करूया 'उणे'