एक्स्प्लोर
रेड लाईट डायरीज : रंगरुपाचे रेड-लाईट लॉजिक...
बाई सत्तरी पार केलेली असो, वा सात महिन्याची निष्पाप चिमुरडी असो, वा रंगरुपाने कशीही असो, अगदी मतिमंद, वेडसर, अपंग, आजारी, जखमी वा अगदी मरणोन्मुख असली, तरी तिच्यावर आपला जोर आजमावणारे स्वतःच्या आयुष्यात गोरी देखणी बायको हवी म्हणतात. खरेतर ही समाजमान्य विकृतीच आहे. अशा विकृतांना आपल्या चपलाखाली रगडणाऱ्या रेड लाईट एरियातील बायकांचे तत्वज्ञान खोटे आहे हे सिद्ध करणारा माणूस ज्या दिवशी भेटेल त्या दिवशी स्त्रीसौंदर्याच्या आणि भोगाच्या व्याख्या बदलायला प्रारंभ झाला असे म्हणायला हरकत नाही.

Pachey (left) and (center) wait for customers outside their room on the 3rd floor of the Joinal Bari brothel in Faridpur, central Bangladesh. About 800 women and girls live and work inside the bustling brothel, comprised of four buildings situated on an important trading route on the banks of the Padma river. Many of chowkri (bonded sex workers) are underage. Some of the girls are runaways who leave home to escape a bad situation or marriage, and end up on the brothels when they have no where else to go. Many others have been kidnapped and sold to a madame by a parent or relative. They must take on 5-10 clients per day, and most receive no pay because they must repay their debt to their madame.
काही घटना वरवर अगदी छोट्या वाटतात. पण बारकाईने पाहिले, तर प्रिझममधून रंगरेषा परावर्तित व्हाव्यात, तसे त्यातील इतर संदर्भ हाती लागतात. अशीच एक घटना दोन-चार दिवसांपूर्वी झारखंडच्या राजधानीत घडली. रांचीतील लालपूर भागात मुलींच्या वसतीगृहात राहणाऱ्या एका तरुणीने आत्महत्या केली. वरवर पाहता ही एक नित्याची बाब होऊन बसल्याने त्यात नोंद घेण्याजोगे काय आहे, असेच सर्वांना वाटेल. यात अप्रूप वाटण्याजोगे खरंच काहीच नाही. कारण आपली अवाढव्य लोकसंख्या आणि त्या प्रमाणात रोज होणाऱ्या आत्महत्यांची आपल्याला इतकी सवय झालीय की, आपल्याला या घटनांचे काहीच सोयरसूतक वाटेनासे झाले आहे. या घटनेचेही कोणास सुख-दुःख वाटावे अशी अपेक्षा का आणि कुणी करावी? लोकांनीही या बातमीची हेडलाईन वाचून सोडून दिली असेल. रोजच्या आत्महत्यांच्या शेकडो घटनांपैकी एक समजून लोक विसरुनही गेले असतील. ‘जन पळभर म्हणतील हाय हाय’ हेच खरे. संवेदनशील मनाला मात्र हे सहजशक्य होत नाही.
गळफास लावून घेतलेल्या अपराजिताला उच्चपदस्थ सरकारी अधिकारी व्हायचे होते, देशाची सेवा करायची होती. त्यासाठी ती स्पर्धा परिक्षांची तयारी करत होती. दरम्यान, तिच्या घरात तिच्या लग्नाची बोलणीही सुरु होती. अभ्यासात मग्न असणाऱ्या अपराजिताला घरी गेल्यावर त्यातली काही चर्चा कानी पडायची आणि तिचे काळीज चर्र होऊन जायचे. तिला पाहून गेलेल्या किंवा तिचा फोटो बायोडाटा बघणाऱ्या लोकांच्या कॉमेंटस तिच्या कानी पडतं. जोडीला घरच्यांची विवशताही ऐकायला मिळे. या सर्वांचा नकारात्मक परिणाम तिच्या मनावर होऊ लागला, आणि त्यातूनच तिने स्वतःला संपवण्याचा निर्णय घेतला. तिने अभद्र निश्चय करुन खिडकीच्या ग्रिलला गळफास लावला, आणि स्वतःला संपवलं. काही तासानंतर बराच वेळ तिच्या खोलीतून प्रतिसाद न मिळाल्याने खोलीचे दार तोडून आत प्रवेश केल्यावर, तिचा अचेतन मृतदेह फासावर लटकलेला आढळला. तपासात निष्पन्न झाले की, मागील काही दिवसांत ती नेहमी आपल्या मैत्रिणींना म्हणायची, 'मी दिसायला जास्त सुंदर नाही. लग्नासाठी घरच्यांना खूप पैसे लागतील, सासरी गेले तर त्रासच होईल.'
आपण काळे-सावळे आहोत, आपण देखणे नाही, लाखात एक असतं तसं आपलं रुपडं नाही, आपल्या व्यक्तीमत्वात आकर्षक असं काहीच नाही, याची तिला खंत लागली होती. आपल्या रंगरुपामुळे घरच्यांना बोलणी ऐकून घ्यावी लागतात. आणि त्यापायी त्यांना वरपक्षाकडील लोकांना भारीभरक्कम हुंडा द्यावा लागेल, याची धास्ती तिला लागली होती. या निराशेतून तिने स्वतः चा जीवनदीप विझवला होता. तिची उत्तुंग स्वप्ने तिच्यासोबतच जळून राख झाली आणि एक जीव अचानक निघून गेला. भोवताली अशा घटना का घडतात? याचा विचार करण्याइतका वेळ कुणाकडे नाही ही दुर्दैवाची बाब आहे आणि महिला संघटना, महिला आयोग आणि स्त्रीवादी एनजीओ, एक्टीव्हिस्टस यावर कधीच तोंड उघडत नाहीत. जणू त्यांची या अविचारास मूक संमती असावी. काळे-सावळे असणं, देखणं नसणे हा गुन्हा आहे काय? यात त्या मुलींचा काय दोष असतो? स्वतः डांबरासारखे काळे कुळकुळीत असणारे, कर्तृत्वशून्य असणारे, बायको गोरी हवी, देखणी हवी, असा अट्टाहास धरतात. तेव्हा त्यांची अक्कल गहाण टाकलेली असते.
रंगावरुन बाह्य स्वरुपावरुन एखाद्या मुलीस नाकारणे, हा खरे तर वर्णभेदाचा छुपा अवतार होय. ज्याला आपल्या देशात खुली मान्यता आहे. विवाह इच्छुकांच्या लग्नाच्या जाहिराती जरी वाचल्या तरी हे लक्षात येते. वधू पाहिजे या हेडिंगखालील जाहिरातीत वराच्या अपेक्षेत रंग गोरा असेच नमूद असते. मुलीचे गुणविशेष, तिचा स्वभाव, तिचे कर्तृत्व याकडे न पाहता केवळ तिचे बाह्यरुप पाहून जीवनाचा जोडीदार निवडणाऱ्या पुरुषांच्या बुद्धीची कीव येते. यामुळे आपल्या रंगरुपाचे जवळपास प्रत्येक मुलींवर प्रचंड दडपण असते. आणि पालक त्याला हातभार लावत असतात. यातूनच सुरु होतो रंग उजळवण्याचा अमानवी हट्ट. मेट्रो सिटीजपासून ते वाडी-वस्तीपर्यंत पसरलेल्या ‘फेअर अँड लव्हली’ने याला आणखी गडद शेड दिली आहे. बहुतांश मुलींची गोरे होण्यासाठी कुतरओढ सुरु आहे. गोरे होण्यासाठीच्या, रंग उजळण्यासाठीच्या शेकडो क्रीम्स आजघडीला बाजारात उपलब्ध आहेत. आणि त्यांची करोडोंची विक्री होते. टीव्हीपासून इंटरनेटपर्यंत, आणि रेडीओपासून ते डिजिटल फ्लेक्सपर्यंत या उत्पादनाच्या जाहिरातींचा राजरोसपणे प्रचंड भडीमार होत असतो. आणि सगळा देश हा वर्णभेदाचा छुपा तमाशा निमूटपणे पाहत असतो. पाहता पाहता त्याचा एक घटकही होऊन जातो. सर्वसामान्य भारतीय मुली रंगरुपाच्या या भयाण ओझ्याखाली दबून जातात, असेच चित्र पहावयास मिळते. पण सर्वच बाबींना अपवाद असतात. तसाच यालाही अपवाद असणाऱ्या स्त्रिया, मुली समाजात आहेत. पण त्यांची संख्या, त्यांचे प्रमाण अत्यंत कमी आहे. जिथे बंधने आहेत, मर्यादा आहेत. स्त्रीत्वाच्या रुढ चौकटी आहेत. तिथे हे प्रमाण जास्त आहे. पण ज्या स्त्रियांनी स्त्रीत्वाच्या बंधानांना झुगारले आहे, पुरुषी वर्चस्वाने आखून दिलेल्या मर्यादांचे उंबरठे ओलांडलेले आहेत. त्या स्त्रिया रंगरुपाच्या असल्या तकलादू आणि भुक्कड परिमाणांना कदापिही भीक घालत नाहीत. उलटपक्षी त्या याचा फज्जा उडवून आपल्याला हवं तसं राहतात, हवी तशी वेशभूषा करतात. स्वतःच्या इच्छेनुसारच चेहऱ्याचे, दिसण्याचे मापदंड राखतात.
असो. अपराजिताची बातमी ऐकताच रेड लाईट एरियात हयात घालवलेल्या अशाच एका मध्यमवयीन स्त्रीची मला आठवण झाली. तिचा उल्लेख करण्याचे कारण म्हणजे स्त्रीच्या जगण्याच्या आणि दिसण्याच्या तिच्या स्वतःच्या व्याख्या जगापुढे आणाव्यात, अशा आगळ्या वेगळ्या आहेत. त्यातलं वेगळंपण केवळ अनोखं नसून ते टोकदार आणि काहीसं जहरीही आहे.
शोमोली काळ्या कुळकुळीत रंगाची, चरबट कातडीची, रुढ अर्थाने देखणेपणाच्या चौकटीत न बसणारी मध्यमवयीन बाई. "अरे औरत काली गोरी हो सकती है, मगर मरद हमेशा दिलसे काला ही होता है !" असं सुनावणारी बिनधास्त पदर पाडून तुटक्या दरवाजाच्या कडी कोयंडयाशी खेळत आपल्याच तालात उभी राहणारी. येणाऱ्या जाणाऱ्यातील कडू लोकं ओळखून त्यांच्या अंगावर फवारा उडेल अशा पद्धतीने मुद्दामहून थुंका उडवणारी, वेळ पडली तर आपल्या मस्तवाल गिऱ्हाईकाच्या गच्चीला धरुन त्याच्या दोन पायाच्या मधोमध लाथ हाणणारी, अचकट-विचकट हातवारे करत दिवसभर खिदळत राहणारी, अधून-मधून पांचट बोलणारी, अंगावरच्या कपड्यांचे जाणीवपूर्वक भान ने ठेवणारी, खुर्चीवर बसताना गुडघ्यापर्यंत परकर वर ओढून गळ्यातल्या काळ्या गोफाशी चाळा करणारी शोमोली अगदी मुंहफट होती. तिचं काळं असणं वा तथाकथित सुंदर नसणं याच्याशी तिला काही घेणं देणं नव्हतं. ती आपल्याच तालात जगायची. 'अंधार केल्यावर बाई काळी असली काय वा गोरी असली काय, काही फरक पडत नाही. बाई देखणी असली नसली तरी फरक पडत नाही' असलं काहीसं भयानक लॉजिक ती लावायची.
ओरिसाच्या कटकजवळील जगतपूरनजीकच्या अशुरेस्वर या छोट्या खेड्यातून आलेल्या शोमोलीवर बाईपणाचा दबाव नव्हता. पण आपल्याला बाई म्हणवून घेताना ती स्वतःच्या तोऱ्यात जगायची. शोमोली असो वा तिच्यासारखीच आणखी कुणी असो, या धंद्यात आलेल्या बायका आपसूक कडूपणा शिकत जातात. आणि रंगरुपाचा मुद्दा गौण होत जातो. या बदनाम दुनियेत जगणाऱ्या बायकांची रेड लाईट एरिया जशी पिळवणूक करतो तसेच जगायलाही शिकवतो. संघर्ष करायला भाग पाडतो. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे कठोर व्हायला भाग पाडतो. शोमोली अशा बायकांचे प्रातिनिधिक उदाहरण ठरावी. पांढरपेशी जीवनातील मुली, स्त्रिया मात्र गोरेपणाच्या आणि देखणेपणाच्या खोट्या कल्पनात इतक्या रुतून बसतात की, आपल्या शरीरातील सुंदरता शोधण्याच्या नादात मनाचे सौंदर्य हरवून बसतात.
'मी काळी आहे, पण माझ्या मनात सदैव तेवणारा एक तेजस्वी प्रकाशही आहे' असं सांगताना तिचे मोठाले काळे डोळे चमकत, तेव्हा ती आणखीच भारी वाटे. "कपडे घातलेल्या मुर्दा लोकांच्या दुनियेतल्या नागडया बायकांना रुपरंगाची भीती नसते. कारण नंगे को खुदा डरे ! हा ना रे समीरबाप्पू? " असलं काही तरी भोचक पण वास्तव बोलून ती बोलती बंद करुन टाकते. या धंद्यातही नेपाळी आणि नॉर्थइस्टकडून येणाऱ्या काहीशा गौरवर्णीय स्त्रियांना थोडी जास्त मागणी आहे. परंतु, सामान्यतः बाह्य जगात ज्या प्रमाणात गोऱ्या स्त्रियांचे आकर्षण आढळून येते. त्यामानाने इथे ते आढळत नाही. या बाजारात पाठीवर कुबड असणारी स्त्रीदेखील आढळते आणि हातापायाने अधूअपंग असणारी बाईही दिसून येते. काळ्या गोऱ्याचा मुद्दा इथे त्या मानाने खूपच मागे राहतो. लोकं आपापल्या आवडीनिवडीनुसार, या बायकांना भोगवस्तू समजून इथे येतात. काही वेळात आपला ‘कार्यभाग’ उरकून निघून जातात. मिरजेच्या उत्तमनगरातील वेश्यावस्तीत अत्यंत काळ्या रंगाच्या, पाठीवर कुबड असणाऱ्या शांत्व्वाला पाहिले होते. तेव्हा मी व्यथित होऊन गेलो होतो. पण तिने आपल्या रंगरुपावर आपणच थुकत नाही, असं सांगत खोलीत आरसादेखील ठेवत नाही, असं ठणकावून सांगितलं होतं. नागपूरच्या गंगा-जमुनात दात पुढे आलेली, ओठावर केसाची लव असणारी, बटबटीत डोळ्यांची ठाशीव अंगाची पद्माही अशाच बायकांपैकी एक. आपल्या रंगरुपाला भीक न घालता, तोंडाच्या पट्ट्यावर ताबा न ठेवता समोरच्यांना रगडून काढणाऱ्या या बायका सामान्य जगातील बायकांपेक्षा नक्कीच वेगळ्या विचारसरणीच्या होत्या. पुण्यातील शुक्रवार पेठेतील पोलीस चौकीसमोर चांदणी नावाची बहुमजली इमारत आहे. तिथल्या खंडीभर कुंटणखान्यापैकी सरस्वतीचा एक अड्डा आहे. इथं नसरीन नावाची महाकजाग बाई भेटली होती. गिऱ्हाईक कसं जाळ्यात ओढायचं याचा अचूक फंडा माहिती असणारी पण रंगरुपाच्या बाह्य व्याख्यात टोटली अनफिट असणारी ही बाई अत्यंत डेअरिंगबाज होती. एकदा अड्ड्यावर पोलिसांची रेड झाली, तेव्हा पोलिसांनी तिला सोबत न्यायचे देखील टाळले. आपण कसे दिसतो याला कचरा किंमत देऊन जगणाऱ्या या बायकांतल्याच काही बायका भडक मेकअप करुन तोंडाला नानाविध क्रीम्स फासून, लालभडक ओठ रंगवून उभ्या असतात. यांना बोलते केल्यावर त्यांनाही गोऱ्या रंगाचे फारसे आकर्षण आढळत नाही. भडक दिसण्यामागे लोकांची आपल्याकडे नजर जावी आणि सावज आपल्या जाळ्यात अडकावे हे ठोकताळे. मात्र गोरं दिसण्याची बाह्य जगातील बायकांची जीवघेणी रस्सीखेच इथे दिसत नाही.
अपराजिताची बातमी ऐकून शोमोलीत असे काय होते, जे सामान्य बायकां-पोरीत नव्हते, याचा नकळत विचार करायला लागलो. आणि एक टोकदार सत्य काळजाला टोचले. शोमोलीसारख्या मुलींना जीवनाचा साथीदार निवडायचा नसतो. तर देहाची भूक भागवण्यासाठी वासनांध गिधाडे तिथे येतात त्यामुळे त्यांच्या पुढ्यात त्यांना हव्या तशा रंगरुपात या बायका येत नाहीत. कारण काही मिनिटांचा, तासांचा प्रश्न असतो. देहभूक भागली की, नागडया बाईच्या हाती वरख़ुशीची नोट कोंबून ही माणसं लवकर पसार होतात. अशा पुरुषांना काय हवे असते, आणि त्यांना कसे अन कुठे ‘चेचून’ काढायचे असते याची यांना चांगलीच समज आलेली असते. पण बाह्य जगातील मुलींना मात्र आयुष्यभराचा जोडीदार हवा असतो. जो बहुतांश करुन त्यांच्या बाह्यरंगरुपावर आपला निर्णय घेणार असतो. आपली बायको गोरी आहे, आणि तथाकथित देखणेपणाच्या चौकटीत बसणारी आहे, हे त्याला जगाला दाखवायचे असते. एरव्ही त्याच पुरुषाला आपल्या वासना भागवताना कसलीही बाई चालते. हे अंतिम सत्य होय. बाई सत्तरी पार केलेली असो, वा सात महिन्याची निष्पाप चिमुरडी असो, वा रंगरुपाने कशीही असो, अगदी मतिमंद, वेडसर, अपंग, आजारी, जखमी वा अगदी मरणोन्मुख असली, तरी तिच्यावर आपला जोर आजमावणारे स्वतःच्या आयुष्यात गोरी देखणी बायको हवी म्हणतात. खरेतर ही समाजमान्य विकृतीच आहे. अशा विकृतांना आपल्या चपलाखाली रगडणाऱ्या रेड लाईट एरियातील बायकांचे तत्वज्ञान खोटे आहे हे सिद्ध करणारा माणूस ज्या दिवशी भेटेल त्या दिवशी स्त्रीसौंदर्याच्या आणि भोगाच्या व्याख्या बदलायला प्रारंभ झाला असे म्हणायला हरकत नाही.
संबंधित बातम्या
रेड लाईट डायरीज : रेड लाईट एरियातली नोटाबंदी
रेड लाईट डायरीज : वेश्येतले मातृत्व ……
इंदिराजी …. काही आठवणी …
रेड लाईट डायरीज : गिरिजाबाई …..
रेड लाईट डायरीज : सेक्सवर्कर्सचे रॅकेट – 2
‘रॅकेट’ रेडलाईट एरियाचे…
नवरात्रीची साडी… रेड लाईट डायरीज – शांतव्वा…. रेड लाईट डायरीज – ‘धाड’! गणेशोत्सवातल्या आम्ही (उत्तरार्ध) गणेशोत्सवातल्या आम्ही… (पूर्वार्ध) उतराई ऋणाची… स्वातंत्र्यसूर्याच्या प्रतीक्षेतले अभागी जीव… गीता दत्त – शापित स्वरागिनीView More
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
आरोग्य
व्यापार-उद्योग
क्रिकेट

























