(Source: ECI/ABP News/ABP Majha)
BLOG | पंतप्रधानांचा मार्गदर्शक 'डोस'
देशातील काही राज्यात कोरोनाच्या संसर्गाचा फैलाव मोठ्या प्रमाणात होत असून झपाट्याने रुग्ण संख्या वाढत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील विविध राज्यातील मुख्यमंत्र्यासोबत चर्चा केली. त्यांनी त्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला थांबवण्याकरिता तात्काळ आणि निर्णायक पावले उचलावी लागणार असल्याचं सूचित केलं. त्याशिवाय या संवादात त्यांनी लॉकडाऊन शिवाय उपलब्ध असलेल्या प्रतिबंधात्मक आणि शास्त्रीय उपायांची अंमलबजावणी करणं गरजेचे आहे असं सांगितलं. तसंच नमुन्याचे जनुकीय अनुक्रम (जीनोम सिक्वेन्सिंग) तपासात राहणं, ट्रेसिंग, ट्रॅकिंग आणि ट्रीटमेंट या त्रिसूचीचा प्रभावी वापर कठोरपणे केला पाहिजे असंही सांगितलं.
त्यासोबतच सध्या सुरु असलेल्या राष्ट्रीय लसीकरण मोहिमेच्या मुद्द्यावर भाष्य करताना देशातील काही राज्यात म्हणजे तेलंगणा, आंध्रप्रदेश आणि उत्तरप्रदेश या राज्यात लसींचा अपव्यय होत असल्याचं अधोरेखित करून पंतप्रधानांनी कोरोनाच्या अनुषंगाने मार्गदर्शक 'डोस' दिला. या संवादादरम्यान त्यांनी कोरोनाच्या लढाईला एक वर्षाहून अधिकचा काळ झाला आहे. भारतीय नागरिकांनी कोरोनाचा जसा सामना केला, ते एक उदाहरण बनलं आहे, त्याची प्रशंसाही झाली. आज देशात 96 टक्के लोक कोरोनामुक्त झाले आहेत. काही राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. देशातील 70 जिल्ह्यांत ही वाढ 150 टक्क्यांपर्यंत आहे. कोरोनाच्या या दुसऱ्या लाटेला वेळीच रोखलं पाहिजे, असंही त्यांनी यावेळी सांगितलं.
गेल्या काही दिवसात राज्याच्या ठराविक जिल्ह्यात आणि शहरात कोरोनाबाधितांचे रुग्ण अचानकपणे वाढू लागले आहेत. ते रुग्ण जुन्या विषाणूचे आहेत की नवीन एखादा विषाणूच्या जनुकीय बदल झाले आहे, त्यामुळे हे पाहणे गरजेचे असते त्यामुळे जीनोम सिक्वेन्सिंग चाचण्या करणे महत्त्वाचे आहे. वैद्यकीय तज्ञांच्या मते, कोरोनाचा संसर्ग पुन्हा होण्याचे दोन प्रकार असू शकतात. त्यामध्ये एक म्हणजे ज्या व्यक्तीला कोरोना होऊन गेला आहे आणि पुन्हा कोरोनाची चाचणी पॉजिटीव्ह आली आहे आहे. त्या व्यक्तीच्या नमुन्यात ज्या आधीच्याच विषाणूपासून कोरोनाची लागण झाली आहे, त्यापैकीच एखादा जुना विषाणू शरीरात कुठेतरी आतड्यांमध्ये राहिला असेल आणि त्याने पुन्हा डोकं वर काढले असेल तर त्या संसर्गाला जुना संसर्ग उफाळून येणे (रीऍक्टिव्हेशन) असे म्हणतात, याच्या आणखी काही शक्यता असू शकतात. तर एखाद्या व्यक्तीला कोरोना झाल्यानंतर पुन्हा कोरोना झाला असे म्हणायचे असेल तर त्याला अगोदर झालेल्या कोरोनाचा विषाणू आणि आता पुन्हा चाचणी पॉजिटीव्ह आल्यानंतरचा विषाणू वेगळा असणे अपेक्षित आहे म्हणजेच त्या विषाणूत काही जनुकीय बदल आढळून आले असतील तर त्या व्यक्तीला पुनर्संसर्ग (रीइन्फेक्शन) झाले आहे असे म्हणतात. मात्र, हे माहित होण्याकरिता त्या व्यक्तीच्या नमुण्याचा विशेष तपास करणे गरजेचे असते. त्यास विषाणूचे जनुकीय अनुक्रम (जीनोम सिक्वेन्सिंग) असे म्हणतात. या तपासात विषाणूचे जनुकीय बदल पाहिले जातात. कोरोनाबाधितांचा आकडा वाढत असल्याने राज्यात विविध निर्बंध आणण्याबाबत राज्य सरकार विचार करत असताना वैद्यकीय तज्ञांच्या मते ज्या ठिकाणी अचानकपणे कोरोना बाधितांची संख्या वाढीस लागली आहे. त्या ठिकाणच्या परिसरातील नमुन्याचे जनुकीय अनुक्रम (जीनोम सिक्वेन्सिंग) तपासात राहणे गरजेचे ठरणार आहे. विषाणूचे जनुकीय बदल (म्युटेशन) ही शास्त्रीय प्रक्रिया असून त्यावर आरोग्य यंत्रणांनी बारकाईने नजर ठेवण्याची गरज आहे. त्यामुळे जर कुठे एखादा नवीन विषाणूचा स्ट्रेन आढळून आला असेल आणि वेगाने पसरून नागरिकांना बाधित करत आहे का नाही याची नोंद प्रशासनाला घेणे शक्य होणार आहे.
मुंबई शहराच्या कोरोना मृत्यू विश्लेषण समितीचे अध्यक्ष डॉ. अविनाश सुपे यांच्या मते "विशेष म्हणजे सध्या जर आपल्याकडे आपण वाढत्या रुग्णसंख्येचा पॅटर्न बघितला तर एक गोष्ट लक्षात येत आहे ती म्हणजे घरात एखादा कुणी व्यक्ती पॉजिटीव्ह सापडला तर संपूर्ण कुटुंब पॉजिटीव्ह निघत आहे. याचा अर्थ काय ज्याला बाधा झाली आहे त्याने व्यवस्थित काळजी घेतलेली नाही. बहुतांश रुग्ण जरी लक्षणविरहित असली तरी त्यांच्यापासून इतरांना धोका आहेच. पंतप्रधान जे सांगतायत त्या ट्रेसिंग, ट्रॅकिंग आणि ट्रीटमेंट या त्रिसूचीचा वापर व्यवस्थित व्हायलाच हवा. त्यानंतर लसीकरणावर अधिक भर देणे गरजेचे आहे, त्यांनी जे सांगितले काही राज्यात लसीचा अपव्यय होत आहे तो रोखायचा असेल तर नागरिकांना 'वॉक - इन आणि स्पॉट रजिस्ट्रेशनचा' पर्याय खुला करून द्या, अनेक नागरिक लसीकरण नोंदणी करण्याच्या प्रक्रियेला कंटाळले आहेत तर काही लोकांना अजूनही लसीकरण नोंदणी करता येत नाही. विशेष म्हणजे ज्या भागात संसर्गाचा प्रादुर्भाव जास्त त्या ठिकाणी जनजागृती करून त्यांना लसीकरणासाठी केंद्रांवर बोलून घेतले पाहिजे. तसेच लस घेण्यासाठी असणारी वयाची अट शिथिल केली पाहिजे. कारण लसीकरण लांबणीवर टाकणे आता परवडणारे नाही. जास्तीत जास्त केंद्रांची संख्या वाढवून लसीकरण घेणे गरजेचे आहे."
मार्च 16 ला 'दुसरी लाट आली, आता त्सुनामी नको!' या शीर्षकातील लेखात, राज्यात काही दिवसांपासून कोरोनाबाधितांची संख्या 'तुफानी' वेगाने वाढत असून यांची गंभीर दखल केंद्र सरकारने घेतली असून त्यांनी राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची सुरुवात झाली असल्याचं सांगितले आहे. यासंबंधीचं पत्र केंद्रीय समितीने राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांना पाठवलं आहे. केंद्रीय सचिव राजेश भूषण यांनी लिहिलेल्या या पत्रात राज्यात कोरोना स्थितीवर गंभीर पावलं उचलली जात नसल्याची टिप्पणी देखील केली आहे. दोन आठवड्यांपूर्वी केंद्रीय समिती राज्याच्या दौऱ्यावर आली होती. त्यावेळी कोरोनाविषयक सुविधांचा आढावा या समितीने घेतला होता. राज्यात दुसरी लाट आली असली तरी आरोग्य यंत्रणा त्याचा सध्या तरी सक्षमपणे मुकाबला करीत आहे. मृत्यू दर कमी ठेवण्यात त्यांना यश आले असून सर्व रुग्णांना वेळीच उपचार दिले जात आहे. सर्वसाधारणपणे साथीच्या आजारात दुसरी लाट मोठी असल्याचे म्हटले जाते, मात्र आता प्रशासनाने आणि नागरिकांनी या लाटेला वेळीच रोखणे गरजेचं आहे नाही तर ' त्सुनामी ' आली तर परवडण्यासारखी आता आपली परिस्थिती नाही. कोरोनाच्या या सर्व एकंदर परिस्थितीकडे सामाजिक त्याचप्रमाणे शास्त्रीय दृष्टिकोनातून पाहायला हवे. शास्त्राच्या आधारवर नियम तयार करून त्याची अंमलबजावणी कशा पद्धतीने होईल यांचा विचार करण्याची ही वेळ आहे.
डॉ. ललित संखे, सहयोगी प्राध्यपक, जनऔषध वैद्यकशास्त्र, ग्रॅण्ट मेडिकल कॉलेज आणि सर ज जी समूह रुग्णालय, सांगतात की, "लसीचा अपव्यय टाळणे ही खरी तर काळाची गरज आहे. आम्ही लसीकरण मोहिमेला सुरवात केली तेव्हापासून आम्ही नियोजनावर अधिक भर दिला आहे. लसीचा अपव्यय टाळणं शक्य आहे मात्र त्यासाठी तुम्हाला व्यवस्थित नियोजन करावे लागते. जर सुरवातीचे दोन तीन दिवसानंतर आपल्याला अंदाज येतो की किती नागरिक ठरलेल्या वेळेत तुमच्याकडे रोज लस घेण्याकरिता येत आहेत. त्याप्रमाणे जर संध्याकाळी पाचला जर लसीकरण करणे थांबविणारे असाल तर संध्याकाळी साडे चारला किती नागरिक लसीसाठी आहे त्याचा अंदाज घेऊन लसीची वायल खोलायची. एका वायल मध्ये 10 डोस असतात त्यामुळे जर संध्याकाळी 4.30 ला चार पाच नागरिक लसीकरणासाठी आले असतील तर त्यांना पाचपर्यंत अन्य नागरिक किती येत आहेत त्याचा अंदाज घेऊन लस द्यायची. दोन-तीन लोकांकरिता पूर्ण वायल उघडणे योग्य ठरणार नाही, अन्यथा बाकीचे डोस वाया जातील. त्यापेक्षा त्या दोन -तीन लोकांना व्यवस्थित समजावयाचे कि ही वायल आता खोलली तर बाकीचे डोस वाया जातील यापेक्षा तुम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर या तुम्हाला पहिल्या क्रमांकावर लस देतो, असे व्यवस्थित समजून सांगितल्यावर लोकं ऐकतात हा आमचा अनुभव आहे. त्यामुळे लसीचा अपव्यय टाळणं शक्य होतं."
तर इंडियन मेडिकल असोसिएशनचे माजी अध्यक्ष, महाराष्ट्र, डॉ. अविनाश भोंडवे यांच्या मते, "पंतप्रधान यांच्या देशातील राज्याच्या अनेक मुख्यमंत्री यांच्या सोबत केलेल्या संवादात लॉकडाऊन शिवाय अन्य प्रतिबंधात्मक आणि शास्त्रीय उपायांची अमंलबजावणी करावी असेच त्यांनी काहीसं सूचित केले आहे. आपल्याकडे ट्रेसिंग आणि ट्रॅकिंग ज्या प्रमाणात करणे गरजेचे आहे तितक्या प्रमाणात होताना दिसत नाही. त्यामुळे प्रशासनाने या गोष्टीकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. लसीकरणाचा वेग वाढवला पाहिजे याकरिता केंद्र शासनाने राज्य शासनाला सहकार्य करणे अपेक्षित आहे. पंतप्रधानांनी या संवादात अनेक शास्त्रावर आधारित अनेक गोष्टी सुचविल्या आहेत ज्याची तात्काळ अंमलबजावणी कटाक्षाने करणे गरजेचे आहे. या दुसऱ्या लाटेपासून वाचण्यासाठी एकत्रितपणे शास्त्रीय आणि सामाजिक उपाय योजनांचे आयोजन करणे अनिवार्य आहे. या उपायांची अंमलबजावणी करताना नागरिकांना त्रासही होणार नाही आणि सर्व नियमांचे पालनही केले जाईल, असा विचार करून नियोजन करावे लागणार आहे."
दुसऱ्या लाटेला रोखण्याकरिता प्रशासन त्यांच्या पद्धतीने प्रयत्न करीत आहेत, नवीन नियम किंवा काही कठोर निर्बंध आणतील. मात्र नागरिक म्हणून आपण या काळात आपली जबाबदारी पार पाडली पाहिजे. आजही ज्या वेगाने पात्र नागरिकांनी लसीकरणासाठी जाणे अपेक्षित आहे. त्या पद्धतीने लसीकरणाची संख्या वाढताना दिसत नाही. यासाठी काही सामाजिक संस्थांनी पुढाकार घेऊन लसीकरणाबाबतच्या जनजागृती मोहिमेला हातभार लावला पाहिजे. अजूनही काही लोकांमध्ये लसीकरणाबाबत काही किंतु परंतु असतील किंवा काही गैरसमज असतील तर ते दूर करण्यासाठी डॉक्टरांच्या संघटनांनी पुढे यायला पाहिजे. लसीकरण हा राष्ट्रीय कार्यक्रम आहे यामध्ये पात्र नागरिकांनी मोठ्या संख्येने सामील होणे अपेक्षित आहे. कोरोनाच्या या दुसऱ्या लाटेला रोखण्याकरिता सर्व परीने प्रयत्न केले गेले पाहिजे.