इंडी आघाडीत आपने ठोकला शेवटचा खिळा?
BLOG : विविध विचारांच्या पक्षांना एकत्र घेऊन राजकारण करणे सोपे नसते. सध्या जरी आघाडीच्या राजकारणाशिवाय पर्याय नसला तरी एकमेकांना बांधून ठेवणे कठिण असते आणि त्याचे ताजे उदाहरण म्हणजे लोकसभा निवडणुकीपूर्वी स्थापन झालेली इंडी आघाडी. ज्या काँग्रेसच्या नेतृत्वाखाली इंडी आघाडी कार्यरत होती त्या आघाडीतून काँग्रेसलाच बाहेर काढण्याचे सूतोवाच आम आदमी पक्षाने केले आहे. देशातील राजकारणात यामुळे नवीन घुसळण दिसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींना सत्तेपासून हटवण्यासाठी काँग्रेस, आम आदमी पार्टी, राष्ट्रवादी, शिवसेना, समाजवादी पार्टी. तृणमूल काँग्रेस असे अनेक पक्ष एकत्र आले आणि इंडी आघाडीची स्थापना झाली. मोदींना तर ही आघाडी सत्तेवर येण्यापासून थांबवू शकली नाही, मात्र आघाडीत काय-काय घडले ते पुन्हा येथे उगाळण्यात अर्थ नाही. पण सुरुवातीलाच बसलेल्या धक्क्यांनी इंडी आघाडी अजूनही सावरलेली नसल्याचे आम आदमी पक्षाच्या नेत्यांच्या वक्तव्याने पुन्हा स्पष्ट झाले आहे. दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी मार्लेना यांनी इंडी आघाडीतून काँग्रेसला बाहेर काढण्याबाबत सूतोवाच केले आहे आणि याला कारणीभूत ठरले आहे काँग्रेस नेते अजय माकन यांचे वादग्रस्त वक्तव्य.
लोकसभेला आम आदमी पक्ष इंडी आघाडीत होता मात्र, त्यानंतर झालेल्या विविध राज्यांच्या निवडणुकांमध्ये आपने स्वतंत्रपणे निवडणुका लढवल्या. याचा मोठा फटका काँग्रेसलाच बसला. फेब्रुवारीमध्ये दिल्ली विधानसभेच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे. या निवडणुकीत स्वतंत्रपणे लढण्याचा निर्णय आपने घेतला आणि अन्य पक्षांनी तयारी करण्यापूर्वीच उमेदवारांची घोषणाही केली. त्यानंतर काँग्रेसनेही उमेदवारांची घोषणा केली. दिल्ली विधानसभा निवडणुकीमुळे काँग्रेस आणि आपमध्ये चांगलाच संघर्ष सुरु झाला आहे.
25 डिसेंबरला काँग्रेसने एक पत्रकार परिषद घेत आपच्या गैरकारभारावर आसूड ओढले आणि श्वेत पत्रिका जाहीर केली. केजरीवाल दिल्लीच्या नागरिकांना फसवत असल्याचा आरोप करीत केजरीवालांना फर्जीवाल असे संबोधले एवढेच नव्हे तर काँग्रेस नेते अजय माकन यांनी केजरीवाल यांना थेट देशद्रोहीच घोषित केले. त्यामुळे आप नेत्यांच्या अंगाचा तीळपापड झाला. लगेचच दुसऱ्या दिवशी आपच्या नेत्या दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी मार्लेना आणि संजय सिंह यांनी पत्रकार परिषद घेत काँग्रेसवर तोंडसुख घेतले.
दिल्ली विधानसभा निवडणुकीत काँग्रेस भाजपला मदत करीत असल्याचा आरोप या दोघांनी केला. काँग्रेस भाजपकडून पैसे घेत असल्याचा गंभीर आरोपही या दोघांनी केला. अरविंद केजरीवाल यांच्याविरोधात काँग्रेसने संदीप दीक्षित यांना मैदानात उतरवले आहे. संदीप दीक्षित यांना भाजप पैसे देत असल्याचा आरोपही आपच्या नेत्यांनी केला आहे.
एवढेच नव्हे तर केजरीवाल यांना देशद्रोही म्हणणाऱ्या अजय माकन यांच्यावर 24 तासात काँग्रेसने कारवाई करावी, असा अल्टीमेटमही दिला. लोकसभा निवडणुकीनंतर काही राज्यांच्या झालेल्या निवडणुकीत आप स्वबळावर लढले तेव्हा आपच्या एकाही नेत्याने काँग्रेस नेत्यांवर टीका केली नाही याचीही आठवण आपच्या नेत्यांनी काँग्रेसला करून दिली. एवढ्यावरच न थांबता काँग्रेसच्या वर्चस्वावरही आप नेत्यांनी शरसंधान केले आहे. इंडी आघाडीच्या घटक पक्षांशी बोलून इंडी आघाडीतून काँग्रेसला बाहेर काढण्यात येईल असे वक्तव्यही आतिशी मार्लेना यांनी केले आहे.
आपच्या पत्रकार परिषदेनंतर काँग्रेस उमेदवार संदीप दीक्षित यांनी केजरीवालांवर पुन्हा टीका करीत आपला जशास तसे उत्तर देण्याचा पवित्रा घेतला आहे. संदीप दीक्षित यांनी केजरीवाल यांच्यावर टीका करताना, केजरीवाल हे सतत रडणारे मूल असून त्यांना ठाऊक आहे की, दिल्ली हातातून गेल्यावर त्यांच्याकडे काहीही राहाणार नाही. एवढेच नव्हे तर संदीप दीक्षित यांनी केजरीवाल यांना बिनकामाचे मूल असेही म्हटले आहे.
काही दिवसांपूर्वी तृणमूल नेत्या आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री यांनीही काँग्रेस नेतृत्वावर टीका करीत इंडी आघाडीचे नेतृत्व करण्यास तयार असल्याचे वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्याला शरद पवार, अखिलेश यादव, संजय राऊत यांच्यासह इंडी आघाडीतील अनेक नेत्यांनी पाठिंबा दिला होता. त्यामुळे आगामी काळात इंडी आघाडीची शकले होणार असेच चित्र दिसत आहे.