BLOG: विराटचा धक्का, कांगारुंच्या जिव्हारी
Virat Kohli Bumps Sam Konstas: विराट कोहली... आक्रमक विराट कोहली... विरोधी संघाशी बिनधास्त भिडणारा, मग ते बॅटनं असो, बोलीभाषेतून असो, किंवा मग थेट. बॉर्डर-गावस्कर मालिकेत विराट कोहलीचा हाच अंदाज क्रिकेटविश्वानं पुन्हा पाहिला.
मेलबर्न कसोटीच्या पहिल्याच दिवशी विराट कोहली भिडला तो 19 वर्षांच्या सॅम कॉनस्टसशी. पण विराटनं दिलेला हा धक्का ऑस्ट्रेलियन मीडियाला आणि प्रेक्षकांना जोरात बसला. अंपायर्सनीही विराट कोहलीच्या वर्तनावर पेनल्टी लावली आणि विराटविरोधाची ही लाट आणखी तीव्र झाली. आयसीसीच्या नियमानुसार एक डिमेरिट पॉईंट आणि सामना मानधनाच्या 20 टक्के दंड विराटला बसला. पण मैदानात आणि मैदानाबाहेर या घटनेचे जोरदार पडसाद उमटले. विराट कोहलीला मैदानात प्रेक्षकांनी आणि मैदानाबाहेर ऑस्ट्रेलियन मीडियानं टार्गेट करायला सुरुवात केलं.
ऑस्ट्रेलियन मीडियातील काही वृत्तपत्रांच्या हेडलाईन्स विखारी होत्या. कॉनस्टसला धक्का दिल्याचा ऑस्ट्रेलियन मीडियाला इतका राग आला की एका वृत्तपत्रानं त्याला जोकरची उपमा दिली. 'किंग कोहली'अशी ओळख असलेल्या कोहलीला हिणवण्यासाठी कॉन्स्टसच्या खेळीला 'किंग कॉन' असं विशेषण लावलं गेलं. केरी ओकीफ या माजी ऑस्ट्रेलियन खेळाडूनं कॉमेंट्रीदरम्यान विराटलं चक्क गर्विष्ठ म्हटलं. मैदानात तर सीमारेषेजवळ क्षेत्ररक्षण करताना विराटची अनेकवेळा हुर्यो उडवली गेली. दुसऱ्या दिवशी विराट बाद होऊन ड्रेसिंग रुममध्ये जाताना एका प्रेक्षकानं त्याला डिवचलं. त्याला उत्तर देण्यासाठी विराट माघारी फिरला. हा व्हिडीओ सोशल मीडियात चांगलाच व्हायरल झाला.
या सगळ्या घडामोडींसंदर्भात या मालिकेसाठी सध्या समालोचन करणाऱ्या इरफान पठाणनंही यावर प्रतिक्रिया दिली. इरफान पठाण म्हणतो, "ऑस्ट्रेलियन मीडिया ही त्यांची सपोर्ट टीम आहे. काल विराटला 'किंग' म्हणणारे आज त्याला जोकर म्हणतायत.याआधी अनेक वेळा ऑस्ट्रेलियात त्यांच्या खेळाडूंना गैरवर्तनासाठी माफ केलं गेलं पण भारतीय खेळाडूंना आणि मलाही दंड झाला. त्यांच्यासाठी वेगळा न्याय आणि दुसऱ्यांसाठी वेगळा असंच इथे दिसतं."
आता कांगारुंच्या टार्गेटवर विराट कोहलीच का? याचं कारण 2014 च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात दडलंय. भारतानं ती मालिका गमावली पण विराटची बॅट तुफान चालली. याचदरम्यान विराटनं ऑस्ट्रेलियन प्रेक्षकांनाही चोख प्रत्युत्तर दिलं. त्याची प्रेक्षकांना उद्देशून केलेली आक्षेपार्ह कृती तेव्हाही वादाचं कारण ठरली होती. हाच विराट 2018 साली कॅप्टन बनून ऑस्ट्रेलियात आला. आणि त्यानं कांगारुंचं गर्वहरण करत नवा इतिहास घडवला. त्याआधी एकदाही भारतीय संघाला ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका जिंकता आली नव्हती. पण विराटच्या नेतृत्वात भारतानं ते करुन दाखवलं.
आक्रमकतेवरुन विराट अनेक वेळा टीकेचा धनी ठरलाय. पण तो काळ आठवा जेव्हा ऑस्ट्रेलियन संघही यापेक्षा कितीतरी पटीनं आक्रमक होता. रिकी पॉन्टिंग, सायमंड्स, हेडन, वॉर्न, क्लार्क यांचं स्लेजिंग आठवा. विराटनं ऑस्ट्रेलियाला त्याच आक्रमकतेला आक्रमकतेनं उत्तर दिलं. आणि म्हणूनच तो 'किंग' आहे. आणि अनेकदा त्यानं टीम इंडियालाही 'किंग' बनवलंय.