BLOG : "वारी चुको न दे हरी"
महाराष्ट्राविषयी बोलताना इरावती कर्वे यांनी असं म्हटलंय की,"वारीला येणाऱ्या लोकांचं राष्ट्र म्हणजे महाराष्ट्र". पंढरीच्या वारीवेळी याचा प्रत्यय ठायी ठायी येतो..म्हणून 'एक तरी वारी अनुभवावी' असं म्हटलं जातं. लाखो वैष्णवांचा मेळा इंद्रायणीच्या काठी जमतो आणि
"नाचत जाऊ त्याच्या गावाला खेळीया,
सुख देईल विसावा रे ,
तेने जन केला खेळीया रे."
असं गात गात विठू नामात तल्लीन होत पंढरीच्या वाटेवर हा मेळा चालायला लागतो..
पण कोरोना आला आणि पंढरीच्या वाटेवरचं चैतन्य हरवलं.जो इंद्रायणीचा काठ जगदगुरू तुकोबारायांच्या आणि कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती माऊलींच्या पालखी प्रस्थानादिवशी लाखो वारकऱ्यांनी फुलून जायचा..तो सलग दुसऱ्या वर्षी सुना सुना दिसला..प्रस्थान सोहळ्याला ज्या आळंदी अन देहूनं आतापर्यंत नजर पडेल तिथं फक्त वारकरी पाहिले.ज्ञानबा तुकोबाच्या गजरात होत असलेला उत्सव पाहिला, त्या देहू -आळंदीला प्रस्थानाच्या दिवशी सलग दुसऱ्या वर्षी संचारबंदी पाहावी लागावी ही केवढी दुःखाची बाब..कोरोनामुळे हे दुःख लाखो वारकऱ्यांच्या वाट्याला आलंय हे खरं...मागच्या वर्षी वारी घडली नाही ती यावर्षी घडेल अशी आशा लावून बसलेल्या वारकऱ्यांच्या आशेवर कोरोनाच्या आलेल्या दुसऱ्या लाटेने अन् तिसऱ्या लाटेच्या शक्यतेने पाणी फेरले..
पण 'वारी चुको न दे हरी' असं म्हणणाऱ्या वारकऱ्यांनी घरबसल्या वारी अनुभवावी म्हणून एबीपी माझाने "माझा विठ्ठल माझी वारी" या कार्यक्रमाचे आयोजन केलेय..या कव्हरेजसाठी जेव्हा इंद्रायणीच्या काठावर मी गेलो तेव्हा संथ वाहणाऱ्या इंद्रायणीला जणू लाखो वैष्णवांची वाट पाहून गहिवरून आले असणार असं वाटल्याशिवाय राहत नाही..कारण हाच तो दिवस असतो ज्यादिवशी इंद्रायणी उत्सव पाहत असते..मी कल्पना केली की जर आज वारी निघाली असती तर काय चित्र असलं असतं...आनंदाचे डोही आनंद तरंग अशा भावनेने वारकरी बेधुंद होऊन इथे नाचताना दिसले असते..पालखी प्रस्थान सोहळ्याची काय जय्यत तयारी सुरू असली असती..दुपारी देऊळवाड्यात दिंड्या येण्यास सुरूवात झाली असती..या प्रस्थानासाठी जवळपास 47 दिंड्या देऊळवाड्यात असल्या असत्या.प्रत्येक दिंडीमधले वारकरी "ज्ञानबा- तुकोबाच्या भजनावर ठेका धरताना पाहायला मिळाले असते.
झाली तरणी म्हातारी कशी फुगडी घालते ,
दुःख चालले आटत जशी वारी ही चालते.
हे असंच पाहायला मिळालं असतं. कारण महिला वारकऱ्यांनी मुक्तपणे झिमा फुगड्या खेळत ,फेर धरत नाचायला सुरूवात केली असती..कारण याच वारीनं महिलांना बंधनमुक्त केलं..जेव्हा भेटलेल्या महिला वारकऱ्यांना मी विचारलं की वारीत तुम्हाला काय मिळतं ,तर त्या सगळ्या महिला वारकरी म्हणाल्या की आम्हाला मुक्तपणा मिळतो,संसाराची चिंता सोडून मागे न पाहता 15-20 दिवस आनंदाने आम्ही वारीत चालत असतो ,आणि सासुरवाशीणीला माहेरात गेल्यावर कसं वाटतं, तसं आम्हाला पंढरीच्या वाटेवर वाटतं असं त्या महिला जेव्हा म्हणाल्या तेव्हा "माझे माहेर पंढरी का म्हणतात हे उमगलं...सलग दुसऱ्या वर्षी या अशा आपल्या आवडत्या माहेराची वाट धरता येत नाही म्हणून त्यांच्या डोळ्यातली आसवं त्यांच्या अंतःकरणातलं दुःख दाखवत होती..हे दुःख खरंतर वारी करणाऱ्या प्रत्येक वारकऱ्याला आहे .जी कल्पना मी करत होतो तीच कल्पना प्रत्येक वारकऱ्याने केली असेल..की जेव्हा माऊलींच्या पादूका सोहळ्याचे मालक आरफळकर यांच्याकडे सुपूर्द केल्या असत्या तेव्हा रामकृष्णहरी ,माऊली माऊलीचा जयघोष आम्ही तिथं केला असता.आणि कळस हलला म्हणताना केवढा आनंद लाखो वारकऱ्यांना झाला असता..पालखीने अश्वांसह आणि मानाच्या दिंड्यांसोबत मंदिराला घातलेली प्रदक्षिणा,आणि पहिल्या मुक्कामासाठी आजोळघराकडे गांधीवाड्यात पोहोचलेली माऊलींची पालखी हे सगळं सगळं फक्त कल्पना करूनच वारकरी डोळ्यासमोर आणत असावेत.आजोळघरात जसं कोडकौतुक होतं ,पाहुणचार होतो तशीच सेवा माऊली करवून घेतात पण ही सेवा माऊली आमच्याकडणं करवून घेत नाहीये हे म्हणताना आजोळघराचे वंंशजही भावूक झाले कारण आजच्या दिवशी इतकं सुनं त्यांना कधी वाटलं असणार आहे?
"टाळी वाजवावी गुढी उभारावी
वाट ही चालावी पंढरीची"
हे असं म्हणत म्हणत हा प्रवास किती आनंदात होतो याची अनुभूती वारकऱ्यांना आहे..इथे ना जातपात पाहिली जाते,ना भेदाभेद आहे ना लहानथोरपणा.. इथे तर नावानेही कोणाला हाक नसते ..हाक मारली जाते ती फक्त माऊली म्हणून..प्रत्येकजण माऊलींच्या वारीत माऊली होऊन जातो..म्हणून मुस्लिम बांधवही या वारीत सेवा करतात..परिवर्तनाच्या दिशेने वारी वाट दाखवते हे खरंच आहे.सुखाची प्राप्ती आणि दुःखाची निवृत्ती व्हावी म्हणून सावळ्या विठूरायाच्या ओढीनं निघालेला वारकरी मला कुठल्याही तीर्थाची ,व्रताची गरज नाही असं सहज म्हणू शकतो कारण त्याला तुकोबांनी सांगितलंय की,
"पंढरीची वारी आहे माझे घरी,
आणिक न करी तीर्थव्रत".
अशा पंढरीच्या वारीची लाखो वारकरी वाट पाहतायत..तुकोबा आणि माऊलींसोबत आम्हाला ही वाट पुढच्या वर्षी तरी चालायला मिळू दे असं मागणं ते विठूरायाकडे मागतायत.वारकरी म्हणतात की रामकृष्णहरीचा जयघोष करत अंगात चैतन्य संचारतं ,बळ येतं .आम्हाला वारी चालण्याचं फळ नको फक्त आस आहे पांडुरंगाच्या भेटीची..सगळ्या जगाने पाठ फिरवली तरी चालेल पण विठूरायाने आमच्यावर नाराज होऊ नये ,त्याने आम्हाला बोलवावं .त्यानेच जर पाठ फिरवली ,तोच जर नाराज झाला तर आम्ही कोणाकडे पाहावं?प्रत्येक वारकरी म्हणतोय की आम्हाला इंद्रायणी काठी जमायचंय ,आम्हाला माऊलींच्या पालखीला खांदा द्यायचाय,उत्साहाने दिवेघाट चढायचाय ,नीरा स्नान होताना पाहायचंय ,जेव्हा अश्व रिंगणात धावतील तेव्हा काळजात विठू नाचताना अनुभवायचंय ,उडी मारायचीये ,खेळ खेळायचेयत ,धावा करायचाय अन पंढरीत विसावा घ्यायचाय.
माऊलींच्या ,तुकोबारायांच्या पादुकांना असं एसटीने जाताना पाहण्याची ही शेवटची वेळ असू दे बा विठ्ठला..हे कोरोनाचं संकट दूर कर अन तुझ्या वारकऱ्यांना तुझ्या पंढरीची वाट चालू दे..
अनाथांचा नाथ हे तुझे वचन l
धांवे नकों दीन गांजो देऊं l l
तुका म्हणे तुवां धरिलें उदास l
तरी पाहों वास कवणाची l l