एक्स्प्लोर

मोदींचा परतीचा प्रवास सुरु?

गुजरात विधानसभा निवडणुकीचा निकाल ठरवेल 2019 साली केंद्रात 'मोदी रिटर्न' पाहायला मिळेल की मोदी 'रिटर्न' गुजरातमध्ये येतील? तोपर्यंत काँग्रेस कार्यकर्त्यांनी थातूर-मातूर निवडणुकांच्या निकालावरुन हुरळून जाऊ नये. कारण विधानसभा, लोकसभा निवडणुकांचे अंदाज हे कुठल्या ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, महापालिका किंवा एखाद्या पोटनिवडणुकीवरुन बांधता येत नाहीत.

आमच्या गावाकडं रोज 10-12 तास लोडशेडिंग असायची. ही सात-आठ वर्षांपूर्वीची गोष्ट. आताही असते. नाही म्हटले तरी 7-8 तास असतेच असते. त्यामुळे रात्रीच्या वेळेस घरात काळाकुट्ट काळोख असायचा. त्यावेळी दोन-तीन काजवे जरी कुठे कोपऱ्यात चमकले, तरी गावातली लहान पोरं ओरडायची, 'लाईट आली, लाईट आली' वगैरे. वर मथळा मोदींसदर्भात लिहून हे काय नवीनच सुरु केलंय? असा प्रश्न पडण्याआधीच स्पष्ट करतो. तर हे या लेखाशी संबंधितच आहे. काँग्रेसची सद्यस्थिती आमच्या गावातल्या लहान पोरांसारखी झालीय. एखादी महापालिका किंवा पोटनिवडणूक जरी जिंकले, तरी देश जिंकल्यासारखं त्यांना वाटू लागलंय. अर्थात, कुट्ट काळोखात जशी काजव्याच्या किंचित प्रकाशाने पोरांना लाईट येण्याची आशा वाटायची, तसंच मोदींच्या विजयी घोडदौडीत छोटासा विजयही काँग्रेसला मोठी आशा देऊन जातोय. अर्थात, हे स्वाभाविकही आहे. कारण गेली लोकसभा निवडणूक असो वा त्यानंतर वेगवेगळ्या राज्यांमधील विधानसभा निवडणूक असो, भाजपने आपला वारु तुफान पळवला. तो वारु रोखण्यात कुठेतरी काँग्रेसला यश मिळू लागलंय. त्यामुळे आशा पल्लवीत होणं सहाजिक आहे. मी नांदेड महापालिका निवडणूक आणि पंजाबमधील गुरुदासपूर पोटनिवडणुकीतील काँग्रेसच्या एकहाती विजयाबद्दल बोलतोय, हे एव्हाना तुमच्या लक्षात आलंच असेल. या विजयानंतर काँग्रेसच्या आशा प्रचंड वाढल्या आहेत. मोदींचा परतीचा प्रवास सुरु झालाय, अशी प्रतिक्रिया नांदेड महापालिकेच्या विजयानंतर अशोक चव्हाणांनीही दिली आणि नंतर संपूर्ण देशभर तसेच विश्लेषण होत गेले. congress (काँग्रेस) मोदींचा परतीचा प्रवास सुरु झालाय, असे मला पूर्णत: वाटत नाही. किंवा झालाही असेल, पण तो ठामपणे म्हणता येईल, असे सध्यातरी मला नजरेत कोणतीच गोष्ट दिसत नाही. असं का, ते मी पुढे स्पष्ट करेनच. पण तूर्तास या दोन निवडणुकीतून काँग्रेसने हुरळून जाण्याचे कारण नाही, असे मला का वाटतं, हे इथे स्पष्ट करणे मला अधिक महत्त्वाचं वाटतं आहे. काँग्रेसने हुरुळून जाण्याचं कारण नाही! काँग्रेस, भाजपविरोधी पक्ष, काँग्रेसला विचारधारेच्या पातळीवर सहानुभूती देणारे विश्लेषक, तसेच भाजपविरोधी विचारधारेचे लोक इत्यादी घटकांपैकी अनेकांच्या मते मोदींचा परतीचा प्रवास सुरु झाला आहे. 2014 च्या लोकसभेवेळी आणि नंतरच्या काळात अनेक राज्यांमधील विधानसभांच्या वेळी जी काही 'मोदीलाट' होती, ती ओसरत चालली असल्याचेही या घटकांचे मत आहे. पण हे मत आत्मसमाधान करणारे आहे, असे मला वाटते. कारण यात अनेक प्लस-मायनस गोष्टी आहेत. ज्यांवर इथे चर्चा करणार आहे. सुरुवात काँग्रेसच्या आशा पल्लवीत करणाऱ्या दोन निवडणुकांपासूनच करु. अर्थात नांदेड महापालिका आणि गुरुदासपूर पोटनिवडणूक. गुरुदासपूर पोटनिवडणूक : बियास आणि रावी या दोन नद्यांच्या मधोमध गुरुदासपूर वसलंय. अत्यंत संवेदनशील भाग. भारत-पाकिस्तानच्या आंतरराष्ट्रीय रेषेपासून अगदी 10 किलोमीटरवर. ऐतिहासिकदृष्ट्याही तितकंच महत्त्वाचं. महाराजा रणजित सिंह यांची राजधानी दिना नगरही इथेच आहे. असो. तर या गुरुदासपूरमध्ये काही आठवड्यांपूर्वी पोटनिवडणूक झाली. ज्येष्ठ अभिनेते विनोद खन्ना हे गुरुदासपूरमधून भाजपचे खासदार होते. विनोद खन्नांच्या निधनानंतर इथे पोटनिवडणूक झाली. त्यात भाजपचा पराभव करत काँग्रेसचे सुनील जाखर मोठ्या फरकाने विजयी झाले. मात्र तरीही मोदींचा लाट रोखत भाजपच्या जागेवर काँग्रेसने विजय मिळवला, असे एका मर्यादेपर्यंत म्हणता येईल. कारण गुरुदासपूर मतदारसंघाची पार्श्वभूमी लक्षात घेतली, तर हा मतदारसंघ कायमच काँग्रेसोबत राहिलेला दिसून येतो. कारण 1952 सालच्या पहिल्या लोकसभा निवडणुकीपासून ते 1996 च्या 11 व्या निवडणुकीपर्यंत एकूण 10 वेळा इथे काँग्रेसचा उमेदवार निवडून आला आहे. अपवाद 1977 सालचा. कारण 1977 साली जनता लाट होती. त्यावेळी जनता पार्टीचे योग्य दत्त शर्मा निवडून आले होते. त्यानंतर 1998 ला विनोद खन्ना भाजपकडून निवडून आले आणि पुढे सलग तीनवेळा ते जिंकले. मात्र 2009 साली पराभूत झाले. तिथे परत काँग्रेसचा उमेदवार निवडून आला. नंतर 2014 साली पुन्हा विनोद खन्ना जिंकले. अर्थात ते मोदीलाटेत. म्हणजेच 1952 पासून आतापर्यंतच्या 16 पैकी 11 निवडणुकीत काँग्रेसचे खासदार निवडून आले आहेत. मोदींचा परतीचा प्रवास सुरु? (दिवंगत अभिनेते विनोद खन्ना) याचाच दुसरा अर्थ असा की, गुरुदासपूर लोकसभा मतदारसंघ हा मूळचा काँग्रेसचा गड आहे, असं म्हटल्यास चूक ठरणार नाही. 1998 साली प्रसिद्धीच्या शिखरावर असलेल्या सुपरस्टार विनोद खन्नांनी तेथील जनतेला विकासाचं नवं स्वप्न दाखवलं. त्यात ते पंजाबी असणं हे जमेची बाजू होती. ते जिंकले. पुढे त्यांनी काम केले. पुन्हा निवडून येत गेले. मात्र विनोद खन्नांबाबत लोकांमधली नाराजी वाढली म्हणा किंवा काँग्रेसवरील विश्वास म्हणा किंवा आणखी काही, पण 2009 साली खन्ना पराभूत झाले. मात्र पुढे 2014 साली मोदींच्या कृपेने पुन्हा जिंकले. म्हणजे इथल्या जनतेने कधीच भाजपला मनापासून साथ दिली नाहीय. मोदींचा परतीचा प्रवास सुरु? (गुरुदासपूर पोटनिवडणुकीत विजयी झालेले काँग्रेसचे सुनील जाखर) या आकडेवारीचा माझ्या अभ्यासात असा अर्थ निघतो की, गुरुदासपूर हा मूळचा काँग्रेसचा गड आहे. त्यात दुसरीकडे, मोदींच्या ध्येय-धोरणांवर चौफेर टीका होत आहे, हेही जनतेला कळतंय. अशा स्थिती पोटनिवडणूक झाल्यावर मूळच्या काँग्रेसी मतदार असलेल्यांनी आपल्या परंपरेला अनुसरुन काँग्रेसला मतं दिली आणि दणदणीत विजय मिळवून दिला. यात काँग्रेसने भाजपच्या बालेकिल्ल्यात मोदी लाट रोखली, हे म्हणणे जरा घाईचं ठरेल. नांदेड महापालिका निवडणूक : 1951 ते 2014 या काळात नांदेड लोकसभा मतदारसंघात लोकसभेच्या एकूण 15 निवडणुका झाल्या. त्यापैकी 12 वेळा काँग्रेसचा उमेदवार विजयी झाला आहे. मधे एकदा जनता दल, एकदा जनता पार्टी आणि एकदा भाजपचा खासदार होता. विशेष म्हणजे 2014 साली मोदीलाटेत अवघ्या देशात काँग्रेसचे बडे बडे बालेकिल्ले नेस्तनाबूत झाले, तेव्हाही इथल्या जनतेने अशोक चव्हाणांच्या रुपाने काँग्रेसचाच खासदार निवडून दिला. आदर्श घोटाळ्याचा आरोप असतानाही त्यांनी अशोक चव्हाणांना पर्याय निवडला नाही, हेही विशेष. याच लोकसभा मतदारसंघात नांदेड महापालिका येते. नांदेड महापालिकेचा इतिहासही काँग्रेसच्या बाजूनेच आहे. 26 मार्च 1997 साली या महापालिकेची स्थापना झाली. म्हणजे 1997 पासून परवाच्या निवडणुकीपर्यंत एकूण 5 निवडणुका झाल्या. या पाचही वेळा नांदेड महापालिकेत काँग्रेसचीच सत्ता आली आहे. आता केवळ अशोक चव्हाणांनी अधिकचा जोर लावून एकहाती सत्ता काबिज केली. आणि उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री, अनेक मंत्री यांच्या प्रचारसभांनंतरही अशोक चव्हाणांनी आपली सत्ता शाबूत ठेवली. एवढंच. मोदींचा परतीचा प्रवास सुरु? (माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे विद्यमान प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण) मोदीलाट असो वा विधानसभा निवडणूक, नांदेडमधील जनता कायमच काँग्रेसच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिलीय. त्यांना मोदीलाट वगैरेचा काहीही फरक पडला नाही. शिवाय काँग्रेसच्या दोन मुख्यमंत्र्यांचं होमग्राऊंड म्हणूनही याकडे पाहिलं पाहिजे. अशा भरभक्कम बालेकिल्ल्यात महापालिका जिंकून मोदींच्या विजयाचा वारु रोखला, असे म्हणणे म्हणजे काँग्रेसने आपण कुचकामी असल्याचे सांगण्यासारखे आहे. कारण चौफेर तटबंदी असलेल्या बालेकिल्ल्यातही जर पराभव स्वीकारावा लागला असता, तर तो केवळ पराभव नसतो, तर लाजीरवाणा पराभव असतो. त्यामुळे इथल्या निवडणुकीमुळे काँग्रेसच्या आशा पल्लवीत होण्याचेही कारण नाही. एकंदरीत नांदेड महापालिका असो किंवा गुरुदासपूर पोटनिवडणूक, या दोन विजयांमुळे जर काँग्रेस हुरळून जात असेल, तर मग कठीण आहे. पण इथे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. 'मोदींचा परतीचा प्रवास सुरु' अशी हाकाटी आणि हुरुळून जाऊन फुटणारे आनंदाचे धुमारे हे काँग्रेसच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्येच दिसून येते. मग मोदींचा परतीचा प्रवास सुरुच होणार नाही का? तर होण्याची शक्यता आहे. आणि थोडी मेहनत घेतली, तर तो येत्या दोन-तीन महिन्यातच सुरु होईल. आणि तिथे एकदा सुरु झाला की, तो प्रवास पुन्हा मूळ ठिकाणी आणल्याशिवाय थांबणार नाही. या गोष्टी राहुल गांधींना बऱ्यापैकी ठाऊक असाव्यात. कारण मी ज्या गोष्टीच्या आधारे म्हणतोय की, दोन-तीन महिन्यात परतीचा प्रवास सुरु होण्याची शक्यता आहे, ती गोष्ट म्हणजे गुजरात विधानसभा निवडणूक. राहुल गांधींना कदाचित हे कळलं असावं म्हणून कदाचित त्यांन गुजरातमध्ये इतकी कंबर कसली आहे. गुजरात विधानसभा निवडणूक ही काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांसाठी टर्निंग पॉईंट ठरणार आहे. कारण हीच निवडणूक ठरवेल, मोदींचा प्रवास परतीचा आहे की पुन्हा राक्षसी बहुमताकडचा आहे. याची सोप्पी कारणं आहे. त्यासाठी गुजरातच्या सत्तेच्या इतिहासात उडती नजर टाकायला हवी. गुजरातच्या सत्तेचा इतिहास गुजरात हा तसा भाजपचा बालेकिल्ला आहे. कारण 1962 ते 1985 या काळात जरी इथे काँग्रेसकडे कायम बहुमत असलं, तरी 1995 मध्ये काँग्रेसने छोटे-मोठे पक्ष एकत्र करुन कशीतरी सत्ता मिळवली. मात्र 1985 साली केवळ 22 जागांवर जिंकलेल्या भाजपने पुढे 1990 मध्ये 67 आणि 1995 मध्ये थेट 121 जागा जिंकत एकहाती सत्ता मिळवली. ही सत्ता आजतागायत त्यांनी सोडली नाही. किंबहुना 182 जागांच्या गुजरात विधानसभेत भाजप 1995 पासून कधीत 115 जागांच्या खाली गेली नाही. एखाद्याच्या हातात संपूर्ण सत्ता देणे म्हणजे काय असतं, हे गुजराती जनतेने भाजपच्या हाती सत्ता देऊन 1995 पासून दाखवून दिले. सतत एकाच पक्षाकडे. त्यात 1998 पासून सलग चारवेळा तर विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच गुजरातचे मुख्यमंत्री होते. त्यामुळे त्या अर्थाने हा भाजपचा बालेकिल्ला बनलाय. त्यात 'मोदींचा गुजरात' असे म्हणत गुजरात राज्य मोदींच्या प्रतिष्ठेचाही विषय आहे. मोदींचा परतीचा प्रवास सुरु? (गुजरात विधानसभा भवन)  ...तर परतीचा प्रवास निश्चित!  गुजरात यदा-कदाचित भाजपने गमावला आणि काँग्रेसने निसटता जरी विजय मिळवला, तर मोदीलाटेला गळती लागलीच म्हणून समजा आणि मोदींच्या राक्षसी बहुमतातील सत्तेचा परतीचा प्रवास सुरु झालच म्हणून समजा. कारण बालेकिल्ला म्हटला जाणारा, किंबहुना ज्या राज्यातील कथित विकासाच्या बळावर मोदी पंतप्रधान पदाचे दावेदार ठरले, तेच राज्य हातून निसटलं, तर मग परतीचा प्रवास निश्चित. पण 1995 पासून कायम बहुमत मिळवत, तेही 182 जागांपैकी कधीही 115 जागांच्या खाली न आलेला भाजप यावेळी काँग्रेसच्या समोर झुकेल का? तेही मोदींचा अद्याप इतका प्रभाव असतानाही? आणि तेही मोदींच्याच राज्यात?... तर उत्तर ठामपणे देता येत नाही. मात्र काही अंदाज नक्कीच बांधता येतात. ते कोणते ते पाहूया. राहुल गांधींचे हुकमी एक्के गुजरातकडून भाजपविरोधी समूहाची अपेक्षा यासाठी वाढलीय. ती अपेक्षा वाढवण्यासाठी दस्तुरखुद्द मोदी आणि भाजपच कारणीभूत आहेत. मोदींचे वारंवार घडणारे गुजरात दौरे, प्रचारासाठी येणारी केंद्रीय मंत्र्यांची फौज, भाजपशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या धावत्या भेटी, भाजप नेत्यांनी ठोकलेले तळ आणि मोदी-शहांच्या भाषणातून जाणवणारी भीती. या साऱ्या गोष्टी भाजपच्या मनातील अस्थिरता सांगू पाहते. भाजपला गुजरातसारख्या बालेकिल्ल्यात इतकी भीती का वाटावी, याचेही कारण सरळ आहे. ते म्हणजे, राहुल गांधींचे हुकमी एक्के. राहुल गांधींकडे एकूण चार हुकमी एक्के सध्यातरी दिसून येतात. एक म्हणजे त्यांचा झंझावती प्रचार, जो गुजराती जनतेच्या पसंतीस पडू लागला आहे. आणि उर्वरित तीन एक्के म्हणजे, हार्दिक पटेल, जिग्नेश मेवानी आणि अल्पेश ठाकोर हे गुजरातमधील मास-लिडर. राहुल गांधींचा झंझावती प्रचार राहुल गांधींचं पहिला एक्का म्हणजे झंझावती प्रचार. झंझावती म्हणजे कोणत्याही आक्रमक भाषेत नव्हे, तर त्यांच्या नेहमचीच्याच. हलक्या फुलक्या भाषेतला. मात्र तरीही गुजराती जनतेला ते भाषण, राहुल गांधींच्या संवाद साधण्याची पद्धत आवडलेली दिसते. कारण त्यात कोणताही बनावटपणा दिसत नाही. जो मोदींच्या भाषणात दिसतो. बहुधा गुजराती जनतेला राहुल गांधींचा हाच गुण आवडला असावा. म्हणून तिथला प्रतिसाद दिवसागणिक वाढताना दिसतो आहे. याची जाणीव भाजपलाही आहे. म्हणून मोदींपासून सर्व मंत्र्यांची फौज गुजरातमध्ये दाखल होतेय. कारण गुजरात विधानसभा विजय हा केवळ एका राज्याचा विजय ठरणार नाही, तर तो मोदींसह भाजपच्या प्रतिष्ठेचा विषय आहे. मात्र मोदींसह भाजपच्या प्रतिष्ठेच्या या विषयाला राहुल गांधींच्या उर्वरिततीन एक्क्यांनी गंभीर जखमा केल्या आहेत. ते  म्हणजे गुजरातमधील मास-लिडर्सचं त्रिकूट. अर्थात पाटीदार समाजाचा नेता हार्दिक पटेल, दलित समाजाचा नेता जिग्नेश मेवानी आणि ओबीसी नेता अल्पेश ठाकोर. index.php (डावीकडून : काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी, हार्दिक पटेल, जिग्नेश मेवानी आणि अल्पेश ठाकोर) हार्दिक पटेल.. पाटीदार समाजाचा लोकप्रिय नेता हार्दिक पटेल हा पाटीदार समाजाचा नेता आहे. पाटीदार समाज हा गुजरातमधील सर्व निवडणुकांमधील निर्णायक गट मानला जातो. या समाजात हार्दिक पटेल हा तरुण सध्या सर्वात लोकप्रिय नेता आहे. मधल्या काळात भाजपने त्याला डिवचलं. शिवाय पाटीदार समाजाला आरक्षण देण्याच्या आश्वासनालाही भाजपने लांबवलं. त्यामुळे हार्दिकसोबत संपूर्ण पाटीदार समाज नाराज आहे. हार्दिकची लोकप्रियता प्रचंड आहे. हार्दिकने काँग्रेसमध्ये प्रवेश केला नाही. मात्र हार्दिकचा सर्वाधिक फायदा काँग्रेसला होणार आहे. कारण भाजपच्या पराभवाची हार्दिक पटेलने एकप्रकारे शपथच घेतलीय. त्यामुळे त्याला मानणारा समाज हा काँग्रेसच्या मागे उभा करण्यासाठी हार्दिक करेल, यात शंका नाही. जिग्नेश मेवानी... दलित समाजाचं युवा नेतृत्त्व जिग्नेश मेवानीचंही हार्दिक पटेलसारखंच आहे. तो काँग्रेसमध्ये प्रवेश करणार नाही. मात्र भाजपच्या पराभवासाठी काँग्रेसला साथ देण्याचं त्याने ठरवलं आहे. जिग्नेश हा गुजरातमधील दलितांचा मोठा नेता आहे. 34 वर्षांचा हा युवक पेशाने वकील आहे. 2008 पासून तो चळवळीच्या माध्यमातून कार्यरत आहे. राष्ट्रीय दलित अधिकार मंच ही त्याची संघटना आहे. त्याच्या एका हाकेला दलित समाजातून मोठी साद मिळते. त्यामुळे दलित समाज, जो खरंतर नेहमीच काँग्रेससोबत राहिला आहे. तो अधिक मजबुतीने काँग्रेसच्या बाजूने एकवटण्यास मदत होईल. अल्पेश ठाकोर... ओबीसींचा चेहरा तिसरा आहे अल्पेश ठाकोर. गुजरातमधील ओबीसी समाजाचा वन ऑफ द बिग लिडर. ओएसएस (OBC, SC and ST) एकता मंच ही अल्पेश ठाकोरची संघटना. गुजरातमध्ये 40 टक्के समाज हा ओबीसी आहे. त्यामुळे काँग्रेसला अल्पेश ठाकोरचा मोठा फायदा होईल. शिवाय अल्पेश ठाकोरने ऑफिशियली काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे त्याच्या मागे उभा असलेला ओबीसी समाज, जो त्याने मोठ्या मेहनतीने सोबत ठेवला आहे, तो काँग्रेसच्या बाजूने उभा राहिल, यात शंका नाही. मोदींचे वाढते गुजरात दौरे पंतप्रधान मोदींनी एकेकाळी ज्या विकासाचं बिगुल वाजवत, राष्ट्रीय राजकारणात प्रवेश करत थेट देशाच्या सर्वोच्च पदावर उडी मारली. त्याच विकासाचं बिगुल किती पोकळ आहे, हेच त्यांचे सातत्याने होणारे दौरे सिद्ध करत आहेत, अशी चर्चा सुरु आहे. कारण विकास केलाय मग "मोदींचे दौरे का, मंत्र्यांची फौज का, भाजप नेत्यांना तळ ठोकून का बसावं लागतंय", अशा प्रश्नांची सरबत्ती सोशल मीडियासह ग्राऊंड लेव्हललाही सुरु आहे. राहुल गांधींनी तर या सर्व गोष्टींना आपल्या भाषणाचा अजेंडाच केलाय. modi-sad-580x376 (पंतप्रधान नरेंद्र मोदी) एकंदरीत काय तर, गुजरात विधानसभा निवडणुकीचा निकाल ठरवेल 2019 साली केंद्रात 'मोदी रिटर्न' पाहायला मिळेल की मोदी 'रिटर्न' गुजरातमध्ये येतील? तोपर्यंत काँग्रेस कार्यकर्त्यांनी थातूर-मातूर निवडणुकांच्या निकालावरुन हुरळून जाऊ नये. कारण विधानसभा, लोकसभा निवडणुकांचे अंदाज हे कुठल्या ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, महापालिका किंवा एखाद्या पोटनिवडणुकीवरुन बांधता येत नाहीत. त्यासाठी राज्यव्यापी विधानसभा निवडणुकीची गरज असते. आणि आता मोदी लाट ओसरलीय का, मोदींचा परतीचा प्रवास सुरु झालाय का वगैरे प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी आणि पुढील अंदाज बांधण्यासाठी गुजरातच्या निकालाची वाट पाहावी लागणार आहे. नामदेव अंजना यांचे याआधीचे ब्लॉग : लालराणीचा राजा उपाशी आय लव्ह यू सनी लिओनी! प्रिय गुरुजी... फिडेल कॅस्ट्रो : अमेरिकेचा झंझावात रोखणारं वादळ क्षमा सावंत : अमेरिकेतील समाजवादी नेत्या योद्धा शेतकरी ब्लॉग : शांतीलाल नावाचा जाणिवांचा झरा! बुकशेल्फ : आय अॅम अ ट्रोल बुकशेल्फ : शहर आत्महत्या करायचं म्हणतंय..! बुकशेल्फ : लेनिन, यशवंतराव आणि जॉन रीड्सचं पुस्तक बुकशेल्फ : माझ्या आईची गोष्ट                                
अधिक पाहा..

ओपिनियन

Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

घरात कुणीच नसल्याचं पाहून बॉयफ्रेंड घरात शिरला, दोन मुलांच्या आईच्या प्रेमाचा THE END; विरार मर्डरची इनसाइड स्टोरी
घरात कुणीच नसल्याचं पाहून बॉयफ्रेंड घरात शिरला, दोन मुलांच्या आईच्या प्रेमाचा THE END; विरार मर्डरची इनसाइड स्टोरी
NEET पेपरफुटीचं आता धाराशिव कनेक्शन; घराला कुलूप लावून आरोपी बायका-लेकरांसह फरार
NEET पेपरफुटीचं आता धाराशिव कनेक्शन; घराला कुलूप लावून आरोपी बायका-लेकरांसह फरार
Cheapest Flight Tickets : स्वस्तात मस्त विमान तिकिट हवंय? आठवड्यातील फक्त 'या' दोन दिवशी सकाळीच बुक करा तिकिट!
स्वस्तात मस्त विमान तिकिट हवंय? आठवड्यातील फक्त 'या' दोन दिवशी सकाळीच बुक करा तिकिट!
आमचे काका निवडणुकीत पडल्यानंतर चांगलं काम करतात; पुतण्या संदीप यांचा जयदत्त क्षीरसागरांना सणसणीत टोला
आमचे काका निवडणुकीत पडल्यानंतर चांगलं काम करतात; पुतण्या संदीप यांचा जयदत्त क्षीरसागरांना सणसणीत टोला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

MVA PC On Monsoon Session : उद्यापासून विधिमंडळाचं अधिवेशन, सरकारच्या चहापानावर विरोधकांचा बहिष्कारManoj Jarange : मराठयांवरती 100 टक्के अन्याय होणार, आता ताकदीनं उठाव करणारABP Majha Headlines : 03 PM : 26 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सTop 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट 26 June 2024 ABP Majha

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
घरात कुणीच नसल्याचं पाहून बॉयफ्रेंड घरात शिरला, दोन मुलांच्या आईच्या प्रेमाचा THE END; विरार मर्डरची इनसाइड स्टोरी
घरात कुणीच नसल्याचं पाहून बॉयफ्रेंड घरात शिरला, दोन मुलांच्या आईच्या प्रेमाचा THE END; विरार मर्डरची इनसाइड स्टोरी
NEET पेपरफुटीचं आता धाराशिव कनेक्शन; घराला कुलूप लावून आरोपी बायका-लेकरांसह फरार
NEET पेपरफुटीचं आता धाराशिव कनेक्शन; घराला कुलूप लावून आरोपी बायका-लेकरांसह फरार
Cheapest Flight Tickets : स्वस्तात मस्त विमान तिकिट हवंय? आठवड्यातील फक्त 'या' दोन दिवशी सकाळीच बुक करा तिकिट!
स्वस्तात मस्त विमान तिकिट हवंय? आठवड्यातील फक्त 'या' दोन दिवशी सकाळीच बुक करा तिकिट!
आमचे काका निवडणुकीत पडल्यानंतर चांगलं काम करतात; पुतण्या संदीप यांचा जयदत्त क्षीरसागरांना सणसणीत टोला
आमचे काका निवडणुकीत पडल्यानंतर चांगलं काम करतात; पुतण्या संदीप यांचा जयदत्त क्षीरसागरांना सणसणीत टोला
Rahul Gandhi: मोठी बातमी : शरद पवारांपाठोपाठ राहुल गांधीही ज्ञानोबा तुकारामाचा गजर करणार, पंढरीच्या वारीत पायी चालणार?
शरद पवारांपाठोपाठ राहुल गांधीही ज्ञानोबा तुकारामाचा गजर करणार, पंढरीच्या वारीत पायी चालणार?
Marathi Serial Updates Zee Marathi : 'लाखात एक दादा'ची ऑन एअरची वेळ ठरली,  झी मराठीवरील 'या' मालिकेचे काय होणार?
'लाखात एक दादा'ची ऑन एअरची वेळ ठरली, झी मराठीवरील 'या' मालिकेचे काय होणार?
Potential Benefits of Tea Free Diet : एक महिना चहा घेतलाच नाही, तर काय होईल? शरीरात कोणते बदल होऊ शकतात?
एक महिना चहा घेतलाच नाही, तर काय होईल? शरीरात कोणते बदल होऊ शकतात?
पराभवानंतर नवनीत राणा 23 दिवसांनी फडणवीसांना भेटल्या; भाजपातच राहणार, पराभवावर काय झाली चर्चा?
पराभवानंतर नवनीत राणा 23 दिवसांनी फडणवीसांना भेटल्या; भाजपातच राहणार, पराभवावर काय झाली चर्चा?
Embed widget