Lok Sabha Election History: आठवी लोकसभा 1984; काँग्रेस 400 पार, राजीव गांधी पंतप्रधान
Eighth Lok Sabha Election 1984 : इतिहास लोकसभा निवडणुकांचा : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी यावेळच्या लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Election 2024) चारसौ पारची घोषणा दिली आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) या निवडणुकीत 400 पार जाईल, असा विश्वास नरेंद्र मोदी (PM Modi) सतत व्यक्त करत आहेत. भाजपच्या सर्व कार्यकर्ते आणि नेत्यांनीही 400 पारचा नारा पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. परंतु, 1984 च्या लोकसभा निवडणुकीत 400 पारची घोषणा न देताही काँग्रेसनं 400 चा आकडा पार केला होता.
इंदिरा गांधींच्या हत्येनंतर दोन महिन्यांनीच आठव्या लोकसभेसाठी निवडणुका झाला. 31 ऑक्टोबर 1984 ला इंदिरा गांधींची हत्या झाली आणि डिसेंबर 1984 मध्ये निवडणुका झाल्या. पंतप्रधान म्हणून आणि इंदिरा गांधींच्या अनुपस्थित पक्षाची संपूर्ण जबाबदारी राजीव गांधींवर होती. वयाच्या अवघ्या 40 व्या वर्षी अपघातानं पंतप्रधान झालेल्या राजीव गांधींना यापैकी कशाचाही अनुभव नव्हता, पण त्यांना इंदिरा गांधींच्या हत्येमुळे निर्माण झालेल्या सहानुभूतीचा फायदा मिळाला आणि काँग्रेसनं या निवडणुकीत 400 पारचा नारा न देताही 524 पैकी 415 जागांवर विजय मिळवला होता.
राजीव गांधी यांनी निवडणूक प्रचारात कुटुंबाच्या योगदानाची सतत देशातील जनतेला आठवण करून दिली. एवढंच नव्हे तर देशाला प्रगतीपथावर आपण नेऊ शकतो, हा विश्वासही त्यांनी मतदारांच्या मनात निर्माण केला होता. इंदिरा गांधींच्या हत्येमुळे राजीव गांधीबाबत जनतेत निर्माण झालेली सहानुभूती, त्यांचं तरुणपण आणि भविष्याचा विचार करणारा नेता या दोन गोष्टींमुळे भारतीय जनतेनं काँग्रेसच्या पारड्यात भरभरून मते टाकली. या निवडणुकीत जवळ जवळ 63 टक्के मतदान झाले म्हणजेच 40 कोटी मतदारांपैकी 25 कोटी 60 लाख मतदारांनी मतदान केले होते. त्यापैकी 50 टक्के मतदान हे काँग्रेसला झाले होते आणि वयाच्या 40 व्या वर्षी राजीव गांधी देशाचे सर्वात तरुण पंतप्रधान झाले. राजीव गांधी यांनी या निवडणुकीत त्यांचा मित्र असलेल्या अमिताभ बच्चन यांना निवडणुकीच्या मैदानात उतरवले होते. अमिताभ बच्चन यांनी अलाहाबादमधून हेमवती नंदन बहुगुणा यांचा पराभव केला होता. तर सुनील दत्त यांनी मुंबईच्या उत्तर-पूर्व मतदारसंघात प्रमोद महाजन यांचा पराभव केला होता. या निवडणुकीत शरद पवार, वसंत साठे, शंकरराव चव्हाण, व्ही. एन, गाडगीळ, शिवराज पाटील, गुलाम नबी आझाद, मुकुल वासनीक, पी, व्ही. नरसिंह राव, राजेश पायलट, नटवर सिंह, बूटा सिंह, अशोक गेहलोत हे काँग्रेस नेते विजयी झाले होते.
या निवडणुकीत तेलुगु देसम काँग्रेसखालोखाल दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला. तेलगु देसमचे 30 खासदार निवडून आले होते. एखादा प्रादेशिक पक्ष संसदेत विरोधी पक्ष म्हणून काम करण्याची ही पहिलीच आणि एकुलती एक घटना ठरली होती. संपूर्ण देशात काँग्रेसची लाट होती, पण आंध्र प्रदेशमध्ये एन. टी. रामाराव यांच्या तेलुगु देसमनं काँग्रेसचा रथ रोखला होता. आंध्र प्रदेशमधील 42 पैकी 30 जागांवर तेलुगु देसम विजयी झाली होती, तर काँग्रेसला फक्त 6 जागा मिळाल्या होत्या. चंद्रशेखर यांच्या जनता पार्टीनं 207 जागांवर निवडणूक लढवली, मात्र त्यांना फक्त 10 जागांवर विजय मिळवता आला. जनता पक्षाच्या निम्म्यापेक्षा जास्त उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली होती. चौधरी चरणसिंह यांच्या लोकदलाला 3 जागा मिळाल्या. बाबू जगनजीवन राम यांनी जनता पारर्टीपासून दूर होत स्वतःची काँग्रेस (जे) तयार केली होती. या पक्षातर्फे तेच एकटे निवडून आले होते.
आतापर्यंत जनसंघ नावाने देशाच्या राजकारणात राजकारण करणाऱ्या पक्षाने भारतीय जनता पक्ष असे नवे नाव घेऊन, नवे रूप घेतले आणि भारतीय जनता पक्षाच्या नावाने पहिलीच निवडणूक लढवली. भाजप नेते सतत जेव्हा बोलतात की आमचे फक्त दोन खासदार होते आणि तेथून आम्ही आज इथवर आलो आहे, ते भाजपचे दोन खासदार याच निवडणुकीत निवडून आले होते. त्यापैकी एक होते जी. सांगला रेड्डी. रेड्डी यांनी आंध्र प्रदेशच्या हनामकोंडा मतदारसंघातून निवडणूक लढवताना तत्कालीन परराष्ट्र मंत्री पी. व्ही. नरसिंह राव यांचा 54, 198 मतांनी पराभव केला होता. तर गुजरातच्या मेहसाणामधून भाजपच्या अमृतलाल कालीदास पटेल यांचा विजय झाला होता. त्यांनी काँग्रेसच्या सागरभाई रांका यांचा 43 हजार मतांनी पराभव केला होता.
सहानुभूतीच्या या लाटेत विरोधी पक्षाच्या अनेक मोठ्या नेत्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. अटलबिहारी वाजपेयी यांचा माधवराव शिंदे यांनी ग्वाल्हेरमध्ये पराभव केला. मुरली मनोहर जोशी, राम जेठमलानी, उमा भारती, सुषमा स्वराज, वसुंधरा राजे इत्यादी भाजप नेत्यांनाही पराभवाचा सामना करावा लागला. जॉर्ज फर्नांडिस यांचा बंगलोर उत्तरमधून काँग्रेस उमेदवार सी. के. जाफ़र शरीफ़ यांनी पराभव केला. कर्पुरी ठाकूर, रामविलास पासवान, तारकेश्वरी सिन्हा, शरद यादव यांचाही पराभव झाला. इंदिरा गांधी यांची लहान सून, संजय गा्ंधी यांची पत्नी मेनका गांधींचा अमेठीत स्वतः राजीव गांधी यांनी पराभव केला. विशेष म्हणजे सर्व विरोधी पक्षांनी मनेका यांना पाठिबा दिला होता, तरीही त्यांचा पराभव झाला.
सहानुभूतीच्या या वादळातही विरोधी पक्षाच्या काही नेत्यांनी विजय मिळवला. त्यात मधु दंडवते (राजापूर), कामगार नेते दत्ता सामंत (मुंबई दक्षिण मध्य) यांचा समावेश आहे. याच निवडणुकीत विजयी होऊन दत्ता सामंत प्रथमच खासदार म्हणून संसदेत पोहोचले होते.
31 ऑक्टोबर 1984 ला इंदिरा गांधी यांची हत्या झाली होती तर 1986 मध्येही राजीव गांधी पंतप्रधान असतानाच त्यांनाही मारण्याचा प्रयत्न झाला होता. 2 ऑक्टोबरला गांधी जयंतीनिमित्त राजीव गांधी नवी दिल्लीतील राजघाटावर महात्मा गांधींच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी गेले होते तेव्हा त्यांच्यावर करमजीत सिंग नावाच्या सीख तरुणाने तीन गोळ्या झाडल्या होत्या. राजीव गांधी तेव्हा सुदैवानेच बचावले होते. राजीव गांधींच्या हत्येसाठी करमजीत जवळ-जवळ आठ दिवस तो महात्मा गांधी समाधीच्या मागील बाजूस असलेल्या यमुना नदीच्या काठावरील झाडांमध्ये राहिला होता. त्याबाबत सविस्तर नंतर कधी तरी.
महत्त्वाच्या इतर ब्लॉग :
1980 सातवी सार्वत्रिक निवडणूक; सूडाचं राजकारण, इंदिरा गांधींची सत्तावापसी आणि जीवनाचा अंत