लाडक्या बहिणींचं क्रॉस व्हेरिफिकेशन, 7 दिवसांत स्रुटीनी; आदिती तटकरेंनी सांगितलं कोण गळणार?
राज्यात जवळपास अडीच कोटी महिलांना या योजनेचा लाभ मिळत असून दरमहा दीड हजार रुपये या महिलांच्या बँक खात्यात जमा होत आहेत.
मुंबई : विधानसभा निवडणुकांच्या अगोदर राज्यात लाडकी बहीण योजनेचा (Ladki bahin Yojana) बोलबाला पाहायला मिळाला. महायुतीमधील तिन्ही पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी लाडक्या बहिणींना महायुतीसाठी मतदान करण्याचं आवाहन केलं. विशेष म्हणजे निवडणूक निकालानंतर लाडक्या बहिणींची महायुतीवरी माया दिसून आली. राज्यात तब्बल 237 जागांवर महायुतीला घवघवीत यश मिळालं. अर्थातच, महायुतीमधील (Mahayuti) सर्वच पक्षाच्या प्रमुखांनी विजयाचं श्रेय महायुतीला दिलं. कारण, विधानसभा निवडणुकांच्या अगोदर अंदाजे अडीच कोटी लाडक्या बहिणींना या योजनेचा लाभ मिळाला आहे. मात्र, आता दुसऱ्यांदा महायुतीचं सरकार स्थापन झाल्यानंतर या योजनेचा चुकीच्या पद्धतीने लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांची नावे योजनेतून बाद करण्यात येणार आहेत. त्यासाठी, 2.5 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या व घरी चारचाकी गाडी असलेल्या लाभार्थ्यांना या योजनेतून वगळण्यात येणार आहे. त्यांची स्रुटीनी (पडताळणी) होणार असल्याचं महिला व बालकल्याणमंत्री आदिती तटकरे (Aditi Tatkare) यांनी म्हटलं आहे.
राज्यात जवळपास अडीच कोटी महिलांना या योजनेचा लाभ मिळत असून दरमहा दीड हजार रुपये या महिलांच्या बँक खात्यात जमा होत आहेत. आता, या लाभार्थ्यांची पडताळणी केली जाणार आहे, पण सरसकट स्क्रुटीनी होणार नाही. स्थानिक प्रशासनाकडून ज्या तक्रारी येतील त्यांच्यावर कारवाई होईल. चार चाकी गाड्या असणाऱ्या लाभधारकांना आता या योजनेचा लाभ मिळणार नाही. ज्यांजे उत्पन्न 1 लाख रुपयांपेक्षा कमी आहे, त्यांची स्क्रुटीनी होण्याचा विषयच नाही, असेही तटकरे यांनी म्हटले. आपण क्रॉस व्हेरिफिकेशन करणार आहोत, 60 ते 70 टक्के लोक असे आहेत जे पिवळे आणि केशरी कार्डधारक आहेत, त्यांचं उत्त्पन्न अडीच लाखापेक्षा कमी आहे. ते या स्क्रुटीनीच्या निकषात नाहीत. ज्यांचं आधारकार्ड आणि बँक खाते नंबर मॅच होतं आहे, ते देखील स्क्रुटीनीमध्ये येणार नाहीत. कारण, त्यांचं उत्पन्न किती आहे हे आपल्या लक्षात आलेलं आहे, अशी माहिती आदिती तटकरे यांनी दिली.
पैसे परत घेणार नाही
या योजनेत ज्यांनी घोटाळा केला आहे, त्यांच्यावर करवाई होईल. दुबार नोंदणी, वाढीव इन्कम आणि मायग्रेशन यांच्या तक्रारी आल्या आहेत, त्यांच्यावर करवाई होईल. आत्तापर्यंत ज्यांना पैसे गेले आहेत, परंतु आता ते निकषात बसत नाहीत त्यांना यानंतरचे पैसै मिळणार नाहीत. पण, त्यांचे आजपर्यंत मिळालेले पैसे सरकार माघारी घेणारं नाही, असेही मंत्री आदिती तटकरे यांनी म्हटले.
सरकारच्या विविध विभागांकडून स्क्रुटीनी
लाडक्या बहीण योजनेचा गैरवापर केल्याच्या तक्रारी किती आल्या आहेत, तो आकडा माझ्याकडे नाही. पुढील 8 ते 10 दिवसांत 70 ते 80 टक्के स्क्रुटीनी होईल. आम्ही परिवहन विभाग, आयटी विभाग, सेंट्रल गव्हर्मेंटकडून माहिती घेत आधार तपासणीबाबतची मदत घेणारं अहोत. या विभागाशी आमचं क्रॉस व्हेरीफिकेशन होइल आणि त्यानंतर योजनेचा चुकीच्या पद्धतीने लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांवर करवाई होईल, असेही तटकरे यांनी सांगितले.
हेही वाचा
मुंबईत मराठी-हिंदी वाद; मुंब्रा बंद करुन टाकेन म्हणणाऱ्यात रुणाला जमावाने मागायला लावली माफी