एक्स्प्लोर
चालू वर्तमानकाळ (28) : सुंदर, सजलेल्या, तरुण बाहुल्या
सैनिकांना लढायला बळ देणारे पोवाडे आणि लढून थकल्यावर मनोरंजन करणाऱ्या लावण्या हे जुनं गणित आपल्याकडे आहेच. मैदान खेळाचं असो, लढाईचं असो वा वैचारिक युद्धाचं असो... तिथं चिअर्स गर्ल्स, ग्रीड गर्ल्स आपली ‘महत्त्वाची मूळ भूमिका’ बजावण्यासाठी तत्पर उभ्या हव्याच वाटतात.

एका महाविद्यालयाकडून अखिल भारतीय चर्चासत्रासाठीचं आमंत्रण आलं होतं. मी बीजभाषण करुन चर्चासत्राची सुरुवात करून द्यायची होती. चार दिवस खपून ‘पेपर’ तयार केला आणि आजकालच्या चर्चासत्रांच्या स्वरुपाविषयी मी अनभिज्ञ असल्याने तो वायाही गेला. चर्चासत्राच्या ‘उद्घाटनाचा सोहळा’ असतो, हा पहिला धक्का होता. स्नेहसंमेलन आणि चर्चासत्र या दोनच तर सजून-धजून मिरवण्याच्या संधी असतात, असं एका उपस्थित प्राध्यापिकेने सांगितल्यावर मी थक्कच झाले. ती एखाद्या लग्नाला जाऊन थेट कॉलेजात आली असावी, हा माझा गैरसमज होता. स्वत:चं लग्न असावं इतकं ती सजली होती, केवळ मेहंदी नव्हती हातांवर.
चर्चासत्र ज्या सभागृहात होतं, तिथं ‘अंगणा’त संस्कारभारतीच्या मोठाल्या बटबटीत रांगोळ्या काढल्या होत्या. या रांगोळ्या आधीच अरुंद असलेल्या जिन्यांवरून कंटिन्यू केल्या होत्या, त्या पुढे कॅरीडॉरमधून वाहत थेट सभागृहात येऊन तिथल्या चार फूट उंच समईभोवती फिरून थांबल्या होत्या. ज्या मुलींनी आदला दिवसभर खपून या रांगोळ्या काढल्या, त्यांचं कौतुक आम्ही पाहुण्यांनी करणं अपेक्षित होतं. या मुलींनी रांगोळ्या काढताना साडीची अडचण होईल, म्हणून सलवार-कमीझ घातले होते खरे, पण बाकी हेअरस्टाईल वगैरे सजावट होतीच. सर्वांत जास्त सजल्या होत्या, त्या व्यासपीठ उर्फ विचारपीठावर वावरण्याचं काम असलेल्या मुली. टिकल्या लावलेल्या मच्छरदाणी साड्या, नखशिखान्त भरपूर खोटे दागिने, चेहऱ्यावर चोपडलेले मेकअप अनेकानेक थर. हातात वेलवेट लावून सजवलेल्या थाळ्या. यांच्यातल्या काहींनी दारात पाहुण्यांना टिळे वगैरे लावून ओवाळण्याचा कार्यक्रम केला. काही स्वागतगीत गायला उभ्या ठाकल्या. काही व्यासपीठावर पुष्पगुच्छ, शाली, मानचिन्हं वगैरे द्यायला हातात तबकं घेऊन विंगेत उभ्या होत्या. एक समईजवळ मेणबत्ती-काडेपेटी घेऊन. पाचवार साड्या, नऊवर साड्या, गुजराती पदर, बंगाली पदर, कुणी घागरे नेसलेल्या, कुणी चनियाचोलीवाल्या. नाकांत नथी, केसांत मोती, केसांचे फुगे केलेल्या केशरचना, त्यांत डोक्याची फुलदाणी करणारी फुलं वा डझनभर गजरे, रंगवलेले ओठ व रंगवलेली नखं... एक ना दोन ‘प्रेक्षणीयता’ वाढवण्यासाठी केलेल्या गोष्टी! आणि हे सारं स्त्रीवादी साहित्यावरील चर्चासत्रात! आणि ‘स्त्रीने स्वसंरक्षण कसं करावं?’ या विषयावरील परिसंवादावेळी देखील! कॉलेजात फक्त मुलीच होत्या असं नाही, मुलगेही होते; ते गरजेनुसार काही हमाली कामं करून मोकळे होऊन मागच्या रांगांमधील खुर्च्यांवर बसून होते. ‘सूत्रसंचालक’ म्हणून गोरा रंग, नाकीडोळी उठावदार, चांगली फिगर असलेली ही वैशिष्ट्यं असलेली तरुणी आवश्यकच; फक्त या बाकी मिरवत्या मुलींप्रमाणे लाजून हसत राहण्याहून थोडं धिटाईने माईकसमोर चार वाक्यं लाडिकपणे बोलण्याचं काम तिला जमायला हवं ही अट.
या सगळ्या एकप्रकारच्या चिअरगर्ल्सच आहेत, असं वाटू लागलं आणि चर्चासत्र, व्याख्यान, परिसंवाद अशा ‘वैचारिक’ मानल्या जाणाऱ्या उपक्रमांमध्ये या सजावटीचं काय काम हेही कळेनासं झालं. जेवणावेळी मी हे बोलून दाखवलं, पण ते कुणालाही आवडलं नाही. त्यांनी त्यांचे मुद्दे मांडले... तरुण मुलींनी, स्त्रियांनी सजायचं नाही, मिरवायचं नाही, तर कुणी? ओवाळणं, रांगोळ्या काढणं वगैरे तर ‘आपली संस्कृती’ आहे; चर्चासत्र असलं म्हणून काय झालं, अशा चांगल्या परंपरा सोडून द्यायच्या की काय? वगैरे. एक प्राध्यापिका म्हणाल्या, “सगळ्या मुली काही हुशार नसतात. त्यांना उद्या रिसेप्शनिस्ट, स्टेनो-टायपिस्ट, सेल्सगर्ल, नर्स, मदतनीस, सूत्रसंचालक, निवेदक असलीच कामं मिळू शकतात; मग त्यांना सुंदर दिसणं, मेकअप करणं, नम्रतेनं बोलणं, देखभाल – सेवा करणं जमायला हवंच. ते प्रशिक्षण अशा कार्यक्रमांमधून मिळत असेल तर त्यात गैर ते काय? हेही काम जमलं नाही, तर बेरोजगार राहतील त्या. आजकाल नुसतं चूलमूल सांभाळणारी बायको पुरेशी नसते; त्याखेरीज तिनं कमावून आणायलाच हवं असतं घरात.”
यानंतर काहीही बोललं तरी ते पालथ्या घड्यावर पाणी असणार हे कळून चुकलं. यांचीच यादी कंटिन्यू करायची, तर ती अजून कुठकुठल्या कामांपर्यंत जाते, हे मला ठाऊक होतंच.
या पार्श्वभूमीवर एक चांगली बातमी वाचली : ग्रीड गर्ल्स म्हणून खेळाच्या मैदानात झळकणाऱ्या तरुणी यापुढे या रीतीने मैदानात दिसणार नाहीत!
“ही प्रथा अयोग्य असून, आधुनिक समाजात तिला स्थान असता कामा नये. मैदानात तरुणी खेळाडू म्हणून खेळताना दिसल्या पाहिजेत आणि व्यासपीठावर जिंकलेल्या खेळाडू म्हणून पदकं स्वीकारताना दिसल्या पाहिजेत!” असं फॉर्म्युला वनकडून काढलेल्या विशेष पत्रकात नोंदवलं असल्याच्या बातम्या वृत्तपत्रांतून झळकल्या आणि चांगला बदल करण्याची बुद्धी लोकांना होतेय, याचा विशेष आनंद वाटला. मोटर स्पोर्ट ड्रायव्हर करुण चंढोक याने एक पाउल पुढे जाऊन असं आवाहन केलं की, “ग्रीड गर्ल्सच्या मिरवण्यावर जितका पैसा खर्च होत होता, तो आता महिला खेळाडू घडवण्यासाठी वापरला जावा. मोटर स्पोर्टसारखे खेळ स्पर्धेत खेळण्यासाठी अधिकाधिक महिला ड्रायव्हर्स तयार केल्या जाव्यात.”
या ग्रीड गर्ल्सची भूमिकाच मुळात कचकड्याच्या बाहुलीची असते. सायकल शर्यतीच्या पुरस्कार समारंभात विजेत्या ड्रायव्हरसोबत त्याच्या नावाची पाटी घेऊन एकेक तरुणी क्रमांकानुसार उभी असते. ट्रॉफीसोबत प्रथा म्हणून विजेत्याला शॅम्पेन दिली जाते. शॅम्पेन उघडून जल्लोषात फवारणं, हे एरवी नेहमीचं दृश्य असलं तरी या प्रसंगी ती या शेजारच्या तरुणीच्या चेहऱ्यावर उडवली जाते आणि हे त्यांनी हसून साजरं करायचं असतं. मग विजेत्याच्या गालाचं चुंबन घेऊन त्याच्यासोबत फोटोसेशन करायचं असतं. त्या तरुण, देखण्या, मादक असणं ही अट या देखाव्यांसाठी महत्त्वाची असतेच. सायकल शर्यतींच्या प्रमाणेच व्यावसायिक बॉक्सिंग आणि मार्शल आर्ट या क्रीडा प्रकारांमध्येही अशा तरुणी दिसतात. आयपीएल टी-२० स्पर्धेतही चीअरलीडर्सना चौकार, षटकार आणि विकेट्सनंतर भडक, तोकड्या कपड्यांमध्ये मैदानात येऊन नाचणाऱ्या चिअर्स गर्ल्स तर आता आपल्याला माहीत आहेतच. चिअर्स लीडर म्हणून मात्र एखादी स्त्री दिसल्याचं आठवत नाही; कारण ते काम भावनिक बुद्धिमत्तेचं आणि ती स्त्रियांकडे देखील असते, हे कबूल करायची कुणाची तयारी असणार?
सैनिकांना लढायला बळ देणारे पोवाडे आणि लढून थकल्यावर मनोरंजन करणाऱ्या लावण्या हे जुनं गणित आपल्याकडे आहेच. मैदान खेळाचं असो, लढाईचं असो वा वैचारिक युद्धाचं असो... तिथं चिअर्स गर्ल्स, ग्रीड गर्ल्स आपली ‘महत्त्वाची मूळ भूमिका’ बजावण्यासाठी तत्पर उभ्या हव्याच वाटतात. 'अल्पसंख्यांकाना खूष करणारा निर्णय', 'स्त्रीवादाचा खोटा बुरखा'असे शेलके आहेर ही बंदी आणणाऱ्या लोकांवर अशाच जुनाट वृत्तीच्या लोकांनी केले आणि अनेकांनी या तरुणींचा पोटापाण्याचा व्यवसाय गेला म्हणून टीकादेखील केली. अशी टीकाही आपल्याला नवी नाहीच. वेश्याव्यवसायावर बंदी आणा म्हटलं, बारगर्ल्सवर बंदी आणा म्हटलं, त्या त्या वेळी या मुद्द्यावर विरोध झालेच आणि केवळ आर्थिक कारण सांगून पुरलं नाही, तेव्हा तर त्यांच्या देहावर त्यांचं स्वातंत्र्य आहे आणि तो बाजारात मांडायचा की नाही, विकायचा की नाही हे ठरवण्याचं त्यांचं स्वातंत्र्य हिरावून घेऊ नका, असे युक्तिवाद देखील केले गेले. असो.
कुठूनतरी सुरुवात झाली आहे; आपापल्या कार्यक्षेत्रात आपणही असं एकेक पाउल उचलण्याची वेळ आली आहे.
संबंधित ब्लॉग :
चालू वर्तमानकाळ (27) : दुसरी बाजू... तिसरी, चौथी, पाचवी बाजू वगैरे
चालू वर्तमानकाळ (26) : द आदिवासी विल नॉट डान्स
चालू वर्तमानकाळ : 25 : कौमार्य चाचणीचा खेळ व पुरुषार्थ चाचणीचं दिव्य
चालू वर्तमानकाळ (24) : पॅनिक बटण आणि इ–संवाद वगैरे
चालू वर्तमानकाळ (23) : पितात सारे गोड हिवाळा?
चालू वर्तमानकाळ २२. लहानग्या सेक्स डॉल हव्यात की नकोत?
चालू वर्तमानकाळ (21) : आनंदाची गोष्ट
चालू वर्तमानकाळ (20) : एका वर्षात अनेक वर्षं
चालू वर्तमानकाळ (19) : रोशनी रोशनाई में डूबी न हो...
चालू वर्तमानकाळ (18) : मुखवटे घातलेल्या बातम्या
चालू वर्तमानकाळ (17) : पशुपक्ष्यांत ऐसे नाही...
चालू वर्तमानकाळ (16) : असं क्रौर्य कुणाच्याही वाट्याला येऊ नये!
चालू वर्तमानकाळ (15) : दीपिकाचं नाक, रणवीरचे पाय आणि भन्साळीचं डोकं
चालू वर्तमानकाळ (१४) : दुटप्पीपणाचं ‘न्यूड’ दर्शन
चालू वर्तमानकाळ (13) : ‘रामायण’ आणि ‘सुहागरात’ व ‘रमणी रहस्य’
चालू वर्तमानकाळ (१२). लोभस : एक गाव – काही माणसं
चालू वर्तमानकाळ (11) : सूट घातलेली बाई आणि वस्तुरुप नग्न नर
चालू वर्तमानकाळ (10) दंशकाल : गूढ, विज्ञान आणि तत्त्वज्ञानाची सांगड
चालू वर्तमानकाळ (९) : बाईच्या थंडगार मांसाचे अजून काही तुकडे
चालू वर्तमानकाळ (8) : बिनमहत्त्वाचे (?) प्रश्न आणि त्यांची हिंस्र उत्तरं
चालू वर्तमानकाळ (7) : अरुण साधू : आपुलकीच्या उबदार अस्तराचं नातं
चालू वर्तमानकाळ : 6. उद्ध्वस्त अंगणवाड्या
चालू वर्तमानकाळ (5) : अनेक ‘कुत्र्या’ आहेत या देशात…
चालू वर्तमानकाळ (4) : जन पळभर म्हणतील…
चालू वर्तमानकाळ (3) : आईचा घो आणि बापाची पत
चालू वर्तमानकाळ (२) – अब्रू : बाईची, गायीची आणि पृथ्वीची!
चालू वर्तमानकाळ (1) : स्वातंत्र्याचं सावळं प्रतिबिंब
View More
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
आरोग्य
व्यापार-उद्योग
क्रिकेट

























