BLOG | कोरोना, लॉकडाऊन आणि क्रिकेट : मुंबई इंडियन्सला सहाव्यांदा उघडलं आयपीेएल फायनलचं दार
मुंबई इंडियन्सनं दिल्ली कॅपिटल्सला लोळवून लागोपाठ दुसऱ्यांदा आणि आजवरच्या इतिहासात सहाव्यांदा आयपीएलच्या फायनलमध्ये धडक मारली आहे. त्यामुळं गतविजेत्या मुंबई इंडियन्सला आयपीएलच्या विजेतेपदावर आता पाचव्यांदा नाव कोरण्याची संधी आहे.
मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माला क्वालिफायर वन सामन्यात भोपळाही फोडता आला नाही. पण त्याच्या फौजेने दिल्ली कॅपिटल्सचा 57 धावांनी धुव्वा उडवून मोठ्या रुबाबात आयपीएलच्या फायनलमध्ये धडक मारली. मुंबई इंडियन्सनं आयपीएलच्या फायनलमध्ये धडक मारण्याची ही लागोपाठ दुसरी आणि आजवरची सहावी वेळ ठरली. त्यामुळं गतविजेत्या मुंबई इंडियन्सला आयपीएलच्या विजेतेपदावर आता पाचव्यांदा नाव कोरण्याची संधी आहे.
दुबईच्या रणांगणात खेळवण्यात आलेल्या क्वालिफायर वन सामन्यात मुंबईच्या फलंदाजांनी दिल्लीला विजयासाठी दिलेलं 201 धावांचं आव्हान लय भारी ठरलं. मुंबईच्या प्रभावी आक्रमणासमोर दिल्लीला वीस षटकांत आठ बाद 143 धावांचीच मजल मारता आली.
मुंबईच्या ट्रेण्ट बोल्ट, जसप्रीत बुमरा आणि कृणाल पंड्यानं या सामन्यात कमाल केली. त्यांनी पहिल्या आठ षटकांत अवघ्या 41 धावांत दिल्लीचा निम्मा संघ माघारी धाडून हा सामना खिशात घातला होता. त्यानंतर मार्कस स्टॉयनिस आणि अक्षर पटेलनं सहाव्या विकेटसाठी 71 धावांची झुंजार भागीदारी रचली खरी, पण विजयासाठीचं लक्ष्य चेंडूगणिक त्यांच्यापासून दूर पळत होतं. अखेर बुमरानं स्टॉयनिसचा त्रिफळा उडवून जमलेली जोडी फोडली आणि दिल्लीचा पराभव अधिक स्पष्ट झाला.
या सामन्यात दिल्लीचा कर्णधार श्रेयस अय्यरनं नाणेफेक जिंकून दिलेली फलंदाजीची संधी मुंबई इंडियन्सच्या फलंदाजांनी दोन्ही हातांनी स्वीकारली. क्विन्टन डी कॉक (25 चेंडूंत 40), सूर्यकुमार यादव (38 चेंडूंत 51), ईशान किशन (30 चेंडूंत नाबाद 55) आणि हार्दिक पंड्या (14 चेंडूंत नाबाद 37) या चौघांनी मुंबईला वीस षटकांत पाच बाद 200 धावांची मजल मारुन दिली. डी कॉक आणि सूर्यकुमारनं दुसऱ्या विकेटसाठी रचलेल्या 62 धावांच्या भागीदारीनं मुंबईच्या डावाचा पाया रचला. मग ईशान आणि हार्दिकनं 23 चेंडूंत 60 धावांची अभेद्य भागीदारी उभारुन त्यावर कळस चढवला.
'तुम हमारा एक आदमी मारोगे, तो हम तुम्हारे तीन मारेंगे' या सामन्यात दिल्लीचा अनुभवी ऑफ स्पिनर रवीचंद्रन अश्विननं रोहित शर्माला शून्यावरच पायचीत पकडलं, त्यावेळी मुंबईच्या डगआऊटमध्ये भूकंपाचा जणू सौम्य धक्का जाणवला असावा. अश्विनच्या त्या चेंडूवर रोहितला कुणीतरी स्टॅच्यू करावं, असा तो एकाच जागी खिळून उभा राहिला. चेंडू त्याच्या मागच्या पॅडवर आदळला आणि पंचांनी अश्विनचं अपील उचलून धरण्याचं काम चोख बजावलं.
रोहितच्या या विकेटचा बोल्ट आणि बुमरानं दामदुपटीनं बदला घेतला. 'तुम हमारा एक आदमी मारोगे, तो हम तुम्हारे तीन आदमी मारेंगे' हा डायलॉग त्यांनी आपल्या कृतीतून मारला. रोहित शर्मासारखा मुंबईचा बिनीचा मोहरा डावातल्या नवव्या चेंडूवर शून्यावर माघारी परतला होता. पण मुंबईच्या बोल्ट आणि बुमरानं दिल्लीच्या पृथ्वी शॉ, अजिंक्य रहाणे आणि शिखर धवन या तिघांनाही पहिल्या आठ चेंडूतच डगआऊटमध्ये पाठवलं. त्या तिघांपैकी एकालाही आपलं खातं उघडला आलं नाही, हे विशेष.
मुंबईच्या फलंदाजांचा अप्रोच वाखाणण्याजोगा मुंबईच्या डावाचं वैशिष्ट्य ठरलं ते त्यांच्या फलंदाजांचा बिनधास्त अप्रोच. कर्णधार आणि बिनीचा फलंदाज असलेला रोहित शर्मा शून्यावर बाद होऊनही मुंबईची फलंदाजी दडपणाखाली आली नाही. क्विन्टन डी कॉक, सूर्यकुमार यादव आणि ईशान किशननं 15 चौकार आणि सहा षटकारांची वसुली करुन पहिल्या आठ षटकांत दहाच्या सरासरीनं धावांची नोंद केली.
दिल्लीकरांनी नऊ ते चौदा या मिडल ओव्हर्समध्ये मुंबईच्या धावगतीला वेसण घातली खरी, पण ईशान किशनच्या साथीला हार्दिक पंड्या आला आणि त्या दोघांनीही दिल्लीच्या आक्रमणावर आडवा हात मारला. हार्दिक तर केवळ षटकारांचीच भाषा बोलत होता. त्यानं केवळ 14 चेंडूंत पाच षटकारांची वसुली केली. त्यामुळंच मुंबईला दोनशे धावांचा पल्ला गाठता आला.
बोल्ट, बुमरा आणि ब्रह्मास्त्र दिल्लीच्या फौजेतही मुंबईसारखी रथीमहारथी फलंदाजांची रेलचेल होती. पण बोल्ट आणि बुमरा यांच्या वेगवान ब्रह्मास्त्रांनी दिल्लीच्या बिनीच्या पाचही फलंदाजांना स्वस्तात माघारी धाडलं. डावखुऱ्या बोल्टचा बाहेर जाणारा नैसर्गिक चेंडू पृथ्वी शॉच्या बॅटचं चुंबन घेऊन यष्टिरक्षक क्विन्टन डी कॉकच्या ग्लोव्हजमध्ये विसावला. मग बोल्टचाच लेट इनस्विंगर अजिंक्य रहाणेला अभ्यासक्रमाच्या बाहेरच्या प्रश्नाइतका कठीण ठरला. तो इनस्विंगर रहाणेच्या पुढच्या पॅडवर आदळून तो पायचीत झाला.
मग शिखर धवनची काठी काढणारा बुमराचा तो स्विंगिंग यॉर्कर आणि त्याची मजा तर स्लो मोशन रिप्लेमध्ये पुन्हा पुन्हा अनुभवावी अशी आहे. आत येणारा तो चेंडू आपल्या मागच्या बुटावर आदळणार या भीतीनं शिखर धवन हलकेच पाय काढून काय घेतो आणि खोलवर टप्प्याचा तो चेंडू त्याची उजवी यष्टी उडवतो, हे दृश्य बुमराची दहशत दाखवून देणारं आहे.
लसिथ मलिंगाच्या अनुपस्थितीत मुंबई इंडियन्सनं यंदा आयपीएलच्या फायनलचं तिकीट बुक केलं याचं बरंचसं श्रेय बोल्ट आणि बुमरा या खिल्लारी जोडीला द्यायला हवं. क्वालिफायर वन सामन्यात बुमरानं 14 धावांत चार, तर बोल्टनं नऊ धावांत दोन फलंदाजांना माघारी धाडलं. त्यामुळं यंदाच्या मोसमातल्या सर्वाधिक विकेट्सच्या शर्यतीत बुमरा 27 विकेट्ससह पहिल्या आणि बोल्ट 22 विकेट्ससह तिसऱ्या क्रमांकावर दाखल झाला आहे. आता मुंबई इंडियन्सला फायनल जिंकून देण्याची मुख्य जबाबदारी त्या दोघांच्याच मजबूत खांद्यांवर आहे.
विजय साळवी यांचे अन्य ब्लॉग : BLOG | रोहित शर्माच्या डोक्यावर दुखापतीची टांगती तलवार BLOG | कोरोना, लॉकडाऊन आणि क्रिकेट : चेन्नई सुपर 'फ्लॉप' BLOG | कोरोना, लॉकडाऊन आणि क्रिकेट : धवन पैलवान की जय हो! BLOG : कोरोना, लॉकडाऊन आणि क्रिकेट : मुंबईचा खडूस फलंदाज BLOG | : कर्णधार धोनीला फलंदाज धोनीवर भरवसा नाही का? कोरोना, लॉकडाऊन आणि क्रिकेट BLOG | कोरोना, लॉकडाऊन आणि क्रिकेट : गावस्करांचं चुकलं की, त्यांना समजून घेताना अनुष्काचं चुकलं? BLOG | कोरोना, लॉकडाऊन आणि क्रिकेट : झुंजार माणसा, झुंज दे… असं कृतीतून सांगणारा क्रिकेटर BLOG | कोरोना, लॉकडाऊन आणि क्रिकेट : चुकांमधून शिकण्याची वृत्ती हेच रोहित आणि सूर्यकुमारच्या यशाचं गमक BLOG | कोरोना, लॉकडाऊन आणि क्रिकेट : वादळवारं सुटलं ग.. आयपीएलचं तुफान उठलं ग.. BLOG | कोरोना, लॉकडाऊन आणि क्रिकेट : बंगलोरचा आयपीएलमधला इतिहास बदलण्याची जबाबदारी देवदत्त पडिक्कलवर BLOG | कोरोना, लॉकडाऊन आणि क्रिकेट : ख्रिस गेलला का बसवलं आणि अजिंक्य रहाणेचं घोडं अडलं कुठे? BLOG | कोरोना, लॉकडाऊन आणि क्रिकेट : जय हो अंबाती रायुडू, जय हो फाफ ड्यू प्लेसी