BLOG: कादरीसाब का इंतिक़ाल; 'पाऱ्या'पासून सोनं बनविण्याचं संशोधन करणारे किमयागार

बार्शीतून ज्येष्ठ पत्रकार संतोष दादांचा फोन आला अन् म्हणाले, मयूर कादरी चाचांचं निधन झालंय. पाऱ्यापासून सोनं बनवणारा हा किमयागार हे माहितीय का तुला, अर्थात केवळ सोशल मीडियावर त्यांच्या निधनाची बातमी वाचली होती. पण, पाऱ्यापासून सोन्याचं संशोधन करणारे आपल्या गावचे अन् आपल्याला माहिती नाही, म्हणून जिज्ञासेतून त्यांच्या शोधाची माहिती घेतली. 'ट्रान्सम्युटेशन ऑफ गोल्ड बाय न्यूक्लिअर फिजन' हे इंग्रजीतील पुस्तकही त्यांनी लिहिल्याचं कळालं. ज्येष्ठ पत्रकार जयप्रकाश दगडे यांनी कादरीसाब यांच्यावर लिहिलेलं 10 वर्षांपूर्वीचं 5 जानेवारी 2015 रोजीचं पुण्य नगरी वर्तमान पत्रात छापून आलेलं आर्टीकल वाचलं अन् अवाक झालो. एवढी महान हस्ती, शास्त्रज्ञ म्हणून पंचक्रोशित परिचीत अन् नव्या पिढीला माहितीच नाही. विशेष म्हणजे बार्शीतील सध्याच्या आजी-माजी लोकप्रतिनिधींकडूनही त्यांच्याबद्दल श्रद्धांजलीचे दोन शब्द सोशल मीडियावर दिसून आले नाहीत, म्हणून हा ब्लॉग लिहिण्याचा, त्यांच्या महतीला उजळणी देण्याचा प्रयत्न.
सोलापूर जिल्ह्यातील बार्शीचे सय्यद अल्लाउद्दीन शाह अहमद कादरी यांचे रविवारी निधन झालं, सोशल मीडियात कुणी किमयागार म्हटलं, कुणी आदरणीय कादरीसाब म्हटलं तर कुणी त्यांच्या पाऱ्यापासून सोनं बनविण्याच्या शोधाचा इतिहास मांडला. कादरींच्या संशोधनाचा इतिहास सांगत, दिवंगत राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांच्या भेटीचंही वर्णन पाहायला मिळालं. कोणत्याही विद्यापीठाची कसलीही डिग्री नसलेल्या बार्शीसारख्या ग्रामीण भागातील, केवळ 10 वी पास असलेल्या आणि अल्पसंख्यांक समाजातून पुढे येत तब्बल 43 वर्षे संशोधन करून रसायनशास्त्र आणि अणुविज्ञान शास्त्रांच्या सिद्धांताला अनुसरून, पाऱ्यापासून चक्क सोनं. जे सध्या लाखमोलाचं अन् दररोज नव्या दराचे उच्चांक गाठत आहे, ते निर्माण करण्याचा 'सुवर्णसिद्धी' सिद्धांत कादरीसाब यांनी सिद्ध केला होता,
कादरीसाह यांचं शिक्षण बार्शीत झालं, 1953 मध्ये त्यांनी दहावीची परीक्षा दिली, त्यांना वाचनाचा मोठा छंद. बार्शीच्या वर्धमान जैन वाचनालयात जाऊन दररोज वृत्तपत्रांबरोबरच विविध नियतकालिके अभ्यासून दृष्टीने वाचणे हा नादच त्यांना लागलेला, त्यातूनच एकदा
सिद्धे रसे करिष्यामि निद्रारिदं गदं जगतः
हा सिद्ध नागार्जुनांचा 2500 वर्षांपूर्वीचा श्लोक त्यांच्या वाचनात आला. 'पाऱ्यापासून सुवर्ण निर्माण करून मी जगाला दारिद्रय- रोग-दु:खमुक्त करेन, असा त्या श्लोकाचा अर्थ. कादरींना त्या श्लोकाने झपाटले. डोक्यात तेथूनच चक्र सुरू झाली अन् दहावीला अभ्यासलेल्या विज्ञानाच्या आधारावर त्यांनी विचार करायला सुरुवात केली. मादाम क्युरीचे चरित्र वाचले. ज्यांनी रेडियम या मूलद्रव्याचे परिवर्तन शिसामध्ये होते, हे सप्रमाण सिद्ध केले होते. याचा अर्थ एका मूलद्रव्याचा परिवर्तन दुसऱ्या मूलद्रव्यात होऊ शकते, हा विचार कादरींच्या डोक्यात शिरला. त्यातूनच त्यांनी आणखी ग्रंथांची शोधाशोध करत संशोधनाचा अध्याय लिहिण्याचं काम हाती घेतलं.
अरबी, पर्शियन ग्रंथांतील हे श्लोक वाचून कादरींमधील विज्ञानवादी चिकित्सकाची जिज्ञासा पूर्ण झाली नाही, त्यांनी प्रयोगही करून बघायला सुरुवात केली. ते करतानाच द्रवरूप पाऱ्याला घनरूप अवस्था देण्यात त्यांना यश मिळाले, त्यांनी नव्याने संशोधनात पुन्हा गाडून घेतले. अणुशास्त्र, अणुविभाजन इ. दीर्घ संशोधनानंतर अखेर त्यांनी अणुविभाजनाद्वारे 'सुवणसिद्धी' ही थेअरी शोधून काढली. सुवर्णसिद्धी म्हणजे तांबे, जस्त, कथोल आदि धातूंचे पंरिवर्तन गंधक, पारा यांच्या संयोगाने सुवर्णात करणे होय. अशा प्रकारची सिद्धी ज्यांनी प्राप्त करून घेतली होती त्यांना पूर्वी 'किमयागार' म्हणत. सय्यद अल्लाउद्दीन कादरींनी स्वतःच्या पदरचे ज्ञान त्यात घातले नाही. रसायनशास्त्रात आणि पूर्वसुरींनी लिहिलेल्या ग्रंथांमध्ये लपून बसलेले हे सूत्र त्यांनी शोधून काढले आणि याप्रमाणे पारा या मुलद्रव्याच्या अणुकेंद्रावर अनुक्रमे अल्फा, बीटा आणि न्यूट्रॉन आदि किरणोत्सर्गी कणांचा भडिमार केल्यानंतर पारा या मूलद्रव्याच्या अणुकेंद्राचे विखंडन किंवा विभाजन होऊन त्याचे परिवर्तन 'सुवर्ण' या मूलद्रव्यात होऊ शकते, हा सिद्धांत कादरींनी जगापुढे पुन्हा आणला.
भारतात अल्फा व बीटा यांच बंवाडमेंट (भडिमार) करण्याची प्रयोगशाळाच नाही. फक्त न्यूट्रॉनचे बंबार्डमंट करण्याची सोय भाभा अॅटॉमिक रिसर्च सेंटरमध्ये आहे. अल्फा व बीटाचे बंबार्डमेंट करण्याचे युनिटही उपलब्ध झाल्यास सुवर्ण तयार होऊ शकते, आपला हा सिद्धांत कादरी यांनी माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांनाही, त्यांच्या बारामती दौऱ्यात भेटून, सांगितला होता. तत्काली राष्ट्रपती कलाम यांच्या हस्ते कादरी यांनी इंग्रजीत लिहिलेल्या 'ट्रान्सम्युटेशन ऑफ गोल्ड बाय न्यूक्लिअर फिजन' या पुस्तकाचे प्रकाशनही त्यावेळी झाले. या कार्यक्रमास भाभा अणुसंशोधन केंद्रातील शास्त्रज्ञ गंभीर, कोलकत्याचे शास्त्रज्ञ जतीन मिन्हा हेही उपस्थित होते. कादरींचे या विषयावरील मराठी पुस्तक 1995 साली प्रसिद्ध झाले होते.
पत्रकार जयप्रकाश दगडे यांच्याशी त्यांनी कादरी अन् सोन्याचं संशोधन विषयावर सविस्तर लिखाण केले होते. सय्यद अल्लाउद्दीन कादरी म्हणाले, विक्रम संवत 1999 मध्ये चैत्र महिन्यात ऋषिकेश येथे पंजाबचे रमवैद्य कृष्णपाल शर्मा यांनी पाऱ्यापासून सोने बनविण्याचा हा प्रयोग प्रत्यक्ष दाखविला. तो पाहणाऱ्यांमध्ये महात्मा गांधींचे चिटणीस महादेवभाई देसाई, गणेशदत गोस्वामी आणि जुगलकिशोर बिर्ला हेही होते. त्यांच्या समक्ष 200 तोळे पाऱ्यामध्ये अन्य औषधी चूर्ण (भस्म) 1 तोळा मिसळून अग्नीमध्ये ठेवल्यानंतर अर्ध्या तासात सगळ्या पायऱ्याचे सोने झाले. वाचक्रियेच्या सहाय्याने त्या दिवशी एकूण 28 शेर सोने बनविले गेले, त्याची त्या काळात किंमत 75 हजार रुपये होती. (त्यावेळी सोने 42 रुपये तोळा होते)
ज्ञानेश्वरांनीही सुवर्णसिद्धी संबंधीच्या सुमारे 27 ओव्या ज्ञानेश्वरीत निरनिराळ्या ठिकाणी घातल्या होत्या असे ह.भ.प. भिंगारकर यांनी आपल्या 'ज्ञानेश्वरवाद' या ग्रंथात नमूद करले आहे. ते सांगताना कादरी यांनी
'आळवाच्या देवापरी।
वेगेआणा शुभ्रमणी ।।
खपर सुताची मेळवणी।
तोरस, संतक दीने अवधानी।।
सुवर्णवृष्टी किजिये ।।'
असा थेट ज्ञानेश्वरीतील दाखलाच दिला होता. कादरी साहेब हे अत्यंत बहुआयामी व्यक्तिमत्व होते, ज्ञानेश्वरी अन् शिवनेरीची महती सांगणारा हा मुस्लिम अवलिया होा. कारण, कादरी साब यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे काढलेले चित्र अप्रतिम व वास्तवदर्शी म्हणून प्रसिद्ध होते. विशेष म्हणजे त्यांनी काढलेल्या या चित्रामध्ये अनेक ठिकाणी मावळे टिपले होते. म्हणजे, मावळ्यांनी भरलेले शिवाजी महाराज अशी चित्रकलेतून प्रतिमा बनवून त्यांनी शिवछत्रपतींबद्दलचा आदर कृतीतून व्यक्त केला होता. सुवर्णसिद्धीचा सिंद्धांत कोळून प्यायलेल्या अशा या महान सय्यद अल्लाउद्दीन शाह अहमद कादरींचा रविवारी इंति.काल झाला अन् बार्शीकरांनी जनाजा नमाज पठण करुन एका शास्त्रज्ञाला अखेरचा निरोप दिला.

























