कॉलम : कोरोना, लॉकडाऊन आणि क्रिकेट : मुंबईचा खडूस फलंदाज
वास्तविक सूर्यकुमारच्या फलंदाजीत काय ताकद आहे, याची कर्णधार रोहित शर्मालाइतकी चांगली कल्पना इतर कुणाला नसावी. दोघंही अस्सल मुंबईकर. मुंबई इंडियन्सआधी मुंबईच्या रणजी संघातूनही ते एकत्रच खेळतात
अखेर सूर्यकुमार यादव त्याच्या लौकिकाला जागला. मुंबई इंडियन्सच्या या शिलेदारानं एक खिंड लढवलीच, पण दुसऱ्या खिंडीतून प्रतिस्पर्धी आक्रमणावर त्यानं हल्लाही चढवला. राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या त्या लढाईत सूर्यकुमार नाबाद राहून डगआऊटमध्ये परतला. त्यामुळंच अंबानींच्या नावावर एका हमखास विजयी लक्ष्याचा बँकबॅलन्स जमा झाला होता.
अबुधाबीच्या त्या रणांगणात सूर्यकुमार यादव फलंदाजीला उतरला त्या वेळी मुंबई इंडियन्सनं पाचव्या षटकांत एक बाद 49 धावांची मजल मारली होती. या पठ्ठ्यानं 47 चेंडूंत अकरा चौकार आणि दोन षटकारांची बरसात करून नाबाद 79 धावांची खेळी उभारली. त्यानं हार्दिक पंड्याच्या साथीनं सहा षटकांत रचलेली 76 धावांची अभेद्य भागीदारी मुंबई इंडियन्सच्या विजयाचं मुख्य गमक ठरली.
सूर्यकुमार यादवनं राजस्थावरच्या ‘रॉयल’ विजयात बजावलेल्या कामगिरीची खरं तर मुंबई इंडियन्सला सातत्यानं अपेक्षा आहे. पहिल्या पाचपैकी चार सामन्यांत त्याचा स्टार्टही अपेक्षा उंचावणारा होता. पण एखादा प्रत्येक वेळी तो एक चुकीचा फटका खेळून बाद झाला. अपवाद फक्त कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या सामन्याचा. त्या सामन्यात रोहित शर्मा आणि सूर्यकुमारनं रचलेली 90 धावांची भागीदारी मुंबई इंडियन्सच्या विजयात मोलाची ठरली होती.
वास्तविक सूर्यकुमारच्या फलंदाजीत काय ताकद आहे, याची कर्णधार रोहित शर्मालाइतकी चांगली कल्पना इतर कुणाला नसावी. दोघंही अस्सल मुंबईकर. मुंबई इंडियन्सआधी मुंबईच्या रणजी संघातूनही ते एकत्रच खेळतात. त्यामुळंच राजस्थानची लढाई जिंकल्यानंतर रोहित शर्मा म्हणाला, ‘सूर्यकुमारकडून मोठ्या खेळीची मला अपेक्षा होतीच. यंदाच्या मोसमात तो चांगलाही खेळतोय. पण त्याच्याकडून लौकिकाला साजेशी मोठी खेळी होत नव्हती. तुमची फटक्यांची निवड तुमच्या खेळीत निर्णायक भूमिका बजावत असते. राजस्थानविरुद्धच्या सामन्यात सूर्यकुमारची फटक्यांची निवड कमालीची होती.’
सूर्यकुमारनं त्याच्या खेळीच्या सुरुवातीलाच राजस्थानच्या श्रेयस गोपालच्या गोलंदाजीवर एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून वसूल केलेला चौकार भलताच देखणा होता. पण आयपीएलच्या रणांगणात सूर्यकुमार यादव या नावाची हवा केली ती त्यानं जोफ्रा आर्चरला पहिल्या स्लीपच्या डोक्यावरून मारलेल्या षटकारानं. तोही स्कूप शॉटवर. कमाल आहे ना!
आर्चरच्या खोलवरच्या टप्प्याच्या त्या चेंडूला सूर्यकुमारनं बॅटचा अख्खा चेहरा दाखवला होता. त्या वेळी तो असा काही भन्नाट फटका खेळेल, हे तुमच्या आमच्या मनातही आलं नव्हतं. पण पुढच्याच क्षणी त्यानं दांडूनं विटी मागच्या दिशेनं खोलावी तसा चेंडू बॅटनं मागच्या सीमारेषेवरून धाडला. सूर्यकुमारच्या चलाखीची ती कमाल तुम्ही आम्ही अगदी अवाक होऊन पाहिली.
सूर्यकुमारची फलंदाजी या कल्पक फटक्यांसाठीही ओळखली जाते. आणि त्याच्या भात्यातील या कल्पक फटक्यांचा भाव हाणामारीच्या षटकांत सोन्यापेक्षाही महाग असतो, हे काही आता नव्यानं सांगायला नको. पण आर्चरच्या षटकात सूर्यकुमारनं तो फटका कोणत्या परिस्थितीत खेळला, हे पाहिलं, तर मुंबईकर फलंदाजाला साजेसा खडूसपणा त्याच्यात उठून दिसतो.
जोफ्रा आर्चरच्या त्या षटकातला पहिलाच चेंडू चक्क बीमर होता. हार्दिक पंड्याच्या हेल्मेटचा थेट वेध घेणारा. ताशी 152 किलोमीटरच्या वेगानं आलेला तो बीमर हार्दिकनं कसा तरी धडपडत सोडला. मग आर्चरचा चौथा चेंडू म्हणायला स्लो बाऊन्सर होता. पण नागासारखा फणा काढणारा तो चेंडू हेल्मेटवर आदळताच सूर्या अक्षरश: भिरभिरला. फिजियोकडून उपचार घेऊन तो पुन्हा आत्मविश्वासानं उभा राहिला. पुढच्याच चेंडूवर स्कूपचा षटकार वसूल करून त्यानं आपलं नाणं खणखणीत वाजवून दाखवलंच, पण आर्चरवर मानसिक कुरघोडीही केली.
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या शब्दांत सांगायचं, तर सूर्यकुमार यादव हा एक खास फलंदाज आहेच, पण तितकाच तो धोकादायक फलंदाजही आहे. कारण खेळपट्टीच्या सगळ्या दिशांना फटके खेळण्याची क्षमता त्याच्यात आहे.
सूर्यकुमार यादवच्या आक्रमक फलंदाजीवर ऑस्ट्रेलियाची माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटर लिसा स्थळेकर इतकी खूश झाली की, त्याच्यासारखा फलंदाजाला टीम इंडियात अजूनही स्थान का मिळू शकत नाही हा प्रश्न तिला पडला. भारताचा माजी कसोटीवीर इरफान पठाणनंही तीच भावना बोलून दाखवली. सूर्यकुमार यादवला जर आता टीम इंडियात स्थान मिळालं नाही, तर माझी निराशा होईल, अशी प्रतिक्रिया त्यानं व्यक्त केली आहे.
भारताच्या ट्वेन्टी ट्वेन्टी आणि वन डे विश्वचषक विजयांचा नायक युवराजसिंग याची दृष्टी तर दिव्यच म्हणायला हवी. त्यानं तर गेल्या वर्षीच्या 30 सप्टेंबरलाच सूर्यकुमारवर झालेल्या अन्याय तिरकसपणे बोलून दाखवला होता. सूर्यकुमारची चौथ्या क्रमांकावर खेळण्यासाठी टीम इंडियात निवड होऊ शकत नसेल, तर भारताची मधली फळी भलतीच तगडी असावी असा शेरा युवराजनं मारला होता.
युवराजसिंग म्हणतो, त्यानुसार इंग्लंडमधला 2019 सालचा वन डे विश्वचषक सूर्यकुमार यादवला खेळता आला नाही. कदाचित निवड समितीलाही त्या विश्वचषकासाठी चौथ्या क्रमांकावर खेळणारा गुणवान फलंदाज निवडण्याची इच्छा नव्हती. त्यामुळंच टीम इंडियाचं आव्हान उपांत्य फेरीत संपुष्टात आलं.
सूर्यकुमार यादवनं आज वयाची तिशी ओलांडली आहे. टीम इंडियाचं प्रतिनिधित्व करण्यासाठी त्याच्या हातात फार वर्षे राहिलेली नाहीत. अजूनही टीम इंडियाचं दार ठोठावायचं तर सूर्यकुमार यादवसमोर श्रेयस अय्यर आणि अंबाती रायुडू यांच्याशी शर्यत करण्याचं आव्हान आहे. पाहूयात त्या परीक्षेत सूर्यकुमार उत्तीर्ण होतो का?
BLOG | कोरोना, लॉकडाऊन आणि क्रिकेट : कर्णधार धोनीला फलंदाज धोनीवर भरवसा नाही का?