Mumbai Nashik Highway Accident: मुंबई-नाशिक महामार्गावर कंटेनर उलटला; चार किमीपर्यंत वाहनांच्या रांगा, नागरिक त्रस्त
Mumbai Nashik Highway Accident: मुंबई-नाशिक महामार्गावर झालेल्या अपघातामुळे मोठी वाहतूक कोंडी झाल्याचे दिसून आले.

Mumbai Nashik Highway Accident: मुंबई-नाशिक महामार्गावर (Mumbai Nashik Highway) आज सकाळी कंटेनर ट्रक उलटल्याची घटना घडली आहे. यामुळे महामार्गावरील दोन्ही दिशांची वाहतूक ठप्प झाल्याचे पाहायला मिळत आहे. या अपघातामुळे (Accident News) महामार्गावर तीन ते चार किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. परिणामी वाहनचालक व प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागला.
ही घटना आज सकाळी आर.के. लॉजिस्टिक कंपनीच्या कंटेनर ट्रकचा चालक वाहनावरील ताबा गमावल्याने घडली. ट्रक महामार्गावर आडवा पडल्यामुळे दोन्ही लेनवरील वाहतूक संपूर्णपणे विस्कळीत झाली. अपघाताच्या वेळी ट्रकमध्ये कोणतेही ज्वलनशील साहित्य नसल्याने मोठा अनर्थ टळला, असे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे.
Mumbai Nashik Highway Accident: ट्रक हटवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न
घटनेची माहिती मिळताच वाहतूक पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांसोबतच स्थानिक प्रशासन व यांत्रिकी सहाय्यक कर्मचाऱ्यांनी ट्रक हटवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले. तब्बल तीन तासांच्या प्रयत्नांनंतर कंटेनर ट्रक रस्त्यावरून बाजूला करण्यात आला. यानंतर महामार्गावरील वाहतूक टप्प्याटप्प्याने सुरळीत करण्यात येत आहे.
Mumbai Nashik Highway Accident: पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन
दरम्यान, या अपघातात कंटेनर ट्रकचा चालक जखमी झाला असून त्याच्यावर नजीकच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातानंतर निर्माण झालेल्या वाहतूक कोंडीत अनेक प्रवासी वेळेत पोहोचू शकले नाहीत, त्यामुळे नागरिकांतून नाराजी व्यक्त होत आहे. महामार्गावरील वाहतूक पुन्हा सुरळीत करण्यासाठी पोलीस आणि स्थानिक प्रशासन सतत प्रयत्नशील आहेत. नागरिकांना शक्य असल्यास पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन वाहतूक विभागाने केले आहे.
Nashik Accident News: नाशिकमध्ये भीषण अपघात, आठ वर्षाच्या चिमुरडीचा मृत्यू
दरम्यान, नाशिक शहरात गेल्या काही दिवसांपासून अपघातांची मालिका सुरू असल्याचं दिसतंय. काल सकाळी पुन्हा एक हृदयद्रावक घटना घडली आहे. औद्योगिक वसाहतीकडे जाणाऱ्या पाईपलाईन रोड परिसरात, जिओ पेट्रोल पंपासमोर, दुचाकी आणि ट्रकचा भीषण अपघात झाला. या अपघातात आठ वर्षांच्या नेविका नेरकर या चिमुरडीचा जागीच मृत्यू झाला आहे. नेविका आपल्या आजीसोबत दुचाकीवरून बाहेर कामासाठी जात असताना ही दुर्दैवी घटना घडली. धडक एवढी जोराची होती की, घटनास्थळीच चिमुरडीचा मृत्यू झाला. अपघाताची माहिती सातपूर पोलिसांना मिळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला. अपघात होताच स्थानिक नागरिकांनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. सध्या या घटनेचा पुढील तपास सातपूर पोलीस करत आहेत. मात्र शहरात वाढत चाललेल्या अपघातांच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. त्यामुळे या ठिकाणी वाहतूक विभागाने तातडीने उपाययोजना करावी अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे.
राज्य आणि देश, विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा Video
आणखी वाचा























