BLOG | कोरोना, लॉकडाऊन आणि क्रिकेट : धवन पैलवान की जय हो!
शिखर धवनची एक आक्रमक फलंदाज म्हणून तुम्हाआम्हाला ओळख आहे. धवनमधला तोच आक्रमक फलंदाज यंदाच्या आयपीएल मोसमात भलताच फॉर्ममध्ये आहे. आयपीएलच्या इतिहासात लागोपाठ दोन शतकं ठोकणारा तो पहिलाच फलंदाज ठरला. इतकंच काय पण लागोपाठ चार सामन्यांमध्ये त्यानं पन्नासपेक्षा अधिक धावा फटकावल्या आहेत. धवनच्या सातत्याचं नेमकं गमक काय आहे.
धवन पैलवान की जय हो! मिशांना पिळ भरणारा, एका हातानं मांडी ठोकून दुसरा हात उंचावून झेल पकडल्याचं सेलिब्रेशन करणारा आणि शतक साजरं झालं की दोन्ही बाहू पसरून आपल्या चाहत्यांना अभिवादन करणारा शिखर धवन हा पेशानं क्रिकेटर असला तरी त्याच्या स्टाईलमुळं तो अस्सल लाल मातीतला पैलवानच अधिक भासतो. दिल्ली कॅपिटल्सच्या या पैलवानानं आयपीएलच्या रणांगणात लागोपाठ दोन शतकं ठोकून आपला रुबाब दाखवून दिला. म्हणूनच म्हटलं की, धवन पैलवान की जय हो!
अर्थात मैदान आयपीएलचं असलं तरी एकापाठोपाठ एक अशी दोन शतकं झळकावणं हे काही सोपं काम नाही. किंबहुना आयपीएलच्या 13 वर्षांच्या इतिहासात ही कामगिरी फत्ते करणारा शिखर धवन हा पहिला फलंदाज ठरला. मंडळी, तुम्हीच विचार करा की आयपीएलनं या 13 मोसमांत किती रथीमहारथी फलंदाज पाहिले असतील? पण आजवर त्या कुणालाही जमला नाही किंवा झेपला नाही असा पराक्रम धवननं गाजवला. त्यामुळंच चेन्नई आणि पंजाबच्या लढाईत त्यानं लागोपाठ झळकावलेली दोन्ही शतकं खास आहेत.
बरं या दोन्ही शतकांचं वैशिष्ट्य म्हणजे धवन दोन्ही डावांत नाबाद राहूनच माघारी परतला. त्याच्या पंजाबविरुद्धच्या शतकाला विजयाचं सुख लाभलं नसलं तरी एका फलंदाजानं ट्वेन्टी ट्वेन्टीच्या रणांगणात तीन दिवसांत लागोपाठ दोन शतकं झळकावणं ही बाब खरोखरच कमालीची म्हणायला हवी. आधी चेन्नईसमोर 58 चेंडूंत 14 चौकार आणि एका षटकारासह नाबाद 101 धावांची खेळी आणि मग पंजाबसमोर 61 चेंडूंत 12 चौकार आणि तीन षटकारांसह नाबाद 106 धावांची खेळी.
दिल्ली कॅपिटल्सच्या दहा दिवसांमधल्या गेल्या चार सामन्यांचा विचार करायचा झाला तर धवनचं सातत्य अधिक खुलून समोर येतं. मुंबई इंडियन्ससमोर नाबाद 69, मग राजस्थान रॉयल्ससमोर 57 आणि त्यानंतर त्या दोन अर्धशतकांना दोन नाबाद शतकांची जोड. म्हणजे चार सामन्यांत मिळून तब्बल 333 धावांचा रतीब आणि त्यात धवन केवळ एकदाच बाद झालेला म्हणजे या चार सामन्यांमधली सरासरीही 333. आता बोला.
शिखर धवनचं आयपीएलमधलं हे सातत्य केवळ यंदाच्या मोसमापुरतं मर्यादित नाही. आयपीएलच्या मागच्या मोसमातही त्यानं दिल्लीकडून 16 सामन्यांत 521 धावा फटकावल्या होत्या. वास्तविक 2009 आणि 2010 सालच्या मोसमांचा अपवाद वगळला, तर धवननं आयपीएलच्या प्रत्येक मोसमात खोऱ्यानं धावा केल्या आहेत. त्यामुळंच आयपीएलमध्ये 5000 धावांचा टप्पा ओलांडणारा तो पाचवा फलंदाज ठरला.
शिखर धवनची आयपीएलमधली ही आकडेवारी त्याच्या आजवरच्या सातत्याचं चित्र मांडत असली तरी यंदाचा आयपीएल मोसम हा त्याच्या कारकीर्दीत खास आहे असं म्हटलं वावगं ठरणार नाही. यंदाच्या मोसमात त्यानं दहा सामन्यांत दोन शतकं आणि दोन अर्धशतकांसह तब्बल 465 धावांचा इमला उभारला आहे. पण श्रेयस अय्यरसारख्या अवघ्या 25 वर्षांच्या गुणी कर्णधाराच्या नेतृत्त्वाखाली खेळताना दिल्ली कॅपिटल्स संघात कुणीतरी एकानं थोरल्या भावाची भूमिका घेणं आवश्यक होतं.
आक्रमक वृत्तीच्या धवनला खरं तर वडीलकीच्या भूमिकेची सवय नाही. सनरायझर्स हैदराबादकडून खेळतानाही तो डेव्हिड वॉर्नरच्या सावलीत खेळायचा. गेल्या वर्षी तो दिल्लीच्या ताफ्यात सामील झाला, पण तिथंही पृश्वी शॉ, रिषभ पंत आणि श्रेयस अय्यरसोबत तो सहनायक म्हणूनच वावरत होता. अखेर यंदाच्या मोसमानं ती कोंडी फोडली.
जाणकारांच्या मते, यंदाच्या मोसमात धवनमध्ये एक अधिक मोकळेपणानं खेळणारा फलंदाज दिसून येत आहे. वेगवान गोलंदाजांना पुढे सरसावत बुकलून काढणारा धवन स्वीपचा फटकाही तितक्याच सढळपणे वापरून फिरकी गोलंदाजांकडून धावा वसूल करत आहे. कोलकात्याचा शुभमन गिल आणि पंजाबचा लोकेश राहुल हे दोन सलामीवीरही यंदा फॉर्मात आहेत. ते दोघंही डावाचा भक्कम पाया रचून मग त्यावर धावांचा कळस भारतात. त्याउलट शिखर धवन पहिल्या पॉवरप्लेमधल्या निर्बंधाचा लाभ उठवून प्रतिस्पर्धी गोलंदाजांना बुकलून काढतो.
जाणकार म्हणतात की, शिखर धवन आक्रमक असला तरी आयपीएलच्या रणांगणात तो इतक्या मोकळेपणानं कधी खेळत नव्हता. पण यंदा काळानं त्याला त्याच्या शैलीला साजेसा बिनधास्त खेळ करण्याची बुद्धी दिली आहे. याच नव्या अप्रोचनं मग धवनला त्याच्या ट्वेन्टी ट्वेन्टी कारकीर्दीतल्या २६५व्या डावात पहिलवहिलं शतक झळकावून दिलं. मग सवयीनं त्यानं पुढच्याही सामन्यात शतक साजरं केलं.
शिखर धवनच्या त्या दुसऱ्या शतकाचा दिल्ली कॅपिटल्सला काही लाभ उठवता आला नाही. दिल्लीनं त्या सामन्यात पंजाबकडून हार स्वीकारली. पण त्या पराभवानंतरही आयपीएलच्या गुणतालिकेत दिल्ली दहा सामन्यांमध्ये सात विजयांसह अव्वल स्थानावर आहे. या पार्श्वभूमीवर आधी प्ले ऑफचं आणि मग आयपीएल विजेतेपदाचं लक्ष्य गाठायचं तर दिल्लीला शिखर धवनकडून आणखी मोठ्या कामगिरीची अपेक्षा राहिल.
विजय साळवी यांचे अन्य ब्लॉग :
BLOG | कोरोना, लॉकडाऊन आणि क्रिकेट : झुंजार माणसा, झुंज दे… असं कृतीतून सांगणारा क्रिकेटर
BLOG | कोरोना, लॉकडाऊन आणि क्रिकेट : चुकांमधून शिकण्याची वृत्ती हेच रोहित आणि सूर्यकुमारच्या यशाचं गमक BLOG | कोरोना, लॉकडाऊन आणि क्रिकेट : वादळवारं सुटलं ग.. आयपीएलचं तुफान उठलं ग..
BLOG | कोरोना, लॉकडाऊन आणि क्रिकेट : बंगलोरचा आयपीएलमधला इतिहास बदलण्याची जबाबदारी देवदत्त पडिक्कलवर
BLOG | कोरोना, लॉकडाऊन आणि क्रिकेट : ख्रिस गेलला का बसवलं आणि अजिंक्य रहाणेचं घोडं अडलं कुठे?
BLOG | कोरोना, लॉकडाऊन आणि क्रिकेट : जय हो अंबाती रायुडू, जय हो फाफ ड्यू प्लेसी
BLOG | कोरोना, लॉकडाऊन आणि क्रिकेट : गावस्करांचं चुकलं की, त्यांना समजून घेताना अनुष्काचं चुकलं?