(Source: ECI/ABP News/ABP Majha)
BLOG | कोरोना, लॉकडाऊन आणि क्रिकेट : चेन्नई सुपर 'फ्लॉप'
धोनीची चेन्नई सुपर किंग्स म्हणजे आयपीएलच्या रणांगणातली एक बलाढ्य फौज. आजवरच्या प्रत्येक मोसमात प्ले ऑफमध्ये हमखास धडक मारणारी चेन्नई आजवरच्या इतिहासात तीन विजेतीपदांची आणि पाच उपविजेतीपदांची मानकरी ठरली आहे. पण त्याच चेन्नईचं आव्हान यंदा साखळीतच संपुष्टात आलं. काय आहेत त्याची कारणं?
भाकरी का करपली? पान का कुजली? आणि घोडा का अडखळला? या तिन्ही प्रश्नांचं उत्तर एकच आहे ते म्हणजे न फिरवल्यामुळं. यंदाच्या आयपीएलच्या रणांगणातही नेमकं तेच घडलं. आयपीएलमधली बलाढ्य फौज अशी ओळख असूनही चेन्नई सुपर किंग्सचं आव्हान यंदा साखळीतच संपुष्टात आलं. त्याचंही पहिलं कारण तेच आहे... न फिरवल्यामुळं.
चेन्नई सुपर किंग्सनं 2018 साली आयपीएलच्या झळाळत्या चषकावर तिसऱ्यांदा आपलं नाव कोरलं होतं. आयपीएलचा तोच चषक सुपर किंग्सच्या हातून गेल्या वर्षी अवघ्या एका धावेनं निसटला. पण सलग दोन वर्षे फायनलमध्ये धडक मारली म्हणून चेन्नई यंदाही विजेता किंवा उपविजेता ठरणार असं मानायचं का? फायनलचं जाऊ दे, पण आदल्या दोन वर्षांच्या कामगिरीच्या भरवशावर चेन्नईचं प्ले ऑफचं तिकीट तरी कन्फर्म होऊ शकत होतं का?
निव्वळ क्रिकेटिंग निकषांवर बोलायचं तर या प्रश्नाचं उत्तर नाही असंच आहे. पण चेन्नई सुपर किंग्सची फ्रँचाईझी ओनर असलेल्या इंडिया सिमेंट्सनं आपल्या टीमबाबत काय विचार केला होता कुणास ठाऊक? इंडिया सिमेंट्सनं गेल्या तीन वर्षांत आपल्या फौजेत नव्या दमाच्या आणि सळसळणाऱ्या रक्ताच्या शिलेदारांना दाखलच करुन घेतलं नाही. त्यामुळं चेन्नईच्या थर्टी प्लस सुपर किंग्सना यंदा साखळीतूनच माघारी फिरावं लागणार आहे.
चेन्नईनं 2018 साली तिसऱ्यांदा आयपीएल जिंकली, त्या वेळी धोनीच्या फौजेचं डॅडीज आर्मी असं गोंडस नाव ठेवण्यात आलं होतं. आणि त्यामागचं कारण होतं चेन्नईच्या फौजेचं सरासरी थर्टी प्लस वय.
ट्वेन्टी ट्वेन्टी क्रिकेट हा तरुणांइतकाच अनुभवी शिलेदारांचाही खेळ असला तरी सलग तीन वर्षे तुम्ही तिशीपस्तिशी ओलांडलेल्या भालदार, चोपदार आणि सरदारांना घेऊन हमखास जिंकू शकत नाही. कधी तरी तुमचं वय हे तुम्हाला दगा देणारच. चेन्नईच्या दुर्दैवानं यंदा नेमकं तेच घडलं.
तुम्हीच पाहा... इम्रान ताहिर वय 41, महेंद्रसिंग धोनी वय 39, शेन वॉटसन वय 39, ड्वेन ब्राव्हो वय 37, फाफ ड्यू प्लेसी वय 36, मुरली विजय वय 36, केदार जाधव वय 35, अंबाती रायुडू 35, रवींद्र जाडेजा वय 31 आणि पियुष चावला वय 31. इतकंच काय यंदाच्या आयपीएलमधून ऐनवेळी माघार घेणारा सुरेश रैना 34 वर्षांचा आहे, तर हरभजनसिंग ऐन चाळीशीत आहे.
चेन्नईचा माजी शिलेदार स्कॉय स्टायरिस म्हणाला की, चेन्नईच्या सुपर किंग्सची आता वयं झालीयत. थकल्याभागल्या शिलेदारांना आता पर्याय शोधायला हवेत याची केव्हाच कल्पना आली होती. पण गेली तीन वर्षे आम्ही केवळ चर्चा करुन तोंडाची वाफ घालवली. पण चेन्नईच्या फौजेत काहीच बदल करण्यात आला नाही. अखेर चेन्नईच्या सुपर किंग्सना यंदा त्यांच्या वयानंच खिंडीत गाठलं.
चेन्नई सुपर किंग्सना कोरोना डसला?
चेन्नईच्या फ्लॉप शोचं दुसरं कारण ठरलं तो कोरोनाचा डंख. आयपीएलच्या महायुद्धासाठी दुबईत दाखल झाल्यानंतर चेन्नईच्या दीपक चहर आणि ऋतुराज गायकवाड या दोन सुपर किंग्ससह 13 सदस्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. ही सारी मंडळी खडखडीत बरी झाली खरी, पण तिथूनच चेन्नईच्या संकटांची मालिका सुरु झाली. त्यामुळं संकट कधी एकटं येत नाही, हे पुन्हा खरं ठरलं.
चेन्नईचा सर्वाधिक भरवशाचा फलंदाज सुरेश रैना न पटणारी कारणं देऊन युएईतून थेट मायदेशी परतला. अनुभवी ऑफ स्पिनर हरभजनसिंगनं तर युएईत पोहचण्याचेही कष्ट न घेता, आयपीएलच्या मोसमातून माघार घेतली. आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक धावा करणारा दुसऱ्या क्रमांकाचा फलंदाज म्हणजे सुरेश रैना आणि सर्वाधिक विकेट्स घेणारा पाचव्या क्रमांकाचा गोलंदाज म्हणजे हरभजनसिंग आहे. त्यामुळं त्यांच्या अनुपस्थितीचा परिणाम चेन्नई सुपर किंग्सचा टीम बॅलन्स आणि त्यांच्या कामगिरीवर झाला.
सुरेश रैनाच्या अनुपस्थितीत चेन्नईच्या फलंदाजीची ताकद घटलीच, पण त्यांचा पर्याय म्हणूनही कुणी जबाबदारी स्वीकारली नाही. सलामीच्या फाफ ड्यू प्लेसीनं लौकिकास साजेसा खेळ करुन धावांचा रतीब घातला. सॅम करननं अष्टपैलू भूमिका बजावली, तर दीपक चहरनं वेगवान गोलंदाज म्हणून आपला ठसा उमटवला. पण या तिघांशिवाय चेन्न्ईच्या फौजेत सामना जिंकून देऊ शकणारे आणखीही काही सुपर किंग्स होते. त्यांना मात्र आपला फॉर्म किंवा आपलं सातत्य दाखवता आलं नाही.
महेंद्रसिंग धोनीची एक फलंदाज म्हणून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधली सद्दी संपल्याचं वन डे विश्वचषकात दिसून आलं होतं. आयपीएलसारख्या डोमेस्टिक ट्वेन्टी ट्वेन्टी लीगमध्येही धोनीला यंदा धावांसाठी झगडावं लागलं. त्याच्या फलंदाजीच्या क्रमांकाविषयी नेहमीच प्रश्नचिन्ह उभं राहिलं. पण त्यानं ठरवलेली चेन्नईची बॅटिंग ऑर्डरही अनेकदा क्लिक झाली नाही.
फॉर्ममध्ये असलेल्या अंबाती रायुडूला दुखापतीमुळं महत्त्वाच्या सामन्यांना मुकावं लागलं आणि मग त्याचं यशही मर्यादित राहिलं. अंबाती रायुडूसारखा ड्वेन ब्राव्होही दुखापतीशी झगडत होता. कॅरेबियन प्रीमियर लीगमधली दुखापत घेऊनच तो युएईत दाखल झाला होता. तरीही धोनीनं त्याला सहा सामन्यांमध्ये खेळवलं. पण गेल्या आयपीएल मोसमात सर्वाधिक 26 विकेट्स घेणारा लेग स्पिनर इम्रान ताहिरला त्यानं पहिल्या दहा सामन्यांमध्ये कुजवलं. मुंबई इंडियन्सविरुद्धच्या परतीच्या सामन्याच्या निमित्तानं तो यंदा पहिल्यांदाच आयपीएलच्या रणांगणात उतरला होता.
धोनीनं इम्रान ताहिरऐवजी पियुष चावला आणि कर्ण शर्मा या दोन लेग स्पिनरवर अधिक विश्वास दाखवला. पण त्या दोघांनाही मिळून यंदा फक्त दहा फलंदाजांनाच माघारी धाडता आलं. लुन्गी एनगिडीलाही धोनीनं केवळ दोन सामन्यांमध्ये खेळवलं. त्यामुळंच चेन्नईचं टीम कॉम्बिनेशन अनेक सामन्यांत जुळून आलं नाही.
ऋतुराज गायकवाड, केदार जाधव, रवींद्र जाडेजा आणि पियुष चावलाला मिळालेल्या संधीचं यंदा सोनं करता आलं नाही. पण आश्चर्य म्हणजे धोनी त्यांच्यावर पुन्हा पुन्हा विश्वास टाकत राहिला. विनाशकाले विपरितबुद्धी म्हणतात ना, ते खरं वाटावं इतकं धक्कादायक धोनीचं नेतृत्त्व होतं.
क्रिकेटच्या खेळात एक कमालीचं वचन आहे. ते म्हणजे क्रिकेटपेक्षा कुणीही मोठा नाही. ज्या वेळी तुम्ही स्वत:ला क्रिकेटपेक्षा मोठं समजू लागता, त्या वेळी हा खेळच तुम्हाला जमिनीवर आणतो. धोनीलाही त्याच्या कारकीर्दीच्या अखेरच्या टप्प्यात क्रिकेटनं जमिनीवर आणलं आहे का?
विजय साळवी यांचे अन्य ब्लॉग : BLOG | कोरोना, लॉकडाऊन आणि क्रिकेट : धवन पैलवान की जय हो! BLOG : कोरोना, लॉकडाऊन आणि क्रिकेट : मुंबईचा खडूस फलंदाज BLOG | : कर्णधार धोनीला फलंदाज धोनीवर भरवसा नाही का? कोरोना, लॉकडाऊन आणि क्रिकेट BLOG | कोरोना, लॉकडाऊन आणि क्रिकेट : गावस्करांचं चुकलं की, त्यांना समजून घेताना अनुष्काचं चुकलं? BLOG | कोरोना, लॉकडाऊन आणि क्रिकेट : झुंजार माणसा, झुंज दे… असं कृतीतून सांगणारा क्रिकेटर BLOG | कोरोना, लॉकडाऊन आणि क्रिकेट : चुकांमधून शिकण्याची वृत्ती हेच रोहित आणि सूर्यकुमारच्या यशाचं गमक BLOG | कोरोना, लॉकडाऊन आणि क्रिकेट : वादळवारं सुटलं ग.. आयपीएलचं तुफान उठलं ग.. BLOG | कोरोना, लॉकडाऊन आणि क्रिकेट : बंगलोरचा आयपीएलमधला इतिहास बदलण्याची जबाबदारी देवदत्त पडिक्कलवर BLOG | कोरोना, लॉकडाऊन आणि क्रिकेट : ख्रिस गेलला का बसवलं आणि अजिंक्य रहाणेचं घोडं अडलं कुठे? BLOG | कोरोना, लॉकडाऊन आणि क्रिकेट : जय हो अंबाती रायुडू, जय हो फाफ ड्यू प्लेसी