BLOG | कोरोना, लॉकडाऊन आणि क्रिकेट : वादळवारं सुटलं ग.. आयपीएलचं तुफान उठलं ग..
शारजामधल्या आयपीएलच्या रणांगणात काल सात छोटी वादळं उठली. त्या सात वादळांमधलं मोठं वादळ हे अस्सल भारतीय होतं. त्याचं नाव संजू विश्वनाथ सॅमसन.
संयुक्त अरब अमिराती म्हणजे युएईतल्या शारजात वादळं कधीही उठतात. त्या वादळांचा नेम देता येत नाही. कधी ती वादळं शारजाच्या वाळवंटात उठतात, तर कधी शारजाच्या क्रिकेट स्टेडियममध्ये. 1998 सालचा शारजा कप तर आपण एका खास ‘डेझर्ट स्टॉर्म’साठीच ओळखतो. त्यावेळी एक वादळ शारजाच्या वाळवंटात उठलं आणि दुसरं शारजाच्या क्रिकेट स्टेडियममध्ये. शारजाच्या क्रिकेट स्टेडियममध्ये उठलेल्या वादळाचं नाव होतं सचिन रमेश तेंडुलकर.
त्यावेळी सचिन तेंडुलकरनं लागोपाठ दोन सामन्यांमध्ये झळकावलेली शतकं भारतीय क्रिकेटरसीक कधीच विसरू शकणार नाहीत. सचिन स्टॉर्मच्या त्या तडाख्यात ऑस्ट्रेलियासारखा बलाढ्य संघ उन्मळून पडला होता. शारजाच्या क्रिकेट स्टेडियममध्ये त्यानंतरही अनेक वादळं उठली, पण त्यांना सचिनची सर आली नाही.
शारजामधल्या आयपीएलच्या रणांगणात काल सात छोटी वादळं उठली. पण ती सातही वादळं एकत्र आली असती, तरी त्यांची तीव्रता ही सचिन स्टॉर्मइतकी संहारक नव्हती. पण त्यापैकी तीन वादळांच्या तडाख्यात चेन्नई सुपर किंग्ससारख्या आयपीएलमधल्या तगड्या फौजेलाही हार स्वीकारावी लागली, हे आपण लक्षात घ्यायला हवं.
त्या सात वादळांमधलं मोठं वादळ हे अस्सल भारतीय होतं. त्याचं नाव संजू विश्वनाथ सॅमसन. दुसरं वादळ होतं ऑस्ट्रेलियन, नाव होतं स्टीव्ह स्मिथ आणि तिसरं वादळ होतं ब्रिटिश, नाव जोफ्रा आर्चर.
राजस्थान रॉयल्सच्या या तीन शिलेदारांनी आयपीएलच्या सामन्यात चेन्नईच्या सुपर आक्रमणावर अगदी निर्विवाद वर्चस्व गाजवलं. त्या तिघांनाही क्षेत्ररक्षण लावायचं तर कसं आणि कुठं, हा प्रश्न महेंद्रसिंग धोनीसारख्या कॅप्टन कूललाही पडला होता. कारण त्या तिघांनीही चेंडू हवाईमार्गानंच सीमारेषेपार धाडण्याचा जणू चंग बांधला होता.
तुम्हीच पाहा... संजू सॅमसन अवघ्या 32 चेंडूंत 74 धावा, त्यात एक चौकार आणि नऊ षटकार. स्टीव्ह स्मिथ 47 चेंडूंत 69 धावा, त्यात चार चौकार आणि चार षटकार. जोफ्रा आर्चर आठ चेंडूंत नाबाद 27 धावा, त्यातही चार षटकार. या तीन फलंदाजांनी मिळून राजस्थानच्या डावात 17 षटकारांची जणू बरसात केली.
चेन्नईच्या डावात फाफ ड्यू प्लेसी, शेन वॉटसन, सॅम करन आणि महेंद्रसिंग धोनी या चार फलंदाजांनीही राजस्थानकडून 17 षटकारांची वसुली केली. पण 217 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्याचा त्यांचा प्रयत्न 16 धावांनी अयशस्वी ठरला.
राजस्थान आणि चेन्नई संघांमधल्या एकाच सामन्यात 33 षटकारांची मेजवानी पाहायला मिळाली याचं मुख्य कारण अबुधाबी आणि दुबईच्या तुलनेत शारजाचं छोटं मैदान आणि तिथली पाटा खेळपट्टी. आजवरच्या इतिहासात शारजाच्या मैदानात 29 टक्के धावा या षटकारांनी वसूल झाल्या आहेत. दुबईच्या मैदानात हेच प्रमाण 22 टक्के, तर अबुधाबीत ते 11 टक्के आहे. त्यामुळं शारजातल्या राजस्थान-चेन्नई सामन्यात लागलेल्या 33 षटकारांनी आयपीएलच्या चित्तथरारकतेला आणखी रंग चढला.
या सामन्यात राजस्थाननं मिळवलेल्या रॉयल विजयाचं श्रेय हे प्रामुख्यानं यष्टिरक्षक-फलंदाज संजू सॅमसनला द्यायला हवं. त्यानं चढवलेल्या पहिल्या हल्ल्यानं पियुष चावला, रवींद्र जाडेजा, सॅम करन आणि दीपक चहर या अनुभवी गोलंदाजांचं पृथक्करण आणि त्यांची लाईनलेंग्थही साफ बिघडवून टाकली. या गोलंदाजांनी पुढ्यात टप्पा द्यायची खोटी, की संजू सॅमसन तो चेंडू सीमारेषेवरून टोलवायचा.
संजू सॅमसनच्या फलंदाजीचं वैशिष्ट्य म्हणजे त्यानं एकही षटकार हा वेड्यावाकड्या फटक्यावर वसूल केलेला नव्हता. किंबहुना त्याचा प्रत्येक षटकार हा जणू क्रिकेटच्या पुस्तकातून घोटवलेला एकेक फटका होता. तो प्रत्येक फटका खेळताना संजूचं स्थिर राहाणारं डोकं त्याच्या तंत्रशुद्धतेची पावती देणारं होतं.
संजू सॅमसनसारखा फलंदाज हा यष्टिरक्षकही असणं हे त्याच्या संघासाठी डबल अॅडव्हान्टेज म्हणायला हवं. आयपीएलच्या रणांगणात आज ते डबल अॅडव्हान्टेज राजस्थान रॉयल्सकडे आहे. पण भविष्यात संजू सॅमसनची नजर ही नक्कीच टीम इंडियात हक्काचं स्थान मिळवण्यावर राहिल. महेंद्रसिंग धोनीनं वन डे आणि ट्वेन्टी ट्वेन्टी क्रिकेटमधूनही नुकतीच निवृत्ती स्वीकारली आहे. त्या दोन्ही फॉरमॅट्समध्ये धोनीचा वारसदार म्हणून रिषभ पंत शर्यतीत पहिला असला तरी संजू सॅमसन आणि लोकेश राहुल त्याच्यापासून फार दूरही नाहीत.
BLOG | कोरोना, लॉकडाऊन आणि क्रिकेट : जय हो अंबाती रायुडू, जय हो फाफ ड्यू प्लेसी
BLOG | कोरोना, लॉकडाऊन आणि क्रिकेट : बंगलोरचा आयपीएलमधला इतिहास बदलण्याची जबाबदारी देवदत्त पडिक्कलवर