एक्स्प्लोर
एका हरवलेल्या दशकाची डायरी : एक ऐसी लडकी थी!
रविनाच्या कारकिर्दीतल्या साठ टक्के भूमिकांचा हा गाळीव अर्क आहे. पण हे सगळं छोट्या शहरातून आलेल्या किंवा खालच्या आर्थिक स्तरातून आलेल्या पुरुषाला प्रचंड सुखावणार होतं. अप्राप्य सौंदर्य आपल्याला पण मिळू शकत असा मनाच्या कोपऱ्यात आत्मविश्वास निर्माण करणार. मी वर म्हणल्याप्रमाणे पुरुष प्रेक्षकांना डोळ्यासमोर ठेवूनच अशा चित्रपटांची निर्मिती होत असल्यामुळे नायिकेला यामध्ये असं दुय्यम स्थान मिळायचं. रविनाची कर्तबगारी ही की ह्या विशिष्ट 'टेम्प्लेट' मधले रोल तिने मोठ्या टेचात केले. रविनाच्या कारकिर्दीचा उल्लेख करताना 'दिलवाले' आणि त्यातल्या 'एक ऐसी लडकी थी' गाण्याचा उल्लेख केल्याशिवाय पुढे जाताच येणार नाही.

प्रत्येक पिढीच्या तारुण्यसुलभ फॅन्टसीजचा एक चेहरा असतो. सत्तरच्या दशकात हेमामालिनी, ऐंशीच्या दशकात श्रीदेवी, नंतर काही काळ माधुरी आणि नव्वदच्या दशकात रविना टंडन हे पुरुषी फॅन्टसीचे चेहरे होते. पुरुषी फँटसी या अर्थाने की अनेकदा भारतीय पुरुष पडद्यावरच्या नायिकेसोबत स्वतःला पाहतो. पावसात तिच्यासोबत कल्पनेत का होईना भिजतो. त्या अर्थाने रविना अनेक भारतीय पुरुषांच्या कल्पनाविश्वाचा हिस्सा होती. हे अनेकांना रविनाच किंवा एकूणच स्त्रीच 'वस्तूकरण' (objectification ) केल्यासारखं वाटेल पण याला पर्याय नाही.
'मोहरा' मधल्या 'टीप टीप बरसा पानी' गाण्यात रविना पिवळ्या साडीत पावसात भिजत नाचते तेंव्हा गाण्याच्या दुसऱ्या मिनिटात अक्षय कुमारच्या चेहऱ्यावर सलज्ज आनंदाचे भाव दिसतात. त्या क्षणापुरता अक्षय हा समस्त भारतीय पुरुष जमातीच प्रतिनिधित्व पडद्यावर करत असतो. नंतर कॅटरिना कैफ पण तशाच पिवळ्या साडीत, तशाच पावसात तशाच अक्षय कुमारसोबत भिजली. पण रविना टंडनने पडद्यावर जे केलं होत त्याची एक टक्का सर पण कॅटरिनाला नव्हती हे कबूल करावं लागत.
रविना तशी 'बॉलिवूड इनसायडर'. दिग्दर्शक रवी टंडन आणि कला दिग्दर्शिका वीणा या दाम्पत्याची ही मुलगी. पण घरची ही पार्श्वभूमी असून पण तिचा हिरोईन बनण्याचा काहीही इरादा नव्हता. एका पी आर एजन्सीमध्ये काम करताना ऍडमॅन प्रल्हाद कक्करची नजर तिच्यावर पडली आणि त्याने तिला फिल्म्समध्ये काम करण्यासाठी प्रोत्साहित केलं. रविनाचा पहिला चित्रपट होता सलमान खानसोबतचा 'पथ्थर के फुल'. फिल्म बऱ्यापैकी चालली. त्यावर्षीचा सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा पुरस्कार पण तिने जिंकला.
रविना ज्या काळात बॉलिवूडमध्ये कार्यरत होती, तो काळ एकूणच स्त्री अभिनेत्यांसाठी आदर्श नव्हता. बहुतेक सिनेमांमध्ये हिरोईन शो पीस पुरती वापरली जायची. हिरोसोबत गाणे गायचे, छान छान दिसायचं आणि एखाद दुसऱ्या प्रसंगात अश्रू ढाळायचे एवढाच मर्यादित रोल अभिनेत्रीला असायचा. आणि रविना पण काही महान अभिनेत्री वगैरे नव्हती. लेट्स फेस द ट्रुथ! रविनाच्या बहुतेक भूमिकांचा एक ठरलेला साचा होता. ती बहुतेक सिनेमांमध्ये श्रीमंत बापाची बिगडी हुई औलाद असायची. जिला आपल्या संपत्तीचा घमंड असायचा . ती एक तर विदेशात शिकून आलेली असायची किंवा महागड्या गाड्या वेगात फिरवत असायची. केसांना मोहक झटके देत आणि इंग्रजी शब्दांचा भडीमार करत जीवावर आल्यासारखे हिंदी संवाद बोलायची. 'व्हॉट नॉन्सेन्स' किंवा 'शट अप' ही वाक्य बहुतेक नायकाला उद्देशून ती सतत म्हणत असायची. मग गरीब घरातून आलेला नायक तिला येनकेनप्रकारेण ताळ्यावर आणायचा. मग रविना त्या नायकाच्या प्रेमात पडायची.
रविनाच्या कारकिर्दीतल्या साठ टक्के भूमिकांचा हा गाळीव अर्क आहे. पण हे सगळं छोट्या शहरातून आलेल्या किंवा खालच्या आर्थिक स्तरातून आलेल्या पुरुषाला प्रचंड सुखावणार होतं. अप्राप्य सौंदर्य आपल्याला पण मिळू शकत असा मनाच्या कोपऱ्यात आत्मविश्वास निर्माण करणार. मी वर म्हणल्याप्रमाणे पुरुष प्रेक्षकांना डोळ्यासमोर ठेवूनच अशा चित्रपटांची निर्मिती होत असल्यामुळे नायिकेला यामध्ये असं दुय्यम स्थान मिळायचं. रविनाची कर्तबगारी ही की ह्या विशिष्ट 'टेम्प्लेट' मधले रोल तिने मोठ्या टेचात केले. रविनाच्या कारकिर्दीचा उल्लेख करताना 'दिलवाले' आणि त्यातल्या 'एक ऐसी लडकी थी' गाण्याचा उल्लेख केल्याशिवाय पुढे जाताच येणार नाही.
खरं सांगायचं तर दिलवाले हा काही महान सिनेमा नाही आणि हे गाणं पण काही ग्रेट नाहीये. पण हे गाणं देवदास कॉम्प्लेक्स मध्ये बुडून राहणाऱ्या आणि त्यामध्येच सॅडीस्ट आनंद शोधणाऱ्या भारतीय पुरुषाला भावविव्हल करत. नदीम श्रवणचं संगीत आणि समीरचे साधे शब्द यांच्यापेक्षा पण हे गाणं अजूनही लोकप्रिय असण्यामागे हे मानसशास्त्रीय कारण असावं. आजही छोट्या शहरांमध्ये किंवा ग्रामीण भारतातल्या काळ्या पिवळ्या, अनधिकृत ट्रॅव्हल्स गाड्या, प्लॅस्टिकच्या खुर्च्या असणाऱ्या आणि चकण्यात फुटाणे कॉम्प्लिमेंटरी देणाऱ्या बारमध्ये हे गाणं नित्य नियमितपणे वाजत. या गाण्याला कुठल्याही उच्चभ्रू मुशायऱ्यांमध्ये किंवा गजल नाइट्समध्ये स्थान नाही. पण कॉलेज गॅदरिंगमध्ये हे गाणं काळ्या सावळ्या अजय देवगणमध्ये स्वतःला बघणारी आणि प्रेमभंगामुळे चेहऱ्यावर प्रचंड तेज आलेली पोर म्हणतात.
मी मागे अजय देवगणवर लिहिलेल्या लेखात एक विधान केलं होतं. तेच विधान रविनाला पण काही प्रमाणात लागू पडतं. जोपर्यंत 'एक ऐसी लडकी थी' गाणं लोकप्रिय आहे तोपर्यंत रविनाची लेगसी कधीही मिटली जाणार नाही. एक अमरपट्टा या गाण्याने रविनाला दिला आहे. जोपर्यंत हे गाणं वाजत आहे, तोपर्यंत प्रेमात धोका देणाऱ्या प्रेयसीचा चेहरा रविनाचाच राहणार आहे. स्वतः जुहूच्या आलिशान बंगल्यात राहणाऱ्या रविनाला पण ह्या गाण्याने तिला काय दिलं आहे याची कल्पना नसावी. 'अंदाज अपना अपना' मध्ये आपण बऱ्यापैकी कॉमेडी करु शकतो याचा साक्षात्कार रविनाला झाला असणार. यातून मिळालेल्या आत्मविश्वासाचा फायदा तिला पडद्यावर गोविंदासोबत जोडी जमवताना झाला असणार. गोविंदासोबत करियरच्या एका फेजमध्ये तिने अनेक चित्रपट केले. तिच्या अगोदर डेव्हिड धवन आणि गोविंदाच्या सिनेमामधला तिसरा कोन करिष्मा कपूर होती. करिष्मा आणि रविनाच पदार्पण एकाच काळात झालं. दोघी एकमेकांना प्रतिस्पर्धी समजायच्या.
व्यावसायिक स्पर्धेसोबत त्याला अजय देवगण नावाचं हळवं अस्तर होतं असं पण म्हणतात. तर करिष्माला गोविंदाच्या सिनेमांपासून दूर जाऊन वेगळी वाट चोखाळायची होती. त्यामुळे तिने त्याच्यासोबत काम करणं कमी केलं. ही पोकळी रविनाने यशस्वीपणे भरुन काढली. गोविंदासोबत काम करणं काही खायचं काम नव्हतं. त्याच्या डान्स स्टेप सोबत डान्स स्टेप मिळवणं, त्याच्या अफाट कॉमिक टाइमिंगला साथ देणं, त्याच्या लहरी स्वभावाला सांभाळून घेणं हे कुठल्याही नायिकेसाठी आव्हान होत. पण रविनाने ते यथाशक्ती पेललं. अर्थात या सगळ्यात तिने 'बॅकसीट' घेणंच सगळ्यांनी गृहीत धरलं होतं. अक्षय कुमारच्या 'खिलाडी' सिरीज मध्ये पण ती हेच करायची. हे सगळं थोड्या बदलायला सुरुवात झाली ती ई. निवासच्या 'शूल' सिनेमातून. या सिनेमात आयुष्यात पहिल्यांदाच तिने नॉन ग्लॅमरस रोल केला.
एका प्रामाणिक पोलिस अधिकाऱ्याच्या पत्नीला भोगावे लागणारे भोग रवीनाने पडद्यावर चांगल्या पद्धतीने उभे केले होते. रविनाला या वेगळ्या भुमिकेत बघणं तिच्या चाहत्यांना जड गेलं असणार. पण आउट अँड आउट मनोज वाजपेयीचा सिनेमा असणाऱ्या सिनेमात पण रविनाने आपली छाप सोडली हे नक्की. नंतर आला कल्पना लाजमीचा 'दमन'. लग्नानंतर स्त्रीसोबत होणारा हिंसाचार या संवेदनशील विषयावर बनलेल्या सिनेमात रविनाने एका शोषित स्त्रीची भूमिका केली होती. सिनेमाकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली असली तरी समीक्षकांनी सिनेमाचं आणि त्यातल्या रविनाच्या भूमिकेचं कौतुक केलं. या सिनेमासाठी रविनाने प्रतिष्ठेचा राष्ट्रीय पुरस्कार जिंकला. एक वर्तुळ पूर्ण झालं. सिनेमात निव्वळ शो पीस असणं या स्टेजपासून राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या अभिनेत्रीच बिरुद मिळवणं हा प्रवास रविनाने यशस्वीपणे पूर्ण केला. नंतर पण 'अक्स' आणि 'सत्ता' मधल्या तिच्या भूमिकेचं कौतुक झालं.
अनुराग कश्यपचा 'बॉम्बे वेलवेट' बघायला मी फार उत्साहाने थियेटरमध्ये गेलो होतो. फिल्म आवडत्या अनुराग कश्यपची होती, हे एक कारण होतच. रणबीर कपूर सिनेमात आहे हे पण एक कारण होतच. पण या सगळ्यांच्या पलीकडे अजून एक खास कारण होतं. सिनेमामध्ये रविना टंडन होती. सिनेमा संपल्यावर मी बाहेर आलो तेंव्हा माझा चांगलाच अपेक्षाभंग झाला होता. सिनेमा वाईट होता म्हणून नाही. तर एडिटिंग टेबलवर रविनाच्या रोलच्या चिंध्या चिंध्या झाल्या होत्या म्हणून. त्या दारुण अपेक्षाभंगाला आपली फसवणूक झाली आहे या दुःखाचं अस्तर होतं. मला खात्री आहे हा सिनेमा बघून बाहेर पडल्यावर माझ्यासारखाच अनुभव अनेकांना आला असेल. विशेषतः नव्वदीच्या दशकात रविनाचा सिनेमा बघून तारुण्यात आलेल्या पिढीला.
रविनाच वैयक्तिक आयुष्य तिच्या प्रेमप्रकरणांमुळे माध्यमातून सतत गाजत राहील. पण तिची एक निरपेक्ष कृती नेहमी दुर्लक्षित राहिली. वयाच्या अवघ्या पंचविसाव्या वर्षी रविनाने दोन अनाथ मुलींना दत्तक घेतलं. वयाच्या त्या स्टेजला तिचं करियर पूर्ण भरात असताना तिने त्या दोन्ही मुलींचं उत्तम पालनपोषण केलं. त्यांना स्वतःच्या पायावर उभं केलं. मागच्या वर्षी त्यातल्या एका मुलीचं लग्न झालं. कुठल्याही उत्साही आईप्रमाणे रविनाने लग्न लावून दिलं. मुख्य म्हणजे हे सगळं करताना कुठलाही गाजावाजा नाही केला की माध्यमांमध्ये भावनाविवश मुलाखती दिल्या नाहीत. सगळं ओरडून विकण्याच्या काळात रविनाच हे वेगळेपण भावतं. 'बीइंग ह्युमन ' होण्यासाठी मार्केटिंगचे ढोल वाजवावे लागतातच असं नाही हे रवीनाने दाखवून दिलं.
रविनाच्या जगभर पसरलेल्या चाहत्यांसाठी रविना नेमकी कोण असेल? एक सुंदर पण मर्यादित वकूब असणारी अभिनेत्री? शहर की लडकी? अंखियों से गोली मारणारी सुंदरी? की 'दमन' साठी राष्ट्रीय पुरस्कार जिंकणारी सशक्त अभिनेत्री? माझ्या मते तरी यापैकी कुणीच नाही. शेकडो भारतीयांसाठी प्रियकराला प्रेमाच्या रस्त्यात मध्येच हात सोडणारी पण त्याच्या आठवणीने रात्रंदिवस अश्रू ढाळणारी लडकी म्हणजे रविना टंडन. “एक ऐसी लडकी थी जिसे मै प्यार करता था. ”
संबंधित ब्लॉग
ब्लॉग : माजघरातल्या उबदार भीतीचा चेहरा
एका हरवलेल्या दशकाची डायरी : या ‘सूर्यवंशम’चं काय करायचं ?
जावेद जाफरी -दुर्लक्षित गुणवत्तावान
अलका याज्ञिक : जिचं गाण्यात असणं आपण गृहीत धरायचो अशी गायिका
गर्दीश : हातातून निसटत जाणाऱ्या स्वप्नांची गोष्ट
श्रीदेवी नावाचं फेनॉमेन
कुमार सानू -एका दशकाचा आवाज (1)
View More
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
आरोग्य
व्यापार-उद्योग
क्रिकेट

























