BLOG : नाही नाही म्हणत जरांगे तयार झालेच! जय-वीरू : पडद्यामागची कहाणी भाग - 6
BLOG : मागच्या भागात सांगितल्याप्रमाणे आम्ही जळगावहून छत्रपती संभाजीनगरमध्ये दाखल झालो. पोहोचेपर्यंत 12 वाजले होते आणि सकाळी 9 वाजता अंतरवाली सराटीत मनोज जरांगेंनी मुलाखतीसाठी वेळ दिली होती. संभाजीनगर ते अंतरवालीचं अंतर फक्त 70-72 किमी होतं त्यामुळे 7 वाजता निघायचं ठरलं. आदल्यारात्री सगळेच दमले होते. जळगावात सकाळी 8 वाजता बाहेर पडलो ते दोन मुलाखती करुन 150 किमी अंतर कापून रात्री 12 वाजता संभाजीनगरमध्ये पाठ जमिनीला लावली होती. ब्रेकफस्ट करुन निघेपर्यंत 7.30 वाजले होते. ड्रायव्हर दादांना गाडी पळवायला सांगितली...आम्ही 9.15 वाजता अंतरवालीत होतो.
माझ्या डोळ्यासमोर एक मंडप होता, खाली सतरंज्या होत्या..एका छोटा स्टेज होता...त्या स्टेजवर शिवरायांची एक मोठी प्रतिमा होती आणि ठीक त्या प्रतिमेच्या खाली आक पांढरी गादी आणि दोन पांढऱ्या उश्या होत्या. आजपर्यंत जे चित्र मी टेलिव्हिजनवर पाहत होतो ते मी माझ्या डोळ्यांनी पाहत होतो. मुळात जात या संकल्पनेला मी मानत नाही, आपण माणूस म्हणून जन्माला आलो आणि माणूस म्हणून जाणार. पण तरी सुद्धा त्या जागेत मला एनर्जी जाणवली...मराठा आरक्षणाचं पुढे काय होईल हे देव जाणे पण ही जागा ऐतिहासिक झाली असून या जागेचं महत्व पुढच्या सात जन्मात तरी कुणी कमी करु शकणार नाही. आम्ही तिथे असताना एक कुटूंब तिथे आलं होतं..मंडपाच्या शेजारी एक मंदिर आहे...त्या कुटूंबाने देवाचा आशीर्वाद घेतला आणि तिथून मंडपा जवळ गेले...शिवरायांच्या प्रतिमेला वंदन केलं आणि त्या स्टेजसह फोटो काढू लागले. मी हेच म्हणतोय...जरांगेंच्या अनुपस्थितीत सुद्धा लोक तिथे जातायत...फोटो काढतयात याचाच अर्थ त्या जागेचं महत्व वाढलंय. फक्त जरांगेंच नाही तर राज ठाकरे, एकनाथ शिंदे, शरद पवार, संभाजीराजे छत्रपती अशा अनेक लोकांनी या जागेला भेट दिली आहे...त्यामुळे नक्कीच या जागेचं महत्व अधिक वाढलं.
जेव्हा अंतरवालीत लाठीचार्ज आणि गोळीबार झाला त्यावेळची सगळी क्रोनोलॉजी रवी सर आम्हाला त्या-त्या ठिकाणी नेऊन सांगत होते. रवी सरांनी ते सगळं जवळून अनुभवलं होतं त्यामुळे त्यांच्या समजवण्यात डिटेलिंग होतं. एखाद्या फिल्मची कथा असते तसंच ते सांगत गेले आणि सगळा प्रसंग आमच्या डोळ्यासमोर तयार होत गेला.
जरांगेंना यायला वेळ आहे म्हटल्यावर रवी सर आम्हाला जवळच एका लॉज कम रेस्टॉरंटमध्ये घेऊन गेले. जरांगेंच्या आंदोलना दरम्यान या लॉजचं महत्व जाम वाढलं. भली मोठी जागा, पार्किंग लॉट, चांगलं जेवण आणि रुम्स असं सगळं असल्याने जरांगेंचं उपोषण करण्यासाठी आलेल्या सर्व पत्रकारांची इथे छावणी झाली होती. हे हॉटेलचं अनेक पत्रकारांचं घर झालं होतं.
हॉटेलवर चहा घेतला आणि रवी सरांच्या मनात एक विचार आला...जरांगेंना एक कार्यक्रम होता त्यामुळे ते 50 किमी दूर एका गावात होते. सध्या जरांगेंची डीमांड जोरात आहे त्यामुळे ते सतत दौऱ्यांवर असतात. परत अंतरवालीत येणार होते पण प्लॅन बदलला आणि तिथूनच दुसरी वाट धरली तर आमची वाट लागायची. म्हणून रवी सर म्हणाले, की आपणच तिथे जाऊ. आम्ही सुद्धा तयार झालो आणि निघालो. मुख्य हायवे सोडून आम्ही आता एका छोट्या रस्त्याला लागलो होतो. दोन्ही बाजूने ऊस आणि दर दहा मिनिटांनी ऊस वाहतूक करणारी बैल गाडी. संपूर्ण दृश्य हे अदभूत होतं, ग्रामीण महाराष्ट्र खरच खूप सुंदर आहे फक्त आपल्याकडे तिथे लक्ष द्यायला वेळ मिळाला पाहिजे. नावाजलेली ठिकाणचं फक्त टुरिस्ट स्पॉट नसतात कधी कधी आपणही एखादा स्पॉट शोधून त्याला टुरिस्ट अटरॅक्शन कसं देता येईल याचा विचार करायला हवा. आम्ही अर्ध्याहून अधिक राज्य फिरलो आणि प्रत्येक जिल्हा हा बघण्यासारखा आहे हे मी छाती ठोकून सांगू शकतो.
असो, तर आम्ही त्या रस्त्यानं जात असताना रवी सरांना फोन आला. फोनवर कळवण्यात आलं की जरांगे पुन्हा अंतरवलीसाठी निघालेत, तासाभरात पोहोचतील. सरांनी पुन्हा खात्री करुन घेतली. आम्ही यु टर्न घेतला आणि थेट अंतरवलीत पोहोचलो. त्या दिवशी अंतरवलीत एक लग्न होतं पण लग्नाला आलेली लोकं लग्न मंडपात न जाता आधी जरांगेंच्या मंडपाचं दर्शन घेत होते. हीच जरांगेंची खरी ताकद.
आम्ही भर रस्त्यात जरांगेंची वाट पाह उभे होतो आणि तेवढ्यात एक काळ्या रंगाची स्कॉर्पियो येताना दिसली. रवी सर म्हणाले..."जरांगे आले.." हे ऐकताच आमची धावपळ सुरु झाली. माईक वगैरे घेतले आणि जरांगेंकडे गेलो. त्यांना बाईक दाखवायची म्हणून मी ती बाईक रस्त्यावरुन मंडपाजवळ आणली. जरांगे सरुवातीला नकोच म्हणत होते पण अखेरीस बाईकमध्ये बसायला तयार झाले. आम्ही जरांगेंना बाईकवर बसवून मुलाखत घेताना अनेक लोक त्यांना भेटायला आले. खरं तर ती फक्त जनता नाहीए, जरांगेंसाठी ती एक जबाबदारी आहे. मराठा समाजातील लोकांचा जरांगेंवर विश्वास आहे हे आम्हाला पाऊलोपावली जाणवलं. मनोज जरांगेंची मुलाखत संपेपर्यंत 1 वाजला होता. आम्ही आवरलं आणि हायवेला आलो. रवी सरांनी ऊसाचा रस पाजला आणि आमचं तन-मन सगळंच शांत झालं. सरांचा निरोप घेतला आणि पुन्हा संभाजीनगरकडे निघालो.
जेवायची वेळ झाली होती पण आता संभाजीनगरलाच जाऊन जेवायचं हे फायनल झालं आणि प्रवास सुरु झाला. संभाजीनगरला चूल नावाचं एक हॉटेल प्रचंड फेमस आहे. अनेकांनी आम्हाला सांगितलं होतं की तिथेच जेवण करा. आम्ही ठिक 3 वाजता हॉटेल चुलवर पोहोचलो. सर्वांसाठी मटण थाळी सांगितली. जेवण यायला वेळ लागेल म्हणून मी हॉटेलचा फेरफटका मारु लागलो. जमीन शेणाने सारवलेली होती, किचन तसं ओपन होतं. भाकरी शेकवायला भली मोठी चूल होती. हे सगळं पाहता जेवण उत्तम असेल याची खात्री झाली. जेवण येताच सर्व तुटून पडले आणि पोटोबो केला. संभाजीनगरमध्ये आम्हाला चंद्रकांत खैरे आणि इम्तियाज जलील भेटणार होते पण ते दुसऱ्या दिवशी त्यामुळे पहिला दिवशी आमचं लवकर पॅकअप झालं.
लवकर हॉटेलवर पोहोचल्याने जरा आराम केला. निवांत झोपून घेतलं. रात्री 10 वाजता जेवायला बाहेर पडलो. काय खायचं तर चायनिज खाऊ म्हटलं. स्वस्तात मस्त होऊन जातं. एकाला फोन केला तर तो म्हणाला अमूक-अमूक ठिकाणी जा. आम्ही पोहोचलो पण जागा काही योग्य वाटली नाही. तो एक लहान कॅफे होता. आम्हाला सोडलं तर कस्टमरही नव्हतं कुणी. ट्रायल म्हणून एक चिकन फ्राईड राईस सांगितला...तो येताच त्याचा कलर पाहून आमचा भ्रमनिरास झाला. पहिला घास तोंडात टाकला आणि चायनासाठी वाईट वाटलं. आमच्या संपूर्ण दौऱ्यात पहिल्यांदा आमचं जेवण फसलेलं.
आम्ही पुढच्या क्षणी हॉटेलमधून निघालो आणि थेट अंडा-भुर्जीपावच्या गाडीवर पोहोचलो. सगळ्यांनी भुर्जीपाव आणि मी ऑमलेटपाव घेतला. पहिल्या घासात आत्मा तृत्प झाला. पटापट आटपलं आणि पुन्हा माघारी हॉटेलवर पोहोचलो. उद्याचा दिवस मोठा होता..सकाळी चंद्रकांत खैरे आणि संध्याकाळी इम्तियाज जलील भेटणार होते. पण टेन्शन एकच होतं...धंगेकरांसारखं होऊदे नको...कारण वेळ कुणाचीच फिक्स नव्हती.
पुढची कहाणी... भाग सात मध्ये
याच लेखकाचा हा ब्लॉग वाचा :