एक्स्प्लोर

काळाकुट्ट अंधार आणि टायर पंक्चर! जय-वीरू : पडद्यामागची कहाणी भाग - 2

BLOG : साताऱ्यात पोवई चौकात एक चहाचं दुकान होतं. तिथे एक मुस्लिम आजोबा बसले होते. मला रँडम लोकांशी बोलायला आवडतं कारण प्रत्येकाची एक कहाणी असते,

BLOG : साताऱ्यात पोवई चौकात एक चहाचं दुकान होतं. तिथे एक मुस्लिम आजोबा बसले होते. मला रँडम लोकांशी बोलायला आवडतं कारण प्रत्येकाची एक कहाणी असते, प्रत्येकाचं एक कॅरेक्टर असतं आणि ते जाणून घेण्याची मला पर्सनली फार उत्सुक्ता असते. त्या आजोबांना समजलं की आम्ही लोकसभेचं शूट वगैरे करतोय. त्यांनी समोरूनच त्यांची कहाणी सांगितली. आता त्यांचं वय 86 आहे आणि यातील 40 वर्ष त्यांनी साताऱ्यातील राजघराण्यात सेवा केली आहे. उदयनराजेंना थेट नावानं हाक मारणारे फार कमी आहेत आणि हे आजोबा त्यातील एक. उदयनराजेंना या आजोबांनी लहानपणापासून पाहिलं आहे. राजेंच्या घरातील कोपरा ना कोपरा यांना अजूनही पाठ आहे. त्यांनी त्यांची ही कहाणी सांगताना एक किस्साही सांगितला. जेव्हा त्यांना हे दुकान थोडं मोठं करुन सुरु करायचं होतं तेव्हा ते प्रशासनाची कारवाई टाळण्यासाठी राजेंकडे गेले. तेव्हा राजे या आजोबांना म्हणाले होते, "चाचा तुम्ही लावा स्टॉल, मी बघतो!". या संपूर्ण दौऱ्यात अनेक अनोळखी माणसं सापडली पण हे आजोबा कायम लक्षात राहतील.

असो,  मागच्या भागात सांगितल्या प्रमाणे रत्नागिरीला निघालो होतो. कराडच्या जवळ पोहोचलो आणि राहुल तपासेंचा फोन आला, "सकाळी मुख्यमंत्री दरे गावात आहेत...आज साताऱ्यात थांबा!". खरं तर मुख्यमंत्री बाईकवर बसले असते तर जॅकपॉट लागला असता पण त्यावेळी योग्य निर्णय घेणं महत्वाचं होतं. मुख्यमंत्री बसतील का याची शास्वती नव्हती त्यात आम्हाला एपीसोड द्यायचे होते. बरं, मुख्यमंत्र्यांच्या दरे गावात पोहोचणं हा वेगळाच टास्क आहे. त्यामुळे, आम्ही निर्णय घेतला आणि साताऱ्यात न थांबता रत्नागिरीचाच रस्ता पकडला. आम्ही पाटणहून राईट घेत कुंभार्ली घाटातून रत्ननागिरीला निघालो. 6.40 दरम्यान रियाज चाचांच्या इफ्तारीसाठी थांबलो. त्यांचं आटपेपर्यंत अंधार पडला आणि आता याच अंधारात आम्ही रस्ते तुडवत पुढे निघालो. समोर घनदाट जंगल, वेडेवाकडे रस्ते आणि काळाकुट्ट अंधार. आता कोकणात जातोय म्हटलं तर आपसूक विषय निघतात ते भुताटकीचे. आमचंही तेच झालं..विनोद सरांनी एक एक किस्सा सांगायला सुरु केलं, त्यात अनिल आणि अजित सरांनी भर टाकला. मी सुद्धा केस मोकळे सोडून सिद्धेशला दोनदा घाबरवलं पण हे सगळं सुरु असता एक गोष्ट आम्हा सर्वांना खुपत होती. हेळवाक नावाच्या गावाचा एक फलक आम्हाला सतत दिसत होता. म्हणजे गेले 70 -80 किमीच्या प्रवासात तर सारखा दिसतच होता. बरं, हे जाणवलं सर्वांना पण बोलत कुणीत नव्हतं. त्यात विनोद सरांचा  कंट्रोल संपला आणि ते म्हणाले..."अरे हे हेळवाक येतच नाहीए अजून..". विनोद सरांचं हे वाक्य ऐकताच सगळ्यांनाच वाचा फुटली..सर्वांच्या मनात तेच होतं. आपल्याला चकवा लागलाय का असाही विचार मनात आला पण म्हटलं जाऊदे चालत राहू पुढे पुढे. आता योगायोग काय तर हा किस्सा होताच पुढच्या 15 मिनिटांमध्ये आम्ही थेट हेळवाक गावात पोहोचलो. गाडी स्लो केली..गाव पाहिलं आणि निघालो. त्या संध्याकाळी आमच्यासोबत काय झालं हे देव जाणे. 

रात्री 9.30 वाजता आम्ही चिपळूणला उतरलो. जेवणासाठी थेट सुप्रसिद्ध अशा हॉटेल अभिषेकमध्ये गेलो. राज ठाकरे, नारायण राणे, आदित्य ठाकरेंसारखे बडे नेते येथे जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी येतात. कोकणात आलोय म्हटल्यावर काय मागवणार? सर्वांच्याच पुढ्यात सुरमई थाळी होती. मस्त जेवलो आणि बिल काऊंटरवर राडा झाला. त्यांच्याकडे UPI Payment नव्हतं.  माझ्याकडे कॅश होती पण पाकीट कारमध्ये आत कुठेतरी होतं...काय करायचं इतक्यात त्या हॉटेल मालकानं विचारलं...जय-वीरु का? आमच्या 'हो' ते जोरात हसले आणि कुठून तरी एक स्कॅनर घेऊन आले. पेमेंट केलं..खडी साखर टिशूमध्ये भरली आणि निघालो. बाहेर आलो..मॅपवर बूक केलेल्या हॉटेलचा पत्ता टाकला...20 किलोमीटर अजून होतं...सावर्डे येथी एका गावात ते हॉटेल आम्ही चुकून बूक केलं होतं...हायवे सोडला आणि गावच्या कच्च्या रस्त्याला लागलो. विनोद सर मागे चाचांसोबत बाईकवर बसले होते. त्यांच्या हाडांचा चुराच झाला असावा. आता 20 मिनिटं होत आली तरी हॉटेल येईना...दोन्ही बाजूने जंगल... त्या भागात बिबट्यांचाही मुक्त संचार आहे त्यामुळे आणखी भिती होती. रस्ता काही संपेना..विनोद सरांचे दोन फोन आले...किती वेळ..आम्ही म्हटलं..मॅपवर कधीपासून 2 किमी दिसतंय. अखेर कसं बसं आम्ही हॉटेलच्या गेटवर पोहोचलो..गेट बंद...माणसाची सावली सुद्धा दिसत नव्हती. 
बरोबर मध्यरात्रीचे 12.15 झाले होते...अखेर दोन इसम आले आणि त्यांना आम्ही आमचं बुकिंग असल्याचं सांगितलं. हे ऐकताच ते चकीत झाले आणि म्हणाले.."हॉटेल तर बंद आहे...बुकिंग कसं झालं...?". थोडी फोनाफोनी झाली आणि आता इतक्या रात्री कुठे जाणार तर ते ही म्हणाले...थांबा..हॉटेल तुफान होतं...म्हणजे कधी तरी सुट्टी काढून 4 दिवस जाण्यासारखं एकीकडे जंगल दुसरीकडे वाहणारी नदी! पण आम्हाला त्या रात्रीचे काही तासच काढायचे होते. चेक इन केलं. कपडे धुतले आणि झोपून गेला.

सकाळी चेकआऊट केलं आणि रत्नागिरीला निघालो. राजन साळवींनी वेळ दिली होती. आम्हाला तसा उशीर झाला होता पण रियाज चाचांना कोकणातील रस्तयांची सवय नव्हती म्हणून गाड्यांचा वेग कमी होता. 10.30 ला रत्नागिरीत दाखल झालो...नाश्ता केला नव्हता म्हणून उभ्या-उभ्या सर्वांनी पटापट 2-2 वडापाव तोंडात कोंबले आणि साळवींच्या घरी पोहोचलो. मागे ACBचं सावट आणि डोक्यावर अटकेची टांगती तलवार असलेले राजन साळवी हेच का असा मला प्रश्न पडला. आम्ही पुढचे 2 तास त्यांच्यासोबत होतो. त्या दोन तासात त्या माणसाला मी एकदाही निराश पाहिलं नाही..सतत तो माणूस हसत होता आणि आम्हाला हसवत होता. या सर्व कारवाईमुळे राजन साळवींनी आपल्या मुलाचंही लग्न पुढे ढकललं...आमच्या मुलाखतीनंतर ते काही नेत्यांकडे जाणार होते...लेकाचं लग्न पोस्टपोन झालंय..येऊ नका हे सांगायला...एक बाप म्हणून त्यांनी ही गोष्ट आम्हाला सांगितली. असो, इंटरव्हिव झाला आणि आम्ही थेट पोहोचलो रत्नागिरीच्या महेश लंच होममध्ये...इथे पुन्हा माशांचा आस्वाद घेतला...पण हो..मला घेता आला नाही...जुलाब सत्र सुरुच होतं त्यामुळे जेवण करणं टाळलं होतं मी. मला सर्वाधिक त्रास झाला तो रत्नागिरीत...इंटरव्हि सुरु झाल्यापासून संपेपर्यंत...माझ्या पोटात गोळे येत होते...एका पॉईंटला मी सगळं शूट सोडून शौचालंय शोधत होतो.

असो, साळवींचं शूट झालं होतं पण आता आणखी एक काम बाकी होतं. खरं तर कोकणात आम्ही पोहोचलो ते नेमकं शिमगा सुरू असताना. कोकणातील शिमगा म्हणजे जगात भारी...माझं गाव रत्नागिरीत असून सुद्धा मी कधी गावची होळी अनुभवली नव्हती पण या कार्यक्रमामुळे तो योग आलाच. चॅनेलसाठी होळी स्पेशल शो करायचा होता आम्ही शिमग्याच्या पहिल्याच दिवशी कोकणात असल्याने पालखी मिळणार नव्हती आणि आमचे काही कॉन्टॅक्टस देखील नव्हते. आमचे स्थानक प्रतिनिधी अमोल मोरे सरांनी आमचं काम केलं. अमोल सकाळपासूनच आमच्या सोबत होते...स्वतःच काम सांभाळून त्यांनी राजन सळवींच्या शूट दरम्यान आम्हाला उत्तम सांभाळून घेतलं. राजापूरमधील आडिवरे गावात त्यादिवशी शिमग्याची सुरुवात होणार होती. अमोलच्या ओळखीचीच मंडळी होती...त्याने फोन केला आणि आम्ही थेट आदिवरेतील या गावी पोहोचलो...घनदाट जंगल आणि उंच डोंगरामध्ये वसलेलं हे गाव...गावची लोकसंख्या काही शेकडोंमध्येच असेल फार नाही...आम्ही पोहोचताच लोकांनी आमचं उत्तम स्वागत केलं आणि थेट खळ्यात घेऊन गेले...गावातील सर्व मंडळी अगदी लहान मुलांपासून ते आजोबांपर्यंत...सगळेच उपस्थित होते...त्यांनी टिपरी नृत्य सुरू केलं...काही जण पारंपरिक गाणी गायचे आणि काही जण नृत्य करायचे...डॉक्यावर  टोपी..कंबरेला रुमाल आणि हातात दांडियाप्रमाणे काठ्या...गुजरातमध्ये जसा गरबा होतो तसाच पद्धतीने हे नृत्य केलं जातं. नृत्य करताना गायली जाणारी गाणी खास तयारी केली जातात तर काही गाण्यांना 50 वर्षांचा वारसा आहे. आम्ही तिथे शूट केलं...गावकाऱ्यांसह संवाद साधला...कोकणातला खास गवती चहा घेतला आणि पॅकअप केलं...

राजापूरात हॉटेल शोधायचं ठरलं आणि त्या दिशेने निघालो... आजचा दिवस कठीण होता पण काम मार्गी लागलं. रस्त्यात महाकाली मातेचं मंदिर दिसलं...गाडी थांबवली, दर्शन घेतलं... बाहेर चहा नाश्ता केला आणि थेट राजापूर डेपो समोरील होटेल मॅजेस्टिकला पोहोचलो.रात्री जेवण झालं...मेडिकल शोधण्याच्या बहाण्यानं जरा फेरफटका मारला आणि पुन्हा हॉटेलवर येऊन झोपलो. सकाळ झाल अन् पुढे सिंधुदुर्गात निघालो..राजापूर तालुका रत्नागिरी-सिंधुदुर्गच्या वेशीवर पडतो त्यामुळे पुढचा टप्पा तसा लांब नव्हता. आम्ही बरोबर 9 वाजता कणकवीलत पोहोचलो. वैभव नाईकांचं घर अगदी हायवेच्या शेजारी त्यामुळे पटकन पोहोचलो. नाईक दाढी करायला बाहेर पडले होते त्यामुळे आमच्याकडे तसा वेळ होता...थोडं शूट करुन घेतलं आणि थेट हॉटेल राणे इथं पोहोचलो. सकाळी सकाळी उत्तम दर्जाची आंबोळी चटणी आणि ऑमलेट पाव मिळाला होता. सगळेच खूश होते. रविवारची सुरुवात चांगली झाली होती. 11 च्या दरम्यान वैभव नाईक आले आणि थेट बाईकवर बसले. आम्हाला पुढे कोल्हापूर गाठायचं होतं त्यामुळे वेळ वाया न घालता शूट सुरु केलं आणि आटपलं सुद्धा. सिंधुदुर्गात दमछाक उडाली ती लोकांचे बाईट्स घेतना. खरं सांगायचं तर लोकांवर दबाव असल्याचं जाणवत होतं. लोक कॅमेऱ्यावर बोलायला अजिबात तयार नव्हते. त्यांच्या कसलातरी दबाव असल्याचं त्यांच्या हावभावांवरुन सहज दिसू येत होतं. आम्हाला हवे तसे बाईट्स मिळत नव्हते, चांगलाच भ्रमनिरास झाला होतं पण पुढे निघायचं म्हणून पॅकअप केलं. समोरच एका हॉटेलवर पुन्हा सुरमई थाळी खाल्ली आणि कोल्हापूरला जाण्यास निघलो. आता सिंधुदुर्गातून कोल्हापुरात जण्याचे दोन प्रमुख मार्ग आहेत. एक आंबोली घाटातून आणि दुसरा फोंडा घाटातून. आमच्यासोबत बाईक असल्यानं आंबोली घाटाला डच्चू देत फोंड्यातून निघालो. पुढे फोंड्यात आमच्यासोबत एक किस्सा घडला. घाटात एका ग्रुपनं आमची गाडी अडवली. ते स्वतःला गावकरी म्हणत होते आणि होळीसाठी पैसे मागत होते. आम्ही आधी नाही म्हटलं तर त्यांनी थोडा फोर्स करण्याचा प्रयत्न केला पण गाडी चॅनलची आहे पाहताच म्हणाले..."मनाने द्या कितीही चालतील..." संतापलेल्या आमच्या अजित सरांनी पाकिट उघडलं आणि थेट 20 रुपये हातात टेकवले. ती लोकं मुळात स्थानिक नव्हते, टुरिस्ट असावेत. पण त्यांच्या हातातील नोटांची बंडल पाहून एक नक्की की त्यांनी अनेकांना लुबाडलं होतं. 

संध्याकाळी 5 वाजताच्या जवळ आम्ही राधानगरीतून कोल्हापुरात उतरलो. राधानगरी धरणाचं दृश्य पाहून सगळा थकवा निघून गेला होता. पुणे 7 वाजताच्या दरम्यान आम्ही हॉटेलमध्ये चेकइन केलं. जेवायचं कुठे तर पारख वगैरे सोडून राजधानीत जायचं ठरलं. आधीच खूप हेवी झालं होतं. थाळी वगैर न मागवता फक्त बिर्याणी मागवली आणि हॉटेलवर जाऊन थेट बेड गाठला.

सकाळी लवकर बाहेर पडलो. सिद्धेश आणि विनोद सर बाईक घेऊन पुढे गेले आणि मी कारमधून नंतर निघालो. आम्ही एक यु-टर्न चुकवला आणि थेट 10 मिनिटं उशीर झाला. लोकेशनला पोहोचलो तर खासदार धैर्यशील माने बाहेर उभे...आम्हीच लेट. धैर्यशील माने म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणाला लाभलेला एक वक्ता. त्यांचे विचार आणि बोलण्याची पद्धतही प्रेमात पाडणारी आहे. असो, त्यांच्या मुलाखतीनंतर आमचा पुढची मुलाखत शिरोळच्या कुरुंदवाडमध्ये होती. राजू शेट्टींनी प्रचारा दरम्यान वेळ दिली होती. आम्ही तात्काळ निघालो पण पोटात भुकेची आग पेटली होती. आमच्यासोबत आमचे स्थानिक प्रतिनिधी विजय केसरकर सर होते. त्यांनी एका मस्त अशा उडपी हॉटेलवर गाडी थांबवली. इतकं भन्नाट साऊथ इंडियन फूड आम्हाला कोल्हापुरात मिळेल असं वाटलं नव्हतं. पुढे 40 किमीचा प्रवास बाकी होता, पटापट खाल्लं आणि निघालो. इनोव्हातून बाकी लोक पुढे निघाले होते आणि मी विनोद सरांसह बाईकवर होतो. 11.30 च्या दरम्यान आम्ही कुरुंदवाडमध्ये पोहोचलो...लोकेशन शोधण्याच्या नादात गावात हरवलो. कसं बसं बाहेर आलो आणि एक ग्लास लिंबाचा रस प्यायलो. डोक्यावर सुर्य तापला होता सो आमच्याकडे पर्यायही नव्हता. 10 मिनिटांमध्ये राजू शेट्टी आले. वेळ वाया न घालता अर्ध्यातासात शूट आटपलं आणी पुन्हा कोल्हापूर सिटी गाठली. त्या दिवशी जाम पळापळ सुरु होती. विजय सरांनी सगळे महत्वाचे नेते लाईन अप केले होते. राजू शेट्टीनंतर आम्ही थेट गाठलं कोल्हापूरचे खासदार संजय मंडलिकांचं घर. मंडलिक बाईकमध्ये बसायला तयार झाले हेच आमचं नशिब. महत्वाचं म्हणजे, माने-मंडलिक-महाडिक...तिघांची घर 1 किमीच्या रेंजमध्येच आहेत. मंडलिकांचा इंटरव्हिव झाला आणि आम्ही फ्रेश होण्यासाठी थेट हॉटेल गाठलं...तिथेच जेवलो आणि 15 मिनिटं झोपलो. पुढची मुलाखत 4.30 वाजता होती. आम्ही 4 च्या ठोक्याला काँग्रेसच्या कार्यालयात पोहोचलो...आमच्या बाईकवर बसणारा पुढचा नेता होता सतेज पाटील...उर्फ कोल्हापूरकरांचे बंटी पाटील! सतेज पाटील आणि तरुणांमध्ये असाणाऱ्या त्यांच्या क्रेजबद्दल फार ऐकलं होतं. मलाही कुतूहल होती की काय एवढं खास आहे बाबा यांच्यात म्हणून देखील एक्सायटेड होतो. बरं, शूट करताना सर्वात मोठं टेंशन असतं ते म्हणजे लाईटचं. नॅचरल लाईटमध्ये शूट केलेलं केव्हाही चांगलं. आम्ही तसंही भर रसत्यात शूट करायचो त्यामुळे आर्टीफिशीयल लाईटिंगचा प्रश्नच नाही. याच सर्व गोष्टींमुळे काँग्रेस कार्यालयात आमचं टेंशन वाढलं होतं. सतेज पाटलांचा कार्यकर्म सुरु होता...4.30 वाजता मालोजीराजे पोहोचले...गाडीतून उतरताच विचारलं.."बंटी कुठंय?" मी म्हटलं आता हे बंटी पाटलांना भेटणार आणि यांची मिटींग संपेपर्यंत बाहेर अंधार होईल. तेवढ्यात एक गृहस्त आले आणि आम्हाला कॉन्फरसंमध्ये घेऊन गेले...AC चालू केला आणि मस्त चहा पाजला. वेळ निघत चालला होता, आमची एकंदरीतच वाटचाल अंधाराकडे होत होती...एवढ्यात विजय सरांचा फोन आला...कार्यक्रम झालाय...बंटीदादा बाहेर येतायत! मी मधल्या कॉरिडोरमध्ये उभा होतो...बाहेर नुसती गर्दी...त्या गर्दीतून वाट काढत एक व्यक्ती समोर आली...पांढरं शर्ट, काळी पँट, क्राफ्टिंग केल्या प्रमाणे पर्फेक्ट केस आणि मिशी...लोकं ओरडली...बंटीदादा एक फोटो! मी अनेक नेत्यांना पाहिलंय...पहिल्या फळीतील नेत्यांचा रुबाब हा असतोच...त्यांच्या पदामुळे, कामामुळे किंवा घराण्यामुळे पण दुसऱ्या फळीतील फार कमी नेते आहेत जे मनात घर करुन जातात. बंटी पाटील त्या फार कमी नेत्यांपैकी एक...ते येताच वातावरणात ताकद जाणवली..त्यांच्या बोलण्या-चालण्यातच नाही तर थांबण्यात आणि फक्त उभं राहण्यातही रुबाब होता. इंग्रजीत आम्ही Aura म्हणतो...मला बंटी पाटलांचा Aura जाणवला...आणि बंटी पाटील हे रसायन वेगळं आहे हे समजलं...मी त्यांचा फॅन झालो!

बंटी पाटलांचा इंटरव्हिव धमाल झाला. कधी नव्हे ते पहिल्यांदा मुन्ना महाडिक आणि त्यांच्या वादावर बोलले. या दिल खुलास गप्पा पटकन संपल्याचं दुःख झालं पण पर्याय नव्हता. इंटरव्हिव झाला आणि आम्ही पुन्हा हॉटेवलवर गेलो. दुसऱ्या दिवशी कोल्हापुरात बाईट्स घ्यायचे होते. कोल्हापूरकांनी आम्हाला नाराज केलं नाही..मजा आली. आम्ही पटकन आवरंल आणि सांगलीला निघालो. सांगलीत संध्याकाळी चार वाजता संजयकाकांनी वेळ दिली होती. 

दुपारी अडीच वाजता आम्ही सांगलीत पोहोचलो. डेपोच्या शेजारीत आमचं हॉटेल होतं. चेकइन केलं, फ्रेश झालो, जेवलो आणि थेट गाठलं सांगलीचं गणपती मंदिर. संजयकाका तिथेच येणार होते. संजयकाका फार धमाल व्यक्ती. त्यांच्यात आणि आमच्यात फक्त कर्तृत्वाचंच नाही तर वयाचंही फार अंतर आहे, पण एका क्षणालाही त्यांनी आम्हाला हे जाणवू दिलं नाही. त्यांनी हसत खेळत मनोकळ्या गप्पा मारल्या. मुलाखतीनंतर ते आम्हाला चहासाठी एका रेस्टॉरंटला घेऊन गेले. तिथे चहासोबत अनौपचारिक राजकीय गप्पाही झाल्या ज्या इथं लिहणं योग्य नाही. सांगलीतील अनेक नामांकीत पत्रकार आम्हाला तिथे भेटले, त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर स्थानिक राजकारणाबद्दल खूप काही माहित झालं. तिथे एक पत्रकार आले होते, पत्रकारीतेसह ते समाजसेवाही करतात. सध्या त्यांनी नवा उपक्रम हाती घेतलाय. रस्त्यांवरील स्पीडब्रेकर्सवर पांढऱ्या पट्ट्या असतात पण कालांतरानं त्याचा रंग उडतो आणि कधी कधी स्पीडब्रेकर दिसत नाहीत. हे गृहस्त स्वतः पेंटचा डब्बा घेऊन प्रत्येक स्पीडब्रेकरवर पांढऱ्या पट्ट्या रंगवण्याचं काम करतायत.

सांगलीत पहिला दिवस संपला. रात्री जरा फेरफटका मारायचं ठरलं आणि माझ्यासह विनोद सर बाहेर पडले. आम्ही बाईक काढली आणि हळूहळू कोल्हापूरच्या दिशेनं निघालो. बघता-बघता आम्ही सांगलीची वेश ओलांडली आणि कोल्हापुरात दाखल झालो. नरसोबाची वाडी जवळ येऊन थांबलो. म्हटलं एक काम करु, जरा अजून आत जाऊ. मी पहिल्यांदा हा भाग फिरत होतो त्यामुळे मला जाम उत्सुक्ता होती. पुढे पुढे करत आम्ही थेट शिरोळच्या घालवाड या गावात पोहोचला. त्या दिवशी आम्ही कदाचित थांबलोही नसतो पण सुमारे 10.45 दरम्यान आमच्या बाईकचा मागचा टायर पंकचर झाला. इतक्या रात्री कुणाला शोधायचं..? ते ही या छोट्याश्या गावात! अनेक प्रश्न पडले होते...पुन्हा माघारी 30 किमी जायचं होतं. विनोद सरांनी त्यांच्या भावाला फोन केला आणि पुढच्या 15 मिनिटांमध्ये केतन नावाचा एक मॅकॅनिक आमच्या जवळ पोहोचला. कशीबशी बाईक आम्ही त्याच्या गॅरेजला घेऊन गेलो आणि काम सुरु झालं. ते गॅरेजपाहून मी स्तब्ध झालो होतो. इतक्या छोट्यागावातील या गॅरेजमध्ये मुंबईतील गॅरेज मालकांना लाजवतील अशा दर्जेदार मशिनरी होत्या. आता बूलेटचा टायर निघतो पटकन पण पुन्हा लावताना जीव काढतो समोरच्याचा. सुदैवाने एकच पंक्चर होता पण टायर लावण्याची कसरत अजून संपली नव्हती. अखेर बाईकच्या सायलेंसरला जॅक लावला आणि बाईक उचलली...२ इंच वर जाताच करररर असा सायलेंसरच्या जॉईंटमधून आवाज आला...मी आणि विनोद सरांना एकाच वेळी दोघांकडे पाहिलं...दोघांच्या डोळ्यात एकच गोष्ट होती..चिंता! 

रात्री 12.15 च्या दरम्यान कसाबसा टायर लागला आणि आम्ही थेट देवालाच हात जोडले! म्हटलं आता रस्त्यात पुन्हा काही झालं नाही म्हणजे झालं. मॅकॅनिकने जो काही त्रास सहन केला आणि जी काही मेहनत घेतली, मुंबईत आमच्याकडून किमान 700 ते 800 रुपये घेतले असते. आम्ही त्याला पैसे विचारले तर म्हणे, "50 रुपये द्या..." पंक्चरपेक्षा मोठा धक्का मला इथं लागला. आम्ही त्याला 200 द्याला तयार होतो पण तो म्हणाला 100 पेक्षा जास्त नकोच. आकडा ठरला पण आहा UPI Payment फसलं. ना विनोद सरांचं होई ना माझं. तो मॅकेनिक हसत म्हणाला...जा साहेब...हरकत नाही!

आम्ही 12.45 च्या दरम्यान पुन्हा हॉटेलवर पोहोचलो, सगळेच जागे होते. सर्वांना वाटलं होतं उद्याचं शूट सांगली शहरातच आहे पण आम्ही बाहेर असताना आम्हाला आमच्या स्थानिक रिपोर्टर कुलदीप मानेचा फोन आला होता. उद्याच्या मुलाखतीसाठी आम्हाला 60 किमीचा प्रवास करावा लागणार होता. नेता होता डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील आणि ठिकाण होतं सांगलीतील एक सुंदर,छोटं आणि माझं पर्सनल फेवरेट गाव...विटा!

पुढची कहाणी... भाग तीन मध्ये

BLOG : शूटचा गोंधळ ते पोटात गडबड, जय वीरू - पडद्या मागची कहाणी! (भाग 1)

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विधानसभेची खडाजंगी: लातूरमध्ये शहरमध्ये अमित देशमुखांपुढे अर्चना पाटील चाकूरकरांचं आव्हान, कोण मारणार बाजी?  
विधानसभेची खडाजंगी: लातूरमध्ये शहरमध्ये अमित देशमुखांपुढे अर्चना पाटील चाकूरकरांचं आव्हान, कोण मारणार बाजी?  
शरद पवार यांच्याकडून आंबेगावच्या सभेत गद्दार असा उल्लेख,दिलीप वळसे पाटील यांचा मोठा निर्णय, थेट पत्रकार परिषद रद्द, नेमकं काय घडलं? 
शरद पवार यांच्या सभेनंतर होणारी पत्रकार परिषद दिलीप वळसे पाटील यांच्याकडून रद्द, नेमकं काय घडलं?
शरद पवारांबाबत बोलायलाच नको, भूमिका लाजते; बदलत्या भूमिकेवरुन राज ठाकरेंचा टोला
शरद पवारांबाबत बोलायलाच नको, भूमिका लाजते; बदलत्या भूमिकेवरुन राज ठाकरेंचा टोला
अदानींचा काडीचाही संबंध नाही, अजित पवारांचं बीडमधून स्पष्टीकरण; मनोज जरांगेंबद्दलही बोलले
अदानींचा काडीचाही संबंध नाही, अजित पवारांचं बीडमधून स्पष्टीकरण; मनोज जरांगेंबद्दलही बोलले
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour Chandiwal Ayog : 100 कोटी खंडणी प्रकरण, इनसाईड स्टोरी काय?Sanjay Shirsat On Chandiwal : 'चांदीवाल ते सचिन वाझे' गौप्यस्फोटांवर शिरसाट यांची प्रतिक्रियाVidhan Sabha Manchar Reaction : सख्ख्या भावांनी आम्हाला रडवलं मंचरकरांचा मूड कुणाच्या बाजूने?Chitra Wagh Akola On Supriya Sule : बारामतीच्या ताईंनी आपल्या अडाणीपणाचे प्रदर्शन नाही केलं पाहिजे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विधानसभेची खडाजंगी: लातूरमध्ये शहरमध्ये अमित देशमुखांपुढे अर्चना पाटील चाकूरकरांचं आव्हान, कोण मारणार बाजी?  
विधानसभेची खडाजंगी: लातूरमध्ये शहरमध्ये अमित देशमुखांपुढे अर्चना पाटील चाकूरकरांचं आव्हान, कोण मारणार बाजी?  
शरद पवार यांच्याकडून आंबेगावच्या सभेत गद्दार असा उल्लेख,दिलीप वळसे पाटील यांचा मोठा निर्णय, थेट पत्रकार परिषद रद्द, नेमकं काय घडलं? 
शरद पवार यांच्या सभेनंतर होणारी पत्रकार परिषद दिलीप वळसे पाटील यांच्याकडून रद्द, नेमकं काय घडलं?
शरद पवारांबाबत बोलायलाच नको, भूमिका लाजते; बदलत्या भूमिकेवरुन राज ठाकरेंचा टोला
शरद पवारांबाबत बोलायलाच नको, भूमिका लाजते; बदलत्या भूमिकेवरुन राज ठाकरेंचा टोला
अदानींचा काडीचाही संबंध नाही, अजित पवारांचं बीडमधून स्पष्टीकरण; मनोज जरांगेंबद्दलही बोलले
अदानींचा काडीचाही संबंध नाही, अजित पवारांचं बीडमधून स्पष्टीकरण; मनोज जरांगेंबद्दलही बोलले
विधानसभेची खडाजंगी : गेवराईत काका-पुतण्याच्या लढाईत कोण मारणार बाजी? मनसेसह अपक्ष लक्ष्मण पवारांचेही आव्हान
विधानसभेची खडाजंगी : गेवराईत काका-पुतण्याच्या लढाईत कोण मारणार बाजी? मनसेसह अपक्ष लक्ष्मण पवारांचेही आव्हान
Nana Patole on Devendra Fadnavis : आता नाना पटोलेंच्या बॅगची झाडाझडती; म्हणाले, 'मला फडणवीसांची कीव येते, नियम सगळ्यांना सारखा असेल, तर..'
आता नाना पटोलेंच्या बॅगची झाडाझडती; म्हणाले, 'मला फडणवीसांची कीव येते, नियम सगळ्यांना सारखा असेल, तर..'
20 नोव्हेंबर रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर, बँकाही बंद; राज्य सरकारचा आदेश जारी, परिपत्रक निघालं
20 नोव्हेंबर रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर, बँकाही बंद; राज्य सरकारचा आदेश जारी, परिपत्रक निघालं
Donald Trump : दोस्तासाठी काय पण! डोनाल्ड ट्रम्प सरकारमध्ये एलाॅन मस्क आणि विवेक रामास्वामींना मोठी जबाबदारी; टीव्ही अँकर संरक्षण मंत्री होणार!
दोस्तासाठी काय पण! डोनाल्ड ट्रम्प सरकारमध्ये एलाॅन मस्क आणि विवेक रामास्वामींना मोठी जबाबदारी; टीव्ही अँकर संरक्षण मंत्री होणार!
Embed widget