एक्स्प्लोर

BLOG : शूटचा गोंधळ ते पोटात गडबड, जय वीरू - पडद्या मागची कहाणी! (भाग 1)

BLOG : फेब्रुवारी महिन्याचा शेवटचा आठवडा सुरु होता आणि सेकंड शिफ्टला काम करत होतो. इतक्यात आमच्या सरांनी आवाज दिला आणि मला बोलावून घेतलं. कामासंदर्भात चर्चा होत असताना अचानक मला त्यांनी विचारलं, "चॅनल लोकसभेसाठी एक शो करणार आहे...तूला काम करायचंय का?". खरं सांगायचं तर आमच्या क्षेत्रात अशी संधी मिळणं म्हणजे थेट ब्रह्मदेव पावला असंच समजायचं. मी एका क्षणाचाही विलंब न करता होकार दिला. मनात खूप धाकधूक होती... मी करू शकेन असा विश्वास मलाच नव्हता. त्यात ऑफिसमध्ये अनेक मित्र असे आहेत ज्यांनी हे माझ्यापेक्षा कितीतरी पटीने चांगलं केलं असतं. त्यामुळे या सगळ्याची जाणीव होतीच, पण तरी ही संधी समोरून आली होती, सोडली असती तर आयुष्यभर  असतो. बरं, आता मिळतं ते सरळ आणि सोपं कसं मिळेल? दोन दिवसांनी राजीव सर आणि सरीता मॅम यांच्यासोबत मिटिंग आहे असं कळवलं. नेमकं दोन दिवसांनी माझ्या मामाचं दहावं होतं. कार्य करताना भाचा लागतोच. पण आईच म्हणाली "...मिटींगला जा, संधी पुन्हा मिळत नाही". 

मीटिंग झाली आणि ठरलं. मतदारसंघाच्या शोधात जय वीरु! मी आणि माझा सहकारी सिद्धेश ताकवले शोले सिनेमातील जय वीरूचं पात्र साकारणार होतो. दोघांनाही लोकसभा लढवायची असल्याने महाराष्ट्रभर मतदारसंघ फिरणार, लोकांशी आणि नेत्यांशी चर्चा करून आढावा घेणार आणि मतदारसंघ निवडणार. आठवड्याभरात निघायचं ठरलं, पण इतकं सोपं असतं का? सगळं झालं पण शोलेमधील बाईक म्हणजेच बुलेट आणि साईडकार काही सापडेना. बुलेट सापडली पण साईडकारचं काही होईना. सगळेच कामाला लागले होते. 

शोधून इतके कंटाळलो की सर म्हणाले, "साईडकार भाड्याने मिळत नसेल तर विकत घेऊ". विकत घायची ठरलं तर वेटिंग 25 दिवसांचं त्यामुळे पुन्हा भाडेतत्वावर घ्यायचं ठरलं. अखेर 10-12 दिवसांनी ऐरोलीतील रबाळा येथे एक डीलर सापडला. बाईक आणि साईडकार फायनल झाली. मनीष पांडे सरांनी आम्हाला फक्त एकदा ही बाईक बघून यायला सांगितलं आणि आम्ही रबाळ्याला पोहोचलो. बाईक आणि साईडकार पाहून जो काही आनंद गगनात मावेना झाला होता तो ती बाईक चालवताना थेट पाताळात गेला. बुलेट चालवणं फार अवघड नाही पण साईडकारसोबत ती बुलेटी चालवणं ना मला जमत होत ना सिद्धेशला. आता हे कुठे ऑफिसमध्ये सांगून स्वतःची फजिती करून घेणार म्हटलं आणि दोघेही शांत राहिलो. प्रॅक्टिस करून चालवू असं ठरलं. 

अनेक दिवसांची प्रतीक्षा संपली आणि कार्यक्रम सुरु करण्याचा दिवस उजाडला. 16 मार्च 2004, शनिवार. दुपारीच ऑफिसला आलो बाईकसोबतचा प्रोमो शूट केला आणि संध्याकाळी मी, सिद्धेश, विनोद घाटगे, अजित कदम आणि अनिल संगरे असे सगळे पुण्याला निघालो. निघायला फार उशीर झाला होता त्यामुळे मुंबईच्या बाहेर पडून जेवण करण्याचं ठरलं. रात्री 1 वाजता लोणावळ्यात पोहोचलो अर्धातास फिरल्यानंतर एक हॉटेल दिसलं तेही बंद झालं होतं. पोटात कावळे किंचाळू लागले होते. हॉटेलच्या मॅनेजरला ही आमच्याकडे पाहून दया आली असावी, तो म्हणाला, "ठीक हैं बैठो..." पोटभर जेवलो आणि पुढे निघालो. रात्री 3च्या सुमारास आम्ही पुण्यात पोहोचलो. पुण्यात आमचं पाहिलं शूट ठरलं होतं. रात्री राहण्यासाठी बुक केलेल्या हॉटेलची दारं बंद होती... जरा जोरात वाजवलं तर  मॅनेजर उठला... दार उघडताच तो अस्सल पुणेकर असल्याचं त्याने दाखवून दिलं आणि म्हणाला, "...लवकर आलात तुम्ही". पुण्यात पोहोचल्याचं जणू सर्टिफिकेट मिळालं आम्हाला.   

रात्री निवांत झोपलो आणि सकाळी शूटला निघालो. आम्ही INNOVA घेऊन पुढे आलो होतो. आमची जय वीरूची बाईक सकाळी पोहोचणार होती. आता अनेकांना प्रश्न पडला होता की ती बाईक आम्ही ट्रान्सपोर्टने घेऊन जातो जिल्ह्या-जिल्ह्यात. खरं तर तसं नसून बाईक ही बायरोड चालवत घेऊन जाण्यात आली. त्यासाठी मुंबईहून रियाझ परमार नावाचा एक खास रायडर आम्ही घेतला होता. खरं तर रियाज चाचांचं वय 52 आणि त्यात रमजानचा महिना असल्याने रोजा. त्यातही त्या माणसाने आमच्या innova च्या मागून ज्याप्रकारे ती बाईक चालवली ते अद्भूत होतं. रियाझ चाचांच्या इफ्तारीची वेळ झाली की आम्ही सगळे आहोत तिथेच थांबायचो.. शहर असो वा जंगल, सर्वांनी सहकार्य केलं. 

बरं, आता पहिल्या दिवशीच आमची दमछाक उडाली. पुणे चांगलंच तापलं होतं. त्यात वसंत मोरेंना घेऊन आम्ही भर दुपारी कसबा आणि लक्ष्मी रोडवर फिरलो. वर सूर्य तळपत होता आणि खाली आमची बाईक. इंजिन गरम झालं होतं. तात्या स्वतः म्हणाले... वाफा मारतायत! इंटरव्हूव दरम्यान फार मजा आली. एकंदरीतच वसंत मोरे काय रसायन आहे हे उलगडायची फार इच्छा होती. आपल्या हाती काहीही नसतानाही प्रचंड आत्मविश्वास कसा काय असू शकतो याचं उत्तर त्या भेटीत समजलं. आम्ही जवळपास 25 नेत्यांना भेटलो पण मोरेंना भेटण्यासाठी जी गर्दी झाली होती ती कुठेच आणि कुणासाठी हि पहिली नाही. गर्दीत सामान्य माणूस होता, कार्यकर्ता नाही. 

शूट झालं आणि आम्ही थेट गाठलं ते पुण्यातील संदीप हॉटेल! रविवार होता. एक फुल मटण हंडी मागवली आणि पोरांनी पार धुरळा उडवला. असं मटण मी आयुष्यात खाल्ल नव्हतं, मटणाच्या फोडीला बोट जरी लावलं तरी ते हाडापासून वेगळं व्हायचं.. इतकं मऊ. संदीप हॉटेलचे मालक हे मूळ अहमदनगरचे. बोकड शिजवायला त्यांनी खास माणसं ठेवली आहेत आणि त्यात ती मुलं  इतकी परफेक्ट होती. असंही म्हणतात की जेवणासाठी लागणारं पाणी हे नगरहून आणलं जातं. असो, किती तथ्य आहे माहित नाही पण मजा आली. बरं, काम संपलं नव्हतं आणि आता वाढणारही होतं. जेवण होताच गाठल्या पुण्यातील पेठा. लोकांच्या प्रतिक्रिया घेताना फार मजा आली आणि पुणेकर तो पुणेकर. एक उत्तर कुणी सरळ दिलं नाही. त्यात दोन-चार वेळा आम्हीच ट्रोल झालो. दिवस पहिला आवरता घेतला आणि थेट गाठलं सिद्धेशचं घर. 

गावरान चिकन आणि इंद्रायणी भात खाऊन पुन्हा हॉटेलवर आलो. झोप लागत नव्हती कारण आमचे करताकरवीते विनोद घाटगे मुंबईला या माघारी निघाले होते. पुढचं शूट आम्हालाच करायचं होतं. कार्यक्रम सोमवारपासून TV वर दाखवणार होतो. त्यामुळे वसंत मोरेंचा एपिसोड ऍडव्हान्समध्ये शूट केला होता, चिंता नव्हती. दुसऱ्या दिवशी सकाळी रवींद्र धंगेकर भेटणार होते. सकाळ झाली आणि धंगेकरांना फोन केला , "ते म्हणाले, पोहोचतोय." आम्ही वाडेश्वरला भेटायचं ठरवलं. 12 दरम्यान धंगेकर आले आणि येताच धक्का दिला. म्हणाले, "आपण उद्या शूट करू... ". आम्ही कन्व्हिन्स करण्याचे तुफान प्रयत्न केले पण गडी काही ऐकेना. तेवढ्यात वाडेश्वरला आमचा मिक्की आला. मिक्कीने समजूत काढली आणि संध्याकाळी 5 वाजताची वेळ ठरली. वैद्य उपहार गृहातून सुरुवात करायचं ठरलं. दुपारी गिरीजाला शेवभाजी, पिठलं आणि मस्त आमरस चपाती खाल्ली आणि 5 वाजता वैद्य उपहार गृहाच्या दारात पोहोचलो. बघतो तर काय, हॉटेल बंद आणि धंगेकरांचा फोन सुद्धा. 

पुन्हा मिकीला फोन केला आणि मॅटर सांगितलं. पुन्हा वेळ बदलली आणि सकाळी पुढच्या दिवशी सकाळी आठची वेळ ठरली. इंटरव्हूव मिळतोय हेच त्यावेळी महत्वाचं होतं...आमचा जीव भांड्यात पडला. पण रात्री 9 च्या सुमारास पुन्हा सगळं फिस्कटलं. रवींद्र धंगेकर मुंबईला रवाना झाले. मुरलीधर मोहोळ यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न सुरूच होते पण ते ही काही तयार होईनात. उद्या सकाळी शूट झालं नसतं तर संध्याकाळी एपिसोड गेला नसता आणि दुसऱ्याच दिवशी ही नामुष्की आमच्यासाठी अर्थात योग्य नव्हती. आता कुणीच नाही तर रात्री 11 वाजता मनसे नेते साईनाथ बाबर यांना फोन केला. ते एका फटक्यात तयार झाले आणि सकाळी नऊची वेळ दिली. एकंदरीत दोन दिवसाचे अनुभव पाहता जो पर्यंत नेता साईडकारमध्ये बसत नाही तोपर्यंत रिलॅक्स व्हायचं नाही असंच मनाशी ठरवलं होतं. 

सकाळी 6 वाजता फोन वाजला...साईनाथ बाबर Calling! उचलता उचलता कट झाला. मी पुन्हा केला...त्यांनी एका फटक्यात उचलला...म्हणाले, "संकेत, मला जमणार नाही.. पक्षादेश आहे की सध्या कुठे बोलायचं नाहीये". मी म्हटलं ओक आणि फोन ठेऊन सगळ्यात पाहिलं टीमला उठवलं. काही तरी करावं लागेल या विचाराने बाहेर पडलो. सकाळी 10 वाजले तरी काहीच होईना. 10.30 ला सिद्धेशने अंकुश काकडेंना फोन केला आणि ते सुद्धा एका फटक्यात तयार झाले. महत्वाचं म्हणजे ते आले! वाडेश्वरला 40 मिनिटं शूट केलं आणि सुटकेचा निश्वास सोडला. 

या शूट दरम्यान मी मुंबई ऑफिसला भारती मॅम यांना लाईव्ह युनिटसाठी फोन केला होता आणि त्यावेळी त्यांनी मला सुषमा अंधारे यांना फोन करण्याचा सल्ला दिला होता. त्यामुळे अंकुश सरांच्या मुलाखतीनंतर सुषमा अंधारे यांना फोन केला. त्या देखील तयार झाल्या. 15 मिनिटांनी मला पुन्हा फोन केला आणि विचारलं, रुपालीला आणू का? मी म्हटलं चाकणकर? त्या म्हणाल्या नाही. रुपाली ठोंबरे पाटील. माझा एकंदरीत सायलन्स पाहून त्या स्वतः म्हणाल्या, समोरच्या पक्षात असलो तरी खास मत्रिणी आहोत! पुढे त्या दोघींना आम्ही भेटलो आणि शूट झालं. 5 वाजता एपिसोड TV वर जाणार होता... 4.45 वाजता आम्ही शेवटचं फुटेज पाठवलं. दिवस भयंकर होता पण त्याच दिवशीचं सुषमा अंधारे - रुपाली पाटलांचा एपिसोड सर्वाधिक गाजला आणि मतदारसंघाच्या शोधात जय वीरू हा शो पहिल्यांदा खऱ्या अर्थाने घराघरात पोहोचला.       

सुषमा अंधारे - रुपाली पाटलांचं शूट पॅकअप केलं. हॉटेल वर पोहोचलो, बॅगा उचलल्या आणि थेट निघालो पुढच्या मतदारसंघात. शिरूर लोकसभा मतदारसंघ! रात्री 11 च्या सुमारास मंचरला पोहोचलो. एका रेस्टॉरंटबाहेर गाडी थांबली. इतकं काही भारी नव्हतं रेस्टॉरंट, पण यानंतर काही मिळेल असं वाटत नव्हतं म्हणून तिथेच जेवलो. पुढे हॉटेलवर जाऊन थेट झोपी गेलो. पहाटे जाग आली. हाथ पाय थरथरत होते, अंग दुखत होतं... पोटात दुखत होतं...वॉशरूमला गेलो फ्रेश झालो. जुलाब झाले होते... देवाला म्हटलं.. आता आजारी नको पाडूस. मी काही परत मुंबईला इतक्यात जाणार नाही. गोळी खाल्ली आणि पुन्हा झोपलो. 

सकाळी 7 ला उठलो...आता बरं वाटलं होतं पण जुलाब काही थांबेना. मी पहिल्यांदा मंचर, शिरूर हा भाग फिरत होतो. पाहीन ते नवलच होतं. पण सर्वात नवल वाटलं ते म्हणजे मंचरसारख्या ग्रामीण भागातील हॉटेल्समध्ये काम करणारी मुलं. मी हॉटेलमध्ये गेलो की थेट गप्पा मारायला सुरु करायचो आणि किचन गाठायचो. सकाळी ब्रेकफस्टसाठी गेलो होतो त्या हॉटेलमध्ये काम करणारी मुलं ही चक्क नेपाळ आणि पश्चिम बंगालमधून आली होती. दुपारच्या रेस्टॉरन्टमध्ये जेवलो तिथेही तसंच. प्रश्न हा पडला होता परप्रांतियांचा लोंढा मुंबई सोडून या दिशेने कुठे? तर त्याचं उत्तर असं मिळालं की आता काम करणारी मुलं आहेत, त्यांच्या गावातील काही लोक 20-25 वर्षांपूर्वी महाराष्ट्रात आली. मुंबई परवडलं नाही म्हणून पुणे आणि पुणेही परवडलं नाही म्हणून पुणे ग्रामीण गाठलं तेव्हापासून ते इथेच आणि आता काम करणाऱ्या मुलांना तेव्हा आलेल्या लोकांनीच आणलं. महत्वाचं म्हणजे, काही नेपाळी मुलांना मराठी बोलता येत होतं. 

ब्रेकफस्ट झाल्यानंतर थेट पोहोचलो शिवाजीराव आढळराव पाटलांच्या घरी.. सॉरी...महालात! त्यांचं घर पाहून आम्ही हरवून गेलो होतो. आढळरावांनी बाईकमध्ये बसण्यास नकार दिला पण म्हणाले तुम्हाला माझ्या कारमधून माझं गाव फिरवतो. म्हटलं चालेल... आधी शाळा...नंतर बाग...त्यानंतर सभागृह आणि शेवटी स्थानिक मुलांसाठी उभारलेल्या क्रिकेट स्टेडियमवर घेऊन गेले. आढळरावांनी उभारलेलं विश्व हे साध्यासुध्या माणसाचं काम नाही. शाळेत मुलं यावी म्हणून त्यांनी 50 स्कुल बसेस ठेवल्या आहेत. गावातील मुलांनी  क्रिकेट खेळावं म्हणूनं स्टेडियम बांधलं. अर्थात ही सोर्स ऑफ इन्कमची साधनं आहेत, हे सर्व ते शहरी भागात उभं करून तुफान पैसे कमावू शकले असते. पण त्यांनी पहिली पसंती आपल्या गावाला दिली. आढळरावांचा इंटरव्हूव चांगला झाला, पण त्यात एक महत्वाची गोष्ट आम्हाला समजली ती म्हणजे आढळरावांचं विश्व हे मोठं आहे. जिथे एक भारतीय फक्त जगण्याचं स्वप्न पाहतो अशा अमेरिकेत त्यांचा व्यवसाय आहे, स्वतःचं घर आहे. आढळराव सेमिकंडक्टरचं उत्पादन करतात आणि NASA सारखी बलाढ्य संस्थाही त्यांची क्लायंट आहे. राजकारणापलीकडे जाऊन आपण या माणसाचा अभिमान हा बाळगायलाच हवा. 

पुढे शिरूरचं शूट आटपून पुन्हा पुण्याला आलो. पुण्याला आलो कारण संभ्रमात होतो. पुढचा इंटरव्हूव लाईनअप नव्हता. सुप्रिया सुळे - रोहित पवार - युगेंद्र पवार तयार होते पण बारामती आणि पुण्यात कुणीच नव्हतं. आमचे सतत कॉल सुरु होते पण वेळ आणि ठिकाण काही जमेना. यावेळी आमच्यासोबत रवींद्र धंगेकर पार्ट 2 झाला तो विजय शिवतारेंमुळे. आम्ही निघालो त्यावेळी शिवतारेंनी महायुतीत टेन्शन वाढवलं होतं त्यामुळे ते फार उघड उघड मीडियाशी बोलत होते. त्यातपण आमच्या मिक्कीने इंटरव्हिए अरेंज करून दिला होता. पुढच्या दिवशी सकाळी 8 वाजता VIP गेस्ट हाऊसवर आम्ही वेळेत पोहोचलो.. शून्य मिनिटं थांबलो आणि समजलं विजय शिवतारे सासवडला आहेत. सासवडला त्यांची स्थानिक बैठक होती. पुन्हा त्यांना कॉल केला. त्यांच्या सहकाऱ्यांशी बोलणं झालं. ते म्हणाले , मुंबईला अर्जंट मिटिंग आहे.. साहेब ठरावतायत थांबायचं की जायचं... तुम्ही हडपसरला येऊन थांबा. 

सकाळचे 10 वाजले होते. ना चहा झाला होता...ना नाश्ता. आम्ही 40 मिनिटं भर रस्त्यात थांबून वाट पहिली... शिवतारेंनी नकार दिला. सुप्रिया सुळे भोरला होत्या. पोहोचलो असतो पण दौरा सुरु असल्याने त्या वेळ देतील का हा प्रश्न होता. संध्याकाळी 5 वाजता एपिसोड जाणार होता त्यामुळे आम्ही आज नेता न गाठता थेट जनतेशी संवाद साधायचं ठरवलं आणि सासवड गाठलं. लोकांशी गप्पा मारल्या... शिवतारेंचा  इलाखा होता त्यामुळे सर्वच लोक त्यांच्याबाजूने होते. म्हटलं, आता एकदा बारामती जवळ जाऊन बघू ती लोकं काय म्हणतायत. 

त्या दिवशी दुपारचं जेवण स्किप झालं पण दूध रसाचे दोन ग्लास प्यायलो आणि पोट भरलं. मुंबईत आपण उसाचा रस पितो, पण सासवडला उसाचा रस आणि दूध असं मिक्स करून मिळतं.. भन्नाट लागतं! पुढे मोरगावला पोहोचलो आणि पुन्हा लोकांशी संवाद साधला. इथे आम्हाला पवार समर्थक मिळाले पण काही मात्र नाराज होते. मोरगावच्या बाप्पाचं दर्शन घेतलं, सगळं फुटेज पाठवलं आणि पोटपूजा करायचं ठरवलं. सर्वांनीच 3-4 वडापाव हाणले आणि नीरेच्या काठी मस्त वाफाळता चहा घेतला. दिवस अंगावर आला होता. एपिसोड गेला पण नेता सापडला नाही यांचं दुःख होतं. शूट फसलं होतं... थोडं का होई ना अपयश आलं होतं. अपयशाला राम राम ठोकला आणि थेट सातारच्या दिशेनं निघालो.  
 
साताऱ्याच्या दिशेनं जाताना सालपे घाट लागला आणि 6 वाजून 45 मिनिट झाली. रियाझ चाचांच्या रोजाची वेळ. दोन्ही गाड्या कडेला लावल्या आणि खाली उतरलो. मी गाणं ऐकलं होतं..राखट देशा..कणखर देशा...दगडांच्या देशा...ते सर्व मी त्या दिवशी त्या घाटात पाहिलं. समोर जे काही होतं ते अद्भुत होतं.. इतरांसाठी ते नॉर्मल असेल पण मी कधीच नव्हतं पाहिलं.

रात्री नऊ दरम्यान साताऱ्यात पोहोचलो. जगात फेमस असलेल्या प्रांजली रेस्टॉरंटमध्ये गेलो. मी व्हेज खायचं ठरवलं आणि अस्सल मराठमोळी थाळी माझ्यासमोर आली. पिठलं, भिर्ड, चार प्रकारच्या चटण्या आणि बाजरीची भाकरी. मस्त ताव मारला आणि पुन्हा हॉटेलवर जाऊन झोपलो. साताऱ्यात राजे नव्हते त्यामुळे इंटरव्हूव  कुणाचा घायचा हा प्रश्न होताच. पण आम्ही टेन्शन फ्री होतो कारण आमच्या मदतीला होते आमचे साताऱ्याचे प्रतिनिधी राहुल तपासे! राहुल सर सकाळी 9 वाजता चंद्रविलास हॉटेलला भेटले. मस्त नाश्ता केला आणि थेट पोहोचलो उदयनराजेंच्या घरी. अर्थात राजे नव्हते पण त्यांच्या घरातील परिसरात शूट करता आलं. तो क्षण आमच्यासाठी ऐतिहासिक होता. तिथून निघालो आणि थेट पोहोचलो राजवाडा परिसरात, लोकांशी गप्पा मारल्या, कल जाणून घेतला आणि पुन्हा पुढे निघालो. 

पोवई नाक्यावर काही लोकं भेटली, त्यांच्याशी संवाद साधला आणि तेवढ्यात तिथे आले शिवसेनेचे जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम जाधव. पुरुषोत्तम जाधव लोकसभेसाठी इच्छुक होते, म्हटलं तुम्हीच बसा बाईकवर. त्यांना घेऊन पुन्हा मार्केटमध्ये गेलो. सातारकरांच्या नजरा फक्त आमच्यावर होत्या.. आमच्यावर म्हणजे आमच्या बाईक वर. साताऱ्यात बाईक चालवण्याचा जो फील आला तो कुठेच नाही आला. सातारा शहराला लाभलेला इतिहास तिथे गेल्यावर जाणवतो. त्या इतिहासाची जान लोकांनासुद्धा आहे हे दिसतं. राजेंप्रती प्रेम आणि आदरही खूप आहे. अनेक लोक भेटली जी राजेंवर तशी नाराज होती, पण कॅमेऱ्यावर बोलायला तयार नाहीत. त्यांना राजेंची भीती वाटत नाही पण आम्ही चारचौघात राजेंवर टीका करणं योग्य नाही ही भावना त्यांच्या मनात होती. 

पुढे शूट संपल्यानंतर राहुल सर आम्हाला त्यांच्या साम्राज्यात घेऊन गेले. त्यांच्या कार्यालयात गेलो आणि स्तब्ध झालो. त्यांनी काढलेल्या पेंटिंग्स पाहून डोळ्यांचं पारणं फेडलं. जवळपास 30 वर्षांपूर्वी त्यांनी मुंबईच्या जे जे स्कुल ऑफ आर्टस्मधून डिग्री घेतली होती. मुंबईच्या धारावीत काम केलं, पण मन साताऱ्यात असल्याने पुन्हा माघारी आले. राहुल तपासे म्हणजे हाडाचा कलाकार, पण ते पत्रकारितेत कसे आले याची स्टोरी आपण कधी त्यांना भेटलात की विचारा... ते उत्तम सांगू शकतात... त्या कहाणीला मी माझ्या फाटक्या शब्दांमधून न्याय देऊ शकत नाही.

सूर्य डोक्यावर येऊन दोन तास झाले होते. दुपारचं जेवणही राहिलं होतं. एका मैत्रिणीचे छान हॉटेल सजेस्ट केलं होतं पण Hotel Surve's पाहिलं आणि पुण्यात अर्धवट राहिलेलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी सहकाऱ्यांनी गाडी तिथेच थांबवली. पुन्हा मटण हाणलं, 5-6 वाट्या रस्सा प्यायलो आणि बाहेर पडलो. मला मंचरला सुरु झालेले जुलाब अजूनही थांबलेला नव्हता. वॉशरूम दिसेल तिथे माझा कार्यक्रम सुरूच होता. 

आता साताऱ्यातून खरं तर सांगलीला जाणंच योग्य ठरलं असतं आणि तिथे पुढे कोल्हापूर. पण असं करताना कोकण मात्र चुकत होतं. कोल्हापुरातून सिंधुदुर्गात उतरलो असतो पण ते उलटच पडलं असतं. म्हणून मग साताऱ्यातून रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग करत कोल्हापूर गाठायचं ठरलं. दोन्ही गाड्या सज्ज होत्या... आमचं पोट भरलं होतं... आता गाड्यांच्याही पोटात पेट्रोल नावाचा रस्सा ओतला आणि प्रवास सुरु झाला रत्नागिरीच्या दिशेने...

पुढची कहाणी... भाग दोन मध्ये

अधिक पाहा..

ओपिनियन

Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

'...तर मोदी तुम्ही पंतप्रधान बनलेच नसते'; मल्लिकार्जुन खरगेंची धुळ्यातून जोरदार टीका
'...तर मोदी तुम्ही पंतप्रधान बनलेच नसते'; मल्लिकार्जुन खरगेंची धुळ्यातून जोरदार टीका
काय होतास तू, काय झालास तू, अरे...; फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर बाण, राऊतांनाही म्हणाले पोपटलाल
काय होतास तू, काय झालास तू, अरे...; फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर बाण, राऊतांनाही म्हणाले पोपटलाल
''26/11 च्या हल्ल्यात पाकिस्तानचा हात होता, हे मी फक्त देवेंद्र फडणवीसांमुळेच सिद्ध करू शकलो''
''26/11 च्या हल्ल्यात पाकिस्तानचा हात होता, हे मी फक्त देवेंद्र फडणवीसांमुळेच सिद्ध करू शकलो''
महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र अन् सोनं काढण्याचं काम पंतप्रधान करतात, हे दुर्दैवी; पवारांचा घणाघात
महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र अन् सोनं काढण्याचं काम पंतप्रधान करतात, हे दुर्दैवी; पवारांचा घणाघात
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Raj Thackeray on Shivsena Stage Thane  : 19 वर्षांनी राज ठाकरेंचं शिवसेनेच्या मंचावर पहिलं पाऊल....Raj Thackeray Thane Speech : शिवसेनेचा मंच, बाळासाहेबांची स्टाईल! राज ठाकरेंकडून भाषणाची सरुवात कशी?Vare Nivadnukiche Superfast News 08 PM: लोकसभा निवडणुकीच्या बातम्या: वारे निवडणुकीचे : 12 May 2024TOP 100 Headlines  टॉप 100 हेडलाईन्स बातम्या : 08 PM : 12 May 2024  ABP Majha

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'...तर मोदी तुम्ही पंतप्रधान बनलेच नसते'; मल्लिकार्जुन खरगेंची धुळ्यातून जोरदार टीका
'...तर मोदी तुम्ही पंतप्रधान बनलेच नसते'; मल्लिकार्जुन खरगेंची धुळ्यातून जोरदार टीका
काय होतास तू, काय झालास तू, अरे...; फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर बाण, राऊतांनाही म्हणाले पोपटलाल
काय होतास तू, काय झालास तू, अरे...; फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर बाण, राऊतांनाही म्हणाले पोपटलाल
''26/11 च्या हल्ल्यात पाकिस्तानचा हात होता, हे मी फक्त देवेंद्र फडणवीसांमुळेच सिद्ध करू शकलो''
''26/11 च्या हल्ल्यात पाकिस्तानचा हात होता, हे मी फक्त देवेंद्र फडणवीसांमुळेच सिद्ध करू शकलो''
महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र अन् सोनं काढण्याचं काम पंतप्रधान करतात, हे दुर्दैवी; पवारांचा घणाघात
महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र अन् सोनं काढण्याचं काम पंतप्रधान करतात, हे दुर्दैवी; पवारांचा घणाघात
अज्ञात डंपरच्या धडकेत भाजप नेत्याचा मृत्यू; जवळचा मित्र गेल्याने माजी मुख्यमंत्र्यांना दु:ख
अज्ञात डंपरच्या धडकेत भाजप नेत्याचा मृत्यू; जवळचा मित्र गेल्याने माजी मुख्यमंत्र्यांना दु:ख
तुम्ही स्वत:ला काय समजता, राजकारणी आहात की गावगुंड; अजित पवारांच्या धमक्यांवरुन दमानियांचा संताप
तुम्ही स्वत:ला काय समजता, राजकारणी आहात की गावगुंड; अजित पवारांच्या धमक्यांवरुन दमानियांचा संताप
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 मे 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 मे 2024 | रविवार
'ओऽऽऽ सर्वज्ञानी संजय राऊत, देवेंद्रजींना उपचार शिकवायला तुमच्यासारख्या कंपाऊंडरची गरज नाही'; चित्रा वाघ यांचं जोरदार प्रत्युत्तर
'ओऽऽऽ सर्वज्ञानी संजय राऊत, देवेंद्रजींना उपचार शिकवायला तुमच्यासारख्या कंपाऊंडरची गरज नाही'; चित्रा वाघ यांचं जोरदार प्रत्युत्तर
Embed widget