Bhaskar Jadhav and Nitesh Rane: सभागृहात चिडायचं नसतं, इथे ते चालत नाही, त्यासाठी बाहेर मैदान मोकळं आहे; भास्कर जाधवांनी नितेश राणेंना डिवचलं
Bhaskar Jadhav and Nitesh Rane: भास्कर जाधव यांनी सभागृहात कोकणातील मासेमारीच्या समस्येसंदर्भात एक प्रश्न उपस्थित केला. त्यावर मंत्री नितेश राणेंनी प्रत्युत्तर दिले.

Bhaskar Jadhav & Nitesh Rane: सभागृहात एखादा प्रश्न विचारला म्हणून चिडायचे नसते. त्यासाठी बाहेर मैदान मोकळे आहे. पण सभागृहात ती गोष्ट चालत नाही, अशा शब्दांत ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी राज्याचे मत्स्योद्योग मंत्री नितेश राणे (Nitesh Rane) यांना डिवचले. शनिवारी विधानसभेत प्रश्नोत्तराचा त्रास सुरु होता. त्यावेळी भास्कर जाधव यांनी कोकणातील (Konkan news) समुद्रात परराज्यातील अवैध बोटींकडून मासेमारी होत असल्याचा मुद्दा उपस्थित केला. यावरुन भास्कर जाधव यांनी मत्स्योद्योग खात्याचे मंत्री असलेल्या नितेश राणे यांना प्रश्न विचारले. (Maharashtra Vidhansabha Winter session 2025)
मंत्रीमहोदयांनी माझा प्रश्न वाचला की नाही, मला डाऊट आहे. माझ्या शेवटच्या प्रश्नाचं उत्तर द्या, तुम्ही याबद्दल तुमच्या खात्याला जाब विचारला पाहिजे. त्यांच्या खात्याने एका प्रश्नाच्या उत्तरात, 'महाराष्ट्र सागरी मासेमारी अधिनियमन 1981 सुधारित 2021 नुसार रत्नागिरीत 9 आणि सिंधुदुर्गात 19 अशा परराज्यातील नौकांवर', असा उल्लेख केला आहे. यामधून रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग हे दोन्ही जिल्हे परराज्यात आहेत, असा अर्थ ध्वनित होतो. त्यामुळे तुमच्या खात्याने यामध्ये सुधारणा करुन घ्यावी. लगेच चिडू नका. चिडायला बाहेर मैदान मोकळं आहे, इथे ते चालत नाही. आम्ही पण चिडण्यात कमी नाही. परराज्यातील बोटी येऊन कोकणातील समुद्रात मोठ्याप्रमाणावर मासेमारी करतात, हा चिंतेचा मुद्दा आहे, असे भास्कर जाधव यांनी म्हटले. आपल्याकडे गस्तीसाठी केंद्राच्या 4 आणि राज्याच्या 4 अशा आठ स्पीड बोटी आहेत. पण या सगळ्या स्पीड बोट सध्याच्या घडीला बंद आहेत. बाहेरच्या बोटी या 400 ते 500 हॉर्सपॉवरच्या असतात. त्यांना पकडणे कठीण असते. त्यामुळे केंद्राच्या आणि राज्याच्या 8 स्पीड बोटी तातडीने सुरु कराव्यात, असेही भास्कर जाधव यांनी सांगितले.
यानंतर नितेश राणे हे उत्तर देण्यासाठी उभे राहिले. तेव्हा त्यांनी म्हटले की, चिडणे आणि या प्रश्नाचा काही संबंध नाही. फक्त सगळ्या गोष्टी 2014 पूर्वीच झाल्या, असे म्हणू नये. परत परत मीच केले असं व्हायला नको. परराज्यातल्या बोटी येतात आणि आपले मासे घेवून जातात. आपल्या गस्ती नौका या लाकडी आहेत. परराज्यातल्या बोटीवाल्यांकडे हत्यारेही असतात व हल्ले करतात. 15 स्टिलच्या गस्ती नौका मागवत आहोत. ड्रोनद्वारेही लक्ष ठेवले जाईल. माझ्या खात्याचे 100 टक्के अधिकारी प्रामाणिक आहेत असे नाही, असे नितेश राणे यांनी म्हटले.
आणखी वाचा























