BLOG : नवरात्री विशेष | भाग 3 : सरला शर्मा – आकाश जिंकणारी पहिली भारतीय महिला

BLOG : आपल्या समाजातील ज्या स्त्रियांनी परंपरेच्या चौकटी फोडून मार्ग दाखवला, त्यांची आठवण म्हणून नवरात्रीच्या निमित्तानं नऊ दिवस नऊ प्रेरणादायी कथा. आजच्या भागात अशाच एका अद्वितीय व्यक्तिमत्त्वाची कथा, सरला शर्मा म्हणजेच सरला ठकराल यांची – भारताच्या पहिल्या महिला वैमानिक.
स्वप्नांना प्रयत्नांचे पंख
1914 मध्ये दिल्लीत जन्मलेल्या सरला शर्मा ही सामान्य घरातील पण विलक्षण आत्मविश्वास असलेली मुलगी होती. लहानपणापासूनच त्यांना आकाशात झेपावणाऱ्या पक्ष्यांचं आकर्षण होतं. त्या काळात मुलींना शिक्षण आणि करिअर या बाबी स्वप्नवत होत्या, पण सरला यांची स्वप्नं वेगळीच होती, ती होती आकाशाला गवसणी घालायची.
लग्नानंतर त्यांच्या पतीने त्यांना या स्वप्नाला पाठिंबा दिला. सरला यांनी वैमानिक होण्यासाठी प्रशिक्षण घेण्याचा निर्णय घेतला. हे पाऊलच त्या काळात क्रांतिकारी होतं, कारण विमान उडवणं ही गोष्ट फक्त पुरुषांचीच मानली जात होती.
आकाशाकडे पहिली झेप
1936 साल. सरला केवळ 21 वर्षांच्या होत्या, जेव्हा त्यांनी पायलट परवाना मिळवला. त्या दिवशी त्यांनी पांढरी साडी, पायलटचे गॉगल्स आणि अढळ आत्मविश्वास यासह त्या विमानात बसल्या होत्या. संपूर्ण दिल्लीनं आणि नंतर संपूर्ण भारतानं एका तरुणीला विमान आकाशात उडवताना पाहिले. हा क्षण भारतीय विमानवाहतुकीच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिला गेला.
सरला ठकराल या फक्त पहिल्या महिला वैमानिक ठरल्या नाहीत, तर स्त्रियांच्या मनातील भीती आणि समाजातील बंधने दूर करणारा तो क्षण ठरला. त्यांच्या या धाडसी कृतीनं संपूर्ण भारतातील स्त्रियांसाठी नवं दार उघडलं
आयुष्यातलं आव्हान
परंतु आयुष्य नेहमी साधं सरळ नसतं. पायलट झाल्यानंतर काही वर्षांतच त्यांच्या पतीचा अपघाती मृत्यू झाला. घरची जबाबदारी वाढली, आणि आकाशात झेपावण्याचं स्वप्न थांबवावं लागलं. पण सरला हार मानणाऱ्या नव्हत्या. त्यांनी स्वतःला एका नवीन दिशेकडे वळवलं. पेंटिंग, हस्तकला, वस्त्रनिर्मिती या क्षेत्रांत त्यांनी पाऊल ठेवलं आणि यशही संपादित केलं त्यांनी दाखवून दिलं की स्वप्नं तुटली तरी आयुष्य संपत नाही. नवीन वाट शोधली तर यश मिळवता येतं.
सरला शर्मा या नवरात्रीच्या चंद्रघंटा देवीच्या रूपाचं प्रतीक वाटतात. चंद्रघंटा म्हणजे धैर्य आणि निर्भयता. अगदी तसाच धैर्याचा परिचय सरला यांनी १९३६ मध्ये विमान चालवून दिला.
त्यांची कथा आपल्याला शिकवते – समाजातील परंपरा आणि बंधने आपली स्वप्ने रोखू शकत नाहीत. स्त्रीला संधी आणि पाठिंबा मिळाला तर ती आकाशही जिंकू शकते. अपयशानंतर नवे मार्ग निवडले तरी जीवनात अर्थ निर्माण करता येतो.
प्रेरणा
सरला शर्मा म्हणजे भारतीय स्त्रीशक्तीचा उज्ज्वल चेहरा. त्यांच्या कहाणीमुळे आजच्या तरुणींना हे धडे मिळतात की, “तुमच्याकडे धैर्य आणि स्वप्न असेल तर मार्ग स्वतः तयार होतो.” नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी ही कथा आठवणे म्हणजे देवीच्या स्वरूपातील स्त्रीशक्तीला प्रत्यक्ष मान देणे होय.
संबंधित हा ब्लॉग वाचा:
























