BLOG : सुख आणि दुःख एकाच वेळेस अनुभवणारे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे
BLOG : सन 2019 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजप आणि शिवसेना युतीला राज्यातील जनतेने भरघोस मतांनी निवडून दिले. पण शिवसैनिकाला मुख्यमंत्रीपद मिळावे म्हणून शिवसेनेने भाजपची साथ सोडून राष्ट्रवादी आणि काँग्रेसची साथ धरली. अर्थात यात शिवसेना खासदार संजय राऊत आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा फार मोठा हात आहे. मुख्यमंत्रीपद शिवसेनेलाच द्यायचे नक्की झाल्यानंतर शिवसेनेतील एखाद्या नेत्याला मुख्यमंत्री केले तर राजकारणात बरेच काही घडू शकते याची जाणीव झाल्याने शरद पवार यांनी उद्धव ठाकरे यांनाच मुख्यमंत्रीपदी बसण्याची गळ घातली आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. राज्याच्या इतिहासात ठाकरे कुटुंबातील पहिली व्यक्ती मुख्यमंत्रीपदी बसली. तसे पाहिले तर युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरत राजकीय वाटचाल सुरु केलीच होती.
मुख्यमंत्री होण्यापूर्वी उद्धव ठाकरे यांच्याशी मातोश्री आणि सेनाभवन येथे अनेक वेळा भेटी आणि गप्पा झाल्या होत्या. सेनाभवनवर तर पत्रकार परिषदेनंतर दालनात त्यांच्याशी विविध विषयांवर गप्पाही होत. एकदा त्यांनी राजकीय वाटचालीबाबत बोलताना सांगितले होते. वेडात दौडले वीर मराठे सात तुम्ही ऐकले असेल. पण ते वेडात दौडले म्हणून दुश्मनांच्या तावडीत सापडले. आम्ही वेडात दौडणार नाही. नंतर त्यांच्या या वक्तव्याचा उलगडा झाला.
नागपूर अधिवेशनात राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी चांगल्या गप्पा होत. मुख्यमंत्रीपद स्वीकारल्यानंतर उद्धव ठाकरे प्रथमच नागपूर अधिवेशनाला आले होते. मात्र नागपूर अधिवेशनात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी जास्त गप्पा मारता आल्या नव्हत्या. याचे कारण मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान असलेल्या रामटेकवर झालेली प्रचंड गर्दी. कार्यकर्त्यांनी त्यांना घेरले असल्याने त्यांना बोलावयास वेळच मिळाला नव्हता. तसंच पहिल्यांदाच मुख्यमंत्रीपद भूषवत असल्यानं अनेक गोष्टी जाणून घेण्यात त्यांचा वेळ जात होता.
हिवाळी अधिवेशन संपलं आणि लगेचच एक-दोन महिन्यातच म्हणजे फेब्रुवारी-मार्चमध्ये राज्यातील शेतकऱ्यांना अवकाळी पावसानं आणि गारपिटीनं झोडपलं. यात शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं. यंदाच्या फेब्रुवारीत राज्यातील शेतकऱ्यांना अवकाळी पाऊस आणि गारपिटीनं झोडपून काढलं.
त्यानंतर अर्थसंकल्पीय अधिवेशन आले आणि त्यातच कोरोनाची साथ आली. कोरोनात सगळंच बंद असल्याने मंत्रालयात जाणे-येणे बंद झाले त्यामुळे मुख्यमंत्र्यांनाही भेटता आले नाही. त्यानंतर पावसाळ्यात पावसानं हाहाकार माजवला. दरडी कोसळून अनेकांचा मृत्यू झाला. एकीकडे कोरोनामुळे सगळं बंद, तिजोरीत ख़डखडाट आणि त्यातच शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी निधी द्यावा लागला. कोरोनावरील उपचारासाठी कोट्यवधींचा खर्च करावा लागला.
कोरोनाची साथ आटोक्यात येत असतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मणक्याच्या आजाराने ग्रासले. त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाली पण त्यांच्या हालचालींवर निर्बंध आले. त्यामुळे यावेळच्या हिवाळी अधिवेशनात ते आजपर्यंत उपस्थित राहू शकले नाहीत. मुख्यमंत्री अधिवेशनात फक्त एक दिवस उपस्थित राहू शकतात अशी माहिती एका नेत्याने मागील आठवड्यातच दिली होती. सोमवार किंवा मंगळवारी ते अधिवेशनात उपस्थित राहतील असे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. विधानसभा अध्यक्षांच्या निवडणुकीच्या वेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अधिवेशनाला उपस्थित राहू शकतात.
काल मात्र ते व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून कॅबिनेट बैठकीला उपस्थित राहिले आणि त्यांचे दर्शन झाले. कोरोनाची साथ अजूनही गेलेली नाही. आता तर ओमायक्रॉनने हल्ला केलाय. रोज नवे निर्बंध लागू होतायत.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री झाले खरे पण त्यांनी कदाचित मुहूर्त चांगला निवडलेला नसावा. कारण मुख्यमंत्रीपदी आल्यापासून काही ना काही अडचणी येतच आहेत. मग त्या राजकीय असतील, नैसर्गिक असतील किंवा आरोग्याच्या असतील. खऱ्या अर्थाने त्यांना मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीचा आनंद घेताच आलेला नाही. म्हणूनच सुरुवातीला म्हटले की सुख आणि दुःख एकाच वेळेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना अनुभवायला मिळत आहे.
आई भवानी त्यांची प्रकृती लवकर ठीक करो आणि ते पुन्हा पूर्वीच्याच जोमाने कामाला लागोत हीच सदिच्छा.
(सोबतचा फोटो हा सेनाभवनातील आहे. मागील महापालिका निवडणुकीनंतर सेनाभवनातील आई अंबाबाईच्या दर्शनाला उद्धव ठाकरे सपत्नीक आले होते. त्यावेळचा मी काढलेला हा फोटो).