BLOG | उदंड जाहला प्रतिसाद ... !
ऑक्सफर्डच्या कोरोना प्रतिबंधक लसीची मानवी चाचणी आता भारतात होणार आहे. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीचा पुण्याच्या सिरम इन्स्टिट्यूटशी करार झाला आहे. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी बनवत असलेल्या कोरोना लसीची दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील चाचणी देशातील 10 संस्थांमध्ये होणार असून याकरिता 1600 निरोगी व्यक्तीची निवड करण्यात येणार आहे.
कोरोना सारख्या आजारांवर लस निर्माण करण्याकरिता मानवी चाचण्या कराव्या लागतात हे एव्हाना सगळ्यांना माहित झालं असेल. या पूर्वी असे नवीन औषध किंवा लस बाजारात आणण्यापूर्वी लशींची चाचणी होत असतेच, पण त्याची नागरिकांना कल्पना पण नसायची. मात्र या कोरोना काळात कोणता देश लस काढतोय, त्या लसीची सद्य परिस्थिती काय? ती कोणत्या टप्प्यात आहे, त्याला सरकारने परवानगी दिली का? कोणत्या संस्थेत त्या लसीच्या मानवी चाचण्या करण्यात येणार आहे? लसीच्या पहिल्या टप्प्यात काय झालं? या अशा आणि अनेक विविध वैद्यकीय क्षेत्राशी निगडित औषध निर्माण शास्त्राच्या प्रत्येक अपडेटवर सध्या बहुतांश सर्वसामान्य नागरिकांचं बारीक लक्ष आहे. कारण पण तसेच आहे ना, सध्याच्या संसर्गजन्य कोरोनाच्या आजाराने सर्वचजण मेटाकुटीला आले आहेत, घाबरले आहे म्हणण्यापेक्षा कंटाळले आहेत. त्यामुळे प्रत्येकजण लसीची चातक पक्षी पावसाची वाट पाहतो त्याप्रमाणे या लसीची वाट पाहत आहे. रशियाने लस काढली खरी, पण त्याचं कौतुक होण्याऐवजी ते टीकेचे धनी जास्त झाले. यापूर्वी असं वाटत होते, निरोगी व्यक्ती कशाला पुढे येऊन स्वतःवर या लसीची चाचणी करून घेईल परंतु वैद्यकीय क्षेत्राला यावेळी येणारा अनुभव फारच उत्साहवर्धक आहे. ज्या संस्थांमध्ये या लसीच्या चाचण्या करण्यात येणार असल्याचे जाहीर झाले आहे, तेव्हापासून अनेकांनी स्वयंस्फूर्तीने या चाचणी करता तयार असल्याचे सांगून संस्थेत फोन करून विचारणा करत आहेत.
ऑक्सफर्डच्या कोरोना प्रतिबंधक लसीची मानवी चाचणी आता भारतात होणार आहे. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीचा पुण्याच्या सिरम इन्स्टिट्यूटशी करार झाला आहे. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी बनवत असलेल्या कोरोना लसीची दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील चाचणी देशातील 10 संस्थांमध्ये होणार असून याकरिता 1600 निरोगी व्यक्तीची निवड करण्यात येणार आहे. भारतातील 10 संस्थांपैकी मुंबईतील के ई एम आणि नायर रुग्णालयाची निवड करण्यात आली आहे. प्रत्येकी केंद्रावर 160 निरोगी स्वयंसेवकांवर या लसीच्या चाचण्या करण्यात येणार आहेत. या स्वयंसेवकात 20 ते 50 वयोगटातील नागरिकांची निवड करण्यात येणार आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव सुरु झाल्यानंतर दोन- तीन महिन्यानंतर अनेक परदेशी औषध निर्माण करणाऱ्या कंपन्यांनी लस काढत असल्याचे दावे केले होते. त्यापैकी प्रत्यक्षात काही कंपन्यांनी काम सुरु केले असून पहिल्या टप्प्याच्या चाचण्यांचे निकाल विज्ञान जगतासमोर ठेवले होते, तर दुसऱ्या आणि तिसऱ्या मानवी चाचण्यांच्या टप्प्याचे काही कंपन्यांचे कामही सुरु झाले आहे.
परळ येथील के ई एम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ हेमंत देशमुख सांगतात की, " होय, आमच्या संस्थेची निवड मानवी चाचणीसाठी करण्यात आली आहे. जेव्हापासून ही निवड जाहीर झाली आहे तेव्हापासून अनेक ओळखीच्या आणि अनोळखी लोकांचे फोन व्यक्तीगतरित्या आणि रुग्णालयाच्या दूरध्वनीवर येत आहे. अनेक जणांनी स्वयंस्फूर्तीने या मानवी लस चाचणीच्या उपक्रमात सहभागी होण्याची तयारी दर्शवली आहे. आम्ही या करीता दोन दूरध्वनी क्रमांक ठेवले असून ज्या स्वयंसेवकांना या चाचणीत सहभागी व्हायचे आहे त्यांनी त्यावर आपली सविस्तर माहिती द्यावी. त्यानंतर जेव्हा स्वयंसेवक लागणार आहेत त्यावेळी त्या माहितीचा आधार घेऊन त्यांना बोलावून त्यांची चाचणी करू. लोकांचा उत्साह फार आहे. अनेकांनी या ट्रायल मध्ये सहभागी होण्यासाठी सहमती दर्शवली आहे. आम्हाला सध्या फक्त 160 स्वयंसेवक या चाचणीकरिता हवे आहेत. सध्या मानवी चाचणी करण्याकरिता आवश्यक असणारी आमच्या रुग्णालयातील नैतिक समितीची मंजुरी आवश्यक असते ती लवकरच मिळेल. या चाचण्या कशा पद्धतीने करायच्या यासंदर्भातील काही मार्गदर्शक तत्त्वे असतात. त्या प्रमाणे या चाचण्या पार पडतील. या पूर्वीही अशा पद्धतीच्या नवीन औषधांवरील चाचण्या या रुग्णालयात पार पडल्या आहेत. त्यांचा चांगला अनुभव आमच्या डॉक्टरांना आहे. आमचे चिकित्सालयीन औषधशास्त्र विभागाचे डॉक्टर आणि रुग्णालयातील डॉक्टर सगळे मिळून हे काम व्यवस्थित हाताळू."
11 ऑगस्ट रोजी, लस आली रे ... पण , या शीर्षकाखाली रशियाने लस तयार केल्याचा दावा केला होता त्यावर सविस्तर वृत्त लिहिले होते. त्यानुसार, रशिया देशाने कोरोनाविरोधातील लस निर्माण केल्याचा दावा केला असून विशेष म्हणजे या देशाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या मुलीने ही लस टोचून घेतल्याचे जाहीर करण्यात आले आहे. मात्र लस निर्माण होण्याचा आनंद व्यक्त होत असतानाच या लशींची उपयुक्तता किती आहे ती बघूनच त्याचे अंदाज बांधणे योग्य ठरणार असल्याचे मत आपल्या देशातील वैद्यकीय तज्ञांनी व्यक्त केले आहे
भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (आय सी एम आर ), चिकित्सालयीन औषधशास्त्र , नॅशनल चेअर, डॉ नीलिमा क्षीरसागर, सांगतात की, " मला खूप आनंद होत आहे की मी पूर्वी ज्या विभागात के ई एम रुग्णालयात होते तेथेच आज कोरोना लसीच्या चाचण्या होत आहे. हा विभाग पूर्ण सक्षमपणे ही जबाबदारी सांभाळेल यामध्ये कोणतेही दुमत असण्याचे कारण नाही. आपल्या देशात मानवी चाचण्यांचे खूप कठोर आणि काटेकोर कायदे आहेत. त्या सर्वाचं पालन करून चाचण्या व्यवस्थित पार पडतील याबाबत मला पूर्ण खात्री आहे." तर नायर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ रमेश भारमल यांनीही सांगितले की आमच्यकडेही बऱ्याच लोकांचे कॉल आले असून खूप लोकं या चाचण्यांमध्ये सहभागी होण्याकरिता पुढे येत आहे. ही खरंच खूप आनंदाची बाब आहे, लवकरच या चाचण्या आमच्या रुग्णलयात सुरु होणार आहेत.
येत्या काळात जगभरातील आणखी काही कंपन्या कोरोनाविरोधात नवीन औषध आणल्याचा दावा करतील. याचा अर्थ असा आहे की, काही महिन्यात या आजार विरोधात औषध किंवा लस निर्माण होणार आहे, निश्चित. ही बाब सगळ्या जगातील लोकांसाठी आशादायक आहे. या आजारावर जगभरात प्रथम अमेरिकेतली मॉडर्ना कंपनी, फायझर कंपनी, चीनमधील सिनोफार्मा कंपनीने आणि अन्य देशातील काही कंपनीने लस बनवून मानवी चाचण्या करण्यास सुरुवात केली असून त्या सुद्धा आता दुसऱ्या ते तिसऱ्या टप्प्यात असल्याचे सांगितले जात आहे.
तर जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने भारत बायोटेक कंपनी सोबत करार केला असून त्यांच्या या 'कोव्हॅक्स' या लसीच्या मानवी चाचण्याला परवानगी दिली आहे. या हैद्राबाद स्थित कंपनीने ही लस पुणे येथील राष्ट्रीय विषाणूविज्ञान संस्थेबरोबर संयुक्तपणे विकसित केली आहे. या लसीची मानवी चाचण्या करण्याकरिता देशातील 12 संस्थांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये विशेष म्हणजे एक संस्था महाराष्ट्रातील नागपूर येथे आहे. या संस्थेचे नाव गिल्लूरकर मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल असे आहे. या प्रकरणी या हॉस्पिटलचे संचालक डॉ चंद्रशेखर गिल्लूरकर, यांनी सांगितले की, " दुसऱ्या टप्प्याच्या मानवी चाचणी करिता आम्ही 55 स्वयंसेवकांची निवड करण्यात आली होती. त्यासाठीही स्वयंसेवक स्वतःहून पुढे आले होते. या स्वयंसेवकाना पहिला लसीचा डोस देण्यात आला आहे. त्यांचे 14 दिवस पूर्ण झाले असून त्यांचे रक्त नमुने घेऊन तपासणीकरिता पुढे पाठविण्यात आले असून त्यांना लसीचा दुसरा डोस देण्यात आला असून त्यांची आणखी 14 दिवसाने रक्त नमुने घेण्यात येणार आहे. जी मानवी चाचणी करण्याची प्रक्रिया ठरवून दिले आहे त्याप्रमाणे काम सुरु आहे. सध्या 14 दिवसानंतर सगळे सहभागी झालेले स्वयंसेवक व्यस्थित आहे. लस देण्यात आली आहे ती सुरक्षित असल्याचे दिसून आले आहे. आता त्यांच्यात किती अँटीबॉडीज निर्माण झाल्या आहेत ते त्यांच्या रक्ताचे नमुने आल्यानंतरच कळू शकणार आहे."
एकंदरच बाजारात केवळ लस येऊन चालत नाही तर त्या लसीमुळे किती नागरिकांना फायदा होतो आहे ते पण बघणे गरजेचे आहे. लवकरच या दुसऱ्या आणि तिसऱ्या मानवी चाचणीचे निकाल येऊन शुभवार्ता मिळण्याचे संकेत आतापासून मिळत आहेत. परंतु वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते नागरिकांना ही लस मिळण्याकरिता नवीन वर्षाची वाट पाहावी लागणार आहे. कारण मानवी चाचण्यांतील लसीच्या निकालावरच या लसीचे यश अवलंबून आहे. याकरिता लस निर्माण करण्याकरिता जी शास्त्रीय पद्धत नियम आणि अटी पाळूनच ती लस विकसित करून बाजारात आणली जाणार आहे. या सगळ्या प्रकारातून कोरोनाविरोधात लढणारी लस निर्माण व्हावी याकरिता स्वयंसेवक स्वयंस्फूर्तीने पुढे येत आहे, आणि त्याकरिता उदंड प्रतिसाद मिळत ही खरं तर चांगली गोष्ट आहे.
संतोष आंधळे यांचे अन्य ब्लॉग- BLOG | कोरोनाचे आकडे बोलतात तेव्हा...
- BLOG | फिजिओथेरपीचं योगदान महत्वाचं!
- BLOG | 'डेक्सामेथासोन'!
- BLOG | डायलिसिसच्या रुग्णांना वाट दिसू देगं देवा .....
- BLOG | दाताचा ठणका आणि कोरोना
- BLOG | कोई भी लेलो .... लाल, काला, पिला मास्क
- BLOG | होम कॉरंटाईन वर निष्ठा वाढवेल आपली प्रतिष्ठा
- BLOG | मला कोरोना झाल्यासारखं वाटतंय...
- सोशल डिस्टन्ससिंग म्हणजे काय असतं रे भाऊ?
- BLOG | कोरोनाशी भिडण्याची हीच ती वेळ!
- BLOG | आम्ही बिनधास्त काम करू
- दुःखावर अंकुश ठेवणारा कोरोना
- BLOG | देवभूमीचा कोरोनाशी यशस्वी लढा
- BLOG | 'चाचपणी' संसर्गाच्या फैलावाची
- BLOG | कोरोना, टोळधाड अन् चक्रीवादळ कसं जगायचं!
- BLOG | खासगी रुग्णालयाचं 'हे' वागणं बरं नव्हं
- BLOG | रुग्णसंख्या आवरणार कशी?
- BLOG | रोगाशी लढायचंय, आकडेवारीशी नाही !
- BLOG | 'ती' पण माणसूच आहे
- BLOG | लक्षणविरहित रुग्णाचं काय?
- BLOG | कोरोनाबाधितांची ओळख परेड?
- BLOG | कोरोनामय 'डायबेटिस'
- BLOG | संपता संपेना... कोरोनाकाळ
- BLOG | कोरोनाची वक्रदृष्टी पुरुषांवर अधिक!
- BLOG | व्यर्थ न हो बलिदान...!
- BLOG | कोरोना विरोधी लोकचळवळ!
- BLOG | पुणे करूया 'उणे'
- BLOG | नॅशनल डिजिटल हेल्थ मिशन ... एक आव्हान