Operation Sindoor : पाकिस्तानचे पाच फायटर जेट पाडले, 300 किमीवरुन लक्ष्यभेद केला; ऑपरेशन सिंदूरवरुन वायूदल प्रमुखांचा मोठा खुलासा
Operation Sindoor: वायूदल प्रमुख अमरप्रीतसिंह यांनी ऑपरेशन सिंदूरची सविस्तर माहिती दिली. या संपूर्ण ऑपरेशनदरम्यान S-400 गेमचेंजर ठरल्याचं ते म्हणाले.

नवी दिल्ली : ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताने पाकिस्तानचे नेमके किती नुकसान केले असा प्रश्न सातत्याने विचारला जातो. त्यावर आता खुद्द वायूदल प्रमुखांनीच उत्तर दिलं. भारतीय वायूसेनेने (IAF) ‘ऑपरेशन सिंदूर’ दरम्यान पाकिस्तानच्या 5 लढाऊ विमानांसह एका मोठ्या विमानाचा नाश केल्याची माहिती एअर चीफ मार्शल अमर प्रीत सिंह यांनी दिली. हा हल्ला पाकिस्तानच्या हद्दीत तब्बल 300 किलोमीटर अंतरावरून करण्यात आला. जमिनीपासून ते आकाशात करण्यात आलेला हा हल्ला म्हणजे भारताचा आतापर्यंतचा सर्वात मोठा विक्रम ठरल्याचं अमर प्रीत सिंह म्हणाले.
बंगळुरुतील एअर चीफ मार्शल एल. एम. कात्रे मेमोरियल लेक्चरच्या 16व्या सत्राला संबोधित करताना अमर प्रीत सिंह यांनी पाकिस्तानला दिलेल्या या मोठ्या धक्क्याची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, विशिष्ट गुप्तचर माहितीच्या आधारे पाकिस्तानातील AWC हँगरवर हल्ला करण्यात आला. या हँगरमध्ये देखभालीसाठी ठेवलेली एफ-16 लढाऊ विमाने तसेच एअरबोर्न वॉर्निंग अँड कंट्रोल सिस्टम (AWACS) होते.
ऑपरेशन सिंदूरमधील प्रमुख लक्ष्ये आणि हल्ले
- AWC हॅंगरवर प्रहार, 5 लढाऊ विमाने आणि एक मोठा विमान नष्ट
- सुकूर एअरबेसवरील UAV हँगर आणि रडार स्टेशन उद्ध्वस्त
- सरगोधा एअरबेसवर एफ-16 विमाने असलेल्या भागावर लक्षित हल्ला
वायूदल प्रमुखांनी सांगितले की, “हवाई क्षेत्रावरील हल्ल्याचा निर्णय अत्यंत अचूक गुप्त माहितीनुसार घेतला गेला. मुख्य इमारतीवरही हल्ला करण्यात आला, जी काही वेळा नागरी टर्मिनल म्हणूनही वापरली जात होती. आम्ही लहानपणापासून अशा दिवसांची स्वप्ने पाहिली होती. निवृत्तीपूर्वीच मला हे साध्य करण्याची संधी मिळाली.”
‘ऑपरेशन सिंदूर’मुळे पाकिस्तानच्या हवाई क्षमतेला मोठा धक्का बसला असून, तज्ज्ञांच्या मते हा भारताच्या वायूसेनेच्या इतिहासातील सर्वात यशस्वी आणि रणनीतिकदृष्ट्या महत्त्वाचा हल्ला ठरला आहे.
भारताचा पाकिस्तानवर एअर स्ट्राईक
भारताने 7 मे रोजी पाकिस्तानविरुद्ध ‘ऑपरेशन सिंदूर’ सुरू केले होते, ज्यामध्ये पीओके आणि पाकिस्तानातील नऊ दहशतवादी ठिकाणे उद्ध्वस्त करण्यात आली. भारतीय सैन्याच्या या कारवाईत 100 हून अधिक दहशतवादी ठार झाले होते. ही कारवाई पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या प्रत्युत्तरात करण्यात आली होती, ज्यामध्ये 26 पर्यटकांचा मृत्यू झाला होता.
पाकिस्तानचा दावा काय?
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ आणि लष्कर प्रमुख आसिम मुनीर यांनी दावा केला होता की पाक सैन्याने भारताचे अनेक फायटर जेट्स पाडले आणि त्यांना पाकिस्तानमधून पळून जाण्यास भाग पाडले. मात्र नंतर त्यांनी आपल्या विधानावरून पलटी घेतली आणि म्हटले की भारताचे फायटर जेट्स आमच्या सीमेत शिरलेच नव्हते.
ही बातमी वाचा:























