(Source: Poll of Polls)
BLOG | अहमद पटेल : चौकटीत चालणारा चाणक्य
2004 मध्ये युपीएची सत्ता आली तेव्हा आघाडीतल्या अनेक पक्षांना एकत्र आणण्याची कसरत काँग्रेसला करावी लागली त्यात अहमद भाईंच्या वाटाघाटी कौशल्याचा बराच मोठा वाटा होता.
एखादं साम्राज्य लयीस जात असताना, त्याच्या पुर्नस्थापनेसाठी नेमकं काय करावं हेच कुणाला कळत नसताना या साम्राज्याची नस आणि नस माहिती असलेला सेनापतीच धारातीर्थी पडावा तसं अहमद पटेल यांच्या जाण्यानं काँग्रेसचं नुकसान झालेलं आहे. वयाच्या 71 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या दोन दशकांपासून अधिक काळ पडद्यामागून काँग्रेस चालवणाऱ्या या माणसाचं मध्यरात्रीशी एक वेगळंच नातं होतं. अनेक महत्वाच्या बैठका, खलबतं करण्यासाठी ही त्यांची आवडती वेळ. जगाचा निरोप घेतानाही त्यांनी ही मध्यरात्रीचीच वेळ निवडावी? सगळी कामं संपवून जात असल्यासारखे पहाटे साडेतीन वाजता ते गेले. अहमदभाईंशी बैठक करायची, इहलोकातला हिशोब करायचा म्हणजे मध्यरात्रीची वेळ योग्य हे बहुधा चित्रगुप्ताच्याही लक्षात आलं असावं. त्यामुळेच ही अखेरची बैठक संपवून पहाटे साडेतीनला त्यांनी या जगाचा निरोप घेतला.
सोनियांचा उजवा हात, काँग्रेसचा चाणक्य अशी अनेक विशेषणं त्यांच्याबाबतीत वापरली जातात. त्यामुळे त्यांचं व्यक्तिमत्व दरबारीच आहे असा अनेकांचा समज होऊ शकतो. असे दरबारी राजकारणी सहसा हायकमांडनं लादलेले, मातीशी संबंध नसलेले असतात. अहमद पटेल या वर्गातले नव्हते. त्यांची काँग्रेसमधली सुरुवात ही जमिनीपासूनच झाली होती. काँग्रेस तालुकाध्यक्ष हे त्यांनी संघटनेत भूषवलेलं पहिलं पद. 1977 साली वयाच्या 28 व्या वर्षी ते लोकसभेवर पहिल्यांदा निवडून गेले होते. त्यानंतर तीन लोकसभा निवडणुका त्यांनी जिंकलेल्या आहेत. राज्यसभेचा मार्ग त्यांनी 1993 ला स्वीकारला. नंतर हायकमांडच्या अत्यंत विश्वासू वर्तुळात पोहचल्यानं ज्या पद्धतीचं राजकारण ते करत होते त्यामुळे ते ‘किचन कॅबिनेट’पुरते मर्यादित वाटत असले तरी प्रत्यक्षात त्यांचा हा प्रवास असा लोककारणातूनच झाला होता हे लक्षात घेतलं पाहिजे.
गुजरातमधून संसदेत ( राज्यसभा आणि लोकसभा दोन्ही) असलेले ते एकमेव मुस्लीम खासदार होते. खरंतर त्यांच्या पेहरावातून, वावरातून त्यांचा धर्म कधी दिसायचा नाही. कारण दाढी, शेरवानीपासून ते दूर होते. पण तरीही वृत्तीनं मात्र धार्मिक होते. गुजरातच्या भरुच परिसरात त्यांची ओळख ही ऐंशीच्या दशकापर्यंत ‘बाबूभाई’ अशीच होती. या ओळखीतून त्यांचा धर्म स्पष्ट होत नसल्यानं बाबूभाईचा ‘अहमदभाई’ करुन तो ठसवण्याचं श्रेय भाजपकडे. रामजन्मभूमी आंदोलनाच्या काळात 1989 साली लोकसभा निवडणुकीत त्यासाठी बरीच पोस्टरबाजीही झाली आणि त्यातच अहमद पटेल यांना लोकसभा निवडणुकीतला पहिला पराभव वाटयाला आला.
काँग्रेसमध्ये हायकमांडच्या इतक्या जवळ असूनही कधी मंत्रिपद किंवा इतर कुठलं सरकारी पदाच्या मोहात ते पडले नव्हते. संघटनेतच त्यांची ताकद इतकी होती की अनेक काँग्रेस मुख्यमंत्री, मंत्र्यांपेक्षाही त्यांच्या शब्दाचं वजन अधिक होतं. पण ही अमर्याद ताकद त्यांनी खूप साधेपणानं वापरली. त्यांच्या राहण्यात कुठला बडेजाव नव्हता, ना कसला डामडौल. राज ठाकरे यांनी त्यांच्या श्रद्धांजलीत जे वाक्य लिहिलं आहे ते ही बाब खूप व्यवस्थित स्पष्ट करणारं आहे. राज ठाकरे लिहितात, “राजकारण बुध्दिबळाच्या पटावर ठेवून डाव-प्रतिडाव खेळण्यात ते माहीर होते. पण ही असाधारण क्षमता त्यांनी राजकीय लढाया जिंकण्यापुरतीच वापरली, तिला कधी त्यांनी व्यक्तिगत हेवेदावे यासाठी वापरलं नाही.” त्यामुळे हे चाणक्य नियमांच्या चौकटीत डाव खेळणारे होते. ते काही अगदीच धुतल्या तांदळाप्रमाणे राजकारण करत नव्हते, आवश्यक तिथे कूटनीतीचा वापर त्यांनीही जरुर केला पण डाव जिंकण्यासाठी संस्था वेठीस धरुन देशाची संस्थात्मक उभारणीच दावणीलाच बांधण्याचा प्रकार त्यांनी केला नाही हा फरक लक्षात घ्यायला हवा.
युवक काँग्रेसमध्ये काम, नंतर राजीव गांधींच्या पंतप्रधान पदाच्या काळात संसदीय सचिव म्हणून निवड ते सोनिया गांधींचे राजकीय सल्लागार आणि आता शेवटी शेवटी मोतीलाल व्होरा यांच्यानंतर काँग्रेसचं खजिनदारपद अशा अनेक जबाबदाऱ्या त्यांनी एकनिष्ठेनं सांभाळल्या. राजीव गांधी यांच्यासाठी संसदीय सचिव म्हणून त्यावेळी अरुण सिंह, अहमद पटेल, ऑस्कर फर्नांडिस ही त्रिमूर्ती काम करत होती जी अमर, अकबर, अँथनी म्हणून ओळखली जायची.
2004 मध्ये युपीएची सत्ता आली तेव्हा आघाडीतल्या अनेक पक्षांना एकत्र आणण्याची कसरत काँग्रेसला करावी लागली त्यात अहमद भाईंच्या वाटाघाटी कौशल्याचा बराच मोठा वाटा होता. आत्ता महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकारच्या स्थापनेतही तेच काँग्रेसकडून सर्वाधिक सक्रीय होते. राहुल गांधींनी त्यावेळी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. काँग्रेस आणि शिवेसना हे दोन टोकाचे पक्ष. ते एकत्र येतील का याबद्दल अनेकांच्या मनात शंका होती. पण एकत्र येणं का गरजेचं आहे हे सोनिया गांधी यांना पटवून देण्यात अहमद पटेल यांची भूमिका महत्वाची होती.
काँग्रेस वर्तुळात ते AP या नावानंच ओळखले जात होते. एखादया काँग्रेस मुख्यमंत्र्यांला हायकमांडकडून ग्रीन सिग्नल हवा असो, कुणाची नियुक्ती अडलेली असो, एनजीओचा कुठला प्रस्ताव असो की मित्रपक्षांच्या वाटाघाटी…सोनिया गांधींकडून कुणाला शब्द हवा असेल तर त्यासाठीचा मार्ग म्हणजे अहमद पटेल. अशी ताकद असताना ते गॉडफादरच्या थाटात वावरत नव्हते. पक्षासाठी झटणारा निष्ठावंत सैनिक याच भूमिकेत ते सदैव राहिले. त्यामुळेच त्यांच्या कार्यशैलीबद्दल अनेक अफवा कानावार आल्या तरी प्रत्यक्षात भेटल्यानंतर जाणवणारे अहमद पटेल हे वेगळेच असतात.
दिल्लीत राष्ट्रपती भवनाच्या मागच्या बाजूला 23, मदर टेरेसा क्रिसेंट रोडवर त्यांचं शासकीय निवास्थान. काँग्रेसचं मुख्यालय 24, अकबर रोडवर आहे. त्यामुळे काँग्रेसमध्ये 23 नंबर, 24 नंबर हे शॉर्टफॉर्म खूप लोकप्रिय. 23 नंबर जवळच एक मशीदही आहे. या परिसरातल्या अनेकांना माहिती आहे की, दर शुक्रवारी अहमद पटेल या मशिदीत न चुकता नमाज पढायला येतात. तो त्यांचा ठरलेला रिवाज. निवडणुकीच्या काळात इच्छुकांची गर्दी त्यांना गाठण्यासाठी इथेच दबा धरुन बसलेली असायची. त्यामुळे या काळात मात्र कधीकधी त्यांच्यावर दुसरी मशीद शोधायची वेळ यायची. पण एरव्ही लोकांच्या गाठीभेटींसाठी मात्र त्यांचा रात्री उशीरापर्यंतचा वेळ राखीव असायचा. काँग्रेसच्या अनेक नेत्यांना अहमदभाईंशी तुमची पहिली भेट कधीची तर उत्तर रात्री 1 वाजता, रात्री अडीच वाजता अशी उत्तरं येतात. सत्ता असो किंवा नसो पण लोकांच्या भेटीसाठी कायम दरवाजे उघडे ठेवणारे आणि सहज भेटणारे असे दिल्लीत सध्या दोनच नेते होते. एक शरद पवार आणि दुसरे अहमद पटेल. त्यातही गंमत म्हणजे शरद पवारांची वेळ सकाळी 8 वाजता सुरु होते तर अहमद पटेलांची रात्री उशीरा. म्हणजे अनेकदा अहमद पटेलांच्या बंगल्यावरच्या गाठीभेटी संपण्याच्या वेळी शरद पवारांकडे त्या सुरु होणार.
मोदी आणि शाह यांची जोडगोळी सध्या देशावर राज्य करते आहे. ते ज्या गुजरातमधले त्याच राज्यातले अहमद पटेलही. 2011-12 च्या दरम्यानच मोदींच्या राष्ट्रीय महत्वाकांक्षा स्पष्ट दिसू लागल्या होत्या तेव्हाच काँग्रेस नेतृत्व सावध का नव्हतं या प्रश्नाची चर्चा अनेकदा होते. अहमद पटेल यांचा मोदींविरोधात कुठलं आक्रमक पाऊल उचलायलाही विरोध होता. पण ते त्यांचं कुठलं आतून सेटिंग होतं म्हणून नव्हे तर अशी कारवाई आपल्याच अंगावर उलटू शकते असा त्यांचा होरा होता.
अहमद पटेलांबद्दल अजून एक खास गोष्ट म्हणजे त्यांच्यासोबत असणारी पांढरी अँम्बेसिडर कार. सध्याच्या काळात अहमद पटेल, शरद यादव असे मोजकेच नेते हे गाडी वापरताना दिसायचे. संसद परिसरात ही गाडी आली की सगळे ओळखायचे, अहमदभाई आले. पैशाची ताकद श्रेष्ठ की सत्तेची असा वाद अनेकदा सुरु असतो. त्यात सत्तेचं श्रेष्ठत्व दाखवणारी ही गाडी होती. अहमदभाईंच्या जाण्यानं आता या आधीच दुर्मिळ झालेल्या या गाडीचं दर्शनही दिल्लीच्या सत्तावर्तुळात कमी होईल.