(Source: ECI/ABP News/ABP Majha)
BLOG | देशातील सात राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकांचे पडघम
पुढच्या वर्षी म्हणजे 2022 मध्ये फेब्रुवारीनंतर देशात मिनी लोकसभेच्या म्हणजेच पाच राज्यांच्या निवडणुका होणार आहेत. ही राज्ये आहेत उत्तर प्रदेश, पंजाब, गोवा, उत्तराखंड आणि मणिपूर, तर वर्षाच्या शेवटाकडे गुजरात आणि हिमाचल प्रदेश या दोन राज्यांमध्ये निवडणुका होणार आहे. पुढील लोकसभा निवडणुकीच्या म्हणजेच 2024 पूर्वी देशात 16 राज्यांमध्ये निवडणुका होणार आहेत. या 16 पैकी 9 राज्यात भाजपची स्वबळावर सत्ता तर तीन राज्यात दुसऱ्या पक्षांच्या मदतीने भाजप सत्तेत सहभागी आहे. काँग्रेसची तीन राज्यात सत्ता असून एका राज्यात टीआरएसची सत्ता आहे. या 16 राज्यांमध्ये लोकसभेच्या एकूण 246 जागा आहेत. भाजपला जर मागील दोन लोकसभा निवडणुकांप्रमाणे देशात चांगले यश मिळवायचे असेल तर या राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर विजय मिळवावाच लागेल.
निवडणुकांना सामोरे जाणाऱ्या या राज्यांमध्ये सध्या काय स्थिती आहे ते पाहूया
उत्तर प्रदेश
देशात उत्तर प्रदेश हे एक मोठे आणि केंद्रात सत्ता प्राप्त करण्यासाठी महत्वाचे असलेले राज्य आहे. कधी काळी उत्तर प्रदेश हा काँग्रेसचा बालेकिल्ला होता पण आता इथे त्यांचे स्थान जवळपास नगण्य आहे. मागील लोकसभा निवडणुकीत तर राहुल गांधी यांना उत्तर प्रदेशमध्ये चक्क पराभव पत्करावा लागला होता. भाजपच्या स्मृती इराणी यांनी त्यांचा पराभव केला होता. केरळमधील वायनाड मतदारसंघातून राहुल विजय झाल्याने लोकसभेत तरी पोहचले. भाजपने उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकांची तयारी सुरु केली आहे. यासाठी गेल्या काही महिन्यांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी सतत उत्तर प्रदेशचा दौरा करीत आहे. कोट्यवधी रुपयांच्या योजनांना त्यांनी सुरुवात केलीय. काशी विश्वनाथ कॉरिडॉर हा अशाच अनेक योजनांपैकी एक आहे. ज्याचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी केले. योगी आदित्यनाथच हे भाजपचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा असणार आहे. काँग्रेसने प्रियांका गांधी यांच्यावर उत्तर प्रदेशची धुरा सोपवली आहे. प्रियांका गांधी उत्तर प्रदेश पिंजून काढत आहेत. नुकतेच त्यांनी खास महिलांसाठी एक जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. दुसरीकडे आरजेडी आणि बसपानेही कंबर कसली असून भाजपला टक्कर देण्याची तयारी सुरु केली आहे. एमआयएमही मैदानात उतरणार असल्याने यावेळी उत्तर प्रदेशमध्ये भाजपला विजयासाठी प्रचंड मेहनत घ्यावी लागणार आहे यात शंका नाही.
पंजाब
काँग्रेसच्या हातात असलेले हे राज्य त्यांच्या हातातून जाणार की काय अशी चिन्हे दिसू लागली आहेत. क्रिकेटर आणि मूळचे भाजपवासी नवज्योतसिंह सिद्धू यांना प्रदेश अध्यक्ष बनवले आणि मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांच्यापुढे आव्हान उभे केले. या दोघांमधून विस्तवही जात नसल्याने अमरिंदर सिंह यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर काँग्रेसने लगेचच चन्नी यांना मुख्यमंत्रीपदी बसवले. अमरिंदर सिंह यांनी स्वतःचा वेगळा पक्ष स्थापन केला असून भाजपसोबत युती करून निवडणूक लढवणार आहेत. दिल्ली शीख गुरुद्वारा प्रबंधन कमिटीचे मनजिंदर सिंह सिरसाही भाजपमध्ये सामिल झालेत. त्यामुळे पंजाबमध्ये सत्ता कायम राखण्यासाठी काँग्रेसला मोठी मेहनत करावी लागणार आहे.
उत्तराखंड
सध्या उत्तराखंड भाजपच्या ताब्यात असून त्यांनी तीन वेळा मुख्यमंत्री बदलले आहेत. काँग्रेसने हरीश रावत यांच्यावर निवडणुकीची जबाबदारी टाकली आहे तर आपनेही मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. आपने कर्नल अजय कोठियाल यांना मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून समोर केले आहे. त्यामुळे इथे भाजप विरुद्ध काँग्रेसऐवजी भाजप विरुद्ध आप अशी लढाई दिसली तर आश्चर्य वाटणार नाही.
गोवा
गोव्यात अनेक वर्षांपासून भाजपची सत्ता आहे. खरे तर काँग्रेसने गोवा काबिज केला होता पण अंतर्गत कुरबुरींमुळे त्यांचे सरकार पडले आणि भाजपने त्याचा फायदा उचलत गोवा ताब्यात घेतले. कधी काळी गोव्यात 17 आमदार असलेला काँग्रेस आत फक्त तीन आमदारांवर आला आहे. माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते फलेरियो यांनी काँग्रेसला रामराम करीत ममता बॅनर्जी यांच्या तृणमूलशी घरोबा केला. आणि त्यांना त्याचे राज्यसभेवर खासदारकीचे फळही मिळाले. या निवडणुकीत शिवसेनेनेही 20 ते 22 उमेदवार उभे करणार असल्याचे सूतोवाच केले आहे. आप आणि तृणमूल काँग्रेसनेही गोवा काबिज करण्याचे प्रयत्न सुरु केलेत. त्यामुळे गोव्यात यंदा चांगली लढत पाहायला मिळेल यात शंका नाही.
मणिपूर
सध्या भाजपच्याच ताब्यात असून पुढील निवडणुकीतही हे राज्य भाजपकडेच राहील याची पूर्ण काळजी राज्यातील आणि केंद्रातील सरकारने घेतली आहे. 2017 मध्ये काँग्रेसने मणिपूर जिंकले होते पण भाजपने संख्याबळाची पूर्तता करीत काँग्रेसला पछाडून सत्ता हस्तगत केली होती. त्यातच आता मणिपुरमधील काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गोविनदास कोंथूजाम यांनी काँग्रेसचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केला आहे. गेल्या वर्षीच त्यांना प्रदेशाध्यक्ष बनवण्यात आले होते आणि ते काँग्रेसचे मुख्यमंत्रीपदाचे चेहरे ही होते. पण पक्षश्रेष्ठींवर नाराजी व्यक्त करीत त्यांनी पदाचा राजीनामा दिला. एन बिरेन सिंह यांच्या नेतृत्वात भाजप सरकार चांगले काम करीत आहे. त्यातच नागा पीपल फ्रंटबरोबर केंद्र सरकारने करार केलेला असल्याने त्याचा फायदाही भाजपला होईल अशी चिन्हे आहेत.
हिमाचल प्रदेश
हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसचे सरकार असले तरी तेथे पंजाबप्रमाणे काँग्रेसमध्येच दोन गट निर्माण झालेले आहेत. काँग्रेसचे माजी मंत्री मेजर विजय सिंह मानकोटिया यांनी पंजाबमध्ये अमरिंदर सिंह यांना हटवण्याचे परिणाम हिमाचलमध्ये होतील असे म्हटले आहे. एवढेच नव्हे तर काही काँग्रेसजनांनी राज्यात परिवारवाद वाढत असल्याने तिकडे लक्ष द्यावे असे पत्र सोनिया गांधी यांना पाठवले आहे. स्वतः मानकोटिया यांनीही काँग्रेसचा राजीनामा देऊन स्वतःचा नवीन पक्ष स्थापन करण्याचे सूतोवाच केले आहे.
गुजरात
गेल्या अनेक वर्षांपासून गुजरातमध्ये भाजपचे एकछत्री राज्य आहे. काँग्रेस तेथे असूनही नसल्यासारखी आहे. पुढील वर्षी होणाऱ्या निवडणुकीसाठी आता भाजपने अँटीइनकम्बसी टाळण्यासाठी मुख्यमंत्र्यांसह संपूर्ण मंत्रीमंडळच बदलून टाकले आहे. गुजरातमध्ये आपने मुसंडी मारली असून मनपा निवडणुकीत चांगले यश मिळवले आहे. त्या यशामुळेच अरविंद केजरीवाल गुजरातमध्ये यश मिळवण्याच्या आशेने गुजरातकडे पाहात आहेत.
संबंधित ब्लॉग :