BLOG | कॅप्टन अमरिंदर सिंह काँग्रेस फोडणार?
काँग्रेस आज संकटात दिसत आहे. हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी प्रकृती अस्वास्थ्यामुळे पक्षाच्या रोजच्या कामकाजात म्हणावं तसं लक्ष देऊ शकत नाहीत. राहुल गांधींची प्रतिमा अजूनही सुधारलेली नसल्याने प्रियांका गांधी वड्रा यांना त्यांच्या मदतीला आणण्यात आलं आहे. प्रियांका गांधी वड्रा यांच्यावर उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकांची जबाबदारी सोपवण्यात आलीय. पण या दोघांना काँग्रेसमधील वरिष्ठांचा म्हणावा तसा पाठिंबा नाही. नव्याने आलेल्यांवर राहुल आणि प्रियांका विश्वास ठेवत असल्याने जुणे जाणते नेते नाराज आहेत. त्यामुळेच पंजाबमध्ये कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी मुख्यमंत्रीपदाचा केवळ राजीनामाच दिला नाही तर काँग्रेसचाही राजीनामा दिलाय आणि आता तर ते नवीन पक्ष स्थापन करणार आहेत. निवडणूक आयोगाने पक्षाचे नाव आणि चिन्ह दिल्यानंतर आपण पक्षाची घोषणा करणार आहोत असे त्यांनी जाहीर केले आहे.
काँग्रेस सोडून स्वतःचा नवा पक्ष स्थापन करणारे कॅप्टन अमरिंदर काँग्रेसचे काही पहिले नेते नाहीत. आजवर काँग्रेसच्या अनेक वरिष्ठ नेत्यांनी काँग्रेसला रामराम करीत स्वतःची वेगळी चूल मांडली. त्यात काही जण यशस्वी झाले तर काही अयशस्वी. तर काही जण राजकारणातून बाहेर फेकले गेले. पण काँग्रेस अजून आहेच. अर्थात जवळ जवळ पाच दशकांपेक्षा जास्त काळ देशावर सत्ता गाजवल्याने काँग्रेस तळागाळात पोहोचलेली आहे आणि त्याचा फायदा जसा काँग्रेसला होतो तसाच काँग्रेस सोडून स्वतःची वेगळी चूल मांडलेल्या नेत्यांनाही होतोच.
खरं तर 28 डिसेंबर 1885 ला इंग्रजांविरोधात लढाईसाठी काँग्रेसची स्थापना करण्यात आली होती. विशेष म्हणजे काँग्रेस युनियनची स्थापना एलन ऑक्टेव्हियन ह्यूम या एका इंग्रज अधिकाऱ्याने केली होती. त्यांच्या अध्यक्षतेखालीच काँग्रेसची पहिली बैठक मुंबईत झाली होती आणि व्योमेश चंद्र बॅनर्जी यांच्यावर काँग्रेसचे पहिले अध्यक्ष म्हणून जबाबदारी सोपवण्यात आली होती. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर, काँग्रेसची गरज उरलेली नसून पक्ष बरखास्त करण्याचा प्रस्तावही महात्मा गांधी यांनी दिल्याचं म्हटलं जातं. परंतु काँग्रेस आजही इतक्या वर्षानंतरही टिकून आहे. आजवर काँग्रेस कधी कधी फुटली त्यावर एक नजर टाकूया-
काँग्रेसच्या फुटीची सुरुवात स्वातंत्र्य मिळण्यापूर्वीच झाली होती. 1923 मध्ये सी. आर. दास आणि मोतीलाल नेहरू यांनी काँग्रेस यूनियनमधून बाहेर पडत स्वराज्य पार्टीची स्थापना केली होती. त्यानंतर 1939 मध्ये सुभाषचंद्र बोस, शार्दुल सिंह आणि शील भद्र यांनी काँग्रेसमधून बाहेर पडत अखिल भारतीय फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना केली. काँग्रेस फुटण्याची ही परंपरा स्वातंत्र्यानंतरही कायम राहिली. 1952 मध्ये जे. बी. कृपलानी काँग्रेसबाहेर पडले आणि त्यांनी किसान मजदूर प्रजा पार्टीची स्थापना केली. तर एन. जी रंगा यांनी हैदराबाद स्टेट प्रजा पार्टीची स्थापना केली. 1956 मध्ये सी. राजगोपालाचारी यांनी इंडियन नॅशनल डेमोक्रॅटिक पार्टीची स्थापना केली. 1964 मध्ये के. एम. जॉर्ज यांनी केरळ काँग्रेसची स्थापना केली. 1967 मध्ये चौधरी चरणसिंह यांनी काँग्रेसमधून बाहेर पडत भारतीय क्रांती दलाची स्थापना केली होती.
त्यानंतर इंदिरा गांधी यांनीही 12 नोव्हेंबर 1969 काँग्रेस बरखास्त केली आणि काँग्रेस (आर) नावाने नव्या काँग्रेसची स्थापना केली. त्यावेळी पक्षाचे चिन्ह गाय आणि वासरू होते. 1977 पर्यंत केंद्रात इंदिरा गांधींची सत्ता होती. पण आणीबाणीनंतर इंदिरा गांधींचा पराभव झाला. त्यानंतर त्यांनी देवराज अर्स, ब्रह्मानंद रेड्डी यांना पक्षाबाहेर काढून काँग्रेसची पुनर्रचना केली आणि पक्षाचे नाव काँग्रेस (आय) असं ठेवलं, आणि पक्षाचे चिन्हही गाय वासरू सोडून हाताचा पंजा घेतलं. इंदिरा गांधींच्या हत्येनंतर राजीव गांधी पंतप्रधान झाले. तेव्हा व्ही. पी. सिंह यांनी काँग्रेस सोडून जनता दलाची स्थापना केली आणि ते भाजप आणि डाव्या पक्षांच्या मदतीने पंतप्रधान झाले. मात्र नंतर जनता दलही फुटला आणि त्यातून जनता दल, जनता दल (यू). राजद, जद (एस). सपा हे नवे राजकीय पक्ष तयार झाले.
विविध राज्यांमध्येही अनेक काँग्रेस नेत्यांनी काँग्रेसला रामराम करीत नवा सवतासुभा मांडला. यात पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस, (पश्चिम बंगालमध्ये तृणमूलच्या ममता बॅनर्जी यांच्याकडे एकछत्री सत्ता आहे) आंध्र प्रदेशमध्ये वायएसआर काँग्रेस, (सध्या वायएसआरचे जगनमोहन आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री आहेत) महाराष्ट्रात शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस, (मात्र राष्ट्रवादीला स्वबळावर महाराष्ट्रात स्वतःचा मुख्यमंत्री बसवता आलेला नाही.) छत्तीसगढमध्ये अजीत जोगी यांच्या जनता काँग्रेस, बीजू पटनायक यांचा बीजू जनता दल, चौधरी चरणसिंह यांचा लोकदल, मुफ्ती मोहम्मद सईद यांचा नॅशनल कॉन्फ्रेन्स (मुफ्ती आणि त्यांची मुलगी मेहबूबा काश्मीरच्या मुख्यमंत्रीपदी होते). असे काही पक्ष हे मूळच्या काँग्रेसी नेत्यांचेच आहेत. याशिवाय काँग्रेस सोडून पुन्हा काँग्रेसमध्ये आलेल्या नेत्यांची संख्याही मोठ्या प्रमाणावर आहे. यात प्रामुख्याने प्रणब मुखर्जी, अर्जुन सिंह, माधवराव शिंदे, एन. डी. तिवारी, पी. चिदंबरम यांची नावे घेता येतील.
गेल्या एक-दोन वर्षांपासून काँग्रेस सोडून जाणाऱ्या मोठ्या नेत्यांची संख्याही वाढू लागलीय. पहिला झटका ज्योतिरादित्य शिंदे यांनी दिला. त्यांनी काँग्रेसचा हात सोडून भाजपशी नाते जोडले आणि मध्यप्रदेशमध्ये काँग्रेसची सत्ता गेली. महाराष्ट्रातही नारायण राणे यांनी अगोदर शिवसेना आणि नंतर काँग्रेस सोडून स्वतःचा पक्ष स्थापन केला. पण नंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करीत स्वतःचा पक्ष भाजपमध्ये विलीन केला, आज ते केंद्रात मंत्री आहेत.
आता कॅप्टन अमरिंदर यांनी काँग्रेसला झटका देण्याचा निर्णय घेतलाय. पुढील वर्षी पंजाबमध्ये निवडणुका होणार आहेत. कॅप्टन भाजपच्या मदतीने मुख्यमंत्रीपद पटकावण्याच्या प्रयत्नात आहेत. ज्या पक्षाचं संपूर्ण देशावर एकछत्री राज्य होतं तो पक्ष आता एक-दोन राज्यापुरताच मर्यादित राहिल्यानं एकूणच काँग्रेस हळूहळू संपुष्टाकडे चाललीय का असा प्रश्न यानिमित्तानं राजकीय वर्तुळात विचारला जाऊ लागला आहे.