(Source: ECI/ABP News/ABP Majha)
BLOG | 'क्रिकेट पन्नाशी'तले लिट्ल मास्टर!
कसोटी क्रिकेटमध्ये सलामीला खेळताना सुनील गावस्कर यांनी दोन खणखणीत माईलस्टोन पूर्ण केले. त्यांनी 10 हजार 122 धावा आणि 34 शतकांची वेस पार केलीय. हे म्हणायला नुसतं एक वाक्य आहे, पण हा भारतीय क्रिकेटचा अजरामर आणि अविस्मरणीय इतिहास आहे. हे सगळं कसोटी क्रिकेटमध्ये, भारतीय क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच घडलेलं.
द ग्रेट सुनील गावस्कर यांच्या कसोटी पदार्पणाला 50 वर्ष झाल्याची पोस्ट आज सकाळीच मला आली. ज्येष्ठ सिने लेखक, क्रिकेटचे दर्दी फॅन दिलीप ठाकूर यांनी पाठवलेली ती पोस्ट वाचली. ज्यात क्रिकेटसह काही सिने संदर्भही होते.
आमची पिढी जेव्हा क्रिकेट पाहायला लागली, किंबहुना आमच्या पिढीला जेव्हा क्रिकेट थोडं बहुत कळू लागलं, तेव्हाचा काळ म्हणजे 1986-87 चा. सुनील मनोहर गावस्कर अर्थात द ग्रेट सनी गावस्कर यांच्या कारकीर्दीचा तो उत्तरार्ध होता. त्याच वेळी कलर टीव्हीचं युग भारतात सुरु होऊन काही वर्षे झाली होती. एकीकडे टीव्हीचा पडदा रंगीत झाला, दुसरीकडे भारतीय क्रिकेटमध्येही विजयाचा नवा रंग उधळला गेला. भारताने 1983 मध्ये वनडेचा वर्ल्डकप जिंकला. त्या काळी दादा असलेल्या विंडीज संघाला त्यांनी धूळ चारली. वनडे क्रिकेटमध्ये मानाचं सुवर्णपान खोवलं गेलं असताना कसोटी क्रिकेटमध्ये लखलखणाऱ्या एका भारतीय हिऱ्याने त्याच काळात जगभरातील साऱ्यांचेच डोळे दिपवले होते. त्यांचं नाव सुनील गावसकर जे त्या विश्वविजयी वनडे टीमचेही सदस्य राहिलेत.
कसोटी क्रिकेटमध्ये सलामीला खेळताना सुनील गावस्कर यांनी दोन खणखणीत माईलस्टोन पूर्ण केले. कसोटी क्रिकेटमधील 10 हजार धावा आणि 34 शतके. गावस्करांनी 100 हून अधिक वनडे सामनेही खेळले असले तरी गावस्करांची करिअर साकारली त्या काळात कसोटी क्रिकेटचंच गारुड सर्वांवर होतं. कसोटी क्रिकेट हेच अस्सल आणि खरं क्रिकेट असं मानणारा तो काळ होता. (आजही वनडे, ट्वेन्टी-20 जास्त लोकप्रिय झालं असलं तरी माझ्या पिढीच्या माझ्यासारख्या काही मंडळींना कसोटी क्रिकेटमधील सेशन बाय सेशन बदलत जाणारा खेळ पाहणं हा हृदयात जपून ठेवण्यासारखा कप्पा वाटतो.)
ज्या काळात मार्शल, रॉबर्टस, होल्डिंग, ओल्ड, अरनॉल्ड, विलीस, बॉथम, लिली, थॉमसन, इम्रान खान, सरफराज नवाझ, सर रिचर्ड हॅडली यासारखे तोफखाने आग ओकत. एकेका स्पेलमध्ये समोरच्या टीमच्या बॅटिंगचा पालापाचोळा करत. त्या गोलंदाजांसमोर गावस्कर सलामीला येऊन भारतीय धावसंख्येची मूळं मजबूत करत. फलंदाजांची परीक्षा घेणाऱ्या खेळपट्ट्यांवर हेल्मेटविना खेळताना, कधी फक्त स्कल कॅपचा आधार घेताना गावस्कर या निखाऱ्यावरुन चाललेत. त्यांनी 10 हजार 122 धावा आणि 34 शतकांची वेस पार केलीय. हे म्हणायला नुसतं एक वाक्य आहे, पण हा भारतीय क्रिकेटचा अजरामर आणि अविस्मरणीय इतिहास आहे. हे सगळं कसोटी क्रिकेटमध्ये, भारतीय क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच घडलेलं. एक मराठी माणूस आंतरराष्ट्रीय स्तरावर ही पताका डौलाने फडकवत होता. म्हणजे एका मोठ्या स्टेजवर जाऊन तिथे आपली मुद्रा उमटवणारा हा खेळाडू भारतीय आणि त्यातही मराठी होता, या विचाराने आजही छाती अभिमानाने फुलून येते.
आमच्या पिढीने सचिन, सेहवाग, कोहली, रोहित घडताना पाहिले, हे आमचं भाग्य. पण, आमच्या पिढीला गावसकर, वाडेकर आणि त्यांच्या आधीचे ग्रेट्स घडताना नाही पाहता आले, ही रुखरुख, सल मनात कायम राहिल. असं असलं तरीही गावस्करांची महानता ठसवणाऱ्या अनेक इनिंग्जबद्दल आम्ही दिलीप ठाकूर, द्वारकानाथ संझगिरी सर यांच्या पिढीकडून भरभरुन ऐकलंय. वेगवान गोलंदाजीसमोर कणखरपणे उभं राहून खोऱ्याने धावा करता येतात, हे गावस्करांच्या दस हजारी परफॉर्मन्सने प्रूव्ह केलंय. त्या शाखेतून मग द्रविड, लक्ष्मण, पुजारासारखे संयमी, क्लासी फलंदाज तर जन्मलेच. शिवाय सचिन, कोहली यांच्यासारखे चॅम्पियनही उदयाला आले. ज्यांचा बचाव हा आक्रमणाइतकाच वरच्या दर्जाचा आहे. फलंदाजीसोबतच उत्तम कॅचेस घेणारे क्षेत्ररक्षक म्हणूनही गावसकरांचा लौकिक राहिलाय.
निवृत्त झाल्यानंतर समालोचनातून, स्तंभलेखनातून गावस्कर यांच्या क्रिकेटमधील सखोल ज्ञानाचं दर्शन घडत असतं. कधी भारतीय खेळाडूंच्या खटकलेल्या गोष्टींवर परखडपणे बोट ठेवत तर कधी परदेशी माजी खेळाडूंच्या शेरेबाजीवर आपल्या खास शैलीत टोलेबाजी करत गावस्करांनी अनेकांची तोंडं बंद केलीयेत.
त्यांची कॉमेंट्री ऐकणं हा एक श्रवणीय अनुभव असतो. म्हणजे तंत्रशुद्ध फलंदाजीचं विद्यापीठ असलेले गावस्कर जणू त्या त्या मॅच सिच्युएशनवर बोलत असतात, तेव्हा क्रिकेटचा सोप्या भाषेतील क्लासच सुरु आहे, असं वाटतं.
त्यांच्यात एक खोडकर मूलही दडलेलं आहे. काही निवडक कार्यक्रमांमध्ये जेव्हा ते काही नकला करुन दाखवतात तेव्हा याचा प्रत्यय येतो. त्यांचा फिटनेसही अत्यंत उच्च दर्जाचा आहे. तो तसाच राहो. आजच्या दिवसाच्या निमित्ताने सनी सर, तुम्हाला उत्तम आरोग्यासाठी, दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा.
अश्विन बापट यांचे अन्य ब्लॉग
BLOG | ऐतिहासिक! अविस्मरणीय... 'अजिंक्य' भारत