BLOG : अंदाज-ए-इलाही...
ख्यातनाम गझलकार इलाही जमादार यांचं आज निधन झालं. त्यानंतर त्यांचे अत्यंत जवळचे मित्र गझलनवाज भीमराव पांचाळेंशी संवाद साधला. इलाहींच्या रचना, त्यांच्या लेखणीची, स्वभावाची वैशिष्ट्ये, त्यांच्यातली मैत्री याबद्दल भीमराव भरभरुन बोलले.
ऑफिसला पोहोचत असताना वाटेतच व्हॉट्सअपवर मेसेज आला. गजल रुसली, इलाही निवर्तले..
तसं इलाहींना भेटण्याचा किंवा त्यांच्याशी संवाद साधण्याचा योग कधी आला नाही, तरी त्यांच्या ज्या काही गझला भीमरावांकडून ऐकल्यात, त्यामुळे त्यांच्या शब्दसौंदर्याविषयी आणि शब्दसौष्ठवाविषयी जाणून होतो. त्यामुळे मनाला चटका लागला.
मग, त्यांची एव्हरग्रीन रचना ‘अंदाज आरशाचा’ आठवली. गझलनवाज भीमराव पांचाळेंच्या कार्यक्रमात अनेकदा ऐकलेली. इलाहींच्या गझलांमधले शब्द नुसते काळजाला भिडत नाहीत तर, ते काळजाचाच एक भाग होऊन जातात. ‘ वाचलेली, ऐकलेली माणसे गेली कुठे? पुस्तकातून पाहिलेली माणसे गेली कुठे?’ म्हणत ते आपल्याला याच गझलमधून उत्तर मागताना अंतर्मुख करतात. सोप्या शब्दांमध्ये आभाळाएवढा आशय पोहोचवण्याची ताकद इलाहींच्या रचनांमध्ये होती. त्यातही इलाही आणि भीमराव हा संगम अद्वितीयच म्हणावा लागेल. इलाहींचे शब्द भीमरावांकडून ऐकणं, ही अविस्मरणीय अनुभूती आहे. इलाहींच्या शब्दांचा बाज, त्याचं सौंदर्य राखत त्यांना आलापीत झुलवणं असेल किंवा समेवर आणून ठेवताना त्या शब्दांचं वजन तितक्याच ताकदीने पोहोचवणं असेल, हा अनुभव मनात साठवून ठेवावा असाच.
Gazalkar Ilahi Jamadar | प्रसिद्ध गझलकार इलाही जमादार यांचं निधन, वयाच्या 74व्या वर्षी अखेरचा श्वास
इलाहींच्या निधनाची बातमी पोहोचताच भीमरावांचा कंठही दाटून आला. त्यांनी आमच्या चॅनलशी फोनवरुन संवाद साधत आपल्या भावना व्यक्त केल्या. तरीही इलाहींबद्दल आणखी जाणून घ्यावं, म्हणून मी भीमरावांना फोन केला, तेव्हा इलाहींबद्दल भीमराव भरभरुन बोलले. ते म्हणाले, आमची पहिली भेट 1983 मध्ये. म्हणजे इलाहींची आणि माझी मैत्री 38 वर्ष जुनी आहे. तंत्रशुद्ध आशयघन गझल हे त्यांचं वैशिष्ट्य. त्यांच्या रचनांमध्ये क्लिष्टता नाही. किंबहुना जखमा सुगंधी असू शकतात हा परिचय मराठी माणसाला झाला तो त्यांच्यामुळेच. आज मात्र इलाही आपल्याला कधीही न भरुन येणारी जखम देऊन निघून गेलेत.
माझ्या मैफलीची सुरुवात त्यांच्या गझलनेच व्हायची. अगदी अलिकडे म्हणजे डिसेंबर महिन्यात मी ‘महफिल–ए-इलाही’ हा इलाहींच्या रचनांवर आधारित कार्यक्रम सादर केला.
व्यक्ती म्हणूनही इलाहींचा साधेपणा मनाला नेहमीच भावलाय, त्यांच्या वागण्याबोलण्यात कोणताही अभिनिवेश नसे. मोठा गझलकार असल्याचाही आविर्भाव नसायचा. असा हा माझा मित्र, कुटुंबातला सदस्य मी आज गमावलाय.
भीमराव म्हणतात त्यानुसार, मोठेपणाचा दर्प जरी इलाहींच्या वागण्याबोलण्यात नसला तरी त्यांच्या शब्दांचा सुगंध आपल्या आयुष्यात कायम दरवळत राहणार आहे.
भीमरावांनी इलाहींबद्दलच्या या संवादाची सांगता करताना म्हटलं, इलाहींच्या या ओळी माझ्या कार्यक्रमात गायच्या राहून गेल्या. या ओळी ते शब्दश: खरे करुन गेलेत.
या क्षितिजाच्या पल्याड निघूनि जावे म्हणतो,
आकाशाला कायमचे टाळावे म्हणतो...