BLOG : 2020 वर्ष सरले.. काय विरले..काय उरले??
2020 वर्षात कोरोनाने माणूस म्हणून आपल्याला नव्याने घडण्याची, अधिक सुजाण, सुज्ञ होण्याची संधी दिलीय. ती भरभरून घेऊया.नवीन वर्षात अधिक शिस्तप्रिय होऊन वाटचाल करुया. सर्वांना 2021 साठी सुखसमृद्धीच्या, उत्तम आरोग्याच्या, दीर्घायुष्याच्या शुभेच्छा.
वेगळ्या अर्थाने अविस्मरणीय वर्ष म्हणून 2020 चं वर्णन करावं लागेल. वर्षाच्या सुरुवातीपासूनच कोरोनाची लागलेली कुणकुण आणि मार्चनंतर झालेला प्रकोप आपण साऱ्यांनीच अनुभवला. या मार्च ते आता डिसेंबर या काळात आपण माणूस म्हणून बरंच काही शिकलो, अजूनही शिकतोय. कारण, संकटाची तीव्रता कमी झाली असली तरी ते पूर्ण सरलेलं नाही.
सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वयंशिस्त किती आवश्यक आहे हे या वर्षाने आपल्याला ठसवून सांगितलं. म्हणजे ज्या गोष्टी आपली वडिलधारी मंडळी आपल्याला सांगायची की, हातपाय स्वच्छ धुवा, गरम पाणी प्या. त्याच उपायांची ढाल या कोरोनासुराशी लढताना आपल्याला उपयोगी पडतेय. त्यात भर पडली ती मास्कची. पण, ही मास्क लावण्याची सवय आपण कायम स्वरुपी लावून घेतली तर इथून पुढच्या काळात अशा आजारांना आपण दूर ठेवू शकू. या खेरीज हेल्दी फूड खाणं, जीवनसत्त्वयुक्त आहार ठेवण्याचा मंत्रही या वर्षाने दिला. जिभेचे चोचले म्हणून काही वेळा जंक फूड किंवा तेलयुक्त, मसालेदार पदार्थ ठीक आहेत. पण, ती आपली आहार पद्धती होत चालली होती, त्याला कोरोनाने ब्रेक लावला. आता आहाराबद्दल आपण अधिक जागरुक झालोय, असं दिसतंय तरी. प्रतिकार शक्ती वाढवण्याला पोषक आहार किती गरजेचा आहे हे कोरोनाने अधोरेखित केलं. त्याचमुळे 104 वर्षांचे आजीआजोबाही ठीक होऊन घरी परतले तर, तिशी-चाळीशीतल्यांना मात्र काही वेळा त्रास झाला, काही जण जिवाला मुकले देखील. मानसिक ताकदही इकडे मॅटर करते, हेही कोरोनाने दाखवून दिलं. म्हणजे आपल्याला कोरोना डिटेक्ट झालाय, हे कळल्यानंतरची तुमची मानसिक स्थिती हाही या काळात क्रुशल फॅक्टर ठरला.
आहारासोबतच विहार करताना म्हणजे बाहेर जाऊन फिरणं असेल किंवा कामानिमित्त जाणं असेल. तिथेही आपल्या अंगी अधिक शिस्त आलीय किंबहुना येणाऱ्या काळात ती आणखी यावी असं वाटतं. म्हणजे वारंवार हात धुत राहणे, आपण ज्या ठिकाणी काम करतो, ती जागा स्वच्छ ठेवणे. अनावश्यक गर्दी न करणं, या साध्या साध्या गोष्टींचं पालन आपण नक्कीच करु शकतो. तितके सुज्ञ आपण आहोत.
याचसोबत आणखी एक महत्त्वाची बाब आपण शिकलो ती, आहे त्या पैशात आणि आहे त्या वस्तुंमध्ये भागवणं. अनावश्यक खर्च न करणं. आठ महिन्यात खरेदी न करताही राहिलो की आपण. कुठे लागली गरज नव्या कपड्यांची. चैनीच्या वस्तुंची, हा सारा माईंड गेम होता हे आता दिसून आलं.
या होत्या व्यक्तिनिष्ठित बाबी. पण, समाज म्हणून आपण अधिक सतर्क, शिस्तबद्ध झालोय का? तु्म्ही आम्ही प्रत्येकाने स्वत:ला हा प्रश्न विचारायला हवा. माझं घर मी स्वच्छ ठेवतो, पण, माझा परिसर, माझं शहर, माझं राज्य, माझा देश याचं काय? अशा महामारीचा मुकाबला करताना हे कलेक्टिव्ह फाईटिंग स्पिरीट फार महत्त्वाचं आहे.
तुम्ही आम्ही या वर्षात अनेक प्रियजनांना गमावलं. बहुतेकांना कोरोनामुळे. ज्याला जन्म आहे त्याला मृत्यू आहे, हा सृष्टीचा नियम मानला तरी अशा एखाद्या रोगाने माणसं आपल्यातून इतक्या संख्येने जाणं, हे मनाला चटका लावणारं होतं. जी आपल्या जगण्याचा भाग होती, अशी माणसं या काळात आठवणींचा भाग झाली, हे मन स्वीकारतच नाहीये.
कोरोना काळाने आणखी एक बाब प्रूव्ह झाली, कोणत्याही गोष्टीचा अनावश्यक माज करु नये. पैसा, मटेरियल प्लेजर्स म्हणजे सर्व काही नाही. आरोग्य हीच खरी संपत्ती. हेच सिद्ध झालं.
या वर्षाला निरोप देताना आरोग्य सेवक, अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी मग, स्वच्छता करणारे असो, वा वाहतूक सेवेतील. यांच्याही प्रती कृतज्ञता बाळगूया. अगदी गॅस सिलेंडर आपल्या घरपोच पोहोचवणारे डिलिव्हरी बॉय, भाजीवाले, दूधवाले, पेपरवाले, फुलवाले साऱ्यांचंच ऋण मानायला हवं. ही मंडळी नसती तर आपलं आयुष्य कोरोना काळात असह्य झालं असतं.
इकडे जाता जाता बच्चे कंपनीचीही पाठ थोपटायला हवी. या कोरोना सिच्युएशनला त्यांनी भारी जुळवून घेतलं. म्हणजे शाळा बंद, गार्डनमध्ये जायचं नाही, अगदी घराच्या बाहेरही पडायचं नाही. असा जो काळ होता, त्यातही या छोट्या मंडळींनी दाखवलेला संयम कौतुकास्पद होता.
वर्क फ्रॉम होम हा आतापर्यंत ऐकलेला शब्द आता जगण्याचा भाग झाला. इंटरनेट क्रांतीने मोठा हात दिला. इथून पुढच्या काळात तंत्रज्ञान किती ग्रेट रोल आयुष्यात प्ले करु शकतो, याचा आरसा म्हणजे सरतं वर्ष.
सरत्या वर्षाला निरोप देताना मित्रपरिवार तसंच कुटुंबातील आपल्या माणसांना गमावल्याची बोच आहेच. तो ओरखडा मनावरुन जाईल असं वाटत नाही, त्याच वेळी माणूस म्हणून बरंच काही शिकल्याची किंवा शिकण्याची गरज असल्याची भावनाही आहे. प्रत्येक संकट तुम्हाला नवी संधी दाखवत असतं, असं म्हणतात. कोरोनाने माणूस म्हणून आपल्याला नव्याने घडण्याची, अधिक सुजाण, सुज्ञ होण्याची संधी दिलीय. ती भरभरून घेऊया.
नवीन वर्षात अधिक शिस्तप्रिय होऊन वाटचाल करुया. सर्वांना 2021 साठी सुखसमृद्धीच्या, उत्तम आरोग्याच्या, दीर्घायुष्याच्या शुभेच्छा.
अश्विन बापट यांचे अन्य ब्लॉग :