एक्स्प्लोर
‘कोसळं’दाजी थांबणार कशी?
अगदी अलिकडच्या काळातही सचिन, राहुल द्रविड, व्ही.व्ही.एस.लक्ष्मण यांनी डोक्यावर बर्फ ठेवून खेळण्याचा आदर्श दाखवला होता. तो बर्फ तर वितळलाच,पण साधे त्या पाण्याचे थेंबही आता उरले नाहीत का? असं वाटण्याइतकी कसोटी क्रिकेटची स्थिती आहे, विशेषत: परदेश भूमीतील भारतीय फलंदाजीची.
![‘कोसळं’दाजी थांबणार कशी? Ashwin Bapat's blog India vs England Test Match ‘कोसळं’दाजी थांबणार कशी?](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/08/14233635/ind-eng.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
फोटो सौजन्य - ट्विटर
ऐतिहासिक लॉर्डस मैदानावर रुट अँड कंपनीने टीम इंडियाला डावाने चीत केलं आणि पुन्हा चर्चा सुरु झाली ती परदेशातील भारतीय फलंदाजांच्या निराशाजनक कामगिरीची. देशामध्ये मेरिटमध्ये येणारे बॅट्समन परदेशात ३५ मार्कांनाही तरसतात. बरं, या लाईनअपमध्ये नवखे फलंदाज आहेत म्हणावं तर तेही नाहीत. त्यात आहेत, विजय, राहुल, पुजारा, रहाणे. यातला राहुल सोडला तर इतर तिन्ही फलंदाज हे कसोटी क्रिकेटमध्ये बऱ्यापैकी स्थिरावलेले. तंत्रात, टेम्परामेंटमध्ये स्वत:ला सिद्ध केलेले. मात्र लॉर्डसवर पावसाच्या व्यत्ययामुळे खेळ वाया जाऊनही दुसऱ्या दिवशी सुरु झालेला हा कसोटी सामना चौथ्या दिवशीच संपतो. त्यात टीम इंडिया दोन्ही डावात अनुक्रमे ३५.२ आणि ४७ ओव्हर्समध्येच गाशा गुंडाळते. धक्कादायक होतं.
पण, हे का झालं? कोहलीच्या मते इट्स अ मेंटल थिंग. मानसिक दुखणं. या फलंदाजांचा क्लास पाहताना खरं तर तसंच वाटतंय. कारण, इतकी शरणागती पत्करुन सपशेल नांगी टाकणारे आपले फलंदाज इतके कुचकामी नाहीत. होय, दोन कसोटी सामने हरुनही मला असं वाटतंय की, आपण अधिक चांगलं परफॉर्म करु शकतो. मात्र, त्यासाठी आगामी कसोटी सामन्यांमध्ये प्रचंड शिस्तबद्ध, नियोजनबद्ध खेळ व्हायला हवा. खास करुन कोहली वगळता अन्य बॅट्समनकडून.
आपल्याला धोका अर्थातच अँडरसन, ब्रॉडकडून आहे. दोघेही उंचेपुरे आहेत. एकाचं बलस्थान स्विंग तर दुसरा उंचीमुळे बाऊन्स मिळवतो.
अँडरसनचा आऊटस्विंगर सध्या इतका स्वप्नवत वाटतोय की, त्याच्या हातून चेंडू सुटल्यावर बॅटचा अलगद किस घेऊन विकेटकीपर किंवा अन्य क्षेत्ररक्षकांना मिठी मारतो. नंतर फलंदाजाला कळतं की, आपली शिकार झालीय. त्याच वेळी गेल्या कसोटीत वोक्स सरप्राईज पॅकेज ठरला. म्हणजे बॅटिंगमध्येही आणि बॉलिंगमध्येही. संकटात असताना बेअरस्टोच्या साथीने त्याने केलेल्या मोठ्या भागीदारीने भारतासाठी विजयाचं दार पूर्णपणे लॉक केलं. इंग्लंडच्या कसोटी टीमची डेप्थ बघा. स्टोक्स गेला आणि वोक्स आला, रिझल्ट सेम. अजून मोईन अली बाहेर आहे.
परदेश भूमीवर कसोटी सामन्यात तुम्हाला तग धरायचं असेल तर खेळपट्टीवर ठाण मांडल्याशिवाय पर्याय नाही. सध्या झालंय काय की, वनडे, टी-ट्वेन्टी सामन्यांची संख्या इतकी वाढलीय, की कुणीही खेळपट्टीवर नांगर टाकायला तयार नाही. फटके खेळायची घाई होतेय. त्यामुळेच कसोटी क्रिकेटचा रिझल्ट मिळण्याचं पर्सेंटेंजही वाढलं असेल कदाचित. पण, कसोटी क्रिकेटचं सौंदर्यस्थान जे खेळपट्टीवर उभं राहून गोलंदाजाच्या संयमाची कसोटी पाहणं, हे सातत्याने व्हायचं, तेच लोप पावतंय. आपल्याकडे गावसकर, मांजरेकरांनी ते दाखवून दिलंय. किंबहुना ‘यू गिव्ह वन अवर टू द बोलर नेक्स्ट फाईव्ह अवर्स विल बी युअर्स’. हे कसोटी क्रिकेटमधलं महत्त्वाचं बिरुद होतं.
अगदी अलिकडच्या काळातही सचिन, राहुल द्रविड, व्ही.व्ही.एस.लक्ष्मण यांनी डोक्यावर बर्फ ठेवून खेळण्याचा आदर्श दाखवला होता. तो बर्फ तर वितळलाच,पण साधे त्या पाण्याचे थेंबही आता उरले नाहीत का? असं वाटण्याइतकी कसोटी क्रिकेटची स्थिती आहे, विशेषत: परदेश भूमीतील भारतीय फलंदाजीची.
कमिंग बॅक टू थर्ड टेस्ट. या कसोटीत जर कमबॅक करायचा असेल तर बॅट्समनना प्रचंड भारी टेम्परामेंट, पेशन्स दाखवावा लागेल. विशेषत: ओपनर्सना. म्हणजे मिडल ऑर्डर न्यू बॉलला एक्सपोज होणार नाही, याची दक्षता घ्यावी लागेल. रन्स नाही झाले तरी चालतील. पण, विकेट न गमावणं, फार महत्त्वाचं आहे. यासाठी विजय, धवन आणि राहुल यांच्यावरच भिस्त आहे. त्यातल्या त्यात गेल्या वेळी थोडा पेशन्स दाखवला तो पुजारा आणि रहाणे यांनी. पुजाराने दोन्ही डावात १०६ आणि ४१ मिनिटे तग धरला तर रहाणेने त्याच्या दोन डावांमध्ये ९९ आणि ५५ मिनिटं खिंड लढवली. हार्दिक पंड्यानेही दुसऱ्या डावात ८६ मिनिटं खेळून काढत क्षमतेची चुणूक दाखवलीय. या साऱ्यांचे एकत्रित प्रयत्न फळाला यावेत, ही अपेक्षा.
कोहलीच्या पाठीची दुखापत त्याला किती सतावते हेही क्रुशल ठरणार आहे. तरीही कोहलीचा फायटर स्वभाव पाहता तो नक्की दुखापतीतून बाहेर येईल आणि कसोटी मालिकेत ज्या स्थितीत (०-२ पिछाडीवर) टीम इंडिया आहे, ते पाहता टीमला यातून तारण्यासाठी तो नक्की मैदानात उतरेल.
बॉलिंग फ्रंटवर आपल्याला दिलासा आहे, म्हणजे शमी, ईशांत चांगल्या बॉलिंग फॉर्ममध्ये आहेत. तरीही दोघांनीही न्यू बॉलवर आणखी कन्सिस्टंटली चेंडूचा दिशा, टप्पा योग्य राखावा. आणखी एका आशादायी चित्र म्हणजे बुमरा फिट झालाय. त्याचा हुकमी यॉर्कर टेस्ट क्रिकेटमध्ये मॅटर करेल. दक्षिण आफ्रिकन खेळपट्ट्यांवर त्याच्या गोलंदाजीत अजिबात नवखेपणा दिसत नव्हता. सो तिसऱ्या कसोटीत कुलदीपच्या जागी बुमराच खेळेल, अशी आताची शक्यता आहे.
आपण, दोन्ही मॅचेसवर नजर टाकली तर आपल्याला लक्षात येईल की इंग्लंडची आघाडीची फळी कापून काढल्यावर आपल्याला त्यांची मिडल आणि लोअर मिडल ऑर्डर त्रास देतेय, म्हणजे गेल्या वेळी एजबॅस्टनला करन नडला तर यावेळी बेअरस्टो-स्टोक्स.
हा पॉईंट लक्षात घेत एकदा मिळालेली सामन्यावरची ग्रिप सुटणार नाही, याच्यावर लक्ष द्यायला हवं. मालिकेतली जान राखण्यासाठी ही तिसरी कसोटी जिंकण्याचा प्रयत्न व्हावा.
इथून पुढचा प्रत्येक पेपर कठीण असणार आहे. तेव्हा मार्कशीटमध्ये नापासाचा आणखी एक शिक्का नसो असेल तर उत्तम अभ्यासासोबतच कोणते प्रश्न कोणी सोडवायचे, याचं प्लॅनिंग नीट झालं पाहिजे. मंजिल मुश्किल जरुर है.... मगर नामुमकिन नही....
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
बॉलीवूड
नाशिक
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)