गरीब, गरजू रुग्णांना नाहक त्रास; MPJAY चे आरोग्य मित्र बेमुदत संपावर, राज्यभर धरणे आंदोलन
राज्य शासनाकडे विविध मागण्या करत आरोग्यमित्र आज धरणे आंदोलनावर बसले असून बेमुदत संप असल्याचं त्यांनी म्हटलं. त्यामुळे, आता शासन त्यांच्या मागण्यांकडे लक्ष देणार का असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

मुंबई : राज्य सरकारच्या महात्मा फुले जनआरोग्य योजनेच्या (Mahatma phule janarogya yojana) माध्यमातून सर्वसामान्य व गरीब रुग्णांना 5 लाख रुपयांपर्यंचे मोफत उपचार देण्याची योजना सरकारने सुरू केली आहे. त्यासोबतच, आयुष्यमान भारत कार्डच्या माध्यमातून देखील रुग्णांना ठराविक रुग्णालयात मोफत उपचार देण्यात येतात. मात्र, अद्यापही खरंच रुग्णालयात हा लाभ मिळतो का, रुग्णालयात रुग्णांना ह्या योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रचंड मानसिक त्रास सहन करावा लागतो. त्यामुळेच, या योजनेच्या मार्गदर्शनासाठी व योजना व रुग्णालय यांच्यातील महत्त्वाचा दुवा म्हणून आरोग्य मित्रांची नेमणूक करण्यात आली आहे. मात्र, या आरोग्य मित्रांनी आजपासून बेमुदत संप (Strike) पुकारला आहे. राज्य शासनाकडे विविध मागण्या करत आरोग्यमित्र आज धरणे आंदोलनावर बसले असून बेमुदत संप असल्याचं त्यांनी म्हटलं. त्यामुळे, आता शासन त्यांच्या मागण्यांकडे लक्ष देणार का असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
महाराष्ट्र आणि केंद्र शासनाच्या एकत्रित महात्मा फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचे काम करणारे आरोग्य मित्रांच्या मागण्या पूर्ण न झाल्यामुळे महाराष्ट्रातील सर्व आरोग्यमित्र आजपासून बेमुदत संपावर गेले असून गेल्या वर्षभरापासून पगारवाढी संदर्भात मागणी करून देखील पगार वाढ होत नसल्यामुळे अखेर त्यांनी बेमुदत संपाचं हत्यार उपसलं आहे. गेल्या अनेक वर्षापासून महाराष्ट्रातील आरोग्य मित्र हे पगार वाढी संदर्भात वारंवार पाठपुरावा करून मागणी करीत आहेत. मात्र, किमान वेतन कायद्यानुसार देखील आम्हाला पगारवाढ केली जात नाही. या संदर्भात आम्ही याआधीही देवाला संपर्क करणार असल्याचे प्रशासनाला कळविले होते. मात्र, अद्यापपर्यंत आमच्या मागणीवर कुठलाही विचार न झाल्यामुळे आम्ही आजपासून बेमुदत संप पुकारला असून, जोपर्यंत आमची मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही संप मागे घेणार नाही, अशी भूमिका आरोग्य मित्रांनी घेतली आहे.
जनआरोग्य योजनेतील आरोग्यमित्रांच्या मागण्या काय?
महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्याने आपल्या विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन सुरू केले आहे
आरोग्यमित्रांना दरमहा रु. 26,000 वेतन देण्यात यावे व किमान वेतन कायद्यानूसार स्पेशल अलाउन्स तथा महागाई भत्ता देण्यात यावा.
वेतनात दरवर्षी 10 टक्के वाढ करण्यात यावी, सर्व आरोग्यमित्रांना आजारपणाच्या रजा (एस.एल.) 10, किरकोळ रजा (सि.एल.) 10, विशेष अधिकार रजा (पी.एल.) 30, सणाच्या सुट्या 10 लागू कराव्यात. यासह अन्य मागण्यांचा समावेश या आंदोलनकर्त्यांनी आंदोलनातून केलाय.
हेही वाचा
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

