Makar Sankranti 2024 : मकर संक्रांतीला शनि होणार प्रसन्न; सर्व अडचणी होणार दूर, फक्त 'हे' एक काम नक्की करा
Makar Sankranti 2024 : मकर संक्रांत हा सूर्याची पूजा-उपासना करण्याचा सण आहे. मकर संक्रांतीच्या दिवशी शनि आणि सूर्याशी संबंधित ही गोष्ट नक्की वाचा, असं मानलं जातं की यामुळे शनीची वाईट दृष्टी दूर होते आणि घर संपत्तीने भरलेले राहते.
Makar Sankranti 2024 : वर्षभरात एकूण 12 संक्रांती असतात, परंतु यातील मकर संक्रांत (Makar Sankranti 2024) ही महत्वाची मानली जाते. यावर्षी मकर संक्रांत 15 जानेवारी 2024 रोजी आहे. मकर संक्रांती हा सूर्य आणि शनि यांच्या संयोगाचा दिवस आहे.
शनिदोषातून आराम मिळवण्यासाठी करा हे काम
असं म्हटलं जातं की, मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्याची काळ्या तीळाने पूजा केल्याने व्यक्तीला शनिदोषातून आराम मिळतो. याशिवाय, मकर संक्रांतीच्या निमित्ताने सूर्यदेव आणि शनिची कथा वाचल्याने जीवनात सुख-समृद्धी येते. तर ही मकर संक्रांतीची कथा जाणून घेऊया.
मकर संक्रांत कथा (Makar Sankranti Story)
पौराणिक कथांनुसार, सूर्यदेव आणि शनिदेव हे पिता-पुत्र नक्कीच होते, पण दोघांमधील नातं बिघडलेलं होतं. याचं कारण म्हणजे, सूर्यदेवाने शनिची आई छाया यांच्याशी केलेलं वर्तन. जेव्हा शनिदेवाचा जन्म झाला, तेव्हा सूर्याने शनिचा काळा रंग पाहिला आणि तो पत्नी छायाला म्हणाला की, हा आपला पुत्र असू शकत नाही. त्याने शनिला पुत्र म्हणून स्वीकारलं नाही आणि तेव्हापासून सूर्यदेवाने शनिदेव आणि त्याची आई छाया यांना वेगळं केलं. शनिदेव आणि माता छाया कुंभ नावाच्या घरात राहू लागले, परंतु सूर्याच्या या वागण्याने दुखावलेली पत्नी छाया यांनी सूर्यदेवाला कुष्ठरोगाचा शाप दिला.
सूर्यदेवाला झाला होता कुष्ठरोगाचा त्रास
वडिलांना कुष्ठरोगाने ग्रासलेलं पाहून त्यांचा मुलगा यमराज अत्यंत दु:खी झाला. यमराज हा सूर्याची पहिली पत्नी संयू हिच्यापासून झालेला मुलगा आहे. यमराजाने सूर्यदेवांना कुष्ठरोगापासून मुक्त केलं. जेव्हा सूर्य देव पूर्णपणे निरोगी झाला, तेव्हा त्याने आपलं लक्ष पूर्णपणे कुंभ राशीवर केंद्रित केलं. कालांतराने सूर्याने शनिदेवाचं घर कुंभ जळून खाक केलं, यानंतर शनी आणि त्याची आई छाया यांना त्रास सहन करावा लागला.
पुत्र शनीने काळ्या तीळांनी केलं सूर्याचं स्वागत
आपली सावत्र आई आणि भाऊ शनि यांची व्यथा यमराजाला पाहावली गेली नाही. यमराजाने वडील सूर्याला विनंती केली की, या दोघांना आता क्षमा करा. समजूत घातल्यानंतर सूर्यदेव शनीला भेटायला जातात. शनिदेव जेव्हा आपले वडील सूर्यदेव यांना येताना पाहतात, तेव्हा ते आपल्या जळालेल्या घराकडे पाहतात. ते घराच्या आत जातात आणि एका भांड्यात काही तीळ उरले होते, ते घेऊन येतात. शनिदेव या तीळांनी वडिलांचं स्वागत करतात.
अशा प्रकारे शनिदेवाला मिळालं 'मकर' घर
शनिदेवाच्या या वागण्याने सूर्यदेव प्रसन्न होतात आणि शनिदेवाला दुसरं घर देतात, ज्याचं नाव मकर आहे. यावर प्रसन्न होऊन शनिदेव म्हणतात की, जो कोणी मकर संक्रांतीला सूर्याची पूजा करेल त्याला शनीच्या महादशेपासून मुक्ती मिळेल आणि त्याचं घर धनाने भरून जाईल. म्हणून जेव्हा सूर्यदेव आपल्या मुलाच्या पहिल्या भावात, म्हणजेच मकर राशीत प्रवेश करतात तेव्हा त्याला मकर संक्रांत म्हणतात.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: