(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Shimla mirchi : सांगोल्याच्या ढोबळी मिरचीला मिळाला 101 रुपयांचा दर, बळीराम चव्हाण यांना लाखोंचा नफा
Agriculture News : सांगोला तालुक्यातील एका शेतकऱ्यानं ढोबळी मिरचीच्या (Shimla mirchi) पिकातून भरघोस उत्पन्न घेतलं आहे.
Agriculture News : सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील एका शेतकऱ्यानं ढोबळी मिरचीच्या (Shimla mirchi) पिकातून भरघोस उत्पन्न घेतलं आहे. बळीराम चव्हाण असं शेतकऱ्याचं नाव आहे. सांगोला तालुक्यातील अचकदाणी हे त्याचं गाव आहे. चव्हाण यांच्या ढोबळी मिरचीला प्रतिकिलोला चक्क 101 रुपयांचा दर मिळाला आहे. एवढा विक्रमी भाव मिळाल्याने बळीराम चव्हाण याना लाखोंचं उत्पन्न मिळालं आहे.
हिमाचल प्रदेशात सुरु असलेल्या पुरस्थितीमुळं उत्तर भारतात जाणारे येथील शिमला मिरचीचे पीक वाया गेल्याने महाराष्ट्रातील शिमला मिरची नेण्यासाठी आता दिल्लीतील व्यापारी थेट बांधावर पोहोचू लागले आहेत. त्यामुळेच चांगल्या दर्जाच्या शिमला मिरचीला थेट बांधावर 101 रुपये किलो एवढा भाव देऊन दिल्लीतील व्यापाऱ्याने सांगोल्यातील बळीराम चव्हाण याना लाखो रुपये जागेवर दिले आहेत.
डाळिंबाचे पीक काढून घेतले मिरचीचे पीक
सांगोला तालुका दुष्काळी तालुका आहे. इथं शेती करणं म्हणजे तारेवरची कसरत करावी लागते. तरीही प्रतिकुल परिस्थितीवर मात करत अचकदाणी येथील शेतकरी बळीराम चव्हाण यांनी सतत नुकसानीत असलेले डाळिंबाचे पीक काढून येथे तीन एकरात शिमला मिरचीची लागवड केली होती. पहिल्या तोड्याला 74 रुपये एवढा भाव मिळाला होता. या दरम्यान हिमाचलमध्ये पूरस्थिती झाल्यानंतर उत्तर भारतातील व्यापाऱ्यांनी महाराष्ट्रातील चांगल्या क्वालिटीची शिमला मिरची खरेदीसाठी पाहणी सुरु केली. सांगोला तालुक्यातील अचकदाणी येथील चव्हाण यांच्या शेतातील मल्चिंगवर लावलेली शिमला मिरची पाहून या व्यापाऱ्याने जागेवर 101 रुपये प्रति किलो एवढा भाव दिला आहे. याशिवाय पुढील दोन महिने बांधावरुन चालू भावाप्रमाणे मिरची उचलण्याचा शब्द दिला आहे.
महाराष्ट्रातील शिमला मिरची चांगल्या प्रतीची असते. मात्र, येथून वाहतूक लांब पडत असल्याने आपला माल कमी भावाने खरेदी केला जात असतो. दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहार, कोलकाता या भागातून व्यापारी येथील शिमला मिरचीची खरेदी करत असतात. हिमाचल प्रदेश आणि उत्तर भारतातील पुरस्थितीचा फायदा यंदा आपल्याला मिळत असून पुढील दोन महिने मिरची उत्पादकांना लाखोंची नफा मिळणार आहेत.
तीन एकरात 50 हजार रोपांची लागन
चव्हाण यांनी आपल्या तीन एकरात 50 हजार रोपे लावली होती. हा त्यांचा दुसराच तोडा असून आज 12 टन माल हा 101 रुपये दराने गेल्याने त्यांना 12 लाखांचे उत्पन्न या दुसऱ्या तोड्यात मिळाले आहे. आता दर 10 दिवसांनी होणाऱ्या प्रत्येक तोड्यात शिमला मिरचीचे दर वाढतच जाणार आहेत. चव्हाण यांच्या शेतात 150 ग्रॅमपासून 250 ग्रॅम वजनाची एक एक मिरची असून पहिल्या तोड्यात त्यांचा यासाठीच झालेला सगळा खर्च निघून गेल्याने आता मिळेल ते सर्व उत्पन्न फायदा असणार आहे .
50 लाखापेक्षा जास्तच नफा होण्याची शक्यता
एका बाजूला शेतमालाचे भाव कोसळत असल्याने शेतकरी हवालदील झाला आहे. यातच पाऊस अजून सुरु न झाल्याने शेतकऱ्याची चिंता वाढत आहे. अशा प्रतिकूल परिस्थितीत चव्हाण यांनी नऊ किलोमीटरवरुन पाईपलाईन करुन पाणी आणले आहे. ड्रीपद्वारे काटकसरीने वापरुन पीक जगवत आहेत. या शिमला मिरचीची लागवड टोकाची उष्णता असलेल्या मे महिन्यात केली होती. यामुळे मिरची कशी येईल याबाबत स्वतः चव्हाण साशंक होते. मात्र चव्हाण बापलेकाच्या कष्टाला नशिबाची साथ मिळाली आणि अनपेक्षीतरित्या त्यांना लाखोंचे उत्पन्न मिळाले. केवळ पन्नास दिवसातील शिमला मिरचीच्या पिकामुळे त्यांना 50 लाखापेक्षा जास्तच नफा होण्याची शक्यता आहे. यंदा शिमला मिरचीने दिलेल्या साथीमुळे आता पाच एकरात मिरची लावायची तयारी चव्हाण कुटुंबाने केली आहे. डाळिंबामध्ये सातत्याने तोटा सहन करणाऱ्या आपल्या शेतकरी बांधवानी आंतरपीक म्हणून शिमला मिरचीची लागवड केल्यास चार पैसे मिळतील असा सल्ला चव्हाण सांगोल्यातील शेतकऱ्यांना दिला आहे.
दिल्ली, कोलकाता, पटणा येथील मार्केटमध्ये ढोबळी मिरचीला मागणी
तीन एकरात त्यांनी पन्नास हजार रोपांची लागवड केली असून, त्यासाठी उत्तम किटकनाशके फवारली आहेत. त्यासाठी त्यांना सात लाख रुपये खर्च आला. परंतू उत्पन्न चांगले आल्याने पहिल्याच तोड्यात झालेला खर्च निघाल्याने आता येणारा प्रत्येक रुपया हा त्यांच्यासाठी फायदा ठरत आहे. यापूर्वी शिमला मिरचीला एवढा भाव कधीच मिळाला नाही. त्यामुळे चव्हाण खूप आनंदीत आहेत. केवळ पन्नास दिवसांत उत्पन्न मिळते तसेच भाव मिळतो. त्यामुळं तालुक्यातील शेतकऱ्यांनी ढोबळी मिरचीची लागवड करावी असे बळीराम चव्हाण यांचं आवर्जून सांगणं आहे. दिल्ली, कोलकाता, पटणा येथील मार्केटमध्ये सांगोला तालुक्यातील ढोबळी मिरचीला चांगली मागणी आहे. शिवाय व्यापारी बांधावर येऊन माल घेऊन जातात त्यामुळे वाहतुकीचा खर्च नसल्याचे चव्हाण सांगतात .
महत्त्वाच्या बातम्या: