(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Vegetables Prices : कांद्यासह लसूण आणि टोमॅटोच्या पुरवठ्यात वाढ, दरांमध्ये घट झाल्यानं शेतकऱ्यांना फटका
Vegetables Prices : कांदा, लसूण आणि टोमॅटोच्या पुरवठ्यात वाढ झाली आहे. त्याचा परिणाम दरांवर झाला आहे.
Vegetables Prices : देशातील काही राज्यांमध्ये चांगला पाऊस (Rain) झाला आहे, तर काही राज्यात पावसाचं प्रमाण कमी आहे. ज्या राज्यांमध्ये चांगला पाऊस झाला आहे, तेथील शेतकरी समाधानी असून, पिकं जोमात आहेत. महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि मध्य प्रदेश या राज्यात भाजीपाल्याचे (Vegetables) उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतलं जातं. या राज्यांमध्ये आत्तापर्यंत समाधानकारक पाऊस झाला आहे. त्यामुळं या राज्यातील कांदा, लसूण आणि टोमॅटोच्या पुरवठ्यात वाढ झाली आहे. त्याचा परिणाम दरांवर झाला आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा कांदा, लसूण आणि टोमॅटोच्या बाजारभावात चांगलीच घसरण झाली आहे.
दरम्यान, बंपर उत्पादन आणि पुरेसा पुरवठा यामुळं या प्रमुख कृषी मालाच्या किंमती पुढील दोन महिन्यांमध्ये आणखी घसरतील असा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे. कांद्याच्या बेंचमार्क किंमतीत देखील मागील वर्षीच्या तुलनेत घट झाली आहे. महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील लासलगाव बाजारपेठेत कांद्याच्या किंमतीत 29 टक्क्यांची घसरण झाली आहे. सध्या कांद्याचे दर हे 1 हजार 152 रुपये प्रति क्विंटलवर आले आहेत. साठवलेल्या रब्बी कांद्याचा एकूण उत्पादनात वाटा हा 60 टक्के आहे.
यावर्षी काद्यांच्या उत्पादनात वाढ होण्याची शक्यता
दिल्लीतील आझादपूर ही देशातील सगळ्यात मोठी बाजार समिती आहे. फळे आणि भाज्यांसाठी सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून प्रसिद्ध आहे. या बाजार समितीत कांद्याच्या किंमती या 15 रुपये किलोच्या आसपास आहेत. कमी उत्पादनामुळं गेल्या वर्षी किंमती 30 रुपये किलोच्या आसपास होत्या, अशी माहिती व्यापाऱ्यांनी दिली आहे. दरम्यान, 2021-22 पीक वर्षात कांद्याचे उत्पादन अंदाजे 31.7 दशलक्ष मेट्रीक टन (MT) होण्याची शक्यता आहे. जे मागील वर्षाच्या तुलनेत 20 टक्के अधिक आहे. इंदौर, मध्य प्रदेशमध्ये ही लसूण पिकाची प्रमुख राज्य आहेत. या राज्यातमध्ये लसणाच्या किंमतीत 50 टक्क्यांची घट झाली आहे. मध्य प्रदेशातील मंदसौर प्रदेशात यावर्षी लसणाच्या उत्पादनात वाढ झाली आहे. तिथेही लसणाच्या दरात घसरण झाली असून, शेतकरी संकटात सापडला आहे. मध्य प्रदेशातील मंदसौर, शाजापूर, उज्जैन आणि नीमच हे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर लसणाचे उत्पादन घेतले जाते.
मागील वर्षीच्या तुलनेत टोमॅटोच्या दरात 10 टक्क्यांची घसरण
कर्नाटकातील कोलार इथे टोमॅटोचे दरहे 870 रुपये प्रति क्विंटल राहिले आहेत. जे मागील वर्षीच्या तुलनेत 10 टक्क्यांनी कमी आहेत. महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश या प्रमुख टोमॅटो उत्पादक राज्यांमध्ये मार्च-एप्रिल दरम्यान उष्णतेच्या लाटेचा उत्पादनावर विपरित परिणाम झाला आहे. जूनमध्ये देशभरात टोमॅटोच्या किंमती वाढल्या होत्या. सध्या, प्रमुख शहरांमध्ये टोमॅटोच्या किरकोळ किंमती या 35 ते 40 रुपये प्रति किलो आहेत.
महत्त्वाच्या बातम्या: