Ajit Nawale: ऊस तोडणीसाठी शेतकऱ्यांची आत्महत्येची भाषा, कारखानदार काय भूमिका घेणार? अजित नवलेंचा सवाल
ऊस तोडणीसाठी शेतकऱ्यांकडून आत्महत्या करायची भाषा होत आहे. अशात आपण काय भूमिका घेणार असा सवाल किसान सभेचे नेते अजित नवलेंनी केला.
Ajit Nawale on Sugarcane : अगस्ती सहकारी कारखान्यांमध्ये ऊस तोडीचे योग्य व्यवस्थापन होत नसल्याचा आरोप किसान सभेचे नेते डॉ. अजित नवले यांनी केला आहे. बाहेरुन ऊस आणण्यात वरची कमाई जास्त मिळत असल्यामुळे, अगस्ती कारखान्यामध्ये सत्तेवर असणारे नेते आणि त्यांचे बगलबच्चे बाहेरुन ऊस आणण्यासाठी अधिक तत्पर असतात असेही नवले यांनी म्हटले आहे. मागील गळीत हंगामामध्येसुद्धा कार्यक्षेत्रातील ऊस अशाच प्रकारे उभा राहिल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये अत्यंत संतापाची भावना होती. ही चूक चालू गळीत हंगामात तरी करु नका अशी वारंवार मागणी आम्ही संबंधितांना केली होती असे नवलेंनी सांगितले. ऊस तोडणीसाठी शेतकऱ्यांकडून आत्महत्या करायची भाषा होत आहे. अशात आपण काय भूमिका घेणार असा सवालही नवलेंनी उपस्थित केला.
कारखान्याच्या सर्व सत्ताधाऱ्यांना जाब विचारण्यासाठी रणांगणात उतरण्याची वेळ आली असल्याचे नवले म्हणाले. उसाला तोड दिली नाही तर विहिरीत उडी मारुन जीवन यात्रा संपवेल अशी टोकाची उद्विग्न भूमिका प्रवीण कचरु आहेर या अकोले येथील ऊस उत्पादक शेतकऱ्यांने घेतली आहे. अकोले तालुका हा क्रांतिकारकांचा, चळवळ करणाऱ्यांचा तालुका आहे. शेतकरी आंदोलनाची खोलवर पायाभरणी झालेला हा तालुका आहे. अशा तालुक्यामध्ये प्रवीण सारख्या शेतकऱ्याला अशी टोकाची भूमिका जाहीर करायला लागणं हे आपल्या सर्वांसाठीच अत्यंत क्लेशदायक बाब असल्याचे अजित नवलेंनी म्हटले आहे. वर्षानुवर्ष भ्रष्टाचाराच्या माध्यमातून लोण्याचे गोळे खाण्याची सवय लागलेल्यांना उघडे पाडू या असेही नवले म्हणाले.
अकोले तालुक्यातील विविध शेतकरी संघटनांनी आणि कार्यकर्त्यांनीसुद्धा याबाबत अत्यंत टोकाचा आग्रह लावून धरला होता. अकोले तालुक्यातील ऊस तोडीला प्राधान्य देण्याची वारंवार मागणी केली होती. मात्र बाहेरुन ऊस आणण्यामध्ये आर्थिक हितसंबंध सामावलेल्या लोकांनी यावर्षीही कार्यक्षेत्रातील ऊस तसाच उभा ठेवण्याचे पाप केल्याचे नवले म्हणाले. प्रवीण आहेर सारख्या शेतकऱ्यांना त्यामुळे अतोनात आर्थिक नुकसान सहन करावे लागले आहे. शिवाय प्रचंड मानसिक छळाला सामोरे जावे लागल्याचे नवलेंनी म्हटले आहे. या सर्व गोष्टींना कारखान्याचे विद्यमान सत्ताधारी जबाबदार असल्याचे नवले म्हणालेत.
कारखान्याच्या सर्व सत्ताधाऱ्यांना जाब विचारण्यासाठी रणांगणात उतरण्याची वेळ आली आहे. अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीचे आंदोलन अत्यंत निर्णायक दिशेने पुढे जात आहे. ते आंदोलन अर्धवट सोडण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. आमच्यात आपसात कुरघोड्या लावून देऊन हे आंदोलन कमजोर करण्याचे सत्ताधाऱ्यांचे प्रयत्न सुरु आहेत. मात्र त्याला कसे पुरुन उरायचे हे आम्हाला पक्के ठाऊक आहे. त्यामुळे अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीचे आंदोलन नेटाने पुढे जाईल असा विश्वास अजित नवले यांनी व्यक्त केला. आता ऊस उत्पादकांचा तळतळाट जो कार्यक्षेत्रामध्ये उभा राहतो आहे, त्याच्याबद्दल सुद्धा एक झंझावाती आंदोलन ऊस उत्पादकांच्या वतीने उभे होईल. प्रवीण सारख्या शेतकरी मित्रांना मी आवाहन करतो की आत्महत्या करणे हा उपाय नाही. एकत्र येऊ या ! आरपारची लढाई करु या ! वर्षानुवर्ष भ्रष्टाचाराच्या माध्यमातून लोण्याचे गोळे खाण्याची सवय लागलेल्यांना उघडे पाडू या असे आवाहन यावेळी नवलेंनी केले.
महत्त्वाच्या बातम्या:
- Sugarcane News : अहमदनगरमध्ये अतिरीक्त उसाचा प्रश्न, गाळपाची जबाबदारी 'या' साखर कारखान्यांवर
- Monsoon News : दिलासादायक! यंदा वरुणराजाचं आगमन लवकरच, 10 दिवस आधीच मान्सून केरळच्या किनारपट्टीवर धडकणार