Dhule Rain : धुळ्यातील दोंडाईच्या रेल्वे स्थानकावर पावसाच्या पाण्यात भिजल्या खतांच्या गोण्या, कृषी विभागाचे दुर्लक्ष
धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील दोंडाईच्या रेल्वे स्थानकावर असलेल्या खतांच्या गोण्या (fertilizers) पावसाच्या पाण्यात भिजल्या आहेत. यामध्ये लाखो रुपयांच्या खतांचे नुकसान होत आहे.
Dhule Rain : राज्याच्या विविध भागात पावसानं (Rain) जोरदार हजेरी लावली आहे. नदी नाले दुथडी भरुन वाहत आहेत. अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं आहे. धुळे (Dhule) जिल्ह्यातही जोरदार पाऊस झाला आहे. धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील दोंडाईच्या रेल्वे स्थानकावर असलेल्या खतांच्या गोण्या (fertilizers) पावसाच्या पाण्यात भिजल्या आहेत. यामध्ये लाखो रुपयांच्या खतांचे नुकसान होत आहे.. याकडं रेल्वे प्रशासनासह कृषी विभागाने लक्ष द्यावे अशी मागणी केली जात आहे.
धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील दोंडाईच्या रेल्वे स्थानकावर लाखो रुपयांच्या खतांच्या गोण्या पावसाच्या पाण्यात भिजल्या आहेत. गेल्या तीन ते चार दिवसांपासून दहा वेगवेगळ्या कंपन्यांच्या खतांच्या गोण्या या दोंडाईच्या रेल्वे स्थानकावर पडल्या आहेत. हे खत मागवले कोणी? याचे डीलर कोण? या ठिकाणी पावसात भिजत पडलेले हे खत अद्याप कोणीच का उचलले नाही? असे अनेक प्रश्न यातून उपस्थित होत आहेत. विशेष म्हणजे हे खत मागवले कोणी आणि याचे डीलर कोण याबाबत कोणतीच माहिती रेल्वे प्रशासन आणि कृषी विभागाकडे नसून यामुळं लाखो रुपयांचे नुकसान होत आहे. दोंडाईच्या रेल्वे स्थानकावर पत्र्याचे शेड उभारण्या संदर्भात वारंवार सांगून देखील रेल्वे प्रशासनाने अद्याप याची दखल घेतलेली नाही. एकीकडे शेतकऱ्यांना शेतीसाठी लागणारी खते विकत घेण्यासाठी जास्तीचे पैसे मोजावे लागत आहेत. तर दुसरीकडे खतांचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे. याकडे रेल्वे प्रशासनासह कृषी विभागाने देखील लक्ष द्यावे अशी मागणी होत आहे.
राज्याच्या विविध भागात पावसाची हजेरी
सध्या राज्यात जोरदार पाऊस कोसळताना दिसत आहे. अनेक ठिकाणी नदी नाल्यांना पूर आले आहेत. या पावसामुळं काही ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं आहे. तर काही ठिकाणी शेती पिकांना देखील या पावसाचा फटका बसला आहे. विशेषत: मराठवाडा आणि विदर्भाला या पावसाचा मोठा फटका बसला आहे. दरम्यान, मुंबईसह परिसरात जोरदार पावसानं हजेरी लावली आहे. त्याचबरोबर मराठवाड्यासह, कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातील काही जिल्ह्यात देखील पावसाची संततधार सुरुच आहे. दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार आज राज्यातील कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात यलो अलर्ट देण्यात आला आहे.
कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली. पावसाचा जोर काहीसा कमी झाला आहे. मात्र, धरण पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या पावसाने नद्यांच्या पाणी पातळीत वाढ सुरु आहे. राजाराम बंधाऱ्यावर पंचगंगेची पाणी पातळी 41 फुटांच्या पुढे गेली आहे. त्यामुळं नागरिकांना सतर्कतेचा इशार देण्यात आला आहे. जिल्ह्यातील 74 बंधारे अजूनही पाण्याखाली आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील 7 राज्य मार्गांवर पाणी आलं आहे. तसेच जिल्ह्यातील प्रमुख 24 मार्ग पाणी आल्याने बंद आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील 31 मार्गांवर थेट संपर्क तुटल्याने पर्यायी मार्गाने वाहतूक सुरु आहे. 7 राज्यमार्गांवर 12 ठिकाणी पाण्याने वेढा दिला आहे. प्रमुख 24 मार्गावर 26 ठिकाणी पाण्याचा विळखा आहे.
महत्त्वाच्या बातम्या: