Nanded : नांदेडमध्ये खतांची कृत्रीम टंचाई, कर्नाटक आणि तेलंगणामध्ये चढ्या भावाने विक्री
व्यापाऱ्यांकडून खतासाठी शेतकर्यांची अडवणूक होत असून राज्यातील शेतकऱ्यांच्या हक्काचे खत परराज्यात चढ्याभावाने विक्री केलं जात आहे.
नांदेड : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या हक्काच्या खतांची आंध्रप्रदेश, तेलंगणा, कर्नाटक राज्यातील व्यापाऱ्यांकडून चोरी होत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. महाराष्ट्रातील DAP,18:18,20:20:10 खतांचा साठा कमी दरात घेऊन तेलंगणा, आंध्रप्रदेश, कर्नाटकात दोन हजार रुपयांनी विक्री होत असल्याचा धक्कादायक प्रकार नांदेड जिल्ह्याच्या सीमावर्ती होत आहे.
शेतकऱ्यांच्या हक्काचे खत परराज्यातील व्यापाऱ्यांच्या घशात जात असल्याने नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खत टंचाईच्या झळा बसत आहेत. नांदेड, तेलंगणा, आंध्रप्रदेश, कर्नाटक राज्यातील व्यापाऱ्यांच्या संगनमताने नांदेडात कृत्रिम खत टंचाई निर्माण केली जात आहे.
खरीप हंगाम सुरू होण्यापूर्वी सर्व काही ठीक असल्याचा दावा जरी कृषी विभाग आणि राज्य सरकारकडून केला जात असला तरी खरीपाचे वास्तव काही वेगळेच आहे. शेतकर्यांना डीएपी या खताबरोबर लिंकिंग मध्ये सल्फर सुद्धा घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. भाववाढीचा प्रश्न सतावत असताना नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खतांच्या कृत्रीम टंचाईलाही आता सामोरे जावे लागत आहे. कारण नांदेड जिल्ह्यात अद्याप मागणीच्या तुलनेत खताचा पुरवठा झालेला नाही, असे खत विक्रेत्यांकडून सांगितलं जात आहे.
नांदेड जिल्ह्याचा सीमावर्ती भाग असणाऱ्या आंध्रप्रदेश, कर्नाटक आणि तेलंगणाच्या शेतकर्यांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा हक्काच्या खतावर डल्ला मारलाय. कारण आंध्रप्रदेश, तेलंगणा,कर्नाटक राज्यात DAP,20:20:10,18:18 ही खते 2 हजार ते 2100 रुपये दर आहे. या खतांची एक बॅग महाराष्ट्रात 1350 रुपये इतकी आहे. तर तेलंगणाच्या शेतकर्यांची मागणी ही डीएपी खताला जास्त असल्यामुळे त्या ठिकाणचा सीमावर्ती भागातील शेतकरी महाराष्ट्रात येऊन ही खते खरेदी करून परिपूर्णता करत आहे. दरम्यान तेथील शेतकर्यांना एक बॅग दोन हजारच्या भावाने विकल्या जात असल्याने तेलंगणातील शेतकरी हे सीमावर्ती भागातील कृर्षी सेवा केंद्रातून चढ्याभावाने खत खरेदी करीत असल्याचे चित्र आहे. त्यामुळेच नांदेड जिल्ह्यातील खत व्यापारी खताची कृत्रीम टंचाई निर्माण करत तेलंगणातील शेतकर्यांना विक्री करत आहेत. तर ही परिस्थिती अशीच चालू राहिल्यास नांदेड जिल्ह्यासह मराठवाड्यातील शेतकर्यांना प्रचंड अडचणीस समोर जावे लागणार आहे. त्यामुळे खतांचा काळाबाजार करून विक्री करणाऱ्या कृषी केंद्रावर आणि व्यापाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी विविध शेतकरी संघटना तसेच शेतकरी वर्गातून होत आहे.