(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Raju Shetti : शेतमालाला हमीभाव हवा असेल तर शेतकऱ्यांनी जागृत होणं गरजेचं, राजू शेट्टींची मेघालयमध्ये पूर्वोत्तर राज्यातील शेतकरी नेत्यांशी चर्चा
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टींनी पूर्वोत्तर राज्यातील शेतकरी नेत्यांशी चर्चा केली. यावेळी त्यांनी हमीभावासाठी लढा उभारण्याचं आवाहन केलं आहे.
Raju Shetti : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी (Raju Shetti) यांची पूर्वोत्तर राज्यातील शेतकरी नेत्यांच्या बरोबर एक अत्यंत महत्वाची बैठक शिलाँगमध्ये पार पडली. यामध्ये किसान मोर्चाच्या झेंड्याखाली देशपातळीवर हमीभावाच्या कायद्यासाठी जे आंदोलन सुरु आहे, त्याच्या जनजागृतीचा आढावा घेण्यात आला. तसेच हमीभावाच्या कायद्याची मागणी करणारे गावसभेचे ठराव पूर्वोत्तर राज्यातून जास्तीत जास्त कसे एकत्रित करायचे, यावर सविस्तर चर्चा झाल्याची माहिती राजू शेट्टी यांनी दिली. शेतमालाला हमीभाव हवा असेल तर शेतकऱ्यांनी जागृत होणे गरजेचे असल्याचे शेट्टी यावेळी म्हणाले.
हमीभावासाठी शेतकऱ्यांनी लढा उभारावा
दरम्यान,आसाम, सिक्कीम, मिझोराम, नागालँड, मणिपूर, त्रिपुरा व अरुणाचल प्रदेश या राज्यामध्ये शेतकरी मेळावे घेण्याचे देखील या बैठकीत ठरले आहे. या सर्व मेळाव्यांना मी व व्ही एम सिंग आम्ही दोघेही उपस्थित राहू असेही शेट्टींनी सांगितले. हमीभावाच्या कायद्याच्या मागणीवर सर्वच शेतकरी नेते अतिशय उत्साहित होते. शेतकऱ्यांच्या शेतमालाला जर हमीभाव हवा असेल तर शेतकऱ्यांनी जागृत होणे गरजेचे आहे. तुमच्या घामाचे दाम हवे असतील तर मेघालयातील शेतकऱ्यांनी हमीभावाच्या लढाईसाठी मोठा लढा उभा करावा असे आवाहन राजू शेट्टी यांनी केलं. दरम्यान मेघालयात पिकवला जाणारा फणस, बिन्स, अननस, सुपारी, कोबी, या पिकांना बाजारात चांगला दर मिळावा, त्यासाठी प्रयत्न करायला हवेत. तसेच लोकसभेत हमीभावाचा कायदा संमत होईल त्यावेळी सर्व पिकांचा व पालेभाज्यांचा किमान उत्पादन खर्च भरुन निघेल असे शेट्टी म्हणाले. उसाप्रमाणे इतरही पिकांना हमीभाव मिळावा अशी मागणी त्यांनी केली.
राजू शेट्टी हे मेघालय दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी तेथील शेतकरी नेत्यांच्या गाठीभेटी घेतल्या तसेच शेतीप्रश्नावर चर्चा देखील केली. यावेळी राजू शेट्टी यांनी मेघालयचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांची देखील मेघालय राजभवनात भेट घेतली. यावेळी त्यांनी मेघालय राज्यातील व देशातील शेती प्रश्नाबाबत चर्चा केली. राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी आजपर्यंत शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नावर तसेच दिल्लीतील शेतकरी आंदोलनावेळी केंद्र सरकारच्या धोरणाविरोधात स्पष्टपणे बोलत आपली भुमिका मांडली आहे. यावेळी अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीचे समन्वयक व्ही.एम. सिंग हेदेखील उपस्थित होते.