(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Crop Competition : शेतकऱ्यांसाठी कृषी विभागाचा पुढाकार, प्रोत्साहन देण्यासाठी पीक स्पर्धेचं आयोजन
कृषी विभागाच्या वतीनं पीक स्पर्धेचं (Crop Competition) आयोजन करण्यात येणार आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन शेतकऱ्यांनी अधिकाधिक उत्पादन घ्याव यासाठी स्पर्धेचं आयोजन केलं आहे.
Crop Competition : शेतकऱ्यांचे उत्पादन वाढावं, तसेच त्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा (Modern technology) वापर करावा यासाठी सातत्यानं कृषी विभागाच्या (Department of Agriculture) वतीनं विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. शेतकऱ्यांमध्ये जागृती करण्यासाठी उपक्रम देखील राबवले जातात. आता कृषी विभागाच्या वतीनं पीक स्पर्धेचं (Crop Competition) आयोजन करण्यात येणार आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन शेतकऱ्यांनी अधिकाधिक उत्पादन घेण्यासाठी स्पर्धात्मक वातावरणाची निर्मिती करणे, तसेच त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्यात खरीप हंगामासाठी पीक स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे.
पीक स्पर्धेत 11 पिकांचा सहभाग
पीक स्पर्धेत खरीप हंगामातील भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी (रागी), तूर, सोयाबीन, भुईमूग, सुर्यफूल, मूग व उडीद या 11 पिकांचा समावेश करण्यात आला आहे. तालुक्यामध्ये 1 हजार हेक्टरहून अधिक लागवड क्षेत्र असलेल्या सर्व पिकांकरिता पीक स्पर्धा आयोजीत केली जाणार आहे. पीक स्पर्धेसाठी तालुका पातळीवर सर्वसाधारण गटातील किमान 10 स्पर्धक तर आदिवासी गटातील किमान 5 स्पर्धकांचा सहभाग आवश्यक आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी 300 रुपये प्रति शेतकरी प्रति पीक या प्रमाणे प्रवेश शुल्क आकारले जाणार आहे.
एकापेक्षा अधिक पिकांसाठी स्पर्धेत भाग घेता येणार
एक शेतकऱ्याला एकापेक्षा अधिक पिकांसाठी स्पर्धेत भाग घेता येणार आहे. पूर्वी जिल्हा आणि राज्य पातळीवर वेगवेगळे शुल्क भरुन पीक स्पर्धेत भाग घ्यावा लागत होता. आता मात्र, तालुका पातळीवर एकदाच प्रवेश शुल्क भरावे लागणार आहे. पीक कापणी वरुन आलेल्या उत्पादकतेच्या निकालानुसार पीक स्पर्धेतील विजेत्यांची तालुका पातळीवर निवड केली जाणार आहे. मागील दोन वर्षात तालुका पातळीवर प्रथम दोन क्रमांक आलेले आहेत, असे शेतकरी जिल्हा पातळीवर पीक स्पर्धेमध्ये भाग घेण्यास पात्र असतील. तालुका व जिल्हा पातळीवरील पीक स्पर्धा स्वतंत्र होणार आहे. पीक स्पर्धेसाठी तालुका पातळीवर सर्वसाधारण गटातील किमान 10 स्पर्धक तर आदिवासी गटातील किमान 5 स्पर्धकांचा सहभाग आवश्यक असणार आहे.
मूग व उडीद या पिकांसाठी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस
मूग व उडीद या पिकांसाठी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख आजची म्हणजे 31 जुलै 2022 आणि इतर पिकामध्ये भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी (रागी), तूर, सोयाबीन, भुईमूग, सूर्यफूल या पिकांसाठी 31 ऑगस्ट 2022 पर्यंत आहे. त्यामुळं जे शेतकरी मूग व उडीद या पिकांसाठी अर्ज दाखल करणार आहेत, त्यांच्यासाठी आजचा अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळं अशा शेतकऱ्यांनी यासंबंधीची नोंद घ्यावी. दरम्यान, या पीक स्पर्धेत जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभागी होण्याचं आवाहन कृषी आयुक्तालयाचे कृषी संचालक विकास पाटील यांनी केलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या: