(Source: ECI/ABP News/ABP Majha)
नोकरीसाठी कबड्डीतही बोगस खेळाडूंचा सुळसुळाट; विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर गडांतर; चौकशीही मागणी
अकोल्यात कालपासून 19 वर्षाखालील राज्यस्तरीय शालेय कबड्डी स्पर्धेला सुरुवात झाली आहे.
अकोला : निवडणुकांच्या काळात गेल्या काही दिवसांपासून बोगस मतदान, बोगस मतदार हा शब्द चांगलाच प्रचलित झाल्याचं पाहायला मिळालं. मात्र, हीच बोगसगिरी आता खेळामध्येही दिसून येत आहे. अकोला (Akola) येथे सध्या 19 वर्षाखालील राज्यस्तरीय शालेय कबड्डी स्पर्धा सुरू आहेत. मात्र, या स्पर्धेतील सहभागी अनेक संघांनी आपल्या संघांत बोगस खेळाडूंचा भरणा केल्याचा आरोप प्रशिक्षक आणि विद्यार्थ्यांनी केला आहे. तसेच, या स्पर्धेत वयाची खोटी प्रमाणपत्र सादर करत 19 वर्षांवरील खेळाडूंचा सहभाग स्पर्धेत असल्याचेही आरोप कबड्डी (Kabaddi) प्रशिक्षक गुड्डू देशमुख यांनी केले आहेत. या आरोपाला येथील काही खेळाडूंनीदेखील दुजोरा दिला आहे.
अकोल्यात कालपासून 19 वर्षाखालील राज्यस्तरीय शालेय कबड्डी स्पर्धेला सुरुवात झाली आहे. शहरातील वसंत देसाई शासकीय क्रीडा संकुलात ही स्पर्धा सुरू असून खेळाडूप्रेमींचे व शालेय शिक्षकांचेही लक्ष याकडे लागले आहे. या स्पर्धेत राज्यभरातील शेकडो संघांनी आपला सहभाग नोंदवला. स्पर्धेतून राज्यस्तरावरचा संघ राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवडला जाणार आहे. मात्र, 19 वर्ष वयोगटातील खेळाडूंच्या नावावर जास्त वय असलेल्या खेळाडूंना घुसवल्याचा गंभीर आरोप होत आहे. राज्यातील काही व्यावसायिक खेळाडूंचा शाळांमध्ये कागदोपत्री प्रवेश दाखवून हे खेळाडू स्पर्धेत घुसवण्यात आल्याचं बोललं जातंय. याबाबत, यवतमाळ येथील दुर्गेश मेंढे या सहभागी कबड्डी खेळाडूने संताप व्यक्त केला आहे. तसेच, असा प्रकार घडत असल्यास आमच्यासमोर पर्यायच उरत नाही, असेही त्यांने म्हटलंय. तसेच, कबड्डी प्रशिक्षक गुड्डू देशमुख, यांनीही हा प्रकार गंभीर असल्याचे सांगत चौकशीची मागणी केली आहे.
शालेय क्रीडा स्पर्धेत विद्यार्थ्यांच्या नावावर व्यावसायिक क्रीडापटूंचा भरणा केला जात असल्याचा हा आरोप आहे. कबड्डीच्या एका संघात 12 जणांची निवड केली जाते. विजयी संघाच्या बाराही खेळाडूंना राज्यस्तरीय खेळाडूचे प्रमाणपत्र मिळते. याच प्रमाणपत्राच्या आधारावर नोकऱ्यांमध्ये आरक्षण दिले जाते. या प्रमाणपत्रातून क्रीडा आरक्षणाचा लाभ मिळवण्यासाठी मोठा आर्थिक गोरखधंदा होत असल्याचा आरोपही संबधितांकडून होत आहे. दरम्यान, यासंदर्भात पुराव्यांसह तक्रार केल्यास संबंधितांवर कारवाई करण्याचं आश्वासन क्रीडा विभागांनं दिलं आहे. डॉ.सतिशचंद्र भट, जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी याची दखल घेतली आहे. दरम्यान, अशा प्रकाराची व गंभीर आरोपाची उच्चस्तरीय चौकशी होणे आवश्यक आहे, तरच चांगले खेळाडू या खेळात समोर येऊ शकतील. अन्यथा क्रीडा प्रकारावरूनही गोरगरीब व सर्वसामान्यांचा विश्वास उडेल.
हेही वाचा
राष्ट्रवादी अन शिवसेनेला केंद्रात मंत्रिपद; शिंदेंना स्थान?; महाराष्ट्रातील विजयानंतर दिल्लीत खलबतं