(Source: ECI/ABP News/ABP Majha)
पालघरचा चिकू 24 तासांत दिल्लीत; किसान रेल्वेमुळे शेतकऱ्यांना फायदा
किसान रेल्वेतून पालघर मधील चिकू 24 तासांत दिल्लीला पोहोचला. पालघलमधील डहाणू, घोलवड आणि परिसरातील चिकू अवघ्या 24 तासांत दिल्लीला पोहोचत असल्याने चिकू उत्पादक शेतकऱ्यांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
Palghar : शेतकऱ्यांसाठी सुरू करण्यात आलेल्या किसान रेल्वेमुळे शेतकऱ्यांना आता सुगीचे दिवस येऊ लागले आहेत. देशभरात प्रसिद्ध असलेला आणि भौगोलिक मानांकन मिळालेला डहाणूतील घोलवड आणि परिसरातील चिकू अवघ्या 24 तासांत दिल्लीला पोहोचत असल्याने चिकू उत्पादक शेतकऱ्यांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. किसान रेल्वेमुळे शेतकऱ्यांच्या होणाऱ्या नुकसानीत घट झाली असून वाहतूक खर्चात बचत झाली आहे.
शेतकऱ्यांच्या मालाची वाहतूक करण्यासाठी सुरू केलेल्या किसान रेल्वेतून पालघर मधील चिकू 24 तासांत दिल्लीला पोहोचला आहे. पालघरमध्ये तब्बल पाच हजार हेक्टरवर चिकू लागवड करण्यात आली असून या भागात दीडशे ते दोनशे टन प्रती दिवस एवढं चिकूचं उत्पादन घेतल जातं. कोरोना काळात सुरू करण्यात आलेल्या पश्चिम रेल्वेच्या किसान रेल्वेमधून मागील वर्षभरात 123 ट्रेनमधून तब्बल 35 हजार टन चिकू दिल्लीला रवाना झाला आहे.
पालघर मधील डहाणू, घोलवड, वाणगाव येथील चिकू देशभरात प्रसिद्ध असून परदेशातही या चिकुला मोठी मागणी आहे. मात्र कोरोना काळात या नाशवंत असलेल्या चिकू फळाचे उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांवर मोठं संकट ओढवलं होतं. नाशवंत असलेला चिकू वेळेत योग्य ठिकाणी पोहोचत नसल्याने त्याचा मोठा फटका शेतकरी आणि व्यापाऱ्यांना बसत होता. मात्र, किसान रेल्वेच्या माध्यमातून हा चिकू आता अवघ्या 24 तासात दिल्लीला पोहोचत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिकूच्या वाहतुकीवर होणाऱ्या खर्चात बचत होत आहे.
डहाणू घोलवड मधील चिकू दिल्लीपर्यंत ट्रक मधून पोहोचण्यास तब्बल 32 ते 34 तास लागत असल्याने वाहतुकीदरम्यान चिकूचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असे. मात्र किसान रेल्वेमुळे संकटात सापडलेल्या चिकू उत्पादक शेतकऱ्यांना पुन्हा एकदा सुगीचे दिवस आले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांकडूनही समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
महत्वाच्या बातम्या
- Fertilizer Price : गेल्या महिन्यात 900 रुपयात मिळणारं पोटॅश खत आज 1800वर कसं? शेतकऱ्यांचे सवाल
- सुपरफास्ट ऊसतोड्या! कोयत्याच्या जोरावर भीमपराक्रम; एका दिवसात तब्बल 16 टन ऊस तोडला
- विद्यापीठ शेतकऱ्यांना देणार दुग्धजन्य पदार्थ निर्मितीचे प्रशिक्षण, कोल्हापूरला प्रशिक्षण केंद्र उभारणार
- खतांच्या किंमतीत मोठी वाढ, पाहा कोणत्या खतांच्या किंमतीत किती झाली वाढ