(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Agriculture News : कृषी क्षेत्राच्या गुणात्मक वृद्धीसाठी CCRI संस्थेनं शेतकऱ्यांपर्यंत तंत्रज्ञान पोहोचवावं : नितीन गडकरी
केंद्रीय लिंबूवर्गीय फळ संशोधन संस्थेनं शेतकऱ्यांपर्यंत तंत्रज्ञान पोहोचवण्यासाठी एक उत्प्रेरक म्हणून काम करावं असं मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केलं.
Agriculture News : केंद्रीय लिंबूवर्गीय फळ संशोधन संस्थेनं (Central Citrus Research Institute) शेतकऱ्यांपर्यंत तंत्रज्ञान पोहोचवण्यासाठी एक उत्प्रेरक म्हणून काम करायला पाहिजे. या संस्थेमधील उत्तम तंत्रज्ञान कृषी क्षेत्राच्या गुणात्मक वृद्धीसाठी कामी आलं पाहिजे असं वक्तव्य केंद्रीय रस्ते वाहतूक महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केलं. या संस्थेन जगातील सर्वोत्कृष्ट पद्धतींचा अवलंब करण्यासाठी इतर संस्थांसोबत संयुक्त भागीदारी केली पाहिजे, असे आवाहनही नितिन गडकरी यांनी केलं.
भारतीय कृषी संशोधन संस्थेच्या (आयसीएआर) अंतर्गत अमरावती रोड येथील केंदीय लिंबूवर्गीय फळ संशोधन संस्थेच्या (सीआयसीआर) वतीनं 'सार्वजनिक खासगी भागीदारीद्वारे रोगमुक्त लिंबूवर्गीय वनस्पतीचे उत्पादन या विषयावर आधारित दोन दिवसीय राष्ट्रीय कार्यशाळेचे उद्घाटन गडकरी यांच्या हस्ते झालं. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आयसीएआरचे सचिव डॉ. त्रिलोचन महापात्रा, सीसीआरआयचे संचालक डॉ . दीलीप घोष, कृषी वैज्ञानिक निवड मंडळाचे माजी अध्यक्ष डॉ .सी .डी . मायी उपस्थित होते.
पिकांच्या गुणवत्तेमध्ये सुधारणा होण्यासाठी संशोधनाची गरज
संत्रा पिकाच्या गुणवत्तेमध्ये सुधारणा होण्यासाठी संशोधनाची गरज आहे. यासाठी संत्र्यांच्या 'रुट स्टॉक 'ची चांगली क्वालिटी सीसीआरआय संस्थेने तयार करुन ती स्वस्त दरात शेतकऱ्यांना देणं आवश्यक आहे. यासाठी खासगी रोपवाटिका यासोबतच डॉ. पंजाबराव कृषी विद्यापीठ तसेच जगातील ज्या संस्थेमध्ये उत्कृष्ट तंत्रज्ञान असेल त्यांच्यासोबत जॉइंट व्हेंचर करावं असे गडकरींनी यावेळी सुचवलं. संत्रा पिक उत्पादन खर्च कमी होण्यासाठी ड्रोनव्दारे नॅनो युरिया फवारणी केल्यास संत्रा पिकांना द्रवरुप युरिया जास्त प्रमाणात मिळेल. त्यामुळं उत्पादन वाढेल असे गडकरी यांनी यावेळी सांगितले.
रोगमुक्त संत्रारोपात वाढ करण्याची गरज
या दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेप्रसंगी संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना उपकरणांचे वितरण सुद्धा करण्यात आले. संत्रापिक लागवड आणि प्रक्रिया उद्योगात चांगली कामगिरी करणाऱ्या रोपवाटिकाच्या मालकांना, प्रक्रिया उद्योगाच्या मालकांना यावेळी मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आलं. याप्रसंगी सीसीआरआयचे संचालक डॉ. दीलीप घोष यांनी संस्थेद्वारे निर्माण करण्यात आलेल्या 'नॅशनल सिट्रस डिपॉझिटरी' विषयी माहिती दिली. यामध्ये देश विदेशातून आणलेल्या संत्रा पिकाच्या 500 जर्मप्लास्मचे संवर्धन करण्यात येत असल्यानं रोगमुक्त रोपांचे वितरण करण्यात आल्याचे डॉ . घोष यांनी सांगितले. दरम्यान, डॉ. सी.डी. मायी यांनी सीसीआरआयद्वारे दरवर्षी लाख ते दीडलाख रोगमुक्त संत्रारोप शेतकऱ्यांना पुरवले जात असल्याची माहिती दिली. यामध्ये अधिक वाढ होण्याची आशा यावेळी त्यांनी व्यक्त केली. यावेळी अधिकारी, नर्सरी मालक, विदर्भातील काटोल वरुड मोर्शी तसेच नागपूर आणि अमरावती जिल्ह्यातील संत्रा उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.