(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Eknath Khadse : शिंदे सरकारचा एकनाथ खडसेंना धक्का, जळगाव दूध संघाचं प्रशासक मंडळ बरखास्त, खडसे म्हणाले...
शिंदे सरकारनं माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे यांना मोठा धक्का दिला आहे. जळगाव जिल्हा दूध संघातील संचालक मंडळ बरखास्त केलं आहे.
Eknath Khadse : भाजपसोबत युती केलेल्या शिंदे गटाच्या सरकारनं माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे ( Eknath Khadse) यांना मोठा धक्का दिला आहे. खडसे यांच्या पत्नी अध्यक्ष असलेल्या जळगाव जिल्हा दूध संघातील ( Jalgaon District Milk Sangh) कारभारातील अनियमिता आणि भ्रष्टाचाराच्या चौकशीसाठी समितीची नियुक्ती करण्यात आली आहे. विद्यमान संचालक मंडळ बरखास्त करत जिल्हा दूध संघावर प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे. या मुद्यावरुन एकनाथ खडसे यांनी शिंदे सरकारवर टीका केली आहे. दूध संघ मिळवण्यासाठी विरोधकांचे हे उपदव्याप असल्याचं खडसेंनी म्हटलं आहे.
दूध संघाचा कारभार पारदर्शक पध्दतीनं चालला
जळगाव जिल्हा दूध संघाची चौकशी करण्यासाठी समितीची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच विद्यमान संचालक मंडळ बरखास्त करण्यात आलं आहे. यावरुन एकनाथ खडसेंनी शिंदे सरकारवर निशाणा साधला आहे.
दूध संघाचा कारभार खूप चांगल्या पध्दतीनं चालला आहे. कारभार पारदर्शक पध्दतीनं चालला हे जळगाव जिल्हृयानं अनुभवलं असल्याचे खडसे म्हणाले. मात्र, ज्यांच्यामुळं हा दूध संघ खड्डयात गेला. त्यांच्या नजरा आता या दूध संघाकडे वळल्या आहेत. त्यामुळं आता कारभार चांगला असताना, त्याची निवडणूक घेण्याऐवजी त्याच्यावर प्रशासक नियुक्त करण्याचा उपदव्याप केला जात असल्याचे एकनाथ खडसे म्हणाले.
लिलाव होणार दूध संघ अवसायनातून बाहेर काढला
जिल्हा दूध संघाच्या कारभारासाठी समिती नियुक्त करण्यात आली असून, दुसरीकडे प्रशासक मंडळ नियुक्त करण्यात आले आहे. यावरुन एकनाथ खडसेंनी शिंदे सरकारवर टिका केली आहे. जिल्हा दूध उत्पादक संघ अवसायनामध्ये गेला होता. या दूध संघाचा लिलाव होणार होता. मात्र, त्यावेळी मंत्री असताना दूध संघ अवसायनातून बाहेर काढला. गेल्या सात वर्षात संचालक मंडळाने दूध संघाची भरभराट केल्याचे एकनाथ खडसे म्हणाले.
राजकीय हेतून समितीची नेमणूक
दूध संघाच्या कारभारसाठी जी समिती नियुक्त करण्यात आली आहे, ती राजकीय हेतूने नियुक्त करण्यात आली आहे. चौकशी समितीचे स्वागत करतो, मात्र ती पारदर्शक पध्दतीने झाली पाहिजे. राजकीय दबावातून होवू नये, अशी अपेक्षाही एकनाथ खडसेंनी व्यक्त केली. दूध संघावर जे प्रशासक मंडळ नियुक्त करण्यात आले आहे, ते नियमबाह्य पध्दतीनं नियुक्त करण्यात आलं आहे. अशा प्रकारचे प्रशासन नियुक्त करण्याचा अधिकार या क्षणी सरकारला नाही. मुख्यमंत्र्यांच्या आदेशाने हे प्रशासन मंडळ नियुक्त करण्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, शासनाच्या मान्यतेने प्रशासन नियुक्त होत असते. त्यामुळं हे प्रशासन मंडळ नियमबाह्य पध्दतीनं नियुक्त करण्यात आलं आहे. यामागे राजकारण असल्याचा आरोपही एकनाथ खडसे यांनी केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
- Maharashtra Political Crisis: कुणी तरी ताकद देत असल्याशिवाय एकनाथ शिंदे इतकं धाडस करणार नाहीत: एकनाथ खडसे
- आजपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे महाराष्ट्र दौऱ्यावर, दौऱ्यात कोणते मोठे निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष